Posts

निसर्गाचे रहस्य – १४

‘निसर्गा’च्या शक्ती या अंध आणि हिंस्त्र असतात, असे म्हटले जाते. परंतु तसे अजिबातच नसते. माणूस स्वतःची फूटपट्टी ‘निसर्गा’ला लावून, त्याकडे बघत असतो म्हणून त्याला तसे वाटते. थोडं थांबा, आपण एक उदाहरण घेऊया. एखादा भूकंप झाला की, अनेक बेटं पाण्याने वेढून जातात आणि त्यामध्ये लाखो माणसं आपला जीव गमावतात. तेव्हा लोकं म्हणतात, “निसर्ग किती क्रूर आहे!”

मानवाच्या दृष्टिकोनातून पाहता हा निसर्ग क्रूर आहे. निसर्गाने काय केले आहे? त्याने हलकल्लोळ माजवला आहे. पण विचार करा, तुम्ही जेव्हा उड्या मारता, धावत असता किंवा तसेच काही करत असता, तेव्हा कधीतरी तुम्ही पडता-आपटता, तुम्हाला मार बसतो आणि तुमच्या शरीराचा तो भाग काळानिळा पडतो. आपल्या पेशींच्या दृष्टीने तो एक भूकंपच असतो, तुम्ही अगणित पेशी नष्ट केलेल्या असतात. हा प्रमाणाचा प्रश्न आहे. आपल्यासाठी, आपल्या छोट्याशा चेतनेसाठी, अगदी लहान असणाऱ्या आपल्या चेतनेसाठी हे सारे फार महाभयंकर असते पण पृथ्वीच्या दृष्टीने तो केवळ एक लहानसा मुकामार असतो. आपण येथे फक्त पृथ्वीबद्दलच बोलत आहोत. पृथ्वी म्हणजे तरी काय? पृथ्वी म्हणजे काहीच नाही, पृथ्वी म्हणजे विश्वामधील जणू एक छोटेसे खेळणे आहे. आपण जर या विश्वाबद्दल बोलू लागलो तर, जगतांचे नाहीसे होणे हे एखाद्या मुक्यामारासारखेच असते. ते अगदीच किरकोळ असते.

शक्य झाले तर व्यक्तीने स्वत:ची चेतना विशाल केलीच पाहिजे.

– श्रीमाताजी
(CWM 05 : 151)

प्रेमाची स्पंदने ही फक्त मनुष्यप्राण्यापुरतीच मर्यादित नसतात; मनुष्यप्राण्याच्या तुलनेत इतर जगतांमध्ये ही स्पंदने कमी दूषित असतात. झाडांकडे व फुलांकडे पाहा. जेव्हा सूर्य मावळतो आणि सारे काही शांत होते, अशावेळी थोडा वेळ शांत बसा आणि ‘निसर्गा’शी एकत्व पावण्याचा प्रयत्न करा. या पृथ्वीपासून, झाडांच्या अगदी मुळापासून, त्याच्या तंतूतंतूंमधून वरवर जाणारी, अगदी सर्वाधिक उंच अशा बाहू फैलावलेल्या शाखांपर्यंत पोहोचलेल्या उत्कट प्रेमाची, उत्कट इच्छेची अभीप्सा तुम्हाला संवेदित होईल. प्रकाश आणि आनंद घेऊन येणाऱ्या अशा कशाची तरी ती आस असते, कारण तेव्हा प्रकाश मावळलेला असतो आणि त्यांना तो पुन्हा हवा असतो. ही आस, ही उत्कंठा इतकी शुद्ध आणि तीव्र असते की, झाडांमधील ही स्पंदने जर तुम्हाला जाणवू शकली तर तुमच्यामध्ये देखील, येथे आजवर अभिव्यक्त न झालेल्या शांती, प्रकाश, प्रेम यांविषयीची उत्कट प्रार्थना उदयाला येत आहे आणि वर वर जात आहे असे तुम्हाला जाणवेल.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 72)

….‘निसर्गा’मध्ये स्वतःला पूर्णतः कसे झोकून द्यायचे हे जर एखाद्याला माहीत असेल, आणि तो जर ‘निसर्गा’च्या कार्याला विरोध करत नसेल, तर तो कधीच आजारी पडणार नाही. ‘निसर्गा’ची स्वतःची अशी काही साधने असतात आणि व्यक्तीने भीतीपोटी किंवा संकोचापोटी त्यामध्ये हस्तक्षेप केला नाही तर, निसर्ग तुम्हाला आश्चर्यकारकरित्या त्वरेने बरे करतो. ‘निसर्गा’च्या तालाशी ताल जुळवून कसे जगायचे हे व्यक्तीला समजले तर तो ‘निसर्ग’च तुम्हाला सर्व संकटांतून काळजीपूर्वकपणे बाहेर पडण्याचा मार्ग दाखवितो. ‘निसर्गा’च्या प्रवाहाबरोबर वाटचाल कशी करायची ते व्यक्तीने स्वतः शिकले पाहिजे – मग त्या लाटाच तुम्हाला अगदी हळूवारपणे तुमच्या अंतिम गंतव्यापर्यंत घेऊन जातात.

…स्वतःला झोकून देणे, ‘प्रकृती’च्या हाती स्वतःला सोपविणे, तिच्या लाटेवर प्रवाहित होणे… (असे करता आले तर) अडीअडचणी आणि धोके पूर्णतः नाहीसे होतात. जणू काही व्यक्ती स्वतःला मोकळे सोडते – पूर्णतः खुले करते – जणू काही व्यक्ती त्यावर तरंगत राहते… मग अशा या स्थितीमध्ये, पाण्याच्या तळाशी असलेल्या काळोखाकडे न पाहता, आकाशाकडे पाहत, प्रकाशाकडे पाहत, व्यक्तीने मार्गदर्शन मिळावे म्हणून स्वतःला ‘प्रकृती’च्या हाती सोपवले तर… व्यक्ती जेव्हा अशा रीतीने वागेल, तेव्हा तिला कोणतीही वेदना स्पर्श करू शकणार नाही.

– श्रीमाताजी
(Throb of Nature : 139)

व्यक्तीकडे जेव्हा अशी अंतर्दृष्टी असते, की जी आपल्या अस्तित्वाची आतली द्वारे उघडून देते आणि ज्यामुळे व्यक्ती वस्तुमागील सत्य काय आहे ते पाहायला सुरुवात करते तेव्हा, व्यक्तीला हे उमगू लागते की, अगदी या भौतिक विश्वामध्येसुद्धा अशा अनेक गोष्टी आहेत की, ज्या आपल्या सामान्य नजरेतून निसटून जातात. व्यक्तीने अगदी सूक्ष्मदर्शक यंत्राखाली किंवा अगदी दुर्बिणीतून पाहिले तरी, किंवा आधुनिक छायाचित्रणाच्या साधनांद्वारे त्याचे पुनरुत्पादन करण्यात व्यक्ती सक्षम ठरली तरी, या साऱ्या गोष्टी म्हणजे केवळ वर्गीकरण असते, ‘निसर्गा’ची रहस्यं शोधण्याच्या दिशेने टाकलेली ती पहिलीवहिली पावले असतात. ‘निसर्गा’च्या कार्यप्रणाली मागे काय दडलेले आहे, याचे वर्णन कोणतेही मानवनिर्मित यंत्र करू शकणार नाही. ती कार्यप्रणाली इतकी सुंदर, इतकी बहुविध, इतकी सूक्ष्म आणि तिच्या अचूकतेबाबतीत, तिच्या बारकाव्यानिशी केलेल्या कार्याच्या परिपूर्णतेबाबत इतकी उत्कृष्ट आहे, की या छोट्याशा मेंदूने त्याचे वर्णन कधीच करता येणे शक्य नाही. आणि मनुष्याला मात्र असे वाटत असते की, ‘निसर्गा’च्या या कार्यप्रणालीमध्ये यंत्रांच्या मदतीने आणि त्याने लावलेल्या शोधांच्या माध्यमातून तो सुधारणा घडवून आणू शकतो; भौतिक क्षेत्रात त्याने ज्या क्षमता संपादन केलेल्या आहेत त्याच्या माध्यमातून ‘निसर्गा’च्या या कार्यप्रणाली तो शास्त्रीय पद्धतीने बदलवून टाकू शकतो, अशी त्याची समजूत असते. मनुष्य त्याच्या सूत्रांद्वारे, त्याच्या अनुभवाच्या पद्धतीद्वारे आणि ‘निसर्गा’च्या कार्यप्रणालीवर विजय मिळविण्याच्या दिशेने घेऊन जाणाऱ्या शोधांच्या साहाय्याने ‘निसर्गा’वर प्रभुत्व मिळवू शकतो असा त्याचा उद्दाम विश्वास असतो. केवढी ही मूर्खता, केवढा हा वेडेपणा!… कसली ही तुलना !

अनंताला कवळणाऱ्या ‘निसर्गा’च्या क्षमतेच्या परिघालासुद्धा मनुष्य आजवर स्पर्श करू शकलेला नाही आणि तो ‘निसर्गा’वर सत्ता गाजविण्याचा दावा करत आहे. – हा मनुष्याचा फाजील गर्व आणि त्याचा अहंकार आहे; असाध्य रोगाच्या तावडीत सापडलेल्या आणि ज्याचे आयुष्य गिळंकृत केले जात आहे अशा एखाद्या प्राण्याने व्यर्थ फुशारक्या माराव्यात तसे हे आहे.

आणि तरीही, मनुष्य विजय मिळविण्याची इच्छा बाळगून आहे, त्यावर ठाम आहे, आणि तो अतिशय उत्सुक आहे. परंतु त्यासाठी ज्या मार्गाचा तो अवलंब करत आहे त्यामुळे त्याला प्रदीर्घ काळ लागू शकतो. आणि आपल्या उद्दिष्टापर्यंत पोहोचण्यासाठी त्याला बरीच वेडीवाकडी वळणं पार करावी लागू शकतात.

– श्रीमाताजी
(Blessings of the Grace : 77-78)