Posts

मानवी प्रगतीसाठी उपयुक्त असणाऱ्या सर्वच ‘धर्मग्रंथां’मध्ये नेहमीच असे सांगितलेले आढळते की, “जे कोणी तुम्हाला तुमचे दोष दाखवून देतात त्यांच्याबाबतीत तुम्ही अत्यंत कृतज्ञ असलेच पाहिजेत आणि त्याच्या साथसंगतीची तुम्ही इच्छा बाळगलीच पाहिजे.”

…एखादा दोष तुम्हाला दाखविण्यात आला तर, जणू काही तुम्हाला खजिनाच दाखविण्यात आला आहे असे समजा. म्हणजेच याचा अर्थ असा की, जेव्हा जेव्हा तुम्हाला तुमच्यामध्ये एखादा दोष, अक्षमता, आकलनक्षमतेचा अभाव, दुर्बलता, अप्रामाणिकता, तुम्हाला प्रगतीपासून रोखणारे असे जे काही सापडेल तेव्हा, ते म्हणजे जणू काही तुम्हाला एखादा अद्भुत खजिनाच लाभल्यासारखे वाटेल. “अरे देवा, अजून एक दोष!” असे म्हणत न बसता किंवा त्याविषयी खंत बाळगत न बसता, उलट तुम्हाला जणूकाही एखादी अद्भुत उपलब्धी झाली असल्याप्रमाणे आनंद झाला पाहिजे. कारण जी गोष्ट तुमच्या प्रगतीच्या आड येत होती ती आता तुमच्या पकडीत आलेली असते. आणि एकदा का ती गोष्ट तुमच्या पकडीत आली की, तिला खेचून बाहेर काढा. कारण असे मानले जाते की, अमुक एक गोष्ट करण्यायोग्य नाही असे साधकाला ज्या क्षणी समजते, त्याच क्षणी, ती दूर सारण्यासाठी, बाद करण्यासाठी आणि नष्ट करण्यासाठी लागणारी शक्तीही त्याच्या ठायी असते. दोषाचा शोध लागणे ही एक प्राप्ती आहे, उपलब्धी आहे. जणू काही आत्ताच बाहेर खेचून काढलेल्या मलिनतेच्या छोट्या कणाची जागा घेण्यासाठी प्रकाशाचा पूर आत शिरला आहे.

– श्रीमाताजी (CWM 03 : 220-221)

कर्म आराधना – ३४

‘ईश्वरा’साठी केलेले प्रत्येक कर्म हे ईश्वरी कर्मासमानच असते; ‘ईश्वरा’साठी केलेले शारीरिक श्रम हे स्वतःच्या विकासासाठी, प्रसिद्धीसाठी किंवा मानसिक समाधानासाठी केलेल्या मानसिक संस्कारांपेक्षा अधिक ईश्वरीय असतात.
*
कर्माचा एक मोठा लाभ हा आहे की, कर्म हे प्रकृतीची परीक्षा घेते आणि साधकाला त्याच्या बाह्यवर्ती अस्तित्वाच्या दोषांच्या सामोरे उभे करते, अन्यथा ते दोष त्याच्या नजरेतून निसटण्याची शक्यता असते.

– श्रीअरविंद
[CWSA 29 : 247, 241]

विचार शलाका – ०४

प्रश्न : चैत्य अग्नी (psychic fire) प्रज्वलित कसा करावा?

श्रीमाताजी : अभीप्सेच्या द्वारे.

प्रगतीसाठीच्या संकल्पाद्वारे आणि आत्मशुद्धीकरणाने हा चैत्य अग्नी चेतवला जातो.

जेव्हा प्रगतीची इच्छा तीव्र असते, व ती इच्छा आध्यात्मिक प्रगती आणि शुद्धीकरण या दिशेने वळविली जाते तेव्हा आपोआप त्या व्यक्तीमधील हा अग्नी प्रदिप्त होतो.

एखाद्याला जर स्वत:मधील एखादा दोष, एखादी त्रुटी दूर करावयाची असेल, त्याच्या प्रकृतीमधील काहीतरी त्याला प्रगत होण्यापासून रोखत असेल, त्याची जर त्याने या चैत्य अग्नी मध्ये आहुती दिला तर तो अग्नी अधिक तीव्रतेने प्रज्वलित होतो. आणि ही केवळ प्रतिमा नाही, ती सूक्ष्म भौतिक पातळीवरील वस्तुस्थिती आहे. कोणी त्या ज्योतीची ऊब अनुभवू शकतो, तर कोणी एखादा सूक्ष्म भौतिक स्तरावर त्या ज्योतीचा प्रकाशदेखील पाहू शकतो.

– श्रीमाताजी
(CWM 08 : 251)

काही लोकांच्या प्राणिक प्रकृतीला नेहमीच गोंधळ, विसंवाद, क्षुद्र भांडणं आणि गोंधळगडबड हवाहवासा वाटतो; त्याचप्रमाणे त्यांना बहुधा दु:ख-कष्टाचे एक प्रकारचे खूळ असते आणि त्यांना वाटत असते की, प्रत्येक जण त्यांच्या विरोधात आहे.

यामध्ये सुधारणा करणे खूप अवघड असते आणि त्यासाठी प्रकृतीच्या आमूलाग्र रूपांतरणाची आवश्यकता असते. अशा लोकांशी वागण्याचा उत्तम मार्ग म्हणजे त्यांच्या प्रतिक्रिया मनावर घ्यायच्या नाहीत आणि जे करणे आवश्यक आहे ते तुम्ही साधेपणाने आणि प्रामाणिकपणाने करत राहायचे.

*

प्रश्न : माताजी, आमच्यामध्ये दोष असतात म्हणूनच आम्ही ते दुसऱ्यांमध्ये खपवून घेऊ शकत नाही, असेच नां? आम्हाला जो धक्का बसतो त्याचे मूळ कशामध्ये असते?

श्रीमाताजी : हो, सर्वसाधारणपणे, तुमच्यामध्ये जे दोष असतात तेच दोष इतरांमध्ये असल्याचे आढळून आल्यावर तुम्हाला खूप धक्का बसतो. आणि कालांतराने मग तुम्हाला उमगते की, इतर जण म्हणजे तुम्ही जे काही आहात त्याचे प्रतिबिंब दर्शविणारे आरसे आहेत.

– श्रीमाताजी
(CWM 14 : 280 & 16 : 297-298)

पूर्णयोग आणि बौद्धमत – १२

धम्मपद : आपण अशा साधुपुरुषाच्या सहवासाची इच्छा बाळगली पाहिजे की जो आपल्याला आपले दोष दाखवून देतो. तो जणू काही आपला गुप्त खजिनाच आपल्याला दाखवून देतो. अशा व्यक्तीबरोबर चांगले संबंध प्रस्थापित करावयास हवेत, कारण तो आपल्याला कोणतीही इजा पोहोचवित नाही. तो आपल्यासाठी हितकारकच ठरेल.

श्रीमाताजी : मानवीप्रगतीसाठी उपयुक्त असणाऱ्या सर्वच धर्मग्रंथांमध्ये नेहमीच असे सांगितलेले आढळते की, जो तुम्हाला तुमचे दोष दाखवून देतो त्याविषयी तुम्ही कृतज्ञ असले पाहिजे आणि त्याच्या सहवासाची इच्छा बाळगली पाहिजे, पण येथे तीच गोष्ट मोठ्या समर्पकपणे सांगितलेली आहे : एखादा दोष तुम्हाला दाखविण्यात आला तर जणू काही तुम्हाला खजिनाच दाखविण्यात आला आहे असे समजा. म्हणजेच ह्याचा अर्थ असा की, जेव्हा जेव्हा तुम्हाला तुमच्यामध्ये एखादा दोष, अक्षमता, आकलनक्षमतेचा अभाव, दुर्बलता, अप्रामाणिकता, तुम्हाला प्रगतीपासून रोखणारे असे जे काही सापडेल तेव्हा ते म्हणजे जणू काही तुम्हाला अद्भुत खजिनाच लाभल्यासारखे वाटेल.

“अरे देवा, अजून एक दोष !” असे म्हणत न बसता व त्याविषयी खंत बाळगत न बसता उलट तुम्हाला जणूकाही एखादी अद्भुत उपलब्धी झाली असल्याप्रमाणे आनंद झाला पाहिजे. कारण जी गोष्ट तुम्हाला प्रगत होण्यापासून रोखत होती ती गोष्ट आता तुमच्या पकडीत आली आहे. आणि एकदा का तुमच्या ती गोष्ट पकडीत आली की तिला खेचून बाहेर काढा. कारण असे मानले जाते की जो योगसाधना करतो, त्याला ज्या क्षणी अमुक एक गोष्ट करण्याजोगी नाही असे समजते, त्याच क्षणी ती दूर सारणे, बाद करणे आणि नष्ट करणे ही शक्ती त्याच्या ठायी असते.

दोषाचा शोध लागणे ही एक प्राप्ती आहे, उपलब्धी आहे. जणू काही आत्ताच बाहेर घालवून दिलेल्या धूसतेच्या छोट्या कणाची जागा घेण्यासाठी प्रकाशाचा पूर आत शिरला आहे.

जर तुम्ही योगसाधना करीत असाल, तर तुम्ही दुर्बलता, नीचता, इच्छाशक्तिचा अभाव, ज्ञानापाठोपाठ सामर्थ्य न येणे, ह्या बाबींचा स्वीकार करता कामा नये. एखादी गोष्ट असता कामा नये ह्याची जाणीव होणे आणि तरी ती तशीच चालू ठेवणे हे दुर्बलतेचे लक्षण आहे; ही दुर्बलता कोणत्याही गंभीर अशा योगसाधनेत स्वीकारली जात नाही; अशा संकल्पशक्तिचा अभाव हा व्यक्तीला अप्रामाणिकतेच्या उंबरठ्यावर आणून सोडतो. तुम्हाला कळते की, अमुक एक गोष्ट असता कामा नये, तुम्हाला हे ज्या क्षणी कळते, तेव्हा ती गोष्ट राहता कामा नये, हे ठरविणारे तुम्हीच असता. कारण ज्ञान आणि सामर्थ्य ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. म्हणजे असे म्हणता येईल, तुमच्या अस्तित्वाच्या कोणत्याही भागात तुम्ही तुमच्या प्रगतीच्या मध्यवर्ती संकल्पशक्तिला विरोधी असणाऱ्या, वाईट इच्छेच्या छायेला थारा देता कामा नये; कारण तसे केल्याने ज्या अनिष्टाचा तुम्ही नायनाट केला पाहिजे त्याच अनिष्टासमोर तुमची प्रगतीची संकल्पशक्ती पौरुषहीन, दुबळी, धैर्यहीन, सामर्थ्यहीन ठरते.

अज्ञानातून घडलेले पाप हे पाप नसते; तो या जगतातील सर्वसाधारण अशा अनिष्टाचा एक भाग असतो; पण तुम्हाला माहीत असूनदेखील तुम्ही जेव्हा पाप करता तेव्हा ते अधिक गंभीर असते. ह्याचा अर्थ असा की, फळामध्ये ज्याप्रमाणे एखादा कृमी दडून बसलेला असतो तसा दुरिच्छेचा एखादा घटक तुमच्यामध्ये दडून बसलेला आहे, ज्याला शोधून कोणत्याही परिस्थितीत नष्ट केले पाहिजे, कारण बरेचदा अशा वेळी दाखविलेली दुर्बलता ही पुढे जाऊन कधीच दुरुस्त न होऊ शकणाऱ्या अडचणींचे कारण बनते.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 221)

(आश्रमीय जीवनाच्या सुरुवातीच्या काळात, श्रीमाताजींनी धम्मपदातील वचनांचे विवेचन केले होते, त्यातील हे एक वचन.)

धम्मपद : आपण अशा साधुपुरुषाच्या सहवासाची इच्छा बाळगली पाहिजे की, जो आपल्याला आपले दोष दाखवून देतो. तो जणू काही आपला गुप्त खजिनाच आपल्याला दाखवून देतो. अशा व्यक्तीबरोबर चांगले संबंध प्रस्थापित करावयास हवेत कारण, तो आपल्याला कोणतीही इजा पोहोचवित नाही. तो आपल्यासाठी हितकारकच ठरतो.

श्रीमाताजी : मानवी प्रगतीसाठी उपयुक्त असणाऱ्या सर्वच धर्मग्रंथांमध्ये नेहमीच असे सांगितलेले आढळते की, जो तुम्हाला तुमचे दोष दाखवून देतो, त्याविषयी तुम्ही कृतज्ञ असले पाहिजे आणि त्याच्या सहवासाची इच्छा बाळगली पाहिजे. पण येथे तीच गोष्ट मोठ्या समर्पकपणे सांगितलेली आहे : एखादा दोष तुम्हाला दाखविण्यात आला तर, जणू काही तुम्हाला खजिनाच दाखविण्यात आला आहे असे समजा. म्हणजेच ह्याचा अर्थ असा की, जेव्हा जेव्हा तुम्हाला तुमच्यामध्ये एखादा दोष, अक्षमता, आकलनक्षमतेचा अभाव, दुर्बलता, अप्रामाणिकता, तुम्हाला प्रगतीपासून रोखणारे असे जे काही सापडेल तेव्हा, ते म्हणजे जणू काही तुम्हाला अद्भुत खजिना लाभल्यासारखेच वाटेल.

“अरे देवा, अजून एक दोष !” असे म्हणत न बसता किंवा त्याविषयी खंत बाळगत न बसता, उलट तुम्हाला जणूकाही एखादी अद्भुत उपलब्धी झाली असल्याप्रमाणे आनंद झाला पाहिजे. कारण जी गोष्ट तुम्हाला प्रगत होण्यापासून रोखत होती ती गोष्ट आता तुमच्या पकडीत आली आहे. आणि एकदा का तुमच्या ती गोष्ट पकडीत आली की, तिला खेचून बाहेर काढा. कारण असे मानले जाते की, अमुक एक गोष्ट करण्याजोगी नाही असे योगसाधकाला ज्या क्षणी समजते, त्याच क्षणी, ती दूर सारण्यासाठी, बाद करण्यासाठी आणि नष्ट करण्यासाठी लागणारी शक्तिही त्याच्या ठायी असते.

दोषाचा शोध लागणे ही एक प्राप्ती आहे, उपलब्धी आहे. जणू काही आत्ताच बाहेर घालवून दिलेल्या धूसतेच्या छोट्या कणाची जागा घेण्यासाठी प्रकाशाचा पूर आत शिरला आहे.

जर तुम्ही योगसाधना करीत असाल, तर तुम्ही दुर्बलता, नीचता, इच्छाशक्तिचा अभाव ह्या गोष्टींचा स्वीकार करता कामा नये. कारण तसे करणे ह्याचा अर्थ ‘ज्ञान झाले पण त्यापाठोपाठ सामर्थ्य आले नाही’ असा होतो. एखादी गोष्ट असता कामा नये ह्याची जाणीव होणे आणि तरीदेखील ती तशीच चालू ठेवणे हे दुर्बलतेचे लक्षण आहे; ही दुर्बलता कोणत्याही गंभीर अशा योगसाधनेत स्वीकारली जात नाही, अशा संकल्पशक्तिचा अभाव हा व्यक्तीला अप्रामाणिकतेच्या उंबरठ्यावर आणून सोडतो. तुम्हाला कळते की अमुक एक गोष्ट असता कामा नये, तुम्हाला हे ज्या क्षणी कळते, तेव्हा ती गोष्ट राहता कामा नये, हे ठरविणारे तुम्हीच असता.

कारण ज्ञान आणि सामर्थ्य ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. म्हणजे असे म्हणता येईल, तुमच्या अस्तित्वाच्या कोणत्याही भागात तुम्ही तुमच्या प्रगतीच्या मध्यवर्ती संकल्पशक्तिला विरोधी असणाऱ्या, वाईट इच्छेच्या छायेला थारा देता कामा नये; कारण तसे केल्याने ज्या अनिष्टाचा तुम्ही नायनाट केला पाहिजे त्याच अनिष्टासमोर तुमची प्रगतीची संकल्पशक्ती पौरुषहीन, दुबळी, धैर्यहीन, सामर्थ्यहीन ठरते.

अज्ञानातून घडलेले पाप हे पाप नसते; तो या जगतातील सर्वसाधारण अशा अनिष्टाचा एक भाग असतो; पण तुम्हाला माहीत असूनदेखील, तुम्ही जेव्हा पाप करता तेव्हा ते अधिक गंभीर असते. ह्याचा अर्थ असा की, फळामध्ये ज्याप्रमाणे एखादा कृमी दडून बसलेला असतो तसा दुरिच्छेचा एखादा घटक तुमच्यामध्ये दडून बसलेला आहे, कसेही करून, त्याला शोधून नष्ट केले पाहिजे, कारण बरेचदा अशा वेळी दाखविलेली दुर्बलता ही पुढे जाऊन, कधीच दुरुस्त न होऊ शकणाऱ्या अडचणींचे कारण बनते.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 221)