Posts

आध्यात्मिकता ४१

(उत्तरार्ध)

…वेळ मुळातच इतका कमी असतो, आणि तो अधिकच कमी असल्याचे तुमच्या लक्षात येते. जीवनाच्या अखेरीस तुमच्या लक्षात येते की, मिळालेली संधी तुम्ही तीनचतुर्थांश वेळेला गमावलेली आहे – अशा वेळी तुम्ही मिळालेल्या वेळातच दुप्पट काम करू पाहता पण त्यानेही काही उपयोग होत नाही – त्यापेक्षा नेमस्तपणे, समतोल, चिकाटीने, शांतपणे काम करत राहणे आणि तुम्हाला देण्यात आलेली कोणतीही संधी न दवडणे, म्हणजेच तुम्हाला मिळालेल्या मोकळ्या क्षणाचा वापर खऱ्या उद्दिष्टासाठी व्यतीत करणे हे अधिक उत्तम ठरते.

जेव्हा तुमच्याकडे करण्यासारखे काहीच नसते, तेव्हा तुम्ही अस्वस्थ होता, तुम्ही सैरभैर होता, तुम्ही मित्रमैत्रिणींना भेटता, फिरायला जाता. – लक्षात घ्या, मी येथे फक्त त्यातल्या त्यात बऱ्या गोष्टींचाच उल्लेख करत आहे, ज्या गोष्टी करताच कामा नयेत त्यांच्याविषयी तर मी बोलतच नाहीये.

या गोष्टी करत बसण्यापेक्षा, विस्तीर्ण पसरलेल्या आकाशाखाली वा समुद्रासमोर किंवा झाडांखाली शांतपणे बसा, आणि पुढीलपैकी एखादी तरी गोष्ट जाणून घेण्याचा प्रयत्न करा – आपण का जगतो हे समजून घ्या, आपण कसे जगायला हवे हे शिका, तुम्हाला जीवनात काय करावेसे वाटते आणि त्यासाठी तुम्ही काय केले पाहिजे याचे चिंतन करण्यामध्ये, तसेच ज्यामध्ये तुम्ही जगत असता त्या गोष्टींपासून म्हणजे अज्ञान, मिथ्यत्व आणि दुःखभोग यांपासून सुटका करून घेण्याचा उत्तम मार्ग कोणता, या साऱ्या गोष्टींचे आकलन करून घेण्यामध्ये आणि त्या गोष्टी प्रत्यक्षात उतरविण्यामध्ये वेळ व्यतीत करा.

(उत्तरार्ध समाप्त)

– श्रीमाताजी [CWM 03 : 250-251]

आध्यात्मिकता ४०

(पूर्वार्ध)

जीवनामध्ये कित्येक वेळा एक प्रकारचे रिकामपण जाणवते, कधी एखादा रिकामा क्षण, किंवा काही मिनिटे, किंवा कधीकधी त्याहूनही अधिक वेळ मिळतो. आणि तेव्हा तुम्ही काय करता? तुम्ही स्वतःचे लक्ष लगेचच दुसरीकडे कोठेतरी वळविण्याचा प्रयत्न करता आणि वेळ जाण्यासाठी मूर्खपणाच्या या नाहीतर त्या गोष्टी शोधून काढता. ही अगदी सार्वत्रिक बाब आहे. लहानमोठे सारेच जण, कंटाळा येऊ नये म्हणून, काही ना काही तरी करत राहण्यात वेळ घालवितात. कंटाळा या गोष्टीचा त्यांना सर्वात जास्त तिटकारा असतो आणि त्या कंटाळ्यापासून सुटका करून घेण्याचा त्यांचा मार्ग म्हणजे मूर्खपणाच्या गोष्टी करत राहणे हा असतो.

पण, कंटाळ्यापासून सुटका करून घेण्याचा, त्यापेक्षा एक अधिक चांगला मार्ग आहे, तो म्हणजे स्मरण ठेवणे. तुमच्याजवळ जेव्हा थोडासा रिकामा वेळ असतो, एक तास असो किंवा काही मिनिटे असोत, स्वतःला सांगा, “निदान आता तरी मला काही वेळ एकाग्र होण्यासाठी, विखुरलेल्या ‘मी’चे एकत्रीकरण करण्यासाठी, जीवनाचे प्रयोजन जगण्यासाठी, ‘सत्य’ आणि ‘शाश्वता’प्रत स्वतःला समर्पित करण्यासाठी मिळाला आहे.”

तुम्ही जेव्हा बाह्य परिस्थितीने गांजलेले नसता तेव्हा, त्या प्रत्येक वेळी तुम्ही जर अशा गोष्टी केल्यात तर, तुम्ही या मार्गावर वेगाने प्रगती करत आहात, असे तुम्हाला आढळेल. तुमचा वेळ वायफळ गप्पांमध्ये, निरुपयोगी गोष्टींमध्ये, तुमची चेतना ज्यामुळे निम्नतर पातळीवर उतरते अशा गोष्टींचे वाचन करण्यामध्ये घालविण्यापेक्षा; तसेच तुम्हाला चंचल, विचलित करणाऱ्या इतर सर्व गोष्टींमध्ये वेळ घालविण्यापेक्षा, वर सांगितलेल्या गोष्टींसाठी म्हणजेच योग्य कारणांसाठी वेळ व्यतीत करणे अधिक उत्तम.

– श्रीमाताजी [CWM 03 : 250]

आध्यात्मिकता ३८

(पूर्वार्ध)

 

साधक : आम्ही जेव्हा एखादे काम करत असतो आणि ते काम आम्ही सर्वोत्तम करू इच्छित असतो, तेव्हा ते करण्यासाठी आम्हाला अधिक वेळ आवश्यक असतो. पण सर्वसाधारणपणे आपल्याकडे तेवढा वेळ नसतो, आपण घाईत असतो. मग घाईगडबडीत असतानादेखील सर्वोत्तमप्रकारे काम कसे करावे ?

श्रीमाताजी : हा अतिशय रोचक विषय आहे आणि एक ना एक दिवस मला तुमच्याशी या विषयाबाबतीत सविस्तर बोलायचेच होते. सहसा, माणसं जेव्हा घाईगडबडीत असतात तेव्हा, जे काम करायचे असते ते काम, ते पूर्णपणे करत नाहीत; अथवा, त्यांनी जर ते काम केलेच तर ते काम अगदी वाईट पद्धतीने करतात. खरंतर आणखीही एक मार्ग असतो, तो मार्ग म्हणजे व्यक्तीने आपली एकाग्रता अधिक तीव्र करायची. तुम्ही जर एकाग्रता वाढवलीत तर, तुम्ही निम्मा वेळ वाचविलेला असतो, तोही अगदी कमीत कमी वेळामध्ये! एक अगदी साधे उदाहरण घ्या. स्नान करून, कपडे घालून तयार व्हायला लागणारा वेळ प्रत्येक व्यक्तिगणिक भिन्नभिन्न असतो, नाही का? पण असे गृहीत धरूया की, वेळेचा अपव्यय न करता, किंवा अजिबात घाईगडबड न करता, व्यक्तीला या साऱ्या गोष्टी करण्यासाठी सर्वसाधारणपणे अर्धा तास लागतो. तुम्ही जर गडबडीत असाल तर दोनपैकी एक गोष्ट हमखास घडते – एकतर तुम्ही स्नान नीट करत नाही किंवा मग तुम्ही कपडे वगैरे नीट आवरत नाही.

पण अन्यही एक मार्ग असतो – व्यक्तीने आपले अवधान आणि आपली सर्व ऊर्जा एकवटली पाहिजे. आपण जे काही करत आहोत फक्त त्याच गोष्टीचा विचार करायचा, अन्य कोणत्याही गोष्टीचा विचार करायचा नाही, घाईघाईने खूप हालचाली करायच्या नाहीत, अचूक तेवढ्याच गोष्टी अगदी अचूक रीतीने करायच्या, (हा अनुभवाचा भाग आहे.) त्यामुळे तुम्हाला पूर्वी जी गोष्ट करायला अर्धा तास लागत होता तीच गोष्ट आता तुम्ही पंधरा मिनिटांमध्ये करू शकता आणि ती सुद्धा अगदी उत्तम रीतीने, कधीकधी तर अधिक चांगल्या रीतीने तुम्ही ती करता, कोणतीही गोष्ट न विसरता, करायचे काहीही शिल्लक न ठेवता, केवळ एकाग्रतेच्या तीव्रतेमुळे तुम्ही ही गोष्ट साध्य करू शकता.

(उत्तरार्ध उद्या…)

– श्रीमाताजी [CWM 04 : 137-138]

आध्यात्मिकता ३७

(श्रीमाताजींकृत प्रार्थना…)

बाह्य जीवन, दररोजची प्रत्येक कृती आणि प्रत्येक घटना, ही आपल्या तास न् तास केलेल्या चिंतनासाठी आणि ध्यानासाठी अनिवार्यपणे पूरकच नसते का?

…आपले दैनंदिन जीवन ही एक प्रकारची ऐरण आहे; आणि चिंतनामधून जी प्रदीप्तता येते ती स्वीकारण्यासाठी आणि धारण करण्यासाठी दैनंदिन जीवनातील सर्व घटनांचे शुद्धीकरण व्हावे, त्या परिशुद्ध व्हाव्यात, त्या अधिक लवचीक आणि परिपक्व व्हाव्यात, म्हणून या घटना त्या ऐरणीवरून सरकणेच आवश्यक असते. समग्र विकसनासाठी बाह्य कृती अनावश्यक ठरत नाही तोपर्यंत हे सर्व घटक एकापाठोपाठ एक मुशीमधून गेलेच पाहिजेत. नंतर, पात्र घडविणे आणि ते प्रकाशित करणे या दुहेरी कार्यासाठी चेतनेची इतर केंद्रसुद्धा जागृत व्हावीत म्हणून, हे ईश्वरा, या कृती तुला आविष्कृत करण्याची माध्यमं बनतात. आणि त्यामुळेच आत्मप्रौढी आणि आत्मसंतुष्टता या गोष्टी सर्व अडथळ्यांमधील सर्वाधिक वाईट असा अडथळा असतात.

अगणित घटकांपैकी काही घटकांचे तरी शुद्धीकरण करण्यासाठी आणि तिंबून, मळून त्यांना घडणयोग्य बनविण्यासाठी, त्यांना निर्व्यक्तिक बनविण्यासाठी, त्यांना ‘स्व’चे विस्मरण आणि परित्याग करण्यास शिकविण्यासाठी आणि भक्ती, उदारता आणि हळूवारपणा शिकविण्यासाठी, आपल्याला प्रदान करण्यात आलेल्या छोट्याछोट्या सर्व संधींचा आपण अतिशय विनम्रपणे लाभ घेतला पाहिजे. आणि अस्तित्वाच्या या सर्व पद्धती जेव्हा त्यांच्या अंगवळणी पडतील, तेव्हा ते सारे घटक या ‘निदिध्यासा’मध्ये सहभागी होण्यासाठी, परम ‘एकाग्रते’मध्ये तुझ्याबरोबर एकात्म पावण्यासाठी सिद्ध झालेले असतील.

आणि म्हणूनच मला असे वाटते की, आकस्मिकपणे झालेला बदल हा सर्वांगीण नसतो आणि म्हणूनच हे कार्य अगदी उत्तमात उत्तम साधकांसाठीसुद्धा दीर्घकालीन आणि धीम्या गतीने होणेच आवश्यक असते. आकस्मिक बदल हे व्यक्तीचा दृष्टिकोन बदलवून टाकतात, ते बदल व्यक्तीला निश्चितपणे सुयोग्य मार्गावर आणतात; परंतु खऱ्या अर्थाने उद्दिष्ट साध्य करण्यासाठी, सर्व प्रकारच्या आणि सर्व घटकांच्या अगणित अनुभवांची आवश्यकता असते, त्यापासून कोणाचीच सुटका होऊ शकत नाही.

…माझ्यामध्ये आणि प्रत्येक वस्तुमात्रामध्ये तेजोमयतेने प्रभासित होणाऱ्या हे ‘परम प्रभू’, तुझा ‘दिव्य प्रकाश’ आविष्कृत होऊ दे आणि तुझ्या ‘दिव्य शांती’चे साम्राज्य सर्वांवर पसरू दे. – श्रीमाताजी [CWM 01 : 06-07]