Posts

हे माते दुर्गे, सिंहवाहिनी, सर्वशक्तिदायिनी माते, शिवप्रिये, तुझ्या शक्तीपासून उत्पन्न झालेले आम्ही भारताचे तरुण, तुझ्या मंदिरामध्ये बसून प्रार्थना करीत आहोत. माते, ऐक, पृथ्वीवर अवतीर्ण हो, या भारतामध्ये आविर्भूत हो.

हे माते दुर्गे, युगानुयुगे आणि जन्मोजन्मी मानवी शरीर धारण करून, तुझे कार्य करून आम्ही आनंदधामास परत जातो. आणि यावेळीहि जन्म घेऊन, तुझ्याच कार्यासाठी आम्ही आमचे जीवन देऊ केले आहे. माते, ऐक; या भूतलावर आविर्भूत हो, आम्हांला साह्य करण्यासाठी ये.

हे माते दुर्गे, सिंहवाहिनी, त्रिशूलधारिणी, वीरशस्त्रधारिणी, सुंदर शरीरधारिणी, जयदात्री माते, तुझी मंगलमय मूर्ती पाहण्यासाठी हा भारत आतुर आहे. भारत तुझी प्रतीक्षा करीत आहे. माते ऐक, पृथ्वीवर अवतीर्ण हो, ह्या भारतभूमीमध्ये आविर्भूत हो.

हे माते दुर्गे, शक्तिदायिनी प्रेमदायिनी, ज्ञानदायिनी, शक्तिस्वरूपिणी, सौंदर्यमूर्ती आणि रौद्ररुपिणी हे माते, जेव्हा तू स्वत:च्या शक्तिरुपात असतेस तेव्हा, तू किती भयंकर असतेस. जीवनसंग्रामामध्ये आणि भारताच्या संग्रामामध्ये तुझ्याकडून नियुक्त करण्यात आलेले योद्धे आम्ही आहोत. आमच्या मनाला आणि हृदयाला असुराचे बल दे, असुराची ऊर्जा दे; आमच्या बुद्धीला आणि आत्म्याला देवांचे चारित्र्य आणि ज्ञान दे.

हे माते दुर्गे, भारत, जगांत श्रेष्ठ असलेला भारत वंश, घोर अंध:कारांत बुडून गेला आहे. हे माते, तू पूर्वक्षितिजावर उगवतेस आणि तुझ्या दिव्य गात्रांच्या प्रभेबरोबरच उषा येऊन, अंधकाराचा नाश करते. हे माते, तिमिराचा नाश कर आणि प्रकाशाचा विस्तार कर.

हे माते दुर्गे, आम्ही तुझी मुले आहोत, तुझ्या कृपाशीर्वादाने, तुझ्या प्रभावाने, आम्ही महान कार्य आणि महान ध्येय यासाठी सुपात्र ठरू शकू, असे आम्हाला घडव. हे माते, आमची क्षुद्रता, आमची स्वार्थबुद्धी आणि आमची भीती नष्ट करून टाक.

हे माते दुर्गे, दिगंबरी, नरशीर्षमालिनी हातांत तरवार घेऊन, असुरांचा विनाश करणारी तू कालीमाता आहेस. हे देवी, आमच्या अंतरंगात ठाण मांडून बसलेल्या शत्रूंचा तुझ्या निर्दय आरोळीने निःपात कर; त्यांच्यापैकी एकाही शत्रूला जिवंत ठेवू नकोस; अगदी एकालाही जिवंत ठेवू नकोस. आम्ही निर्मळ आणि निष्कलंक व्हावे, एवढीच आमची प्रार्थना आहे. हे माते, तू आपले रूप प्रकट कर.

हे माते दुर्गे, स्वार्थ, भीती आणि क्षुद्रता यामध्ये भारत बुडून गेला आहे. हे माते, आम्हास महान बनव, आमचे प्रयत्न महान कर, आमची अंत:करणे विशाल कर आणि आम्हास सत्य-संकल्पाशी एकनिष्ठ रहाण्यास शिकव. येथून पुढे तरी आता आम्ही क्षुद्रता व शक्तिहीनता यांची इच्छा बाळगू नये, आम्ही आळसाच्या आहारी जाऊ नये आणि भीतीने ग्रस्त होऊ नये, अशी कृपा कर.

हे माते दुर्गे, योगाची शक्ती विशाल कर. आम्ही तुझी आर्य बालके आहोत; आमच्यामध्ये पुन्हा एकवार गत शिकवण, चारित्र्य, बुद्धी-सामर्थ्य, श्रद्धा आणि भक्ती, तप:सामर्थ्य, ब्रह्मचर्याची ताकद आणि सत्य-ज्ञान विकसित कर; त्या साऱ्याचा या जगावर वर्षाव कर. मानववंशाला साहाय्य करण्यासाठी, हे जगत्जननी तू प्रकट हो.

हे माते दुर्गे, अंतस्थ शत्रूंचा संहार कर आणि बाह्य विघ्नांचे निर्मूलन कर. विशालमानस, पराक्रमी आणि बलशाली असा हा भारतवंश प्रेम आणि ऐक्य, सत्य आणि सामर्थ्य, कला आणि साहित्य, शक्ती आणि ज्ञान यामध्ये वरिष्ठ असलेला हा भारतवंश भारताच्या पुनीत वनात, सुपीक प्रदेशात, गगनचुंबी पर्वतरांगांमध्ये आणि पवित्र-सलिल नद्यांच्या तीरावर, सदा निवास करो; हीच आमची मातृचरणी प्रार्थना आहे. हे माते, तू आविर्भूत हो.

हे माते दुर्गे, तू तुझ्या योगबलाच्या द्वारे आमच्या शरीरामध्ये प्रवेश कर. आम्ही तुझ्या हातातील साधन होऊ, अशुभविनाशी तरवार होऊ; अज्ञान-विनाशी प्रदीप होऊ. हे माते, तुझ्या लहानग्या बालकांचे हे आर्त पूर्ण कर. स्वामिनी होऊन हे साधन कार्यकारी कर. तुझी तरवार चालव आणि अशुभाचा विनाश कर. दीप हाती घे आणि ज्ञानप्रकाश वितरण कर. हे माते, आविर्भूत हो.

हे माते दुर्गे, एकदा का तू आम्हास गवसलीस की, आम्ही तुझा कधीही त्याग करणार नाही. प्रेम व भक्ती यांच्या धाग्यांनी आम्ही तुला आमच्यापाशी बांधून ठेवू. हे माते, ये. आमच्या मनामध्ये, प्राणामध्ये आणि देहामध्ये तू प्रकट हो; आविर्भूत हो.

ये, वीरमार्गप्रदर्शिनी, आम्ही तुझा कधीच परित्याग करणार नाही. आमचे अखिल जीवन म्हणजे मातेचे अखंड पूजन व्हावे; आमच्या प्रेममय, शक्तिसंपन्न सर्व कृती म्हणजे मातेचीच अविरत सेवा बनावी, हीच आमची प्रार्थना आहे. हे माते, पृथ्वीवर अवतीर्ण हो, या भारतामध्ये तू प्रकट हो; आविर्भूत हो.

– श्रीअरविंद
(CWSA 09 : 03-05)