एक वृद्धत्व असे असते की, जे नुसत्या वाढत जाणाऱ्या वयापेक्षादेखील जास्त भयानक आणि जास्त खरे असते ते म्हणजे : विकसित होण्याची व प्रगती करण्याची अक्षमता. ज्या क्षणी तुम्ही वाटचाल करणे थांबविता, ज्या क्षणी तुम्ही प्रगत होणे थांबविता, ज्या क्षणी तुम्ही स्वत:ला अधिक चांगले बनविणे थांबविता, ज्या क्षणी तुम्ही (आलेल्या अनुभवातून) बोध घेणे अथवा प्रग्रल्भ होणे थांबविता, ज्या क्षणी तुम्ही तुमच्यामध्ये रुपांतर घडविणे थांबविता, तेव्हा तुम्ही खरोखरच वृद्ध होता; म्हणजे असे म्हणता येईल, की विघटनाच्या दिशेने तुमचा उतरणीचा प्रवास सुरू होतो.
असे काही तरुण असतात, की जे (वर उल्लेख केलेल्या अर्थाने पाहता) वृद्ध असतात आणि असे काही वृद्ध असतात की, जे (खरे तर) तरुण असतात. तुम्ही तुमच्यामध्ये प्रगतीची आणि रूपांतरणाची ज्योत बाळगलीत; तुम्ही जागरुकपणे पुढे वाटचाल करण्यासाठी म्हणून, सर्व गोष्टी मागे टाकण्याची तयारी ठेवलीत; तुम्ही नवीन प्रगतीसाठी, नवीन सुधारणेसाठी, नवीन रुपांतरणासाठी नेहमीच खुले असाल, तर तुम्ही चिरंतन तरुण राहता. पण तुम्ही आजवर जे काही मिळविलेले आहे, त्यामध्ये समाधानी होऊन आरामशीर बसलात; आपण ध्येयाप्रत जाऊन पोहोचलो आहोत आणि आता करण्यासारखे काहीही उरले नाही, आता फक्त केलेल्या प्रयत्नांची, कष्टांची फळे चाखायची अशी जर तुमची भावना झाली असेल तर… तर तुमच्या निम्म्याहून अधिक गोवऱ्या स्मशानात जाऊन पोहोचल्या आहेत असे समजावे. खरेतर, हीच आहे जर्जरता आणि हाच आहे मृत्यू. जे करायचे शिल्लक राहिले आहे त्याच्या तुलनेत आजवर जे केले आहे, ते नेहमीच अपुरे असते. मागे पाहू नका. पुढे, नेहमीच पुढे पाहा आणि नेहमीच पुढे चालत राहा.
– श्रीमाताजी [CWM 03 : 238]