Posts

मनोमय पुरुषाने, वासनात्मक मनाशी असलेले त्याचे सहसंबंध आणि त्याच्याबरोबर झालेले त्याचे तादात्म्य (self-identification) ह्यापासून स्वत:ला विलग करावेच लागते. त्याला असे म्हणावे लागते की, ”हे झगडणारे व यातना भोगणारे, कधी दुःखी तर कधी आनंदी असणारे; कधी प्रेम तर कधी द्वेष करणारे मन म्हणजे मी नव्हे; ते कधी आशावादी असते तर कधी गोंधळलेले असते; कधी रागावते व भिते तर कधी ते खुशीत असते; कधी निराश, नाउमेद असते; अशा प्राणिक वृत्तीप्रवृतीच्या हेलकाव्यांचे व भावनात्मक आवेगांचे बनलेले हे मन म्हणजे मी नव्हे. ह्या सर्व गोष्टी म्हणजे संवेदनात्मक आणि भावनात्मक मनामध्ये प्रकृतीचे जे कार्य चालते ते कार्य आहे, त्या सर्व तिच्या सवयी आहेत, अन्य काही नाही.” या प्रकारे मनोमय पुरुषाने संवेदनात्मक व भावनात्मक मनाशी असलेले आपले ऐक्याचे नाते तोडले, म्हणजे मनोमय पुरुष किंवा मन आपल्या भावनांपासून दूर होते आणि ज्याप्रमाणे ते शरीराच्या क्रिया व अनुभूती दूरून पाहते, त्याचप्रमाणे मनाच्या भावनांकडेही ते दूरून पाहते, ते या भावनांचे निरीक्षक किंवा साक्षी बनते. याप्रमाणे मनात दोन तट पडतात; एक मन भावनात्मक व दुसरे निरीक्षक बनते.

भावनात्मक मनात नानाविध वृत्ती व विकार येत राहतात, प्रकृतीच्या गुणांच्या सवयीनुसार हे घडत राहते; दुसरे निरीक्षक मन हे वृत्तीविकार पाहात राहते; त्यांचा तटस्थपणे अभ्यास करते आणि त्यांना जाणून घेते, परंतु त्यापासून ते अलिप्त असते. निरीक्षक मन भावनात्मक मनाच्या वृत्तीविकारांकडे पाहताना जणू काही मनाच्या रंगमंचावर, स्वत:पेक्षा वेगळ्या व्यक्ती खेळत आहेत अशा दृष्टीने त्यांजकडे पाहते.

प्रथम या वृत्तीविकारांत त्याला रस वाटतो आणि ते तादात्म्याकडे झुकते, जुन्या सवयींमुळे मधूनमधून ते त्यांच्याशी एकरूप होते; नंतर पूर्ण शांती राखून व अनासक्तपणे ते त्यांजकडे पाहू शकते; आणि शेवटी शांतीबरोबर आपल्या शांत अस्तित्वाचा शुद्ध आनंद त्याला लाभतो; आणि ते समोरच्या गोष्टी पाहून स्मित करू लागते. एखादे लहान मूल खेळत असावे आणि त्यात ते स्वत:च हारावे त्याप्रमाणे, भावनात्मक मनाची सुखदुःखे व इतर विकारवृत्ती मिथ्या आहेत हे त्याला पटते.

दुसरी गोष्ट अशी की, आपणच त्या साऱ्याला अनुमती देणारे किंवा नाकारणारे स्वामी आहोत, अनुमंता आहोत ही गोष्ट, निरीक्षक मनाच्या लक्षात येते. अर्थात आपली संमती काढून घेऊन हा खेळ आपण बंद पाडू शकतो हेही त्याला उमगते.

निरीक्षक मनाने संमती काढून घेतली की, एक महत्त्वाची गोष्ट घडते. भावनात्मक मन शांत होते व सामान्यत: शांत राहते; ते सामान्यत: शुद्ध राहते, विकाररूप प्रतिक्रियांपासून सामान्यत: अलिप्त राहते. या प्रतिक्रिया त्याच्या ठिकाणी पुन्हा येतात तेव्हा त्या आतून येत नाहीत, तर बाहेरून येतात – बाहेरून आलेल्या क्रियांना प्रतिक्रिया म्हणून त्या उत्पन्न होतात. ही प्रतिक्रिया देण्याची सवयसुद्धा कालांतराने नष्ट होते आणि भावनात्मक मन पूर्वी टाकून दिलेल्या विकारांपासून पूर्ण मुक्त होते.

आशा व निराशा, सुख व दुःख, आवड आणि निवड, आकर्षण आणि तिटकारा, समाधान व असमाधान, हर्ष आणि विषाद, भय आणि कंप, क्रोध, उद्वेग आणि लाज आणि प्रेमवद्वेष इत्यादी सर्व विकार हे मुक्त झालेल्या चैत्यपुरुषापासून गळून पडतात. सर्वसाधारणपणे जीवाला या अवस्थेतून जावे लागते; परंतु आम्ही मात्र या अवस्थेला अंतिम साध्य मानलेले नाही.

….पूर्णत्वासाठी ही गोष्ट आवश्यक आहे की, मनोमय पुरुषाने ‘प्रकृतीचा स्वामी’ ही स्वत:ची बैठक पुनरपि प्राप्त करून घ्यावी; मनाचा आंतरिक प्रवाह व बुद्धीचा युक्तिवाद थांबवून या पुरुषाचे भागत नाही, त्यांची जागा वरून प्रकाश मिळवणारा सत्य-ज्ञानयुक्त (Truth-Conscious) विचार घेईल अशी व्यवस्था, स्वत:ची इच्छाशक्ती कामी लावून त्याला करावी लागते.

– श्रीअरविंद
(CWSA 23 : 352-353)