Posts

बहुधा कोणतेही दोन मार्ग अगदी एकसारखेच असत नाहीत, प्रत्येकाने स्वत:चा मार्ग स्वत:च शोधला पाहिजे. पण येथे व्यक्तीने एक चूक करता कामा नये; ती म्हणजे तो मार्ग ‘तर्कबुद्धी’ने ‘शोधता’ कामा नये, तर तो मार्ग ‘अभीप्से’च्या (Aspiration) आधारे ‘शोधला’ पाहिजे. अभ्यास आणि विश्लेषण यांद्वारे नव्हे तर, अभीप्सेची तीव्रता आणि आंतरिक उन्मुखतेबद्दलचा (Inner opening) प्रामाणिकपणा यांच्या माध्यमातून तो मार्ग शोधला पाहिजे.

व्यक्ती खरोखर आणि पूर्णपणे जेव्हा त्या आध्यात्मिक ‘सत्या’प्रतिच अभिमुख झालेली असते, – मग त्याला नाव कोणतेही दिलेले असूदे, जेव्हा बाकी सर्व गोष्टी तिच्या दृष्टीने गौण ठरतात, जेव्हा ते आध्यात्मिक सत्यच तिच्या लेखी अपरिहार्य आणि अटळ गोष्ट बनते, तेव्हा त्याकडून उत्तर मिळण्यासाठी, त्याकडून प्रतिसाद मिळण्यासाठी तीव्र, निरपवाद, संपूर्ण एकाग्रतेचा केवळ एक क्षणदेखील पुरेसा असतो. अशा उदाहरणामध्ये अनुभव आधी येतो, नंतर त्याचा परिणाम आणि स्मृती म्हणून त्या अनुभवाची मांडणी स्पष्ट होते. आणि अशा रीतीने वाटचाल केल्यास, व्यक्तीकडून कोणतीही चूक होण्याची शक्यता उरत नाही….

हे तुमच्यासाठी चांगले असते, हेच केवळ आवश्यक असते. मात्र ती काहीही असू दे, अगदी ती स्वयंपूर्ण असली तरीदेखील तुम्ही जेव्हा ती इतरांवर लादू पाहता तेव्हा ती मिथ्या बनते…

…मार्ग दाखविला पाहिजे, प्रवेशद्वारे खुली केली पाहिजेत मात्र प्रत्येकाने स्वत:चाच मार्ग अनुसरला पाहिजे, त्या प्रवेशद्वारांमधून जात, स्वत:च्या वैयक्तिक साक्षात्काराच्या दिशेने स्वत:च वाटचाल केली पाहिजे.

अशा वेळी, केवळ एकच मदत मिळू शकते आणि तीच स्वीकारली पाहिजे; ती मदत असते ‘ईश्वरी कृपेची’! ही कृपा, प्रत्येकामध्ये ज्याच्या त्याच्या गरजेनुरूप, स्वत:ची अशी योजना करीत असते.

– श्रीमाताजी
(CWM 09 : 406-407)

विचार शलाका – ०६

निर्व्यक्तिक, ‘केवल’, ‘अनंत’ अशी ईश्वराची कल्पना करून, त्याचा अनुभव घ्यावयाचा की विश्वातीत, विश्वात्मक नित्य पुरुषाचा वेध घेऊन, त्याला जाणून घ्यावयाचे, त्याचा अनुभव घ्यावयाचा; हे ठरवण्याची आपल्याला मोकळीक आहे; आपला त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग कोणताही असू देत, परंतु आध्यात्मिक अनुभूतीचे एक महत्त्वाचे सत्य हे आहे की, तो ईश्वर आपल्या हृदयांतच आहे; तो सर्व जीवनाच्या केंद्रस्थानी आहे आणि सर्व जीवन त्याच्यामध्ये सामावलेले आहे आणि त्याचा शोध घेणे म्हणजेच महान आत्मशोध होय.

सांप्रदायिक श्रद्धांचे भिन्न भिन्न प्रकार हे, भारतीय मनाला, सर्वत्र असलेल्या एकमेव ‘परमात्म्या’च्या व ‘ईश्वरा’च्या दर्शनाचे भिन्न प्रकार म्हणून प्रतीत होतात. ‘आत्मसाक्षात्कार’ ही एकच आवश्यक गोष्ट आहे. ‘अंतरात्म्या’प्रत खुले होणे, ‘अनंता’त वसति, ‘शाश्वता’ची साधना व सिद्धी, ‘ईश्वरा’शी ऐक्य, हे भारतीय धर्माचे एकमेव साध्य आहे. आध्यात्मिक मोक्षाचा अर्थ हाच आहे, हेच ते जिवंत ‘सत्य’ आहे, जे मानवाला पूर्णत्व देते व मुक्त करते.

सर्वोच्च आध्यात्मिक सत्याचे केलेले गतिमान अनुसरण आणि सर्वोच्च आध्यात्मिक ध्येय हे भारतीय धर्माला एकत्र आणणारे बंध आहेत; त्याच्या हजारो रूपांच्या पाठीमागे, जर कोणते सामाईक सार असेल तर ते हेच होय.

– श्रीअरविंद
(CWSA 20 : 183-184)

(ऑगस्ट १९०९)

शाश्वत धर्माचा प्रसार हे आमचे उद्दिष्ट आहे आणि त्या शाश्वत धर्मावर आधारित वंशधर्माचे आणि युगधर्माचे पालन करणे हे आमचे उद्दिष्ट आहे….

….आम्ही आमच्या धर्माच्या मार्गापासून ढळलेलो आहोत, आमच्या ध्येयापासून दूर झालेलो आहोत; प्रमादपूर्णतेचे, घोडचुकांचे, धादांत भ्रमाचे, धार्मिक गोंधळाचे बळी ठरलेले आपण, ‘आर्य’ शिक्षण आणि त्याच्या नियामक नीतीतत्त्वांपासून वंचित ठरलो आहोत. ‘आर्य’ वंशकुळातील असूनसुद्धा, जेत्यांच्या वर्चस्वाने आणि दुःखवेदनांचे बळी ठरल्यामुळे, आपण कनिष्ठतेचा कायदा मान्य केला आहे आणि त्यामुळे त्याच्या पाठोपाठ येणारे दास्यत्वदेखील आपण मान्य केले आहे. आपण तगून राहावे, आपला टिकाव लागावा असे वाटत असेल तर आणि या कायम स्वरूपी नरकवासामधून आपली सुटका व्हावी अशी किंचितशी जरी इच्छा आपल्या मनात असेल तर, राष्ट्राची सेवा करणे हेच आपले प्रथम कर्तव्य आहे. आणि हे करण्याचा एक मार्ग आहे तो म्हणजे आर्य चारित्र्याची पुनर्घडण. त्यातून घडणारे ह्या मातृभूमीचे भावी सुपुत्र हे ज्ञानवंत, सत्यनिष्ठ, मानवतावादी, बंधुभावाने प्रेरित झालेले, धैर्यवान, विनम्र असतील. संपूर्ण राष्ट्राला, विशेषत: या देशातील तरुणांना, पुरेसे शिक्षण, उच्च आदर्श आणि ज्यामधून हे आर्य आदर्श उदयाला येऊ शकतील असा कार्याचा मार्ग प्रदान करणे हे आपल्यासमोरील पहिले उद्दिष्ट असले पाहिजे. आणि असे करण्यामध्ये जोवर आम्ही यशस्वी होत नाही तोपर्यंत शाश्वत धर्माचा प्रचारप्रसार करणे म्हणजे नापीक जमिनीमध्ये बी पेरण्यासारखे आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 09 : 191-192)

विचार शलाका – ०७

व्यक्तीमध्ये एकदा का विचाराची शक्ती आली की, तेथे ताबडतोब क्षणोक्षणीच्या ह्या अगदी पशुवत अशा दैनंदिन जीवनापेक्षा काहीतरी उच्चतर अशी आकांक्षा अपरिहार्यपणे त्याच्यामध्ये उदय पावते; आणि त्यातूनच त्याला जगण्याची उमेद आणि ऊर्जा प्राप्त होते.

ही गोष्ट समूहांप्रमाणेच व्यक्तींनादेखील लागू पडते. त्या समूहाच्या धर्माच्या, त्याच्या ध्येयांच्या मूल्यावर, म्हणजे, ज्याला ते त्यांच्या अस्तित्वाची सर्वोच्च गोष्ट मानतात त्यावर त्या समूहांचे मूल्य अवलंबून असते, ते त्याच्या अगदी समप्रमाणात असते.

अर्थातच आपण जेव्हा धर्माविषयी बोलतो, तेव्हा आपल्याला जर ‘प्रमाण धर्म’ असे म्हणायचे असेल तर, व्यक्तीला त्याची जाण असो वा नसो, अगदी ती व्यक्ती ज्या धर्माचा नावलौकिक आहे, परंपरा आहे अशा एखाद्या धर्माशी संबंधित असली तरीही खरोखरच प्रत्येक व्यक्तीला तिचा तिचा एक धर्म असतो. एखादी व्यक्ती जरी त्यातील सूत्रे मुखोद्गत म्हणू शकत असेल, ती व्यक्ती विहित विधी करीत असेल तरीदेखील प्रत्येक व्यक्ती तिच्या तिच्या पद्धतीने धर्म समजून घेते आणि तशी वागते; धर्माचे नाव केवळ एकच असते पण हा समान धर्म, ज्याचे ते परिपालन करीत आहेत असे ते समजतात तो धर्म, प्रत्येक व्यक्तीगणिक समानच असतो असे नाही.

आपल्याला असे म्हणता येते की, त्या ‘अज्ञाता’विषयीच्या किंवा परमश्रेष्ठाविषयीच्या कोणत्याही अभीप्सेच्या अभिव्यक्तीविना मानवी जीवन जगणे हे खूप अवघड झाले असते. प्रत्येकाच्या हृदयात जर अधिक चांगल्या गोष्टीविषयीची, भले ती कोणत्याही प्रकारची असो, आशा नसती, तर जीवन जगत राहण्यासाठीची ऊर्जा मिळविणे व्यक्तीला कठीण झाले असते.

पण फारच थोडी माणसं स्वतंत्रपणे विचार करू शकतात, अशा वेळी त्यांनी स्वत:साठी स्वत:चाच एखादा वेगळा पंथ काढण्यापेक्षा, कोणत्यातरी धर्माचा स्वीकार करणे, त्यामध्ये सहभागी होणे, आणि त्या धार्मिक सामूहिकतेचा एक भाग बनणे हे अधिक सुकर असते. त्यामुळे वरवर पाहता, एखादी व्यक्ती ह्या धर्माची वा त्या धर्माची असते, पण हे फक्त वरवरचे भेद असतात.

– श्रीमाताजी
(CWM 09 : 355-356)

विचार शलाका – ०६

प्रश्न : माताजी, सामान्य माणसाच्या जीवनात धर्माची आवश्यकता आहे का?

श्रीमाताजी : समाजजीवनात या गोष्टीची आवश्यकता असते, कारण सामूहिक अहंकारावर उपाय म्हणून धर्माचा उपयोग होतो, या नियंत्रणाविना हा सामूहिक अहंकार प्रमाणाबाहेर वाढू शकतो.

व्यक्तीच्या चेतनेच्या पातळीपेक्षा सामूहिक चेतनेची पातळी नेहमीच निम्न असते. हे लक्षात येण्यासारखे आहे, उदा. जेव्हा माणसं मोठ्या संख्येने एखाद्या गटात एकत्रित येतात तेव्हा त्यांच्या चेतनेची पातळी खूप घसरते. जमावाची चेतना ही व्यक्ती-चेतनेपेक्षा खालच्या स्तरावरची असते आणि समाजाची सामूहिक चेतना ही, ज्या व्यक्तींनी तो समाज बनलेला आहे त्या व्यक्तींच्या चेतनेपेक्षा खचितच खालच्या पातळीवरची असते.

त्यासाठी धर्माची आवश्यकता आहे. सामान्य जीवनात, व्यक्तीला त्याची जाणीव असो वा नसो, तिला नेहमीच एक धर्म असतो… ती व्यक्ती ज्या देवाची पूजा करते ती यशाची देवता असेल, पैशाची देवता असेल, सत्तेची देवता असेल, किंवा अगदी कुलदेवता असेल : मुलाबाळांची देवता, कुटुंबाची किंवा कुळाची देवता, पूर्वजांची देवता असू शकेल.

धर्म हा नेहमीच अस्तित्वात असतो. प्रत्येक व्यक्तीगणिक त्या धर्माचा दर्जा वेगवेगळा असेल, पण अस्तित्वाचा केंद्रबिंदू असणाऱ्या कोणत्याही मूलभूत आदर्शाविना नुसतेच जीवन जगत राहणे हे माणसाला कठीण असते. बऱ्याचदा त्याला त्याच्या आदर्शाची जाणीवही नसते आणि जर त्याला विचारले की, तुझा आदर्श काय तर तो ते शब्दांत सांगू शकणार नाही, पण त्याचा काही एक धर्म असतो, भले तो अस्पष्ट, धूसर असेल, पण त्याच्या जीवनाच्या दृष्टीने ती खूप मोलाची गोष्ट असते.

बहुतांशी लोकांसाठी तो आदर्श हे एक प्रकारचे संरक्षण असते. व्यक्तीला त्यामुळे जगण्यासाठी सुरक्षित वाटेल अशी परिस्थिती प्राप्त होते. त्याच्या दृष्टीने ते फार मोठे ध्येय असते. मानवी प्रयत्नांमागची ती एक मोठी प्रेरणा असते असेही म्हणता येईल…

– श्रीमाताजी
(CWM 09 : 354-355)

जेव्हा तुम्ही योगमार्गाकडे वळता तेव्हा, तुमच्या सर्व मानसिक रचना आणि तुमचे सर्व प्राणिक मनोरे कोलमडून पडले तरी चालतील, अशी स्वत:ची तयारी ठेवली पाहिजे. तुमच्या श्रद्धेखेरीज तुम्हाला इतर कोणत्याही गोष्टीचा आधार नाही, अशा निराधार अवस्थेत हवेत लटकत राहण्याची तुमची तयारी असली पाहिजे. तुम्ही तुमचा भूतकालीन ‘स्व’ आणि त्याला चिकटून असलेले सर्व काही पूर्णांशाने विसरले पाहिजे, तुमच्या चेतनेमधून त्या उपटून फेकून दिल्या पाहिजेत आणि सर्व प्रकारच्या बंधनांपासून मुक्त अशा स्थितीत नव्याने जन्माला आले पाहिजे. तुम्ही काय होतात ह्याचा विचार करू नका, पण तुम्हाला काय व्हायचे आहे, त्याच अभीप्सेचा विचार करा; जे तुम्ही प्रत्यक्षात उतरवू पाहत आहात त्याच्यामध्येच तुम्ही असले पाहिजे. तुमच्या मृत भूतकाळाकडे पाठ फिरवा आणि भविष्याकडे पाहा. ईश्वर हाच तुमचा धर्म, ईश्वर हाच तुमचा देश, ईश्वर हेच तुमचे कुटुंब.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 82-84)

श्रीमाताजी : तुम्ही तुमचे सर्व नातेसंबंध हे तुमच्या आंतरिक निवडीच्या स्वातंत्र्यानुसार नव्याने निर्माण केले पाहिजेत. तुम्ही ज्या परंपरेमध्ये जन्माला आला आहात किंवा मोठे झाला आहात ती परिस्थिती तुमच्यावर वातवारणाच्या दबावाने किंवा सामान्य मनाद्वारे वा इतरांच्या निवडीद्वारे लादण्यात आलेली आहे. तुमच्या मौनसंमतीमध्ये देखील सक्तीचा एक भाग असतो. धर्म हा देखील माणसांवर लादण्यात येतो, त्याला धार्मिक भीतीच्या सूचनेचा, वा कोणत्यातरी आध्यात्मिक किंवा इतर संकटाच्या धमकीचा आधार असतो.

ईश्वराशी तुमचे जे नाते असते त्याबाबतीत मात्र अशा प्रकारची कोणतीही बळजबरी चालत नाही. ते नाते स्वेच्छेचे असावे, ती तुमच्या मनाची आणि हृदयाची निवड असली पाहिजे. आणि ती निवड उत्साहाने आणि आनंदाने केलेली असली पाहिजे. ते कसले आले आहे ऐक्य की, ज्यामध्ये व्यक्ती भयकंपित होते आणि म्हणते, ”माझ्यावर सक्ती करण्यात आली आहे, मी काहीच करू शकत नाही !” सत्य हे स्वत:सिद्ध असते आणि ते जगावर लादता कामा नये. लोकांनी आपला स्वीकार करावा, अशी कोणतीही गरज सत्याला भासत नाही. ते स्वयंभू असल्यामुळे लोक त्याविषयी काय बोलतात किंवा लोकांची त्यावर निष्ठा आहे की नाही, यावर त्याचे अस्तित्व अवलंबून असत नाही.

पण ज्याला धर्माची स्थापना करावयाची असते त्याला मात्र अनेक अनुयायी असावे लागतात. एखाद्या धर्मामध्ये जरी खरीखुरी महानता नसली तरी, कितीजण त्या धर्माचे अनुयायी आहेत त्या संख्येवर लोक त्या धर्माची ताकद आणि महानता ठरवितात. मात्र आध्यात्मिक सत्याची महानता ही संख्येवर अवलंबून नसते.

मला एका नवीन धर्माचा प्रमुख माहीत आहे, जो त्या धर्माच्या संस्थापकाचा मुलगा आहे. तो एकदा म्हणाला की, “अमुक धर्माची जडणघडण होण्यासाठी इतकी शतकं लागली आणि तमुक धर्माला अमुक इतकी शतकं लागली, पण आमच्या धर्मात मात्र गेल्या पन्नास वर्षातच चाळीस लाखांपेक्षा अधिक अनुयायी आहेत, तेव्हा बघा आमचा धर्म केवढा श्रेष्ठ आहे !”

एखाद्या धर्माच्या महानतेचे मोजमाप हे त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांच्या संख्येवर अवलंबून असू शकते, पण जरी अगदी एकही अनुयायी लाभला नाही तरीही सत्य मात्र सत्यच असते. जेथे मोठमोठा गाजावाजा चाललेला असतो तेथे माणसं खेचली जातात; पण जिथे सत्य शांतपणे आविष्कृत होत असते, तेथे कोणीही फिरकत नाहीत. जे स्वत:च्या मोठेपणाचा दावा करतात, त्यांना जोरजोरात सांगावे लागते, जाहिरात करावी लागते, अन्यथा त्यांच्याकडे लोक मोठ्या संख्येने आकर्षित होणार नाहीत. पण लोक त्याविषयी काय म्हणतात याची पर्वा न करता काम केले असेल, तर ते फारसे विख्यात नसते आणि साहजिकच, लोक त्याकडे मोठ्या संख्येने वळत नाहीत. पण सत्याला मात्र जाहिरातबाजीची गरज नसते, ते स्वत:ला दडवून ठेवत नाही पण स्वत:ची प्रसिद्धीदेखील करत नाही. परिणामांची चिंता न करता, आविष्कृत होण्यातच त्याची धन्यता सामावलेली असते, ते प्रशंसा मिळावी म्हणून धडपडत नाही किंवा अप्रशंसा टाळत नाही, जगाने त्याचा स्वीकार केला काय किंवा त्याच्या कडे पाठ फिरवली काय, सत्याला त्याने काहीच फरक पडत नाही.

– श्रीमाताजी

(CWM 03 : 82-84)

अध्यात्माचा, अतिमानसाचा, सामान्य मानवी चेतनेच्या अतीत असणाऱ्या आणि त्या उच्च क्षेत्रामधून जीवनावर प्रभाव टाकणाऱ्या गोष्टीचा वेध घेणे म्हणजे ‘धर्म’ अशी धर्माची व्याख्या श्रीअरविंदांनी केली आहे. अशा रीतीने, धर्म तर्कबुद्धीच्या पलीकडे असणाऱ्या गोष्टींचा वेध घेत असल्याने धर्म हा तर्कातीत असतो. त्यामुळे धर्माच्या क्षेत्रामध्ये तर्कबुद्धीचा कसा काय पाडाव लागणार ? त्यांच्या म्हणण्याचा अर्थ असा की, एखाद्याने धर्माच्या क्षेत्राचे मूल्यमापन करण्यासाठी आणि त्यात प्रगती करण्यासाठी तर्कबुद्धीचा वापर करावयाचे ठरविले तर निश्चितपणे त्याच्या चुका होणार. कारण तर्कबुद्धी ही तेथील स्वामी नाही, आणि ती त्यावर प्रकाशदेखील टाकू शकणार नाही. जर तुम्ही कोणताही धर्म तुमच्या बुद्धिमत्तेच्या साहाय्याने मापू पाहत असाल तर तुमच्या चुका निश्चितपणे होणार. कारण धर्म हा तर्कक्षेत्राच्या पलीकडचा आणि बाहेरचा आहे. सामान्य जीवनामध्ये बुद्धीचे क्षेत्र ज्या परिघापर्यंत आहे तेथवर तर्कबुद्धी मूल्यमापन करू शकते. आणि श्रीअरविंदांनी म्हटल्याप्रमाणे, सामान्य मानवी जीवनात प्राणिक आणि मानसिक कृतींवर नियंत्रण ठेवणे, त्यांचे नियमन करणे हेच तर्कबुद्धीचे खरेखुरे कार्य असते.

उदाहरणार्थ, जर कोणा व्यक्तीमध्ये प्राणिक असमतोल असेल, विकार असतील, आवेग, वासना आणि तत्सम इतर गोष्टी असतील आणि अशा वेळी जर त्या व्यक्तीने तर्कबुद्धीचा आश्रय घेतला आणि त्या तर्कबुद्धीचा वापर करून त्या दृष्टीने या गोष्टींकडे पाहावयाचा प्रयत्न केला तर, ती व्यक्ती या सर्व गोष्टी परत सुव्यव्यस्थित करू शकते. प्राण आणि मन यांच्या सर्व हालचाली संघटित करणे आणि नियमित करणे हे खरोखर तर्कबुद्धीचे खरे कार्य आहे. उदाहरण द्यायचे झाले तर, दोन संकल्पना एकमेकींशी मिळत्याजुळत्या आहेत, का त्या एकमेकींच्या विरोधी आहेत, आपल्या मानसिक संरचनेमध्ये दोन सिद्धान्त एकमेकांना पूरक आहेत, का ते सिद्धान्त एकमेकांना मारक आहेत, हे पाहण्यासाठी तुम्ही तर्कबुद्धीचा आश्रय घेऊ शकता. सर्व गोष्टी पारखणे आणि त्यांची सुव्यवस्था लावणे, आणि त्यापेक्षा देखील अमुक एखादा आवेग हा उचित म्हणजे तर्कसंगत आहे की अनुचित आहे, त्यातून काही अरिष्ट तर उद्भवणार नाही ना, हे पाहणे किंवा ज्यामुळे आयुष्यामध्ये फारसे काही बिघडणार नाही, तो आवेग चालवून देण्याजोगा आहे का, हे पाहण्याचे काम तर्कबुद्धीचे आहे. हे तर्कबुद्धीचे खरे कार्यक्षेत्र आहे, हा श्रीअरविंदांच्या म्हणण्याचा अर्थ आहे.

– श्रीमाताजी
(CWM 07 : 166-167)

प्रश्न : ज्यांची चेतना सामान्य आहे अशा माणसांसाठी धार्मिक विधी महत्त्वाचे असतात का?

श्रीमाताजी : धार्मिक विधी म्हणजे तुला काय म्हणावयाचे आहे?

प्रश्नकर्ता : जप वगैरे गोष्टी.

श्रीमाताजी : ओह ! ती तर अगदीच सापेक्ष गोष्ट आहे. त्या गोष्टींचा तुमच्यावर काय परिणाम होतो आणि तुम्ही त्यावर किती विश्वास ठेवता, यावरच त्यांचे मूल्य अवलंबून असते. जर त्या गोष्टींनी तुमचे मन एकाग्र व्हायला मदत होत असेल, तर ती चांगली गोष्ट आहे. पण बहुधा सामान्य चेतना असणारे लोक ती गोष्ट अंधश्रद्धेपोटी करतात. त्यांची अशी समजूत असते की, “मी जर ह्या गोष्टी केल्या, मी जर आठवड्यातून एकदा देवळात किंवा चर्च वगैरेंमध्ये गेलो, प्रार्थना केली तर माझ्याबाबतीत काहीतरी चांगले घडून येईल.” ही अंधश्रद्धा आहे, ती जगभर सर्वत्र पसरलेली आहे, पण तिला आध्यात्मिक दृष्टिकोनातून अजिबात महत्त्व नाही.

– श्रीमाताजी

(CWM 06 : 193)

प्रश्न : धर्माचे स्वरूप नेमके काय आहे? आध्यात्मिक जीवनमार्गातील तो अडथळा आहे का?

श्रीमाताजी : मानवतेच्या उच्चतर मनाशी धर्माचा संबंध असतो. मानवाचे उच्च मन, त्याच्या पलीकडे जे आहे त्याच्या पर्यंत पोहोचण्याचा स्वत:च्या क्षमतेनुसार प्रयत्न करत असते. मानव ज्याला ईश्वर वा चैतन्य वा सत्य वा श्रद्धा वा ज्ञान वा अनंत, केवल अशा नावांनी संबोधतो, ज्याच्या पर्यंत मानवी मन पोहोचू शकत नाही, पण तरीही तेथे पोहोचण्याचा ते प्रयत्न करत राहते, त्या प्रयत्नाला ‘धर्म’ ही संज्ञा आहे.

धर्म हा त्याच्या मूळ उगमापाशी दिव्य, ईश्वरी असू शकतो पण त्याचे व्यवहारातील स्वरूप हे ईश्वरी नसून मानवी असते. वस्तुत: आपण एक धर्म असे न म्हणता अनेक धर्मांविषयी बोलले पाहिजे कारण माणसांनी अनेक धर्मांची स्थापना केली आहे…..

सर्व धर्मांची गोष्ट एकसारखीच आहे. एखाद्या महान गुरुचे या भूतलावर येणे हे धर्माच्या उदयाचे निमित्त असते. तो येतो, तो त्या दिव्य सत्याचा अवतार असतो आणि तो ती दिव्य सद्वस्तु उघड करून दाखवितो; पण माणसं त्याचाच ताबा घेतात, त्याचा व्यापार मांडतात, एखादी राजकीय संघटना असावी तशी त्याची अवस्था करून टाकतात. मग अशा धर्माला शासन, धोरणे, नियम, पंथ, सिद्धान्त, कर्मकांड, सणसमारंभ, उत्सव यांनी सजवले जाते आणि या साऱ्या गोष्टी त्या त्या धर्मीयांसाठी जणूकाही निरपवाद व अनुल्लंघनीय अशा बनून जातात. तेव्हा मग धर्म देखील एखाद्या राज्यव्यवस्थेप्रमाणेच, त्याच्या निष्ठावान लोकांना बक्षिस देतो आणि जे बंडखोरी करतात किंवा जे धर्मापासून भरकटतात, जे पाखंडी आहेत, जे त्या धर्माचा त्याग करतात, त्यांना तो शिक्षा सुनावतो.

प्रस्थापित आणि अधिकृत अशा कोणत्याही धर्माचा पहिला आणि मुख्य सांगावा हाच असतो की, “माझे तत्त्व सर्वोच्च आहे, तेच एकमेव सत्य आहे, आणि इतर सारे मिथ्या वा गौण आहे.” कारण अशा प्रकारच्या ह्या मूलभूत सिद्धान्ताशिवाय, प्रस्थापित संप्रदायवादी धर्म अस्तित्वातच आले नसते. तुम्हाला एकट्यालाच सर्वोच्च सत्य गवसले आहे किंवा तुम्ही एकट्यानेच त्या ‘एका’ला कवळले आहे अशी जर तुमची खात्री नसेल आणि जर तुम्ही तसा दावा केला नाहीत तर तुम्ही लोकांवर प्रभाव टाकू शकत नाही आणि त्यांना तुमच्याभोवती गोळा करू शकत नाही. धार्मिक मनुष्याचा हा असा अगदी स्वाभाविक दृष्टिकोन असतो; पण त्यामुळेच धर्म हा आध्यात्मिक जीवनाच्या मार्गावरील अडथळा म्हणून समोर उभा ठाकतो.

– श्रीमाताजी

(CWM 03 : 76-77)