Posts

ज्या धर्मामध्ये तुमचा जन्म झाला आहे वा तुमची घडण झाली आहे त्याचे खरे मूल्य तुम्हाला जाणून घ्यावयाचे असेल, किंवा ज्या समाजात वा ज्या देशात तुमचा जन्म झाला आहे त्याविषयी, यथार्थदर्शी चित्र तुम्हाला हवे असेल, किंवा ज्या विशिष्ट वातावरणात तुम्ही फेकले गेला आहात आणि जेथे तुम्ही स्वत:ला जखडून घेतले आहे, ती गोष्ट किती सापेक्ष आहे, हे तुम्हाला जाणून घ्यावयाचे असेल तर, तुम्ही देशाटन करा. तेव्हा तुम्हाला आढळेल की, ज्याला तुम्ही चांगले समजता ते इतरत्र वाईट मानले जाते आणि ज्याला एका प्रांतात वाईट मानले जाते त्याचेच दुसऱ्या प्रांतात स्वागत केले जाते.

सर्व देश आणि धर्म यांची निर्मिती ही अनेक परंपरांच्या समूहांपासून झालेली आहे. सर्वच ठिकाणी तुम्हाला संतमहात्मे, शूरवीर, महान व्यक्तिमत्त्वे पाहायला मिळतात आणि त्याबरोबरच अगदी क्षुद्र, दुष्ट माणसंदेखील आढळतात. ”माझी अमुक एका धर्मामध्ये घडण झाली आहे त्यामुळे तोच खरा धर्म होय; मी अमुक एका देशामध्ये जन्माला आलो आहे त्यामुळे, माझाच देश सर्व देशांमध्ये चांगला आहे’ असे म्हणणे ही केवढी मोठी थट्टा आहे हे तुम्हाला जाणवेल. व्यक्ती आपल्या कुटुंबाविषयी देखील असाच दावा करू शकते : “अमुक एका देशामध्ये, अमुक एका ठिकाणी, शतकानुशतके राहत असलेल्या एका कुटुंबातून मी आलो आहे म्हणून त्याच्या परंपरा मला बंधनकारक आहेत, त्याच केवळ आदर्शवत आहेत.”

गोष्टी जेव्हा तुमच्यावर लादलेल्या नसतात, जेव्हा तुम्ही त्या स्वेच्छेने प्राप्त करून घेता, तेव्हाच त्या गोष्टींना तुमच्यासाठी आंतरिक मूल्य प्राप्त होते आणि तुमच्यासाठी त्या यथार्थ ठरतात. जर तुम्हाला तुमच्या खऱ्या धर्माविषयी खात्री करून घ्यावयाची असेल तर, तुम्ही त्याची निवड केली पाहिजे; जर तुम्हाला तुमच्या खऱ्या देशाविषयी खात्री करून घ्यावयाची असेल तर, तुम्ही त्याची निवड केली पाहिजे; जर तुम्हाला तुमच्या खऱ्या कुटुंबाविषयी खात्री करून घ्यावयाची असेल तर, त्याचीसुद्धा तुम्ही निवड केली पाहिजे.

केवळ दैवयोगाने तुम्हाला जे देण्यात आले आहे, ते कोणताही प्रश्न न विचारता, जसेच्या तसे तुम्ही स्वीकारलेत तर, तुमच्यासाठी ते चांगले आहे का वाईट, तुमच्या जीवनासाठी ते योग्य आहे का नाही, ह्याची तुम्ही कधीच खात्री देऊ शकणार नाही.

ज्या कोणत्या गोष्टींमुळे तुमचे स्वाभाविक वातावरण घडते किंवा तुमची तथाकथित वंशपरंपरा निर्माण होते आणि निसर्गाच्या आंधळ्या यांत्रिक प्रक्रियेद्वारे हे वातावरण व ही वंशपरंपरा तुमच्यावर लादण्यात येते, त्या साऱ्या गोष्टींपासून दोन पावले मागे सरा; स्वत:च्या अंतरंगामध्ये शिरा आणि तेथून सर्व गोष्टींकडे शांतपणे आणि निरासक्तपणे पाहा. त्यांचे मूल्यमापन करा, मग स्वेच्छेने त्यांची निवड करा. मग तेव्हा तुम्ही आंतरिक सत्यानिशी म्हणू शकाल, ”हे माझे कुटुंब आहे, हा माझा देश आहे, हा माझा धर्म आहे.”

– श्रीमाताजी
(CWM 03 : 80-81)