Posts

साधना, योग आणि रूपांतरण – १८७

योगामधील केंद्रवर्ती प्रक्रिया – भाग ०३

खरा आत्मा (The real Self) हा पृष्ठभागावर नसतो तर तो खोल अंतरंगामध्ये आणि ऊर्ध्वस्थित असतो. अंतरंगामध्ये आंतरिक मन, आंतरिक प्राण, आंतरिक शरीराला आधार देणारा आत्मा असतो, आणि त्या आत्म्यामध्ये विश्वव्यापक होण्याची क्षमता असते. त्याच्याकडे स्वतःच्या आणि वस्तुमात्रांच्या ‘सत्या’शी थेट संपर्क साधण्याची क्षमता असते. त्याच्याकडे वैश्विक आनंदाची चव चाखण्याची क्षमता असते. त्याच्याकडे स्थूल भौतिक शरीराच्या दुःखभोगापासून आणि बंदिवान झाल्यामुळे आलेल्या क्षुद्रतेपासून मुक्ती मिळविण्याची क्षमता असते.

आजकाल अगदी युरोपमध्येसुद्धा, पृष्ठवर्ती भागाच्या मागे असणाऱ्या गोष्टीचे अस्तित्व वारंवार मान्य केले जात आहे, परंतु त्याचे स्वरूप समजावून घेण्यात त्यांची चूक होत आहे, त्याला ते ‘अवचेतन’ (subconscient) किंवा ‘प्रच्छन्न चेतना’ (subliminal) असे संबोधतात. वस्तुतः ते अस्तित्व त्याच्या स्वतःच्या पद्धतीने खूप सचेत असते; ते प्रच्छन्न नसते, फक्त ते पडद्याआड दडलेले असते इतकेच.

आमच्या मनोविज्ञानानुसार, ते अस्तित्व हे या छोट्या पृष्ठवर्ती व्यक्तिमत्त्वाशी, चेतनेच्या काही विशिष्ट चक्रांद्वारे जोडलेले असते, ‘योगा’मुळे आपल्याला त्यांची जाणीव होते. आपल्या आंतरिक अस्तित्वाचा काही अंशभाग या चक्रांच्या माध्यमातून बाह्य जीवनामध्ये पाझरतो, हा अंशभागच आपल्या जीवनाचा सर्वोत्तम भाग असतो आणि तो अंशभागच आपल्या कला, काव्य, तत्त्वज्ञान, आदर्श, धार्मिक आकांक्षा, ज्ञान आणि पूर्णत्वप्राप्तीसाठी केलेले प्रयत्न या गोष्टींना कारणीभूत ठरतो. परंतु ही आंतरिक चक्रं बहुतांशी, मिटलेली किंवा सुप्त असतात. ती खुली करणे आणि त्यांना जागृत व सक्रिय करणे हे ‘योगा’चे एक ध्येय असते.

ही चक्रं जसजशी खुली होतात, तशतशा आपल्यामध्ये आंतरिक अस्तित्वाच्या शक्ती आणि शक्यता उदयाला येऊ लागतात. प्रथमतः आपल्याला एका विशाल चेतनेची आणि नंतर वैश्विक चेतनेची जाणीव होते. त्यानंतर मात्र आपण मर्यादित जीवनं असणारी छोटीछोटी विलग व्यक्तिमत्त्वं म्हणून उरत नाही, तर आता आपण वैश्विक कृतीची केंद्र बनतो आणि त्यानंतर आपला वैश्विक शक्तींशी थेट संपर्क येतो. पृष्ठवर्ती व्यक्तित्व ज्याप्रमाणे वैश्विक शक्तींच्या हातचे अनिच्छुक बाहुले असते त्याप्रमाणे आपण बाहुले बनून राहण्याऐवजी, आता आपण विशिष्ट प्रमाणात सचेत बनू शकतो आणि प्रकृतीच्या लीलेचे ‘स्वामी’ बनू शकतो. मात्र हे किती प्रमाणात घडून येऊ शकते हे आंतरिक अस्तित्वाच्या विकासावर आणि त्याच्या उच्चतर आध्यात्मिक स्तरांप्रत असलेल्या ऊर्ध्वमुखी उन्मुखतेवर अवलंबून असते. त्याचवेळी हृदयचक्र खुले झाल्यामुळे, चैत्य पुरुषाची (psychic being) मुक्तता होते, आणि मग तो चैत्य पुरुष आपल्या अंतरंगामध्ये असणाऱ्या ‘ईश्वरा’ची आणि ऊर्ध्वस्थित असणाऱ्या उच्चतर ‘सत्या’ची आपल्याला जाणीव करून देण्याच्या दिशेने प्रगत होतो. (क्रमश:)

– श्रीअरविंद (CWSA 30 : 325)

धम्मपद : रस्त्याच्या कडेलासुद्धा एखादे सुंदर सुवासिक फूल उमललेले आढळते, त्याचप्रमाणे स्वयंप्रकाशित बुद्धांचे शिष्यदेखील, त्यांच्या बुद्धिप्रकाशाच्या योगे, अंध व अज्ञानी जनसमूहात, चारचौघांमध्ये उठून दिसतात.

श्रीमाताजी : येथे काही चांगल्या सूचना करण्यात आल्या आहेत, उदाहरणार्थ, इतर जणं काय करतात किंवा ते कोणत्या चुका करतात याच्याशी तुमचा संबंध असता कामा नये, तर स्वत:चे दोष, निष्काळजीपणा यांकडेच तुम्ही लक्ष पुरविले पाहिजे आणि ते दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

दुसरी एक सुजाण सूचना अशी की, अशा कोणत्याही गोष्टी, ज्या प्रत्यक्ष कृतीमध्ये कार्यान्वित होत नाहीत, अशा गोष्टींचे वर्णन करताना आपले शब्दपांडित्य खर्च करू नये. कमी बोलावे आणि उत्तम कृती करावी. पोकळ शब्द हे सुगंध नसलेल्या फुलाप्रमाणे असतात.

तुम्ही तुमच्या स्वत:च्या दोषांनी, त्रुटींनी नाउमेद होऊ नका. रस्त्याच्या कडेला असलेल्या कचऱ्याच्या ढिगामध्येसुद्धा अतिशय निर्मळ फूल उमललेले आढळून येते. मथितार्थ असा की, ज्यामधून विशुद्ध अशा साक्षात्काराचा जन्मच होणार नाही इतके त्याज्य काहीच नसते.

व्यक्तीचा भूतकाळ कसा का असेना, हातून कोणत्याही चुका का घडलेल्या असेना, माणूस किती का घोर अज्ञानात जगलेला असेना, तरीही प्रत्येकाच्या अंत:करणात खोलवर एक परमोच्च असे पावित्र्य, शुद्धता दडलेली असते की ज्याचे सुंदर अशा साक्षात्कारामध्ये रूपांतर होऊ शकते. केवळ त्याचाच विचार करा, त्यावरच लक्ष केंद्रित करा, इतर सर्व अडचणी, अडथळे, संकटे यांची चिंता करू नका.

तुम्ही जे बनू इच्छिता केवळ त्यावरच लक्ष केंद्रित करा, तुम्ही जे बनू इच्छित नाही ते संपूर्णपणे, शक्य तितके नि:शेषतया विसरण्याचा प्रयत्न करा.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 215)

आपले जीवन सत्कारणी लागावे अशी ज्यांची इच्छा असते, तेच असे म्हणतात की, ”जोवर आवश्यकता आहे तोवर मी इथे राहीन, अगदी शेवटच्या क्षणापर्यंत! आणि माझे ध्येय साध्य करत असताना एकही क्षण मी व्यर्थ दवडणार नाही”, वेळ आली तर अशीच माणसं सर्वोत्तम कामगिरी करून दाखवितात.

असे का? – कारण अगदी सोपे आहे, कारण ते त्यांच्या ध्येयासाठी जगतात, त्यांच्या ध्येयाच्या सत्यासाठी जगत असतात, कारण त्यांचे ध्येय हीच त्यांच्यासाठी खरी गोष्ट असते, ते ध्येय हेच त्यांच्या जगण्याचे खरे प्रयोजन असते, आणि सर्व गोष्टींमध्ये त्यांना हे ध्येयच दिसत असते, अस्तित्वाचे प्रयोजन दिसत असते आणि असे लोक भौतिक जीवनाच्या हीनदीनतेमध्ये कधीच खाली उतरून येत नाहीत.

तात्पर्य असे की, व्यक्तीने मृत्युची इच्छा कधीही धरता कामा नये.
व्यक्तीने मृत्युची आस कधीही बाळगू नये.
व्यक्तीला मृत्युची भीती कधीही वाटता कामा नये.
आणि सर्व परिस्थितींमध्ये व्यक्तीने आत्मोल्लंघनाचा संकल्प करायला हवा.

– श्रीमाताजी
(CWM 04 : 354-355)

‘पूर्णयोगा’ची योगसूत्रे – ०५

चेतना (consciousness) ईश्वराप्रत खुली करणे, अधिकाधिक आंतरिक चेतनेमध्ये निवास करत, तेथून बाह्य जीवनावर कार्य करणे, आंतरतम असणाऱ्या चैत्य पुरुषाला (psychic) पुढे आणणे आणि त्याच्या शक्तीने अस्तित्वाचे शुद्धीकरण आणि परिवर्तन घडविणे; ज्यामुळे ते अस्तित्व रूपांतरासाठी सज्ज होऊ शकेल आणि दिव्य ज्ञान, दिव्य संकल्प आणि दिव्य प्रेम यांच्याशी एकत्व पावू शकेल, हे या योगाचे ध्येय आहे. दुसरे ध्येय म्हणजे योगिक चेतना विकसित करणे – म्हणजे, अस्तित्वाचे त्याच्या सर्व स्तरांवर वैश्विकीकरण करणे, विश्व-पुरुषाविषयी आणि वैश्विक शक्तींविषयी (cosmic being and cosmic forces) जागृत होणे, आणि अधिमानसापर्यंतच्या (Overmind) सर्व स्तरांवर ईश्वराशी एकत्व पावून राहणे. तिसरे ध्येय असे की, अधिमानसाच्या पलीकडे असणाऱ्या, अतिमानसिक चेतनेच्या (supramental consciousness) माध्यमातून, विश्वातीत ईश्वराच्या (transcendent Divine) संपर्कात येणे, चेतनेचे व प्रकृतीचे अतिमानसिकीकरण घडविणे आणि गतिशील अशा ‘दिव्य सत्या’च्या साक्षात्कारासाठी तसेच त्या सत्याच्या पार्थिव-प्रकृतीमधील रूपांतरकारी अवतरणासाठी स्वतःला त्याचे एक साधन बनविणे.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 20)

परमेशाचे परिपूर्ण पात्र बनणे आणि दिव्य अतिमानव बनणे; हे तुमचे कार्य आहे आणि हे तुमच्या अस्तित्वाचे ध्येय आहे आणि ह्याचसाठी तुम्ही इथे आहात.

या व्यतिरिक्त इतर जे काही तुम्हाला करावे लागेल ते दुसरे तिसरे काही नसून, एकतर तुमची तयारी करून घेणे आहे, किंवा मार्गावरील आनंद आहे, किंवा हेतूपासून स्खलन, ध्येयच्युती आहे.

या मार्गाधारे मिळणारी सत्ता वा शक्तिसामर्थ्य किंवा मार्गावरील आनंद हे तुमचे गंतव्य आणि प्रयोजन नसून, परमेशाचे परिपूर्ण पात्र बनणे आणि दिव्य अतिमानव बनणे; हेच तुमचे गंतव्य आणि प्रयोजन आहे.

तुम्हाला मार्गावरील हा आनंद मिळत आहे, कारण तुम्हाला ज्याचा वेध लागला आहे, तोदेखील या मार्गावर तुमच्या बरोबर आहे. तुम्ही तुमची सर्वोच्च शिखरे सर करावीत, यासाठीच आरोहणाची ही शक्ती तुम्हाला देण्यात आली आहे.

जर तुमचे काही कर्तव्य असेलच तर ते हेच होय; जर तुम्ही असे विचारत असाल की, तुमचे ध्येय काय असावे, तर ते ध्येय हेच असावे. जर तुम्ही सुखाची अभिलाषा बाळगत असाल तर, उपरोक्त गोष्टीपेक्षा अधिक दुसरा कोणताच आनंद नाही; कारण स्वप्नाचा आनंद असो किंवा झोपेचा आनंद असो किंवा स्व-विस्मृतीचा आनंद असो, हे सारे इतर आनंद तोडकेमोडके वा मर्यादित असतात. पण हा तुमच्या संपूर्ण अस्तित्वाचा आनंद आहे.

जर तुम्ही असे विचारत असाल की, माझे अस्तित्व काय, तर ईश्वर हे तुमचे अस्तित्व आहे आणि इतर सर्वकाही ही त्याची केवळ भग्न वा विपर्यस्त रूपे आहेत.

जर तुम्ही सत्य शोधू पाहात असाल, तर ते सत्य हेच होय. तेच तुमच्यासमोर सातत्याने असू द्या आणि सर्व गोष्टींमध्ये तुम्ही त्याच्याशीच एकनिष्ठ राहा.

– श्रीअरविंद
(CWSA 12 : 150)