अमृतवर्षा ०१
साधक : खरेखुरे स्वातंत्र्य अस्तित्वातच नाही का? प्रत्येकच गोष्ट ही पूर्णपणे पूर्वनिर्धारित असते का, अगदी स्वातंत्र्य सुद्धा पूर्वनिर्धारित असते का ? प्रारब्धवाद हेच सर्वोच्च रहस्य आहे का?
श्रीमाताजी : स्वाधीनता आणि प्रारब्ध (Freedom and fatality) स्वातंत्र्य आणि निश्चयवाद (liberty and determinism) या गोष्टी म्हणजे चेतनेच्या भिन्नभिन्न पातळ्यांवर प्राप्त होणारी सत्य आहेत. त्या दोहोंना समान पातळीवर आणून, परस्परांविरोधात उभे करण्यास मनाला भाग पाडणारे जर कोणी असेल तर ते अज्ञानच असते.
चेतना ही काही एकच एक एकसंध अशी वास्तविकता नसते, तर ती खूप जटिल असते; एखादे सरळसोट प्रतल असल्यासारखी ती नसते; तर ती बहुआयामी असते. एका बाजूला सर्वोच्च उंचीवर ‘अव्यक्त परात्पर’ असते तर सर्वात खाली ‘जडद्रव्य’ असते आणि या दोहोंच्या दरम्यान, म्हणजेच सर्वोच्च उंची आणि निम्नतम खोली यांच्या दरम्यान चेतनेच्या स्तरांच्या अगणित छटा असतात.
जडभौतिकाच्या प्रतलावर आणि सामान्य चेतनेच्या स्तरावर तुमचे हातपाय बांधलेले असतात. तेथे तुम्ही प्रकृतीच्या यंत्रणेचे गुलाम असता; तुम्ही कर्मबंधांनी बद्ध झालेले असता, आणि तेथे जे जे काही घडते ते, जे आधी घडून गेले आहे त्याचा काटेकोर परिणाम असतो. तेथे स्वतंत्र कृतीचा व कर्माचा आभास असतो पण वास्तविक, इतर जण जे काही करत असतात त्याच गोष्टी तुम्ही करत असता, या जगतामध्ये प्रकृतीच्या लौकिक व्यापारांचे तुम्ही केवळ प्रतिध्वनी असता, प्रकृतीच्या वैश्विक यंत्राच्या रहाटगाडग्यावर तुम्ही असहाय्यपणे फिरत राहता.
पण हे असेच असायला पाहिजे असे मात्र नाही. तुमची इच्छा असेल तर तुम्ही तुमचे स्थान बदलू शकता; तुम्ही खाली असण्याऐवजी, या अजस्त्र यंत्रणेखाली चिरडून जाण्याऐवजी, किंवा कळसूत्री बाहुलीप्रमाणे हालचाली करत राहण्याऐवजी, तुम्ही वर उठू शकता आणि वरून पाहू शकता; आणि तुमच्या चेतनेमध्ये परिवर्तन घडवून त्यायोगे, वरकरणी अपरिहार्य भासणारी परिस्थिती आणि बंधवत वाटणारी स्थिती यामध्ये बदल घडवून आणणाऱ्या सुकाणूचा तुम्ही ताबा घेऊ शकता.
एकदा का तुम्ही त्या रहाटगाडग्याच्या वर उठलात आणि वर भरभक्कमपणे उभे राहिलात तर तुमच्या असे लक्षात येते की, तुम्ही मुक्त आहात. तुम्ही सर्व प्रकारच्या सक्तींपासून मुक्त आहात. तुम्ही आता केवळ एक अगतिक साधन राहत नाही; इतकेच नव्हे, तर तुम्ही आता एक सक्रिय असे माध्यम बनता. आता तुम्ही तुमच्या कर्मफलांनी बद्ध राहत नाही; तर, तुम्ही त्या कर्मफलांमध्ये बदलसुद्धा घडवून आणू शकता.
एकदा का तुम्ही या साऱ्याकडे शक्तींची लीला या दृष्टीने पाहू लागलात; एकदा का तुम्ही या शक्तींचा उगम जेथे आहे त्या चेतनेच्या स्तरावर जाऊन पोहोचलात, आणि त्या गतिमान अशा शक्ति-उगमाशी तद्रूप झालात की मग, तुम्ही केवळ एखाद्या कळसूत्री बाहुलीप्रमाणे हालचाल करणारे राहात नाही तर तिची सूत्रे हालविणाऱ्यांपैकी एक बनता.
कर्माच्या चक्रातून बाहेर पडून दिव्य गतिविधींमध्ये प्रवेश होणे हेच खरंतर योगसाधनेचे उद्दिष्ट असते. योगसाधनेच्या साहाय्याने तुम्ही प्रकृतीच्या यांत्रिक चक्रामधून बाहेर पडता. प्रकृतीच्या यांत्रिक चक्रामध्ये तुम्ही केवळ एक अज्ञानी गुलाम असता; असहाय्य, अगतिक असे साधन असता, अशा यांत्रिक चक्रामधून योगसाधनेच्या आधारे तुम्ही बाहेर पडता आणि एका निराळ्या स्तरावर चढून जाता; तेथे तुम्ही ‘उच्चतर नियती’च्या कार्याचे जागरूक सहभागीदार आणि क्रियाशील माध्यम बनता.
– श्रीमाताजी [CWM 03 : 29-30]