Posts

ईश्वरी कृपा – २३

न्याय म्हणजे वैश्विक प्रकृतिच्या गतिविधींचा काटेकोर तार्किक नियतिवाद. हा नियतिवाद जडभौतिक शरीराला लागू होतो तेव्हा त्याला आजारपण असे म्हणतात. या अपरिहार्य न्यायाच्या आधारावर, वैद्यकीय मन, उत्तम आरोग्याकडे घेऊन जाणारी परिस्थिती आणण्यासाठी तार्किकपणाने धडपडते. त्याच प्रमाणे, नैतिक चेतना ही सामाजिक देहामध्ये (social body) आणि तपस्या ही आध्यात्मिक प्रांतामध्ये कार्य करते…

केवळ ‘ईश्वरी कृपे’मध्येच, हस्तक्षेप करण्याची आणि या वैश्विक न्यायाचा क्रम बदलण्याचे सामर्थ्य असते. या पृथ्वीवर ‘ईश्वरी कृपे’चे आविष्करण घडविणे हेच अवताराचे महान कार्य असते. अवताराचे शिष्य बनणे म्हणजे ईश्वरी कृपेचे साधन बनणे. दिव्य माता ही एक महान प्रबंधक आहे – ‘ईश्वरी कृपे’च्या तादात्म्याद्वारे, परिपूर्ण ज्ञानानिशी, वैश्विक न्यायाच्या परम यंत्रणेच्या तादात्म्याद्वारे ती प्रबंधनाचे (to dispense) कार्य करते. आणि दिव्य मातेच्या मध्यस्थीद्वारे, अभीप्सेचे ईश्वराप्रत असलेले प्रत्येक प्रामाणिक व विश्वासपूर्ण स्पंदन, ईश्वराने अवतरित व्हावे यासाठी त्याला आवाहन करते. आणि त्याला प्रतिसाद म्हणून ‘ईश्वरी कृपे’चा हस्तक्षेप घडून येतो.

हे ईश्वरा, तुझ्यासमोर उभे राहून कोण अगदी प्रामाणिकपणे असे म्हणू शकेल का की, ”मी कधीच कोणतीही चूक केलेली नाही.” दिवसभरात कितीदा तरी आम्ही तुझ्या कार्यामध्ये चुका करत असतो आणि तरीही त्या चुका पुसून टाकण्यासाठी नेहमीच तुझी कृपा मदतीस धावून येते. ‘तुझ्या कृपे’चा हस्तक्षेप नसता तर, वैश्विक न्याय-धर्माच्या निर्दय पात्याखाली किती जण किती वेळा आले असते बरे? येथे प्रत्येक जण, एका अशक्यतेचे प्रतिनिधित्व करतो; या अशक्यतेचे निराकरण करणे आवश्यक आहे; आणि तुझ्या दिव्य कृपेला सारे शक्य आहे. या साऱ्या अशक्यता दिव्य साक्षात्कारामध्ये रूपांतरित होऊन पूर्णत्वाला जातील, हेच तुझे अगदी तपशीलवार आणि समग्र कार्य असेल.

– श्रीमाताजी
(CWM 14 : 83)