Posts

आत्मशोधाच्या पाऊलवाटेवर… (१७)

‘दिव्य’ चेतनेप्रत स्वतःला खुले करण्याचे किंवा त्यामध्ये प्रवेश करण्याचे अनेक मार्ग आहेत. मी जो माझा मार्ग सांगतो तो असा आहे की, व्यक्तीने स्वतःच्या अंतरंगात शिरण्याचा सातत्यपूर्ण सराव करायचा; अभीप्सेच्या माध्यमातून त्या ‘ईश्वरा’प्रति स्वत:ला खुले करायचे आणि एकदा का व्यक्ती त्या ‘ईश्वरा’विषयी आणि त्याच्या कार्याविषयी सजग झाली की त्या ‘ईश्वरा’प्रति स्वतःचे संपूर्णपणे आत्मदान करायचे.

या आत्मदानाचा अर्थ असा की, कशाचीही मागणी न करता, त्या ‘दिव्य चेतने’च्या सतत संपर्कात राहायचे किंवा तिच्याशी ऐक्य राखायचे; तिची शांती, शक्ती, प्रकाश, आणि आनंद यांबद्दल अभीप्सा बाळगायची; मात्र अन्य कशाचीही मागणी करायची नाही. या जगामध्ये व्यक्तीला जे कार्य नेमून देण्यात आले आहे ते कार्य, जीवनात व कृतीमध्ये उतरविण्यासाठी त्या ‘दिव्य शक्ती’चे माध्यम बनायचे. व्यक्तीला एकदा का मन, हृदय व शरीर यांमध्ये कार्यरत असणाऱ्या ‘आत्मशक्ती’ची, ‘दिव्य शक्ती’ची जाणीव होऊ शकली आणि त्याप्रत व्यक्ती खुली होऊ शकली, म्हणजे मग शिल्लक उरते ते म्हणजे त्या ‘दिव्य शक्ती’शी एकनिष्ठ राहणे, सातत्याने तिला आवाहन करणे, आणि जेव्हा ती अवतरते, तेव्हा तिला तिचे कार्य करू देणे आणि निम्नतर चेतनेशी व निम्नतर प्रकृतीशी संबंधित असणाऱ्या इतर सर्व गोष्टींना आणि कनिष्ठ ‘शक्तीं’ना नकार देणे.

– श्रीअरविंद (CWSA 36 : 441)

तुम्ही झटून प्रयत्न केले पाहिजेत, तुम्ही तुमच्या सर्व दुर्बलता आणि मर्यादा यांवर मात करण्यासाठी धडपडले पाहिजे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे “आता तुझी सद्दी संपली आहे,” असे तुम्ही तुमच्या अहंकाराला सांगितले पाहिजे.

आपल्याला आता एक असा वंश हवा आहे की ज्या वंशातील लोकांना अहंकार नसेल, आणि अहंकाराची जागा ‘दिव्य चेतने’ने घेतलेली असेल. आपल्याला अशी ‘दिव्य चेतना’ हवी आहे की, जिच्यामुळे तो वंश स्वतःहूनच विकसित होईल आणि त्यामधून अतिमानसिक जीव जन्माला येईल.

– श्रीमाताजी [CWM 11 : 307]

ईश्वरी कृपा – ११

मनाच्या पलीकडे, ‘ईश्वरी कृपे’वरील श्रद्धाच आपल्याला सर्व अग्निपरीक्षांमधून बाहेर पडण्याचे, आपल्या सर्व दुर्बलतांवर मात करण्याचे सामर्थ्य देते आणि ती श्रद्धाच आपला दिव्य चेतनेशी संपर्क करून देते, ही ‘दिव्य चेतना’ आपल्याला केवळ शांती आणि आनंदच देत नाही तर, शारीरिक संतुलन आणि उत्तम आरोग्यसुद्धा प्रदान करते, ही सारी शिकवण आपल्याला देण्यासाठीच जीवनातील सर्व परिस्थिती घडविण्यात आलेली असते.

– श्रीमाताजी
(CWM 10 : 320)

मी आंतरिक सत्य, प्रकाश, सुमेळ आणि शांती यांचे काहीएक तत्त्व, पृथ्वीचेतनेमध्ये आणू पाहत आहे. मला ते वर दिसत आहे आणि ते काय आहे हे मला माहीत आहे. जाणिवेमध्ये उतरू पाहणारी त्याची तेज:प्रभा मी सातत्याने अनुभवत आहे. आज मानवाची प्रकृती अर्धप्रकाश, अर्धअंधकार अशा दशेत आहे; त्याने त्याच दशेमध्ये राहण्यापेक्षा, मानवाचे समग्र अस्तित्वच, त्या सत्य-तत्त्वाने स्वत:च्या अंगभूत शक्तीमध्ये सामावून घ्यावे, हे त्या सत्य-तत्त्वाला शक्य व्हावे म्हणून मी झटत आहे. या पृथ्वीवरील अंतिम उत्क्रांती असे जिला म्हणता येईल, अशी उत्क्रांती म्हणजे दिव्य चेतनेचा विकास; तो विकास घडून येण्यासाठीचा मार्ग या सत्य-तत्त्वाच्या अवतरणाने खुला होईल, अशी मला खात्री आहे.

-श्रीअरविंद
(CWSA 35 : 281)