Posts

साधना, योग आणि रूपांतरण – १८९

योगामधील केंद्रवर्ती प्रक्रिया – भाग ०५

ऊर्ध्वगामी उन्मुखता (upward opening) ही अपरिहार्यपणे फक्त शांती, नीरवता आणि ‘निर्वाणा’कडेच घेऊन जाते असे नाही. साधकाला आपल्या वरच्या दिशेस, जणूकाही आपल्या मस्तकाच्या वरच्या बाजूस असणाऱ्या व्यापकतेची आणि सर्व भौतिक व अतिभौतिक प्रदेश व्यापून टाकणाऱ्या एका महान, अंतिमत: एक प्रकारच्या अनंत शांतीची, नीरवतेचीच जाणीव होते असे नाही तर, त्याला इतर गोष्टींचीही जाणीव होते. सर्व ऊर्जा ज्यामध्ये सामावलेली असते अशा एका महान ‘शक्ती’ची, सर्व ज्ञान ज्यामध्ये सामावलेले असते अशा एका महा‘प्रकाशा’ची, सर्व आनंद आणि हर्ष ज्यामध्ये सामावलेला असतो अशा एका अपार ‘आनंदा’ची साधकाला जाणीव होते. सुरूवातीला या गोष्टी अनिवार्य आवश्यक, अनिश्चित, निरपवाद, साध्या, केवल अशा स्वरूपात त्याच्या समोर येतात. निर्वाणामध्ये उपरोक्त साऱ्या गोष्टी शक्य असल्याचे त्याला वाटते.

परंतु पुढे त्याला हेही आढळते की, या ‘दिव्य शक्ती’मध्ये अन्य शक्ती सामावलेल्या आहेत, या ‘दिव्य प्रकाशा’मध्ये अन्य सारे प्रकाश, या ‘दिव्य आनंदा’मध्ये शक्य असणारे सारे हर्ष आणि आनंद सामावलेले आहेत. आणि या साऱ्या गोष्टी आपल्यामध्येही अवतरित होऊ शकतात, हेही त्याला उमगू लागते. फक्त शांतीच नव्हे तर यांपैकी कोणतीही एक किंवा सर्व गोष्टी अवतरित होऊ शकतात. एवढेच की परिपूर्ण स्थिरता आणि शांती यांचे अवतरण घडवणे हे सर्वाधिक सुरक्षित असते कारण त्यामुळे इतर सर्व गोष्टींचे अवतरण हे अधिक निर्धोक होते. अन्यथा, बाह्य प्रकृतीला एवढी ‘शक्ती’, ‘प्रकाश’, ‘ज्ञान’ किंवा ‘आनंद’ धारण करणे किंवा तो पेलणे अवघड जाऊ शकते. आपण जिला ‘उच्चतर, आध्यात्मिक किंवा दिव्य चेतना’ असे म्हणतो, तिच्यामध्ये वरील सर्व गोष्टींचा अंतर्भाव होतो.

हृदय-चक्राच्या माध्यमातून येणारा आंतरात्मिक खुलेपणा (Psychic opening) आपल्याला मूलतः व्यक्तिगत ‘ईश्वरा’च्या, आपल्याशी असलेल्या ‘ईश्वरा’च्या आंतरिक नात्याच्या संपर्कात आणतो. हा विशेषतः प्रेम आणि भक्तीचा मूलस्रोत असतो. ऊर्ध्वमुखी उन्मुखता (Upward opening) थेटपणे आपले नाते समग्र ‘ईश्वरा’शी जोडून देते आणि ती उन्मुखता आपल्यामध्ये दिव्य चेतना निर्माण करू शकते, ती आपल्या आत्म्याचे एक किंवा अनेक नवजन्म घडवून आणू शकते. (क्रमश:)

– श्रीअरविंद (CWSA 30 : 326-327)

साधना, योग आणि रूपांतरण – १८८

योगामधील केंद्रवर्ती प्रक्रिया – भाग ०४

सर्वोच्च आध्यात्मिक ‘आत्मा’ हा आपल्या व्यक्तित्वाच्या आणि शारीर-अस्तित्वाच्या मागे नसतो, तर तो सर्वस्वी त्याच्या पलीकडे, ऊर्ध्वस्थित असतो. आंतरिक चक्रांपैकी सर्वोच्च चक्र हे मस्तकामध्ये असते, तर सर्वात गहनतम चक्र हे हृदयामध्ये असते; परंतु जे चक्र थेटपणे ‘आत्म्या’प्रत खुले होते ते मस्तकाच्याही वर, शरीराच्या पूर्णपणे बाहेर म्हणजे ज्याला ‘सूक्ष्म शरीर’ असे संबोधले जाते, त्यामध्ये असते.

या (सर्वोच्च) आत्म्याला दोन पैलू असतात आणि त्यांच्या साक्षात्काराचे परिणाम हे या दोन पैलूंशी संबंधित असतात. एक पैलू हा अक्रिय, स्थितीमान (static) असतो. ही स्थिती व्यापक शांतीची, मुक्तीची व नीरवतेची असते. या शांत ‘आत्म्या’वर कोणत्याही कृतीचा वा अनुभवाचा काही परिणाम होत नाही. तो त्यांना निःपक्षपातीपणे आधार पुरवत असतो पण तो त्यांची निर्मिती करत असावा असे दिसत नाही, किंबहुना तो या साऱ्यापासून अलिप्तपणे, उदासीनपणे दूर उभा राहतो.

या आत्म्याचा दुसरा पैलू हा गतिशील असतो आणि विश्वात्मा म्हणून तो अनुभवास येतो, तो संपूर्ण वैश्विक कृतीला केवळ आधारच पुरवितो असे नाही तर तो ती कृती निर्माण करतो, आणि ती कृती स्वतःमध्ये सामावूनही घेतो. या वैश्विक कृतीमध्ये आपल्या शारीरिक अस्तित्वांशी संबंधित असलेल्या घटकांचाच नव्हे तर त्यांच्या अतीत असणाऱ्या सर्व घटकांचा, इहलोक आणि सर्व अन्य लोक, या विश्वाच्या भौतिक तसेच अतिभौतिक श्रेण्यांचा समावेशदेखील त्यामध्ये होतो. तसेच, सर्वांमध्ये वसत असलेला आत्मा एकच आहे याची आपल्याला जाणीव होते. इतकेच नाही तर, तो सर्वाच्या अतीत, परात्पर, सर्व व्यक्तिगत जन्माला किंवा वैश्विक अस्तित्वालाही ओलांडून जाणारा म्हणून संवेदित होतो.

सर्वांमध्ये वसत असलेल्या त्या एकामध्ये म्हणजे विश्वव्यापक आत्म्यामध्ये प्रविष्ट होणे म्हणजे अहंभावापासून मुक्त होणे. अशा वेळी, हा अहंभाव एकतर चेतनेमधील एक छोटीशी साधनभूत परिस्थिती बनून शिल्लक राहतो किंवा मग आपल्या चेतनेमधून तो पूर्णपणे नाहीसा होतो. यालाच ‘अहंभावाचे निर्वाण’ असे म्हणतात. सर्वांच्या अतीत असणाऱ्या परात्पर आत्म्यामध्ये प्रविष्ट होण्यामधून आपण वैश्विक चेतना आणि कृतीच्या पूर्णपणे अतीत होण्यास सक्षम होतो. विश्व-अस्तित्वामधून पूर्ण मुक्ती मिळविण्याचा तो एक मार्ग असू शकतो, यालाच ‘लय, मोक्ष, किंवा निर्वाण’ असे संबोधले जाते. (क्रमश:)

– श्रीअरविंद (CWSA 30 : 325-326)

विचार शलाका – १७

देहरूपी आवरणापासून आत्म्याची सुटका हेच जर उद्दिष्ट असेल, तर अतिमानसिकीकरणाची (Supramentalisation) आवश्यकता नाही. त्यासाठी ‘आध्यात्मिक मुक्ती’ किंवा ‘निर्वाण’देखील पुरेसे आहे. भौतिकातीत पातळ्यांपर्यंत जाऊन पोहोचणे हे जरी उद्दिष्ट असेल तरीसुद्धा अतिमानस अवतरणाची आवश्यकता नाही. एखाद्या स्वर्गातील देवाची भक्ती करून व्यक्तीला त्या स्वर्गात प्रवेश मिळू शकतो. पण त्याला प्रगती म्हणता येणार नाही. अन्य जगतं (लोक, worlds) ही नमुनेबद्ध, नमुनेदार आहेत. ती त्यांच्या स्वत:च्या पद्धतीने, प्रकाराने आणि कायद्याने, नियमांनी बद्ध झालेले असतात. उत्क्रांती ही पृथ्वीवरच होऊ शकते आणि म्हणून योग्य असे प्रगतीचे खरे क्षेत्र, पृथ्वी हेच आहे. अन्य जगतातील अस्तित्व एका जगतातून दुसऱ्या जगतामध्ये प्रगत होऊ शकत नाहीत. ती त्यांच्या स्वत:च्या वर्गामध्येच बंदिस्त होऊन राहतात.

– श्रीअरविंद
(CWSA 28 : 288)