Posts

आध्यात्मिकता २०

आपल्यामध्ये असलेल्या चिरंतन आत्म्याचा साक्षात्कार आपल्याला झाला आहे किंवा नाही हा प्रश्न व्यक्ती जोपर्यंत स्वतःला विचारत राहते; जोपर्यंत व्यक्तीच्या मनात काही शंका असते किंवा काही द्विधा मनस्थिती असते त्यातूनच हे सिद्ध होते की, अजूनपर्यंत ‘खरा’ संपर्क झालेला नाही. कारण जेव्हा ही घटना घडून येते, तेव्हा ती तिच्यासोबत अशी एक अवर्णनीय गोष्ट घेऊन येते, जी इतकी नूतन आणि इतकी खात्रीदायक असते की, शंकाकुशंका, प्रश्न यांना जागाच शिल्लक राहत नाही. तो खरोखरच एक नवजन्म असतो, ‘नवजन्म’ या शब्दाचा जो खराखुरा अर्थ आहे, अगदी त्या अर्थाने तो नवीन जन्म असतो.

तुम्ही एक नवीनच व्यक्ती बनता, आणि तुमचा मार्ग कोणताही असला किंवा नंतर त्या मार्गावर कोणत्याही अडचणी जरी आल्या तरी ती नवजन्माची जाणीव तुम्हाला कधीच सोडून जात नाही. ही गोष्ट इतर अनेक अनुभवांसारखी नसते, म्हणजे इतर अनुभव येतात आणि नंतर मागे पडतात, पडद्याआड जातात, त्यांची एक प्रकारची धूसर स्मृती तुमच्या मनात रेंगाळत राहते, ती स्मृती धरून ठेवणेसुद्धा काहीसे कठीण असते, त्याची आठवण कालांतराने अस्पष्ट, धूसर, अधिक धूसर होत जाते, मात्र हा अनुभव तसा नसतो.

तुम्ही एक नवीनच व्यक्ती बनलेले असता, आणि काहीही झाले तरी निश्चितपणे तुम्ही ती नवीन व्यक्ती असता. आणि मनाच्या सर्व अक्षमता, प्राणाच्या सर्व अडचणी, शरीराचे जडत्व या सर्वांनादेखील ही नवीन अवस्था बदलणे अशक्य असते. या नवीन अवस्थेमुळे चेतनेच्या जीवनामध्ये एक निर्णायक क्षण येतो. या साक्षात्कारापूर्वीची व्यक्ती आणि साक्षात्कारानंतरची व्यक्ती ही आता एकसारखीच असत नाही. …त्याचे खऱ्या अर्थाने पूर्णपणे प्रतिक्रमण (reversal) झालेले असते, ते प्रतिक्रमण असे असते की, ज्यामध्ये परतून मागे फिरता येत नाही.

आणि म्हणूनच जेव्हा लोकं मला सांगतात, “माझा माझ्या आत्म्याशी संपर्क झाला आहे की नाही हे जाणून घ्यायला मला आवडेल, ” तेव्हा मी त्यांना सांगते, “ज्याअर्थी तुम्ही हा प्रश्न विचारत आहात त्याअर्थी हे उघड आहे की, अजूनपर्यंत तुमचा तुमच्या आत्म्याशी संपर्क झालेला नाही. तुम्हाला अन्य कोणी उत्तर देण्याची आवश्यकता नसते, ते उत्तर तुमचे तुम्हीच स्वतःला द्यायचे असते.” जेव्हा ही गोष्ट घडून येते, तेव्हा त्याव्यतिरिक्त अन्य काही शिल्लक नसते. सारे काही संपलेले असते.

आणि आपण आत्ता त्याबद्दल बोलत आहोत म्हणून मी पुन्हा एकदा आठवण करून देते; श्रीअरविंदांनी काय सांगितले आहे, त्यांनी पुन्हापुन्हा जे सांगितले आहे, लिहिले आहे, पुन्हापुन्हा ठाशीव पद्धतीने जे सांगितले आहे त्याची मी आठवण करून देते. त्यांनी सांगितले आहे की, त्यांच्या योगाचा, पूर्णयोगाचा प्रारंभ या अनुभवानंतरच होऊ शकतो, त्या आधी नाही… त्यामुळे हा अनुभव येण्यापूर्वी, अतिमानस काय आहे हे आता आपल्याला कळायला लागले आहे. त्याच्यासंबंधी काही कल्पना तयार करता येत आहेत किंवा कोणत्याही प्रकारे, मग ते कितीही अल्पसे का होईना पण तुम्हाला त्याचे मूल्यमापन करता येत आहे अशा प्रकारच्या कोणत्याही भ्रामक कल्पनांना खतपाणी घालू नका.

म्हणून, या मार्गावर प्रगत होण्याची जर तुम्हाला इच्छा असेल तर प्रथमतः या नवजन्माच्या मार्गावर अतिशय विनम्रपणे तुम्ही तुमची पहिलीवहिली पावले टाकली पाहिजेत आणि तुम्हाला अतिमानसिक अनुभव येऊ शकतात या भ्रांतकल्पनांचा परिपोष करण्यापूर्वी, तो नवजन्म प्रत्यक्षात उतरविला पाहिजे…

तुम्हाला दिलासा देण्यासाठी मी एक गोष्ट सांगू इच्छिते की, तुम्ही या पृथ्वीवर आत्ता जीवन जगत आहात, या वस्तुस्थितीमुळेच, भलेही तुम्ही त्याबद्दल सचेत असाल किंवा नसाल, तुम्हाला हवे असो किंवा नसो, आता या पृथ्वीच्या वातावरणात प्रसृत होऊ लागलेले, नूतन अतिमानसिक द्रव्य तुम्ही तुमच्या प्रत्येक श्वासागणिक ग्रहण करत आहात. आणि ते द्रव्य तुमच्यामध्ये काही गोष्टींची तयारी करत आहे, आणि तुम्ही निर्णायक पाऊल उचलताक्षणीच, ते द्रव्य अचानकपणे आविष्कृत होईल.

– श्रीमाताजी [CWM 09 : 336-337]