Posts

सद्भावना – १३

एकदा तुम्ही (योगमार्गाच्या वाटचालीस) सुरुवात केलीत की मग मात्र तुम्ही अगदी अंतापर्यंत गेलेच पाहिजे. माझ्याकडे मोठ्या उत्साहाने जेव्हा लोकं येतात तेव्हा मी कधीकधी त्यांना सांगते की, “थोडा विचार करा, हा मार्ग सोपा नाही, तुम्हाला वेळ लागेल, धीर धरावा लागेल. तुमच्याकडे तितिक्षा (Endurance) असणे गरजेचे आहे, पुष्कळशी चिकाटी आणि धैर्य आणि अथक अशी सद्भावना असणे गरजेचे आहे. तुमच्याकडे या सगळ्या गोष्टी आहेत का ते पाहा आणि मगच सुरुवात करा. पण एकदा का तुम्ही सुरुवात केलीत की मग सारे संपते, तेथे परत फिरण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, तुम्हाला शेवटपर्यंत गेलेच पाहिजे.”

– श्रीमाताजी
(CWM 06 : 441)

विचार शलाका – १९

संसारी मनुष्य सर्व प्रकारच्या अडचणी, संकटे सहन करू शकतो. तो हे समर्थ मानसिक नियंत्रणाच्या साहाय्याने करतो. परंतु ती समता नाही, ती तितिक्षा होय. सहन करण्याची ही ताकद म्हणजे समतेची केवळ पहिली पायरी किंवा समतेचा केवळ तो पहिला घटक होय.

*

समता नसेल तर साधनेचा भरभक्कम पायाच रचला जाऊ शकत नाही. परिस्थिती कितीही त्रासदायक असू दे, इतरांची वागणूक भलेही तुम्हाला न पटणारी असू दे, तुम्ही त्या साऱ्या गोष्टी एका सुयोग्य धीराने आणि कोणत्याही अस्वस्थ प्रतिक्रियांविना स्वीकारायला शिकला पाहिजेत. या गोष्टी म्हणजे समतेची कसोटीच असते. जेव्हा सर्व गोष्टी सुरळीत चालू आहेत, माणसं आणि परिस्थिती सुखकारक आहे तेव्हा समत्व बाळगणे, धीर राखणे सहजसोपे आहे. परंतु जेव्हा यापेक्षा विपरित परिस्थिती असते तेव्हा धीर, शांती, समत्व ह्यांच्या पूर्णतेचा कस लागतो, अशा परिस्थितीमध्ये, त्या अधिक बळकट, अधिक परिपूर्ण केल्या जाऊ शकतात.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 135), (CWSA 29 : 129)