Posts

कृतज्ञता – १४

प्रश्न : ‘ईश्वरी कृपा’ कृतज्ञतापूर्वक स्वीकारण्याचा मार्ग कोणता?

श्रीमाताजी : सर्वप्रथम तुम्हाला त्याची आवश्यकता जाणवली पाहिजे. हा सर्वांत महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे त्या ईश्वरी कृपेविना तुम्ही असाहाय्य आहात याची जाणीव करून देणारी, एक विशिष्ट अशी आंतरिक विनम्रता असणे आवश्यक आहे. खरोखरच, तुम्ही त्याविना अपूर्ण आणि शक्तिहीन असता. सुरुवात करायची झाली तर ही पहिली गोष्ट आहे.

ही पहिली अट आहे. आणि मग, ज्या परिस्थितिमध्ये तुम्ही सापडलेले असता, त्या परिस्थितितून केवळ ती ईश्वरी कृपाच तुम्हाला तारू शकते, तीच तुम्हाला उपाय सुचवू शकते आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी लागणारे सामर्थ्यदेखील तीच देऊ शकते, फक्त ईश्वरी ‘कृपा’च हे सारे करू शकते, अशी जाणीव जर तुम्हाला झाली तर, अगदी स्वाभाविकपणे तुमच्यामध्ये एक उत्कट आस निर्माण होते, चेतना खुलेपणात अभिव्यक्त झालेली असते. तुम्ही जर धावा कराल, आस बाळगाल आणि प्रतिसाद मिळावा अशी आशा बाळगाल तर, अगदी स्वाभाविकपणे तुम्ही त्या ईश्वरी ‘कृपे’प्रत खुले होता.

आणि नंतर ईश्वरी ‘कृपा’ तुम्हाला जो प्रतिसाद देते, त्याकडे तुम्ही अगदी बारकाईने लक्ष दिले पाहिजे, ती ‘कृपा’ तुम्हाला तुमच्या त्रासामधून बाहेर काढते, ती तुमच्या समस्येवर उपाय सुचविते किंवा तुमच्या अडचणीमधून बाहेर पडण्यास तुम्हाला साहाय्य करते. पण एकदा का तुमची त्या त्रासापासून सुटका झाली आणि तुम्ही त्या अडचणीमधून बाहेर आलात तर, तुम्हाला त्यातून बाहेर काढणारी ‘ईश्वरी कृपा’ होती, हे तुम्ही विसरता कामा नये; तुम्हीच स्वतःला त्या परिस्थितितून बाहेर काढले आहे, असे समजता कामा नये. हा खरोखरच, महत्त्वाचा मुद्दा आहे. अडचण दूर झाली की, लगेचच बहुतेकजण असे म्हणतात, “त्या अडचणीतून मी मला कसे बाहेर काढले, माझे मलाच माहीत.”

तर हे सारे असे असते.

– श्रीमाताजी
(CWM 06 : 322-323)