Posts

विचार शलाका – ०३

सर्व वेदना, दुःखभोग, संकटे, चिंता, अज्ञान आणि सर्व प्रकारच्या अक्षमता, दुर्बलता ह्या गोष्टी विलगतेच्या भावनेतून आल्या आहेत. संपूर्णतया केलेले आत्मदान, संपूर्ण आत्मनिवेदनात (consecration) झालेला ‘मी’चा विलय, यामुळे दुःखभोग नाहीसे होतात आणि त्याची जागा, आनंदाने घेतली जाते की, जो कशानेही झाकोळला जात नाही.

आणि असा आनंद जेव्हा या जगामध्ये स्थापित होईल, तेव्हाच दुःखभोगाचे खरेखुरे रूपांतरण झालेले असेल, आणि येथे एक नवजीवन, नवनिर्माण व नव-प्रचिती असेल. हा आनंद सर्वप्रथम चेतनेमध्येच स्थापित झाला पाहिजे. तसे झाले म्हणजे मगच भौतिकाचे रूपांतरण होईल, तत्पूर्वी नाही.

खरे तर, ‘विरोधी'(शक्ती) सोबतच दुःखभोग या जगात आले. आणि असा आनंदच केवळ त्या दुःखभोगांना पराभूत करू शकतो, त्या दुःखभोगांचा अंतिमतः निर्णायक पराभव करू शकेल असे अन्य कोणीही नाही.

‘दिव्यानंदा’नेच निर्मिती केली आहे आणि पूर्णतेस नेणाराही ‘दिव्यानंद’च असेल.

हे मात्र नीट लक्षात ठेवा की, सामान्यतः लोक ज्याला आनंद म्हणतात, त्या आनंदाविषयी मी हे बोलत नाहीये. तो आनंद म्हणजे खऱ्याखुऱ्या आनंदाचे व्यंगचित्रही शोभणार नाही. मला वाटते, इंद्रियसुख, आत्मभानशून्यता आणि बेपर्वाई यांपासून मिळणारा आनंद हा व्यक्तीला मार्गच्युत करणारा राक्षसी आविष्कार असतो.

मी ज्या आनंदाविषयी बोलते आहे, तो आनंद म्हणजे परिपूर्ण शांती, छायाविरहित प्रकाश, सुसंवाद, संपूर्ण व सर्वांगीण सौंदर्य, अनिरुद्ध सामर्थ्य होय. तो असा आनंद आहे की, जो अर्करूपाने, ‘संकल्प’रूपाने आणि त्याच्या ‘जाणिवे’ने, स्वत:च एक ईश्वरी ‘अस्तित्व’ आहे!

– श्रीमाताजी
(CWM 07 : 396-397)

विचार शलाका – ०२

दुःखभोग हे प्रथमतः अज्ञानामुळे येतात आणि दुसरे कारण म्हणजे, व्यक्तिरूप चेतनचे ‘दिव्य चेतना’ व ‘दिव्य अस्तित्व’ यांपासून विलगीकरण झालेले असल्यामुळे ते येतात.

जेव्हा ही विलगता नाहीशी होते, जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःच्या विभक्त अशा छोट्याशा ‘स्व’मध्ये न जगता संपूर्णतया ‘दिव्यत्वा’मध्ये जगू लागते तेव्हाच केवळ दुःखभोग पूर्णत: नाहीसे होतात.

– श्रीअरविंद
(CWSA 28 : 527)

विचार शलाका – ०१

दुःखभोग हे आपल्या पापकर्माची किंवा आपल्यातील वैरभावाची शिक्षा म्हणून आपल्या वाट्याला येतात असे नाही – तसे समजणे ही चुकीची कल्पना आहे. अज्ञानदशेतील जीवनाचा एक अविभाज्य भाग म्हणून जसे सुख किंवा सुदैव अनुभवास येते त्याप्रमाणेच दुःखभोग देखील वाट्यास येतात. आपल्याला आपल्या सत्यचेतनेपासून आणि परमेश्वरापासून विलग करणाऱ्या अज्ञानाचे अटळ परिणाम म्हणजे हर्ष-वेदना, आनंद-दुःख, सुदैव-दुर्दैव ही द्वंद्वे होत. केवळ परमेश्वराकडे परतण्यानेच दुःखभोगापासून आपली सुटका होऊ शकते. गतजन्मांतील कर्म अस्तित्वात असतात आणि बव्हंशी जे घडते ते त्यामुळेच; पण सर्वच गोष्टी काही त्याचे परिणाम नसतात. कारण आपण आपल्या स्वतःच्या चेतनेने आणि प्रयत्नांनी आपल्या कर्मांमध्ये सुधारणा घडवून आणू शकतो. ज्याप्रमाणे भाजणे हा आगीशी खेळण्याचा स्वाभाविक परिणाम असतो त्याप्रमाणे दुःखभोग हा आपल्या गतकालीन प्रमादांचा निव्वळ स्वाभाविक परिणाम असतो; दुःखभोग ही आपल्या गतकालीन प्रमादांची शिक्षा नसते. अशा काही अनुभवाच्या माध्यमातून, जीव हा त्याच्या साधनांद्वारे शिकत असतो आणि जोपर्यंत तो परमेश्वराकडे वळण्यास तयार होत नाही, तोपर्यंत तो विकसित होत राहतो, वृद्धिंगत होत राहतो.

– श्रीअरविंद
(CWSA 31 : 670)