Posts

आध्यात्मिकता २३

स्वत:ला समजून घेतल्याने आणि स्वत:ला कसे जाणून घ्यायचे हे शिकल्यामुळेच माणूस परमशोध लावू शकतो. जेव्हा ‘जडभौतिका’च्या प्रत्येक अणुरेणुमध्ये माणसांना ‘ईश्वर’ आपल्या अंतर्यामी असल्याच्या विचाराची जाणीव होईल, प्रत्येक प्राणिमात्रामध्ये त्यांना ‘ईश्वरा’च्या अस्तित्वाची काही झलक जाणवेल, जेव्हा प्रत्येक मनुष्य त्याच्या बांधवांमध्ये ‘ईश्वरा’ला पाहू शकेल तेव्हा उष:काल होईल, तेव्हा या समग्र प्रकृतीला भारभूत झालेले अज्ञान, मिथ्यत्व, दोष, दुःखभोग, अंधकार भेदले जातील. कारण “सारी ‘प्रकृती’ त्रास सहन करत आहे आणि शोक करत आहे, कारण ती ‘ईश्वरपुत्रांना’ (मनुष्याला) साक्षात्कार कधी होणार याची प्रतीक्षा करत आहे.” हा एक असा मध्यवर्ती विचार आहे की ज्यामध्ये इतर सर्व विचारांचे सार येते; सूर्य ज्याप्रमाणे सर्व जीवन उजळवून टाकतो तसा हा विचार कायम आपल्या स्मरणात असला पाहिजे. एखाद्या दुर्मिळ रत्नाप्रमाणे, खूप मौल्यवान खजिना असल्याप्रमाणे आपण आपल्या हृदयात या विचाराची जपणूक करून, त्यानुसार मार्गक्रमण केले आणि त्या मध्यवर्ती विचाराला, त्याचे ज्योतिर्मय करण्याचे व रूपांतरण करण्याचे कार्य आपल्यामध्ये करू देण्याची मुभा दिली तर, आपल्याला हे कळू शकेल की, सर्व वस्तुमात्रांच्या आणि प्राणिमात्रांच्या अंतर्यामी तो विद्यमान असतो आणि त्यामध्येच या विश्वाचे अद्भुत एकत्व आपण अनुभवू शकतो.

तेव्हा मग आपल्याला आपली मूर्ख भांडणे, आपल्या छोट्याछोट्या इच्छावासना, आपले अंध रोष, किरकोळ समाधानांमधील बालीशपणा आणि फोलपणा लक्षात येईल. आपल्यातील छोटेछोटे दोष विरघळून जात आहेत, आपल्या संकुचित व्यक्तिमत्त्वाचे आणि आपल्या आडमुठ्या अहंकाराचे उरलेसुरले बुरूज ढासळून पडत आहेत असे आपल्याला दिसेल.

‘खऱ्याखुऱ्या आध्यात्मिकते’च्या या उदात्त प्रवाहामध्ये आपले अस्तित्व वाहून जात आहे; तो प्रवाह, संकुचित मर्यादा आणि बंध यांच्यापासून आपली सुटका करत आहे, असे आपल्याला जाणवेल. ‘व्यक्तिगत आत्मा’ आणि ‘विश्वात्मक आत्मा’ हे दोन (भिन्न नसून) एकच आहेत; प्रत्येक विश्वामध्ये, प्रत्येक जिवामध्ये, प्रत्येक वस्तुमध्ये, प्रत्येक अणुमध्ये ईश्वरी उपस्थिती आहे आणि त्याचे आविष्करण करणे हे मनुष्याचे जीवितकार्य आहे.

– श्रीमाताजी [CWM 02 : 40-41]

साधनेची मुळाक्षरे – २२

तुम्ही कोणतीही गोष्ट करत असलात तरी, तुम्ही जे ध्येय तुमच्या स्वत:समोर ठेवले आहे त्या ध्येयाचा कधीही विसर पडू देऊ नका. एकदा का तुम्ही या महान शोधासाठी प्रवृत्त झालात की, कोणतीच गोष्ट लहान वा थोर नसते; सर्व गोष्टी सारख्याच महत्त्वाच्या असतात आणि त्या एकतर तुम्हाला त्वरेने यश मिळवून देऊ शकतात किंवा त्या यशाला उशीर लावतात. भोजनापूर्वी काही सेकंद अशा अभीप्सेने चित्त एकाग्र करा की, तुम्ही जे अन्न ग्रहण करणार आहात त्यामुळे, तुमचे परमशोधासाठी जे प्रयत्न चालू आहेत त्या प्रयत्नांना एक भरभक्कम आधार प्राप्त होईल. तुमच्या शरीराला यथायोग्य असे द्रव्य मिळावे आणि तुमच्या प्रयत्नांमध्ये सातत्य, चिकाटी राहावी म्हणून, त्या अन्नाद्वारे तुम्हाला ऊर्जा प्राप्त होईल.

झोपी जाण्यापूर्वी काही सेकंद अशी इच्छा बाळगा की, त्या झोपेमुळे तुमच्या थकल्याभागल्या नसा पुन्हा ताज्यातवान्या होतील, तुमच्या मेंदूला शांतता आणि शांती प्राप्त होईल. त्यामुळे जागे झालात की, परत ताजेतवाने होऊन, ताज्या दमाने, परमशोधाच्या मार्गावरील तुमची वाटचाल तुम्ही पुन्हा सुरु करू शकाल.

कोणतीही कृती करण्यापूर्वी अशी इच्छा बाळगा की, तुमची कृती तुम्हाला साहाय्यकारी होईल किंवा अगदीच काही नाही तर, परमशोधाच्या दिशेने चाललेल्या तुमच्या मार्गक्रमणामध्ये किमान ती अडथळा तरी ठरणार नाही.

तुम्ही जेव्हा बोलायला सुरुवात करता तेव्हा तुमच्या मुखातून शब्द बाहेर पडण्यापूर्वी, ते शब्द पडताळून पाहण्यासाठी जेवढा कालावधी लागेल तेवढा वेळ चित्त एकाग्र करा आणि जे शब्द बाहेर पडणे नितांत आवश्यक आहेत फक्त त्याच शब्दांना अनुमती द्या; परमशोधाच्या दिशेने चाललेल्या तुमच्या मार्गक्रमणामध्ये कोणत्याही प्रकारे हानीकारक ठरणार नाहीत केवळ त्याच शब्दांना मुखावाटे बाहेर पडण्यास अनुमती द्या.

सारांश रूपाने म्हणायचे तर, तुमच्या जीवनाचे ध्येय आणि तुमचे उद्दिष्ट कधीही विसरू नका. त्या परमशोधाची इच्छा ही नेहमीच तुमच्या वर असली पाहिजे, तुम्ही जे काही करता, तुम्ही जे काही आहात त्या प्रत्येक अस्तित्वाच्या वर असली पाहिजे. तुमच्या अस्तित्वाच्या सर्व हालचालींवर प्रभुत्व गाजवणाऱ्या एखाद्या भल्यामोठ्या प्रकाशपक्ष्याप्रमाणे ती इच्छा असली पाहिजे.

तुमच्या या सातत्यपूर्ण अथक परिश्रमांमुळे, एक दिवस अचानकपणे आंतरिक द्वार खुले होईल आणि एका लखलखीत, प्रकाशमान दीप्तिमध्ये तुमचा उदय होईल, त्यातून तुम्हाला अमर्त्यतेची खात्री पटेल, तुम्ही नेहमीच जिवंत होतात आणि पुढेही जिवंत असणार आहात, केवळ बाह्य रूपे नाहीशी होतात आणि तुम्ही वस्तुत: जे काही आहात त्याच्याशी तुलना करता, ही बाह्य रूपे म्हणजे जणू टाकून दिलेली जीर्ण वस्त्रे असतात, ह्याचा मूर्तिमंत अनुभव तुम्हाला येईल. आणि तेव्हा मग, सर्व बंधनातून मुक्त झालेले तुम्ही ताठपणे उभे राहाल. एरवी प्रकृतीने तुमच्यावर जे परिस्थितीचे ओझे लादलेले असते त्या ओझ्याखाली चिरडून जायला नको असेल तर, तुम्हाला मोठ्या कष्टाने ते ओझे वागवत पुढे चालावेच लागते, ते ओझे सहन करावेच लागते, आता मात्र तसे करावे न लागता, तुम्ही सरळ, खंबीरपणे मार्गक्रमण करू शकाल; आता तुम्हाला तुमच्या नियतीची जाण असेल, आता तुम्ही तुमच्या जीवनाचे स्वामी असाल.

– श्रीमाताजी
(CWM 12 : 32-35)