पूर्णयोगांतर्गत पारंपरिक योग – २१
ज्ञानयोग
ज्ञानयोगाचे साध्य ईश्वरप्राप्ती हे आहे. आपण ईश्वराला प्राप्त करून घ्यावे आणि आपण आपल्या जाणिवेच्या द्वारे, आपल्या ऐक्याच्या द्वारे, आपल्या मधील दिव्य सत्याच्या प्रतिबिंबाद्वारे आपला ताबा ईश्वराला घेऊ द्यावा. अर्थात ही गोष्ट, आपल्या सद्य अस्तित्वापासून दूर कोठेतरी, केवळ अमूर्त पातळीवर साध्य करायची असे नाही तर ती अगदी इथेसुद्धा घडवून आणली पाहिजे. त्यासाठी, स्वत:मधील ईश्वर, विश्वातील ईश्वर; अंतरंगातील ईश्वर आणि सर्व वस्तू व सर्व जीवमात्रांतील ईश्वर हा आपण आत्मसात केला पाहिजे. म्हणजे, ईश्वराशी एकत्व प्राप्त करून घेऊन, त्याच्या माध्यमातून ह्या जगतातील एकत्वाची, विश्वात्मक एकत्वाची आणि सर्वांमधील एकत्वाची प्राप्ती करून घेतली पाहिजे. त्या एकत्वामध्ये अनंत विविधतेचा लाभ घेतला पाहिजे. आणि हे करायचे ते एकत्वाच्याच आधारावर, विविधतेच्या वा विभक्ततेच्या आधारावर नव्हे. म्हणजे ईश्वर, त्याच्या व्यक्तित्वांत आणि त्याच्या निर्व्यक्तित्वांत, त्याच्या निर्गुण शुद्धतेत आणि त्याच्या अनंत गुणांमध्ये, सगुण रुपामध्ये, त्याच्या कालात्मक आणि कालातीत स्वरूपात, त्याच्या क्रियाशीलतेत आणि त्याच्या निःशब्दतेतही, त्याच्या सान्त स्वरूपात व त्याच्या अनंत स्वरूपात आपलासा करायचा. केवळ त्याच्या शुद्ध आत्मस्वरूपात नव्हे, तर सर्वांच्या आत्मरूपात तो आपलासा करायचा; केवळ आत्मरूपात नव्हे, तर प्रकृतीतही; केवळ आत्म्यात नव्हे, तर अतिमानसात, मनात, प्राणात व शरीरातही आपलासा करायचा; आत्म्याने, मनाने, प्राणाने व शारीर जाणिवेने तो आपलासा करायचा. आणि परत ईश्वरानेही (आत्मा, मन, प्राण, शरीर) वरील सर्व गोष्टी त्याच्या कराव्या, जेणेकरून, आपले अस्तित्व ईश्वराशी एकरूप होईल, त्याने भरून जाईल, त्याच्या नियंत्रणाखाली काम करील व त्याच्या प्रेरणेने काम करील. म्हणजे ईश्वर एकत्वस्वरूप असल्याने, आपल्या शारीर जाणिवेने भौतिक विश्वाच्या आत्म्याशी व प्रकृतीशी एकरूप व्हावे; आपल्या प्राणाने सर्वात्मक प्राणांशी एकरूप व्हावे; आपल्या मनाने विश्वमनाशी एकरूप व्हावे; आपल्या आत्म्याने विश्वात्म्याशी एकरूप व्हावे; आपण त्याच्या कैवल्यामध्ये विलीन होऊन जावे आणि सर्व संबंधांत त्याचाच शोध घ्यावा.
दुसरे असे की, दिव्य (ईश्वरी) अस्तित्व आणि दिव्य ईश्वरी प्रकृती आपण आपलीशी करायची. ईश्वर सच्चिदानंद आहे, म्हणून आपण आपले अस्तित्व उन्नत करून, ते दिव्य ईश्वरी अस्तित्व करायचे, आपली जाणीव उन्नत करून ती ईश्वरी जाणीव करायची, आपली शक्ती उन्नत करून ती ईश्वरी शक्ती करायची, आपला अस्तित्वमूलक आनंद उन्नत करून तो ईश्वरी अस्तित्वमूलक आनंद करायचा. आपले अस्तित्व केवळ उच्चतर जाणिवेमध्ये उन्नत करायचे असे नाही, तर ती उच्चतर जाणीव आपल्या समग्र अस्तित्वामध्ये व्यापक करायची; कारण आपण आपल्या अस्तित्वाच्या सर्व पातळ्यांवर, आपल्या सर्व घटकांमध्ये, ईश्वराचा शोध घ्यावयाचा आहे; जेणेकरून आपले मानसिक, प्राणिक, शारीरिक अस्तित्व हे दिव्य प्रकृतीने भरून जाईल. आपल्या बुद्धियुक्त मानसिकतेला ईश्वरी ज्ञानयुक्त इच्छेच्या क्रीडेचे रूप यावे, आपल्या मानसिक आत्मजीवनाला ईश्वरी प्रेमाच्या व आनंदाच्या क्रीडेचे रूप यावे, आपली प्राणक्रिया ही दिव्य जीवनाची क्रीडा व्हावी, आपले शारीरिक अस्तित्व हे ईश्वरी द्रव्याचा जणू साचा व्हावे. दिव्य ज्ञान (विज्ञान) आणि दिव्य आनंद यांच्याप्रत स्वत:ला खुले करूनच ही ईश्वरी क्रिया आपल्यामध्ये प्रत्यक्षात यावयास हवी; आणि ही ईश्वरी क्रिया पूर्ण होण्यासाठी, आपण विज्ञानभूमीवर व आनंदभूमीवर चढून गेले पाहिजे, तेथे कायमचे वास्तव्य केले पाहिजे.
– श्रीअरविंद
(CWSA 23-24 : 511-512)