Posts

विचार शलाका – ०७

आपल्या अस्तित्वाची आत्ताची रचना किंवा स्थिती ही अंतिम आहे, असे मानून, विकासक्रमाच्या शक्यतेवर मर्यादा घालण्याचे काहीच कारण नाही. पशुजीवन ही एक अशी प्रयोगशाळा आहे की, ज्या प्रयोगशाळेमध्ये ‘प्रकृती’ने मनुष्यजात घडवली. मनुष्यसुद्धा तशीच एक प्रयोगशाळा असू शकतो. त्या प्रयोगशाळेत दिव्य जीव म्हणून आत्म्याला प्रकट करण्याची, तसेच एक दिव्य प्रकृती विकसित करण्याची आणि अतिमानव घडविण्याचे कार्य करण्याची प्रकृतीची इच्छा आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 13 : 502)

ईश्वरी कृपा – ३३

ज्यांनी ईश्वराप्रत आत्मदान केले आहे, अशा व्यक्तींना जी जी अडचण सामोरी येते, ती प्रत्येक अडचण म्हणजे त्यांच्यासाठी एका नव्या प्रगतीचे आश्वासन असते आणि त्यामुळे ती ‘ईश्वरी कृपे’ने दिलेली भेटवस्तू आहे, अशा रितीने त्यांनी तिचा स्वीकार केला पाहिजे.

*

केवळ ईश्वराची ‘कृपा’च शांती, सुख, शक्ती, प्रकाश, ज्ञान, आनंद आणि प्रेम या गोष्टी त्यांच्या साररूपात आणि त्यांच्या सत्यरूपात प्रदान करू शकते.

*

आपण ईश्वरी ‘कृपे’साठी प्रार्थना केली पाहिजे – कारण ईश्वरी ‘न्याय’ जर इथे आविष्कृत व्हायचा झाला तर, त्याच्या समोर टिकून राहू शकतील असे फारच थोडेजण असतील.

– श्रीमाताजी
(CWM 14 : 96, 85, 83)

देह सोडल्यानंतर चैत्य पुरुष, दुसऱ्या जगातील काही विशिष्ट अनुभव घेतल्यानंतर, मानसिक आणि प्राणिक व्यक्तिमत्त्व टाकून देतो आणि गतकाळातील अर्क आत्मसात करण्यासाठी आणि पुढील जन्माची तयारी करण्यासाठी विश्रांत अशा स्थितीत निघून जातो.

नवीन जन्माची परिस्थिती कशी असेल हे, ह्या तयारीवरच अवलंबून असते. या तयारीमधूनच, नवीन व्यक्तिमत्त्वाची पुनर्रचना आणि त्यासाठी लागणाऱ्या साधनसामग्रीची निवड यासाठी मार्गदर्शन मिळते.

निघून गेलेला चैत्य पुरुष भूतकाळातील अनुभव अर्करूपाने स्मरणात साठवून ठेवतो, तो त्यांचे रूप वा तपशील लक्षात ठेवत नाही. आत्ताच्या आविष्करणाचा एक भाग म्हणून आत्म्याने जर गत जीवनातील एक वा अधिक व्यक्तिमत्त्वं आपल्यासोबत आणली असतील तर, त्याला गत जन्मातील काही तपशील आठवण्याची शक्यता असते. अन्यथा, केवळ योगदृष्टीनेच अशी स्मृती येते.

चैत्य पुरुषाच्या उत्क्रांतीमध्ये प्रतिगामी वाटतील अशाही काही हालचाली असतात, पण त्या केवळ आडव्यातिडव्या हालचाली असतात, ते खरोखरीचे मागे जाऊन पडणे नसते, तर ते ज्याच्यावर अद्यापि काम झालेले नाही पण परत त्यावर अधिक चांगले काम करावे म्हणून, अशा कोणत्यातरी गोष्टीकडे परत फिरून जाणे असते.

आत्मा प्राणिमात्रांच्या अवस्थेत परत मागे जात नाही; पण प्राणिक व्यक्तिमत्त्वातील काही भाग स्वत:ला विलग करून घेत, स्वत:मधील पशुप्रवृत्तीवर काम करण्यासाठी, परत पशुजन्माला जाऊन मिळू शकतो. लोभी मनुष्य साप बनून पुन्हा जन्माला येतो, या लोकरूढ कल्पनेमध्ये काही तथ्य नाही. ह्या प्रचलित काल्पनिक अंधश्रद्धा आहेत.

– श्रीअरविंद
(CWSA 28 : 534)

(श्रीमाताजींनी त्याच्या घडणीच्या काळामध्ये, तीव्र योगसाधना केली होती, त्या काळामध्ये त्यांच्या योगसाधनेचा एक मार्ग होता तो म्हणजे ‘प्रार्थना व ध्यान’. त्या काळामध्ये त्या रोज पहाटे ध्यानाला बसत असत आणि त्यातून प्रस्फुटीत झालेले विचार नंतर लिहून काढत असत, ते विचार पुढे Prayers and Meditations या ग्रंथामध्ये समाविष्ट करण्यात आले. मुळात फ्रेंच भाषेमध्ये लिहिलेल्या यातील काही प्रार्थनांचे श्रीअरविंदांनी इंग्रजीत भाषांतर केले. या प्रार्थना योगसाधकांना मार्गदर्शक आहेत.)

१५.०६.१९१३ रोजी श्रीमाताजींनी केलेली प्रार्थना. Read more