Posts

आध्यात्मिकता ३९ (उत्तरार्ध)

तुम्ही कोणतीही गोष्ट करत असा – अभ्यास असो, खेळ असो, कोणतेही काम असो – कोणत्याही गोष्टीसाठी एकच उपाय आहे, आणि तो म्हणजे व्यक्तीने आपली एकाग्रतेची शक्ती वाढविणे. आणि जेव्हा तुम्ही अशी एकाग्रता साध्य करता, तेव्हा मग ती एकाग्रता तुम्हाला थकवणारी नसते. साहजिकच आहे की, सुरुवाती-सुरुवातीला त्यामुळे काहीसा ताण निर्माण होतो पण तुम्हाला एकाग्रतेचा अवलंब करण्याची सवय झाली की तो ताण नाहीसा होतो आणि मग एक वेळ अशी येते की जेव्हा तुम्ही अशा रीतीने एकाग्र नसता, जेव्हा तुम्ही विखुरलेले असता, अनेकानेक गोष्टींनी तुम्हाला गिळंकृत केले तरी चालेल अशी मुभा जेव्हा तुम्ही त्यांना देता, म्हणजेच तुम्ही जे करत आहात त्याकडेच तुम्ही लक्ष एकाग्र केलेले नसते, तेव्हाच तुम्हाला थकवा येतो.

एकाग्रताशक्तीमुळे व्यक्ती कोणत्याही गोष्टी अधिक चांगल्या रीतीने आणि अधिक वेगाने करण्यामध्ये यशस्वी होते. आणि अशा प्रकारे, तुम्ही विकसनाचे एक साधन म्हणून दैनंदिन कामाचा उपयोग करू शकता…

(उत्तरार्ध समाप्त)

श्रीमाताजी [CWM 04 : 138]

सौंदर्याची तपस्या किंवा साधना आपणांस भौतिक जीवनाच्या तपस्येच्या द्वारा कर्मस्वातंत्र्याप्रत घेऊन जाईल. त्याचा पायाभूत कार्यक्रम म्हणजे सुंदर बांध्याचे, सुसंवादी ठेवणीचे शरीर घडविणे हा असेल. तसेच हालचालींमध्ये चपळ व लवचीक, कृतींमध्ये सामर्थ्यसंपन्न आणि आरोग्य व इंद्रियांच्या कार्याबाबत सुदृढ असे शरीर घडविणे हा असेल. हे सर्व साध्य करून घेण्यासाठी काही विशिष्ट सवयी लावून घेऊन, भौतिक जीवन सुसंघटित करण्यासाठी त्या सवयींचा साहाय्यक म्हणून उपयोग करून घेणे सामान्यतः योग्य ठरेल. कारण नियमित आखीव कार्यक्रमाच्या चौकटीत आपले शरीर अधिक सुगमतेने कार्य करू शकते. Read more