साधारणपणे शंभर वर्षे किंवा त्याहूनही अधिक काळ समस्त मानवजात एका आजाराने ग्रासली आहे आणि तो आजार दिवसेंदिवस अधिक पसरत चाललेला दिसत आहे आणि आता तर आपल्या काळात त्याने उग्र रूप धारण केले आहे; त्याला आपण ‘उपयुक्ततावाद’ म्हणतो. माणसे आणि वस्तू, परिस्थिती आणि कृती, उपक्रम या गोष्टी जणूकाही केवळ त्याच दृष्टिकोनातून बघितल्या जातात आणि जोखल्या जातात असे वाटते. जर एखादी गोष्ट उपयुक्त नसेल तर तिला काही मोलच नसते. जे अजिबात उपयुक्त नाही त्यापेक्षा काहीतरी जे उपयुक्त आहे ते निश्चितच अधिक चांगले आहे. पण यासाठी उपयुक्त म्हणजे काय यावर आधी आपले एकमत व्हावे लागेल – उपयुक्त कोणासाठी, उपयुक्त काय आणि कशासाठी ? ह्याची व्याख्या करावी लागेल.
जे मानववंश स्वत:ला सुसंस्कृत समजतात त्यांची अशी समजूत असते की, जे जे काही पैशाला आकर्षित करून घेऊ शकते, पैसा मिळवू शकते, पैसा उत्पन्न करू शकते ते ते उपयुक्त होय. प्रत्येक गोष्टीचा निर्णय व मूल्यमापन आर्थिक दृष्टिकोनातूनच केले जाते. ह्यालाच मी ‘उपयुक्ततावाद’ म्हणते.
आणि हा आजार खूपच संसर्गजन्य आहे कारण या रोगापासून अगदी लहान मुलांचासुद्धा बचाव होऊ शकलेला नाही. ज्या वयात मुलांनी सौंदर्य, महानता, पूर्णत्व यांची स्वप्ने पाहावयास हवीत, त्या वयात आजची मुले केवळ पैशाची स्वप्ने पाहू लागली आहेत आणि त्यांना चिंता आहे ती हा पैसा मिळवायचा कसा ह्याची.
म्हणून जेव्हा ती मुले अभ्यासाचा विचार करीत असतात, तेव्हा सर्वात जास्त ती ह्याच गोष्टीचा विचार करीत असतात की त्यांना काय उपयोगी पडू शकेल. काय केले असता, मोठे झाल्यावर त्यांना त्यातून भरपूर पैसा कमावता येतील. त्यांच्यालेखी एकच गोष्टी सर्वाधिक महत्त्वाची ठरते ती म्हणजे परीक्षेत यशस्वीरित्या उत्तीर्ण होण्यासाठी स्वत:ची तयारी करणे; कारण पदविका, प्रमाणपत्र, विविध पदव्या यांच्या साहाय्यानेच केवळ त्यांना चांगले हुद्दे प्राप्त होऊ शकतील आणि ते त्यातूनच भरपूर पैसा कमावू शकतील. त्यांच्यालेखी अभ्यासाचा इतर कोणताच हेतू नसतो, त्याव्यतिरिक्त त्यांना अभ्यासात काही स्वारस्यही नसते.
ज्ञानासाठी ज्ञान मिळविणे, प्रकृती आणि जीवनाचे रहस्य जाणून घेण्यासाठी अभ्यास करणे, जाणिवेचा विकास घडविण्यासाठी स्वतः शिकणे, स्वत:च स्वत:चा स्वामी बनण्यासाठी स्वयंशिस्त लावणे, स्वत:च्या दुर्बलता, अक्षमता व अज्ञान यांवर मात करणे, अधिक उदात्त व विशाल, अधिक उदार व अधिक सच्च्या अशा ध्येयाच्या दिशेने मार्गप्रवण होणे…. या साऱ्याचा आजची मुले क्वचितच विचार करतात आणि या साऱ्या गोष्टींना ते फार आदर्शवादी, कल्पनारम्य असे मानतात. व्यावहारिक बनणे, पैसा कसा कमवावयाचा हे शिकणे आणि त्यासाठी स्वत:ला तयार करणे फक्त ह्याच गोष्टी त्यांच्या लेखी महत्त्वाच्या असतात.
जे अधिक उन्नत आणि चांगल्या जीवनाची आकांक्षा बाळगतात, जे ज्ञान व पूर्णत्वासाठी तहानलेले असतात, येणाऱ्या अधिक पूर्ण सत्य अशा भविष्यकाळाची जे आतुरतेने वाट पाहतात केवळ अशीच मुले येथे आम्हाला हवी आहेत. इतरांसाठी बाहेरील जगामध्ये भरपूर जागा आहे.
– श्रीमाताजी