आध्यात्मिकता ४४
(तिमिर जावो….भाग ०३)
…स्वतःमधील द्वंद्व दिसण्यासाठी, ते लक्षात येण्यासाठी, व्यक्ती पुरेशी निर्मळ आणि प्रामाणिक असली पाहिजे. सहसा व्यक्ती या गोष्टींकडे पुरेसे लक्ष देत नाही. व्यक्ती या टोकाकडून त्या टोकाकडे हेलकावत राहते. म्हणजे अगदी साध्या शब्दांत सांगायचे तर, तुम्ही असे म्हणू शकता की, एखाद्या दिवशी मी चांगला असतो, आणि दुसऱ्या दिवशी मी वाईट असतो. आणि तुम्हाला हे सारे अगदी स्वाभाविक वाटते. एवढेच काय पण कधीकधी तर, एका तासासाठी तुम्ही अगदी चांगले असता, आणि पुढच्याच तासाला तुम्ही अगदी दुष्ट होता, किंवा कधीकधी तुम्ही आख्खा दिवस चांगले असता आणि अचानक एकदम तुम्ही दुष्टासारखे वागू लागता, एखादा क्षण अतिशय दुष्टाप्रमाणे वागता, म्हणजे तुम्ही जेवढे चांगले असता, तितकेच टोकाचे दुष्टसुद्धा असता! फक्त एवढेच की, तुम्ही त्याकडे लक्ष देत नाही, तुमच्या मनामध्ये अतिशय हिंसक, वाईट, मत्सरयुक्त अशा गोष्टी येऊन जात असतात… सहसा व्यक्ती त्याकडे लक्षच देत नाही. पण हीच गोष्ट पकडली पाहिजे. ज्या क्षणी तुमच्या मनामध्ये ती गोष्ट उदयाला येते, त्या क्षणी तिच्या मानगुटीला धरून तिला घट्ट पकडली पाहिजे, तिला पकडून प्रकाशासमोर उभे केले पाहिजे आणि म्हटले पाहिजे, “नाही, मला तुझी गरज नाही, मला तू नको आहेस, मला तुझ्याशी काही घेणेदेणे नाही. तू इथून चालती हो आणि परत फिरकू नकोस.”
आणि हा असा अनुभव असतो की व्यक्तीला तो रोज येऊ शकतो किंवा बरेचदा… काही क्षण अतीव उत्साहाचे, उदात्त अभीप्सेचे असतात, जेव्हा व्यक्तीला अचानक स्वतःच्या दिव्य उद्दिष्टाची जाणीव होते, व्यक्तीला ‘ईश्वरा’प्रत एक आस असते, ईश्वरी कार्यामध्ये सहभागी होण्याची इच्छा असते, व्यक्ती स्वतःमधून अतीव आनंदाने, अतीव ऊर्जेने बाहेर पडते… आणि नंतर, काही तासांतच, तीच व्यक्ती अगदी छोट्याछोट्या गोष्टींसाठी हीनदीन होऊन जाते, अगदी किरकोळ, अगदी संकुचित, अगदी सुमार दर्जाच्या, स्वार्थपरायण गोष्टींमध्ये लिप्त होऊन जाते, अगदी सुमार इच्छावासना बाळगते… आणि मग त्यापुढे त्या सगळ्या उदात्त भावना क्षणार्धात लुप्त होऊन जातात, इतक्या की जणूकाही त्या तिथे कधी अस्तित्वातच नव्हत्या. हे विरोधाभास तुमच्या अंगवळणी पडलेले असतात, तुम्ही त्याकडे लक्ष देत नाही आणि म्हणूनच या गोष्टी सख्खे-शेजारी असल्याप्रमाणे गुण्यागोविंदाने तुमच्यामध्ये वसती करून असतात. तुम्ही प्रथम या गोष्टी शोधल्या पाहिजेत आणि तुमच्या चेतनेमध्ये त्यांची सरमिसळ होण्यापासून त्यांना रोखले पाहिजे, प्रकाश कोणता आणि काळोख कोणता त्याचा निर्णय केला पाहिजे, त्यांना विलग केले पाहिजे. असे केल्यानंतर मग, व्यक्ती या काळोख्या भागापासून स्वतःची सुटका करून घेऊ शकते. (तिमिर जावो…. भाग समाप्त)
– श्रीमाताजी [CWM 06 : 263-264]