Posts

ज्या प्रकाशाच्या आधारे कृती करायची तो प्रकाशच गवसलेला नसेल तर कृतिप्रवणतेवरील हा सगळा भर निरर्थक ठरतो. योगामधून जीवन वगळता कामा नये, योगामध्ये जीवनाचा समावेश असलाच पाहिजे, याचा अर्थ जीवन आहे तसेच स्वीकारण्यासाठी, म्हणजे त्याच्या अडखळणाऱ्या अज्ञानानिशी, दुःखानिशी, मानवी इच्छा आणि तर्कबुद्धी यांच्या अंधकारमय गोंधळानिशी जीवन स्वीकारण्यासाठी आपण बांधील आहोत, असा होत नाही. जीवन ज्या आवेगांची, उपजत प्रेरणांची अभिव्यक्ती करत असते त्या साऱ्यानिशी जीवनाचा स्वीकार करण्यासाठी आपण बांधील आहोत, असा याचा अर्थ होत नाही.

सातत्याने नवप्रवाह निर्माण करणाऱ्या मानवी बुद्धीमुळे आणि ऊर्जेमुळे सारे काही ठीक होईल असे कृतिप्रवणतेच्या समर्थकांना वाटत असते. परंतु मानवी बुद्धीचा एवढा प्रचंड विकास आणि ज्याला इतिहासामध्ये तुलनाच नाही अशा ऊर्जेच्या अचाट उत्पादनानंतरसुद्धा झालेली जगाची सद्यस्थिती आपण पाहू लागलो तर, कृतिप्रवणतेचे समर्थक ज्या भ्रमामध्ये राहून (त्यांच्या कृतीमुळे सारे काही ठीक होईल या भ्रमामध्ये राहून) परिश्रम करत असतात त्या भ्रमाचा, जगाची सद्यस्थिती म्हणजे सूचक पुरावाच असल्याचे आढळते.

(कृतिप्रवणतेच्या समर्थनाची भूमिका आणि योगाची भूमिका यातील फरक श्रीअरविंद येथे स्पष्ट करत आहेत…) केवळ चेतनेच्या परिवर्तनाद्वारेच या जीवनाचा खरा आधार शोधला जाऊ शकतो, ही ‘योगा’ची भूमिका आहे; अंतरंगाकडून बहिरंगाकडे हा येथे खरंतर नियम असतो. परंतु अंतरंग म्हणजे पृष्ठभागाच्या मागे अर्धापाऊण इंच आतमध्ये असा त्याचा अर्थ होत नाही. व्यक्तीने आत खोलवर जाऊन आपल्या ‘आत्म्या’चा, ‘स्व’चा, आपल्या अंतरंगामध्ये असणाऱ्या ‘दिव्य सद्वस्तु’चा शोध घेतला पाहिजे आणि तेव्हाच आपले जीवन ही खरी अभिव्यक्ती ठरू शकेल; आपण म्हणजे आजवर जी एक अपुरी, अपरिपूर्ण, नेहमीच पुनरावृत्त होणारी गोंधळलेली, धूसर आणि अंध वस्तू होतो त्याऐवजी, आपण काय असू शकतो त्याची, आपले जीवन ही खरी अभिव्यक्ती ठरू शकेल.

आपल्या जुन्याच गोंधळात राहायचे आणि अपघाताने, योगायोगाने का होईना पण कोणतातरी एखादा नवीनच शोध लागेल अशा आशेने अंधारात चाचपडत राहायचे की, जोपर्यंत आपल्या अंतरंगामध्ये व बाहेरही असणाऱ्या देवतेचा शोध आपल्याला लागत नाही आणि आपण आपल्या अंतरंगामध्ये तिची मूर्ती घडवत नाही तोपर्यंत, मागे राहून, अंतरंगातील ‘प्रकाशा’चा शोध घ्यायचा, या दोन्हीमधून आपल्याला एका गोष्टीची निवड करायची आहे.

– श्रीअरविंद [CWSA 28 : 444]

प्रश्न : योग करण्याची पात्रता येण्यासाठी आम्ही काय केले पाहिजे?

श्रीमाताजी : प्रथमतः आपण जागृत झालो पाहिजे. आपल्याला आपल्या अस्तित्वाच्या अगदीच अल्प अंशाची जाणीव असते. उरलेला बहुतेक सर्व भाग आपल्याला अज्ञात असतो. आपण त्याविषयी अजागृत असतो. या अजागृतीमुळेच आपण आपल्या असंस्कारित प्रकृतीला चिकटून राहतो आणि या अजागृतीमुळेच प्रकृतीमध्ये काही बदल किंवा रूपांतरण घडून आणण्यामध्ये अडसर निर्माण होतो. या अजागृतीच्या माध्यमातूनच अदिव्य शक्ती आपणामध्ये प्रवेश करतात आणि आपल्याला त्यांचे गुलाम बनवून टाकतात.

तुम्ही स्वत:विषयी जागृत झाले पाहिजे, तुमची प्रकृती व तुमच्यामध्ये निर्माण होणारी आंदोलने यांविषयी तुम्ही जागृत झाले पाहिजे. तुम्ही काही गोष्टी का करता व कशा करता, त्याविषयी तुमच्या भावना कशा प्रकारच्या आहेत व त्या तशा का आहेत, त्या गोष्टीसंबंधी तुमचे विचार काय आहेत व ते तसे का आहेत ह्याचे ज्ञान तुम्ही करून घेतले पाहिजे. जे हेतु व ज्या उर्मी, ज्या प्रकट वा अप्रकट शक्ती तुम्हाला कृतिप्रवण करतात त्या तुम्ही समजून घेतल्या पाहिजेत.

सारांश असा की, तुम्ही आपल्या अस्तित्वरूपी यंत्राचे भाग सुटे सुटे करून निरखून पारखून पाहिले पाहिजेत. अशा रीतीने तुम्ही एकदा का जागृत झालात की, तुम्हाला वस्तुस्थिती ओळखता येईल, तिचे पृथक्करण करता येईल. तुम्हाला खाली खेचणाऱ्या शक्ती कोणत्या व तुम्हाला साह्यभूत होणाऱ्या शक्ती कोणत्या, हे तुम्हाला ओळखता येईल. योग्य काय नि अयोग्य काय, सत्य काय नि असत्य काय, दिव्य काय नि अदिव्य काय हे एकदा का तुम्हाला समजू लागले की जे योग्य, सत्य, दिव्य असेल त्याला धरूनच तुम्ही अगदी काटेकोरपणे आचरण केले पाहिजे.

म्हणजेच जे योग्य व दिव्य त्याचा निश्चयपूर्वक स्वीकार करून, तद्विरोधी सर्वांचा त्याग केला पाहिजे. पदोपदी हे द्वंद्व तुमच्यापुढे उभे राहील आणि पदोपदी तुम्हाला निवड करावी लागेल. तुम्हाला धीर धरावा लागेल, चिकाटीने व सावधगिरीने प्रयत्न करावा लागेल. जणू डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवावे लागेल. संतसत्पुरुष सांगतात त्याप्रमाणे, दिव्यत्वाच्या विरोधी असणाऱ्या अदिव्याला कोणतीच संधी मिळू नये यासाठी तुम्ही प्रत्येक वेळी अदिव्याला नकार दिला पाहिजे.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 01-02)