आत्मशोधाच्या पाऊलवाटेवर… (१९)
‘अध्यात्म-जीवन’, ‘धर्म-जीवन’ आणि ज्याचा नैतिकता हा एक अंशभाग असतो ते ‘सामान्य मानवी जीवन’ या तीन भिन्नभिन्न गोष्टी आहेत आणि आपल्याला यांपैकी नक्की कोणते जीवन हवे आहे हे व्यक्तीला माहीत असलेच पाहिजे, आणि तिने वरील तीन गोष्टींमध्ये गल्लत करता कामा नये.
सामान्य मानवी जीवन हे सर्वसामान्य मानवी चेतनेचे असे जीवन असते की जे, स्वत:च्या खऱ्या ‘जीवात्म्या’पासून तसेच ‘ईश्वरा’पासून विभक्त झालेले असते. आणि या जीवनाचे संचालन मन, प्राण, शरीर यांच्या सामान्य सवयींद्वारे, म्हणजेच अज्ञानाच्या कायद्यांद्वारे केले जात असते.
धार्मिक जीवन हीदेखील त्याच अज्ञानी मानवी चेतनेची एक अशी वाटचाल असते की जी, या पृथ्वीकडे पाठ फिरवून किंवा तसा प्रयत्न करून, ‘ईश्वरा’कडे वळू पाहत असते. या पृथ्वीचेतनेच्या बंधनातून मुक्त झाल्याने, त्या पलीकडचे सौंदर्यमय असे काही गवसले आहे असा दावा जो पंथ वा संप्रदाय करीत असतो, अशा एखाद्या पंथ वा संप्रदायाच्या सिद्धान्ताच्या किंवा नियमांच्या आधारे धार्मिक जीवनाची वाटचाल चालू असते, पण तरीही ती ज्ञानविरहितच असते. धार्मिक जीवन हा आध्यात्मिक जीवनाकडे वळण्याचा पहिलावहिला प्रयत्न असू शकतो, पण बहुधा तो कर्मकांड, सणसमारंभ, विधीविधाने, काही ठरीव संकल्पना आणि रूपे यांच्या चक्रामध्येच गोलगोल फिरत राहतो.
या उलट, आध्यात्मिक जीवन चेतनेच्या परिवर्तनाद्वारे थेटपणे वाटचाल करत असते. स्वत:च्या खऱ्या जीवात्म्यापासून आणि ‘ईश्वरा’पासून विभक्त झालेल्या, अज्ञानी अशा सामान्य चेतनेकडून एका महान चेतनेकडे ही वाटचाल होत असते. या महान चेतनेमध्ये व्यक्तीला स्वत:चे खरे अस्तित्व सापडते आणि व्यक्ती प्रथमतः ‘ईश्वरा’च्या थेट व चैतन्यमय संपर्कात येते आणि नंतर ती त्या ‘ईश्वरा’बरोबर एकत्व पावते. आध्यात्मिक साधकाच्या दृष्टीने हे चेतनेचे परिवर्तन हीच एकमेव गोष्ट असते की जी मिळविण्यासाठी तो धडपडत असतो, अन्य कोणत्याच गोष्टीची त्याला मातब्बरी वाटत नाही.
नैतिकता हा सामान्य जीवनाचा एक भाग असतो. विशिष्ट मानसिक नियमांद्वारे व्यक्तीच्या बाह्य जीवनाचे नियमन करण्याचा हा एक प्रयास असतो, प्रयत्न असतो किंवा मानसिक नियमांद्वारे विशिष्ट मानसिक आदर्शानुसार चारित्र्य घडविण्याचा तो एक प्रयास असतो. आध्यात्मिक जीवन मनाच्या पलीकडे जाते; ते सखोल अशा ‘आत्म्या’च्या चेतनेमध्ये प्रवेश करते आणि ‘आत्म्या’च्या सत्यामधून कृती करते.
– श्रीअरविंद (CWSA 28 : 419-420)