Posts

साधना, योग आणि रूपांतरण – ४१

(ध्यानाची उद्दिष्टे काय असतात किंवा काय असावीत यासंबंधीचा विचार आपण येथे समजावून घेत आहोत. त्याचा हा उत्तरार्ध…)

‘योगा’मध्ये एकाग्रतेचा उपयोग अन्य उद्दिष्टासाठीदेखील केला जातो. उदा. आपल्या जाग्रत स्थितीपासून (waking state) म्हणजे चेतनेची जी सीमित आणि पृष्ठवर्ती अवस्था असते त्यापासून निवृत्त होऊन, आपल्या अस्तित्वाच्या अंतरंगामध्ये खोलवर जाण्यासाठीदेखील (‘समाधी’च्या विविध अवस्थांद्वारे ही खोली मोजली जाते) एकाग्रतेचा अवलंब केला जातो. या प्रक्रियेसाठी, विचारमालिकेवर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा (ध्यानापेक्षा), कोणत्यातरी एकाच वस्तुवर, संकल्पनेवर किंवा नामावर लक्ष केंद्रित करणे (निदिध्यास) अधिक परिणामकारक असते.

असे असले तरी, ध्यानामुळे ‘पूर्णयोगां’तर्गत अभिप्रेत असलेल्या समाधीची पूर्वतयारी होते. असे ध्यान आपले आपल्या अस्तित्वाच्या खोलवर असणाऱ्या अवस्थांशी अप्रत्यक्षपणे पण जाग्रत सायुज्य (communion) निर्माण करते. काहीही असले तरी, जो विचार ‘पुरुषा’च्या नियंत्रणाखाली (सांख्य तत्त्वज्ञानातील पुरुष) आणला गेला आहे अशा रचनात्मक विचाराची तेजस्वी कृती हा ध्यानाचा वैशिष्ट्यपूर्ण उपयोग असतो. त्याद्वारे उर्वरित सर्व चेतना नियंत्रित केली जाते, ती उच्चतर आणि विशालतर संकल्पनांनी परिपोषित केली जाते आणि त्या संकल्पनांच्या साच्यामध्ये चेतनेचे त्वरेने परिवर्तन केले जाते आणि अशा प्रकारे चेतना पूर्णत्वाला नेली जाते.

ध्यानाचे इतर आणि महत्तर उपयोग याच्याही पलीकडचे असतात पण ते आत्मविकसनाच्या पुढील टप्प्यांशी संबंधित असतात. ‘भक्तियोगा’मध्ये, या दोन्ही प्रक्रिया (ध्यान आणि निदिध्यासन) समग्र अस्तित्व एकाग्र करण्यासाठी, समानतेने उपयोगात आणल्या जातात. किंवा भक्तीविषयाच्या (आराध्य देवतेच्या) चिंतनाने, त्याच्या रूपाने, त्याच्या सत्त्वाने, त्याच्या गुणवैशिष्ट्यांनी आणि त्याच्याबद्दलच्या भक्तिभावाच्या व ऐक्याच्या आनंदाने समग्र प्रकृती न्हाऊन निघावी यासाठी या दोन्ही प्रक्रिया समानतेने उपयोगात आणल्या जातात. तेव्हा विचार हा ‘दिव्य प्रेमा’चा सेवक, ‘कैवल्य-आनंदा’ची तयारी करून घेणारा असा घडविला जातो.

‘ज्ञानयोगा’मध्येदेखील ध्यानाचा उपयोग, वरकरणी दिसणारे रूप आणि सत्य यांमध्ये, तसेच आत्मा आणि त्याची विविध रूपे यांमध्ये सदसद्विवेक करण्यासाठी केला जातो. व्यक्तिगत चेतनेचा ‘ब्रह्मन्’मध्ये प्रवेश व्हावा आणि नंतर सायुज्य घडावे यासाठी एकाग्र निदिध्यासनाचा अवलंब केला जातो. ‘पूर्णयोगा’मध्ये या सर्वच उद्दिष्टांचा सुमेळ साधला जाईल.

– श्रीअरविंद (CWSA 13 : 446-447)

साधना, योग आणि रूपांतरण – १४

साधक : ‘ध्यान’ म्हणजे नक्की काय?

श्रीअरविंद : ‘ध्याना’ची भारतीय संकल्पना स्पष्ट करण्यासाठी इंग्रजीमध्ये meditation आणि contemplation हे दोन शब्द उपयोगात आणले जातात.

एकाच विषयाचा वेध घेण्यासाठी म्हणून विचारांच्या एका सलग मालिकेवर मनाचे लक्ष केंद्रित करणे म्हणजे ‘ध्यान’ (Meditation)

एकाग्रता-शक्तीच्या आधारे, वस्तुचे, प्रतिमेचे किंवा संकल्पनेचे ज्ञान, मनामध्ये स्वाभाविकरित्या उदित व्हावे म्हणून, एकाच वस्तुकडे, प्रतिमेकडे किंवा संकल्पनेकडे मनाने पाहत राहणे, म्हणजे ‘निदिध्यास’ (Contemplation).

हे दोन्ही प्रकार ही ‘ध्याना’चीच दोन रूपं आहेत. कारण, विचारावर असू दे, दृश्यावर असू दे किंवा ज्ञानावर असू दे, पण मनाची एकाग्रता करणे हे ‘ध्याना’चे तत्त्व आहे. ‘ध्याना’चे इतरही काही प्रकार आहेत.

आत्म-निरीक्षणात्मक एकाग्रता
एके ठिकाणी विवेकानंदांनी, तुम्हाला तुमच्या विचारांपासून अलग होऊन मागे उभे राहायला सांगितले आहे: मनात विचार जसे येत आहेत तसे येत राहू देत, तुम्ही नुसते त्याचे निरीक्षण करायचे आणि ते काय आहेत हे जाणून घ्यायचे. याला ‘आत्म-निरीक्षणात्मक एकाग्रता’ (Concentration in self-observation) असे म्हणता येईल.

मुक्तिप्रद ध्यान
आत्म-निरीक्षणात्मक एकाग्रता ध्यानाच्या दुसऱ्या एका प्रकाराकडे घेऊन जाते. मनामधून सर्व विचार काढून टाकणे; ज्यायोगे, ते मन एकप्रकारची विशुद्ध सावध अशी पोकळी बनले पाहिजे म्हणजे त्यामध्ये दिव्य ज्ञान अवतरू शकेल आणि स्वतःचा ठसा उमटवू शकेल; त्यामध्ये सामान्य मानवी मनाच्या कनिष्ठ विचारांची लुडबूड असणार नाही आणि काळ्या फळ्यावर पांढऱ्या खडूने लिहावे तितकी स्पष्टता त्यामध्ये असेल. अशा प्रकारे, सर्व मानसिक विचारांचा निरास (rejection) करणे ही योगाची एक पद्धत असल्याचे ‘भगवद्गीते’मध्ये सांगितले आहे असे तुम्हाला आढळून येईल आणि या पद्धतीला ‘गीते’ने पसंती दिलेली दिसते. याला ‘मुक्तिप्रद ध्यान’ (Dhyana of liberation) असे म्हणता येईल. कारण या ध्यानामुळे विचारांच्या यांत्रिक पद्धतीच्या गुलामीमधून मनाची मुक्तता होते. या ध्यानामुळे, विचार करायचा की करायचा नाही, हे ठरविण्यासाठी मनाला मुभा मिळते. तसेच, स्वतःच्या विचारांची निवड करण्यास मुभा मिळते किंवा वाटले तर, विचारांच्या अतीत होऊन, आपल्या तत्त्वज्ञानामध्ये ज्याला ‘विज्ञान’ असे म्हटले जाते त्या ‘सत्या’च्या शुद्ध बोधाप्रत जाण्याची मनाला मुभा मिळते.

ध्यान (Meditation) ही मानवी मनाला सर्वाधिक सोपी असणारी प्रक्रिया आहे पण त्याचे परिणाम सर्वात अल्प असतात. निदिध्यासन (Contemplation) ही अधिक कठीण पण परिणामांच्या दृष्टीने मोठी गोष्ट आहे. आत्म-निरीक्षण आणि विचारमालिकांपासून मुक्ती (मुक्तिप्रद ध्यान) या गोष्टी सर्वाधिक कठीण आहेत परंतु त्याचे फळ मात्र सर्वात विशाल आणि महान असे असते. तुम्ही तुमच्या कलानुसार आणि क्षमतेनुसार यापैकी कोणत्याही प्रकाराची निवड करू शकता.

योग्य पद्धती म्हणायची झाली तर, ध्यानाच्या या सर्वच प्रकारांचा उपयोग करावा, प्रत्येक पद्धत तिच्या तिच्या स्थानी आणि तिच्या तिच्या उद्दिष्टांसाठीच वापरण्यात यावी. परंतु यासाठी एका दृढ श्रद्धेची, स्थिर धैर्याची आवश्यकता असते तसेच ‘योगा’साठी त्या त्या पद्धतीचा स्वतःहून अवलंबून करण्यासाठी म्हणून महान ‘संकल्प’ शक्तीची आवश्यकता असते.

– श्रीअरविंद (CWSA 36 : 293-294)

एकाग्र ध्यान :

इकडेतिकडे धावणाऱ्या मनाला एक विशिष्ट सवय लावणे ही एकाग्रता साधण्यासाठीची पहिली पायरी असली पाहिजे. ही विशिष्ट सवय म्हणजे, इकडेतिकडे न ढळता स्थिरपणे, एकच विषय घेऊन, त्यावर एकाच दिशेने क्रमबद्ध विचार करण्याची सवय होय. मनाने हा विचार करताना सर्व मोह, तसेच त्याला ढळवू पाहणारे सर्व हाकारे कटाक्षाने टाळले पाहिजेत. आपल्या सामान्य जीवनात अशी एकाग्रता वरचेवर पाहावयास मिळते, अनुभवावयास मिळते; मनाला सामान्य जीवनात बाह्य विषय, बाह्य क्रिया यांवर एकाग्र व्हावयाचे असते व ते तसे एकाग्र होतेही; परंतु असा बाह्य विषय नसताना आंतरिक विषयावर एकाग्र होणे हे मनाला फार अवघड जाते; तथापि, ज्ञानाच्या साधकाला अशी ही आंतरिक एकाग्रता प्रत्यक्षात आणणे आवश्यकच आहे.

एकाग्रता ही कल्पनेच्या फलदायी सारतत्त्वावर करावयाची असते. जीवाच्या इच्छेने एकाग्र होऊन तसा आग्रह धरला की, ही कल्पना तिच्यात अंतर्भूत असलेल्या सत्याची सर्व अंगे प्रकट करते. उदाहरणार्थ, जर ‘दिव्य प्रेम’ हे आपल्या एकाग्रतेचा विषय असेल तर, प्रेम म्हणजे ईश्वर ह्या संकल्पनेच्या सारभूत तत्त्वावर एकाग्रतेने चिंतन केले पाहिजे. त्या दिव्य प्रेमाचे बहुविध आविष्करण तेजोमय रीतीने उदित व्हावे अशा पद्धतीने मनाने त्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे.

ही एकाग्रता फक्त विचारांमध्ये नाही तर हृदयात, अस्तित्वात आणि साधकाच्या दृष्टीमध्येही असली पाहिजे. येथे विचार आधी आणि अनुभव नंतर असे होऊ शकते, पण कधीकधी, अनुभव आधी आणि नंतर त्या अनुभवातून ज्ञानाचा उदय असेही होऊ शकते. त्यानंतर मग प्राप्त झालेल्या गोष्टीचे अधिकाधिक चिंतन, मनन केले पाहिजे आणि ती जोवर नित्याचा अनुभव बनत नाही आणि पुढे जाऊन, जीवाचा तो नियमच किंवा धर्मच बनत नाही तोवर ती गोष्ट धरून ठेवली पाहिजे.

निदिध्यास :

एकाग्र ध्यानाची प्रक्रिया वर सांगितली; परंतु ह्या प्रक्रियेहून जोरदार, अधिक कष्टाची प्रक्रिया म्हणजे, समग्र मन हे कल्पनेच्या केवळ सारभूत अंशावरच एकाग्र करणे, त्याचे एकाग्रतेने निदिध्यासन करणे ही आहे. ध्यानविषयाचा फक्त मानसिक अनुभव घेण्यासाठी किंवा फक्त विचारगत ज्ञान मिळविण्यासाठी हा निदिध्यास केला जाऊ नये, तर कल्पनेच्या मागे असणाऱ्या वस्तूचे सार गाठण्यासाठी हा निदिध्यास केला जावा. या प्रक्रियेमध्ये साधकाचा विचार थांबतो आणि साधक तन्मयतेने वस्तूचे आनंदभरे दर्शन घेत राहातो अथवा आंतरिक समाधीच्या द्वारा त्या वस्तूत विलीन होऊन जातो. ही दुसरी प्रक्रिया जर उपयोगात आणली असेल तर नंतर, या प्रक्रियेने ज्या अवस्थेप्रत आपण चढून जातो त्या अवस्थेला खाली बोलावून, आपल्या निम्नतर अस्तित्वाचा ती ताबा घेईल, आपल्या सामान्य जाणिवेला ती प्रकाश, सामर्थ्य, आनंद प्रदान करेल असे करावे लागते. असे न केल्यास, आंतरिक समाधीत किंवा उच्च पातळीवर ती अवस्था आपली असेल पण आपण जागृतीत येऊन जगाच्या संपर्कात उतरलो की, आपल्या पकडीतून ती निसटलेली असेल, असे बरेच जणांचे होते. तेव्हा, हे असे अर्धवट प्रभुत्व हे पूर्णयोगाचे साध्य नाही.

मन निर्विषय करणे :

एकाच विषयावर मन एकाग्र करणे ही एक प्रक्रिया; विचार दृष्टिविषय झालेल्या एकाच वस्तूचा जोरदार निदिध्यास घेणे ही दुसरी प्रक्रिया; ह्या प्रक्रिया वर वर्णिल्या. तिसरी प्रक्रिया मन एकदम शांत, निर्विषय करणे ही आहे. अनेक मार्गांचा वापर करून, मन शांत करता येते. एक मार्ग असा आहे – मन क्रिया करीत असताना त्या क्रियेत साधकाने भाग घेऊ नये तर अगदी तटस्थ राहावे. मनाकडे केवळ पाहत राहावे; असे सारखे तटस्थतेने मनाकडे पाहात राहिले, तर शेवटी मन कंटाळते. त्याच्या उड्या, त्याची धावपळ ही त्याच्या मालकाच्या संमतीशिवाय चालली आहे हे त्याच्या लक्षात येते आणि मग ते अधिकाधिक शांत होत जाते व शेवटी पूर्ण शांत होते. मन शांत करण्याचा दुसरा मार्ग असा – मन जे विचार सुचवील ते साधकाने असंमत करावे. ते मनातून बाहेर फेकून द्यावे. ते जसजसे त्याच्या समोर येत जातील तसतसे त्यांना फेकून देत राहण्याचे कार्य त्याने करीत राहावे; आणि आपल्या अस्तित्वात मनाच्या धांगडधिंग्यामागे जी शांती नेहमीच वसत असते, त्या शांतीला चिकटून राहावे. असे करीत राहिल्याने, अस्तित्वातील गुप्त शांती प्रकट होते; साधकाच्या मनात, सर्व अस्तित्वांत महान शांती प्रकटपणे स्थिर होते आणि या शांतीबरोबर सर्वव्यापी शांत ब्रह्माची अनुभूती साधकाला प्राप्त होते. या महान शांतीच्या पायावर दुसरी सर्व उभारणी करता येते. ही उभारणी, ज्या ज्ञानाच्या व अनुभवाच्या आधारावर केली जाते ते ज्ञान वस्तूंविषयीच्या वरवरच्या लक्षणांचे ज्ञान नसते तर, ते ईश्वरी अभिव्यक्तीच्या अति-खोल असणाऱ्या सत्याचे ज्ञान असते.

– श्रीअरविंद

(CWSA 23 : 323-324)