Posts

आपण आपल्या चेतनेच्या पृष्ठभागावरच जीवन जगत असल्याने, आपल्याला केवळ या पृष्ठवर्ती चेतनेचेच भान असते. ही पृष्ठवर्ती चेतना (माणसामधील सर्वसाधारण जाग्रत मन) म्हणजेच आपण आहोत, समग्रत्वाने आपण आहोत असे आपल्याला वाटत असते, कारण आपण केवळ त्या पृष्ठवर्ती भागावरच जाग्रत असल्याने आपल्याला फक्त त्याचीच जाणीव असते.

पण अंतरंगामध्ये, आंतरिक अस्तित्व आणि बाह्यवर्ती अस्तित्व यांच्या दरम्यान गूढतेची किंवा विस्मृतीची एक प्रकारची भिंत असते; एक आंतरिक अस्तित्व (Inner being) – आंतरिक मन, प्राण, शरीर असते आणि आंतरतम भागामध्ये चैत्य पुरुष (an Inmost or Psychic being) असतो; मात्र आपण या साऱ्यांविषयी अनभिज्ञ असतो. तेथून पृष्ठभागावर जे जे काही येते फक्त त्याचीच जाणीव आपल्याला असते; त्याचा उगम कोठे आहे किंवा ते पृष्ठभागावर कोठून, कसे आले याविषयी आपल्याला काहीच माहीत नसते.

‘योगसाधने’तून ती भिंत हळूहळू ढासळू लागते आणि आपल्याला आपल्यातील आंतरिक आणि आंतरतम अशा अस्तित्वाची जाणीव होऊ लागते. असे केल्यामुळे आपल्यामध्ये जी एक नवीन ‘योगमय’ चेतना निर्माण होते त्या चेतनेला सभोवती असलेल्या वैश्विक चेतनेशी आणि वर असलेल्या उच्चतर आध्यात्मिक चेतनेशी थेट संपर्क साधणे शक्य असते.

ज्याप्रमाणे व्यक्तीकडे स्वत:ची अशी चेतना असते, त्याचप्रमाणे वैश्विक चेतना, वैश्विक ‘अस्तित्व’, वैश्विक ‘मन’, वैश्विक ‘प्राण’, वैश्विक भौतिक जाणीवयुक्त ‘प्रकृती’ देखील असते. आपण आपल्या बाह्य शारीर अस्तित्वामध्येच कोंडून पडल्यामुळे आपण त्या साऱ्याविषयी अनभिज्ञ असतो.

आंतरिक जागृतीमुळे आणि ऊर्ध्वमुख विकसनामुळे वैश्विक चेतना, वैश्विक ‘प्रकृती’, वैश्विक ‘आत्मा’ आणि त्याच्या हालचालींविषयी आपण जागृत होतो; आपली चेतना व्यापक होऊन, आपण त्या वैश्विक चेतनेशी तद्रूप होऊ शकतो. वैश्विक ‘प्रकृती’च्या शक्ती सातत्याने आपल्यावर कार्य करत असतात. वैश्विक प्रकृतीच्या शक्ती कशा कार्य करतात याची आपल्याला कल्पनादेखील नसते किंवा आपल्यावर चालणाऱ्या त्यांच्या कार्यावर आपण नियंत्रणही ठेवू शकत नाही. विश्वप्रकृतीविषयी सचेत झाल्यानेच आपण त्यांचे कार्य ओळखू शकतो आणि त्यावर नियंत्रणही मिळवू शकतो.

– श्रीअरविंद
(CWSA 28 : 19-20)

जर तुम्ही मानवी प्रकृतीचे रूपांतरण गतिमान दिव्य प्रकृतीमध्ये करू इच्छित असाल तर, कोणतीही उणीव न ठेवता, किंवा कोणताही प्रतिकार, विरोध न करता, स्वत:ला माताजींच्या व त्यांच्या शक्तींच्या हाती सोपवा आणि त्यांना तुमच्यामध्ये त्यांचे कार्य, कोणत्याही अडथळ्याविना करू द्या. जाणीव, लवचीकता आणि हातचे काहीही राखून न ठेवता केलेले समर्पण ह्या तीन गोष्टी तुमच्याकडे असणेच आवश्यक आहे.

जाणीव :
श्रीमाताजी आणि त्यांच्या शक्ती व त्यांचे कार्य याविषयी तुमचे मन, आत्मा, हृदय, प्राण इतकेच काय पण, तुमच्या शरीरातील पेशीसुद्धा सजग असल्या पाहिजेत. कारण, जरी श्रीमाताजी तुमच्या अंधकारात आणि तुमच्या अचेतन भागांमध्ये, अचेतन क्षणांमध्ये देखील कार्य करू शकतात आणि तशा त्या करतात देखील, परंतु जेव्हा तुम्ही जागृत असता आणि त्यांच्याशी जिवंत संपर्क राखून असता तेव्हाची गोष्ट वेगळी असते.

लवचीकता :
तुमची समग्र प्रकृतीच श्रीमाताजींच्या स्पर्शाला घडणसुलभ लवचीक (Plastic) असली पाहिजे – स्वसंतुष्ट अज्ञानी मन जसे प्रश्न विचारत राहते, शंका घेत राहते, विवाद करत बसते आणि ते जसे प्रबोधनाचे व परिवर्तनाचे शत्रू असते, तशी तुमची प्रकृती असता कामा नये. ज्याप्रमाणे माणसातील प्राण स्वत:च्याच हालचालींवर भर देत राहतो आणि तो जसा आपल्या हट्टाग्रही इच्छा व दुरिच्छेमुळे, प्रत्येक ईश्वरी प्रभावाला सातत्याने विरोध करत राहतो, तशी तुमची प्रकृती स्वत:च्याच हालचालींवर भर देणारी असता कामा नये. माणसाची शारीरिक जाणीव जशी अडथळा निर्माण करते आणि त्याच्या किरकोळ आणि काळोख्या गोष्टींमधील सुखाला ती जशी चिकटून राहते; शरीराची आत्माविहिन दिनचर्या, आळस किंवा त्याची जी जड निद्रा असते त्याला धक्का पोहोचविणाऱ्या कोणत्याही स्पर्शाने जशी शारीरिक जाणीव आरडाओरडा करते; तशी तुमची प्रकृती ही अडथळा निर्माण करणारी, स्वत:ची अक्षमता, जडता आणि तामसिकता ह्यांना हटवादीपणे चिकटून राहिलेली अशी असता कामा नये.

समर्पण :
हातचे काहीही राखून न ठेवता केलेले, तुमच्या आंतरिक व बाह्य अस्तित्वाचे समर्पण तुमच्या प्रकृतीच्या सर्व भागांमध्ये ही घडणसुलभ लवचीकपणा (Plasticity) आणेल; वरून प्रवाहित होणाऱ्या प्रज्ञा आणि प्रकाश, शक्ती, सुसंवाद आणि सौंदर्य, पूर्णता ह्या साऱ्या गोष्टींसाठीसातत्यपूर्ण खुलेपणा राखलात तर, तुमच्यामधील सर्व अंगांमध्ये जाणीव जागृत होईल. इतकेच काय पण तुमचे शरीरसुद्धा जागृत होईल आणि सरतेशेवटी, त्याची जाणीव ही त्यानंतर अर्धचेतन जाणिवेशी संबद्ध न राहता, अतिमानसिक अतिचेतन शक्तीशी एकत्व पावेल; आणि तिची ऊर्जा ही वरून, खालून, चोहोबाजूंनी शरीराला अनुभवास येईल आणि एका परम प्रेमाने व आनंदाने ते शरीर पुलकित होऊन जाईल.

पण सावध असा आणि तुमच्या क्षुल्लक अशा पार्थिव मनाने, की ज्याला त्याच्या पलीकडे असणाऱ्या गोष्टींनादेखील स्वत:च्या निकषांच्या, स्वत:च्या मोजमापांच्या अंकित करायला आवडते, स्वत:च्या संकुचित तर्काच्या आणि प्रमादशील समजुतींच्या, बिनबुडाच्या आक्रमक अज्ञानाच्या आणि स्वत:च्या क्षुद्र आत्म-विश्वासपूर्ण अज्ञानाच्या अंकित करायला आवडते, अशा पार्थिव मनाद्वारे, दिव्य मातेला समजून घेण्याचा किंवा त्यांची पारख करण्याचा यत्न करू नका.

दिव्य शक्तीच्या विविध स्तरांवरील बहुमुखी स्वातंत्र्याचे आकलन, अर्धवट उजळलेल्या अशा अंधकारमय तुरुंगात बंदिस्त झालेल्या मानवी मनाला होऊ शकणार नाही. दिव्य शक्तीच्या दृष्टीची आणि कृतीची गतिमानता आणि तिची जटिलता ही मनाच्या अडखळणाऱ्या आकलनाला ओलांडून कितीतरी पलीकडे जाते; तिच्या गतिविधींची परिमाणे ही मनाची परिमाणेच नव्हेत. हे मन दिव्य शक्तीच्या विविध व्यक्तिमत्त्वांमधील जलद बदलाने भयचकित होऊन जाते. तिचे लयताल निर्माण करणे आणि ते मोडूनही टाकणे, तिचे वेगामध्ये वाढ करणे आणि वेग मंद करणे, एकाची समस्या हाताळण्याची तिची एक पद्धत तर दुसऱ्याची समस्या हाताळताना तिची दुसरीच पद्धत, अशा तिच्या अनेकविध पद्धती, तिने आत्ता एक दिशा पकडणे आणि नंतर ती सोडूनही देणे व दुसरीच दिशा पकडणे आणि मग त्या सर्वच दिशा एकत्रित करणे या सगळ्या प्रकाराने मन भयचकित होते. आणि अशा मनाला, परमशक्ती जेव्हा अज्ञानाच्या जंजाळामधून वळणावळणाने वरवर ढकलत दिव्य प्रकाशाकडे घेऊन जात असते, तेव्हाच्या त्या परमशक्तीच्या पद्धतीचे आकलन होऊ शकत नाही.

त्यापेक्षा तुमचा आत्मा श्रीमाताजींप्रत खुला करा आणि तुमच्या चैत्य प्रकृतीने तरी तुम्ही श्रीमाताजींना जाणून घेऊ शकता, ह्याबाबत समाधानी राहा आणि त्यांच्याकडे चैत्य दृष्टीने पाहा, तीच एकमेव गोष्ट तुम्हाला सत्याप्रत थेटपणे घेऊन जाणारी असेल. आणि श्रीमाताजी स्वत:च त्यांच्या चैत्य घटकांद्वारे तुमचे मन, हृदय, प्राण आणि तुमची शारीरिक चेतना उजळून टाकतील आणि त्यांना त्या परमशक्तीच्या कार्यपद्धती, परमशक्तीची प्रकृती उघड करून दाखवतील. सर्वज्ञतेच्या व सर्वशक्तिमानतेच्या आपल्या ज्या अगदीच बाळबोध वरवरच्या संकल्पना असतात, त्या नुसारच ईश्वरी शक्तीने कायम वागावे, अशी आपल्या अज्ञानी मनाची जी सदोष मागणी असते, ती सुद्धा टाळा. प्रत्येक वळणावर सहजसुलभ यश, डोळे दिपवणारे वैभव आणि चमत्कारपूर्ण शक्ती अनुभवास यावी, ह्यासाठी आपल्या मनाचा गोंगाट चालू असतो. असे डोळे दिपवणारे, प्रभावित करणारे काही अनुभवास आले नाही तर, तेथे ईश्वर आहे ह्यावर त्याचा विश्वासच बसू शकत नाही. श्रीमाताजी अज्ञानाशी मुकाबला करण्यासाठी, अज्ञानाच्या क्षेत्रामध्ये उतरल्या आहेत. अज्ञानक्षेत्राच्या पलीकडे, उच्च स्थानी कोठेतरी राहून नव्हे तर, श्रीमाताजी प्रत्यक्ष अज्ञानाच्या क्षेत्रामध्ये उतरून, अज्ञानाशी दोन हात करत आहेत.

श्रीमाताजी त्यांचे ज्ञान आणि त्यांची शक्ती झाकून ठेवतात, अंशत:च प्रकट करतात. बऱ्याचदा त्यांचे साधन झालेल्यांपासून आणि व्यक्तींपासून त्या ते ज्ञान व शक्ती रोखून ठेवतात आणि शोधक मनाच्या पद्धतीनुसार, अभीप्सा बाळगणाऱ्या चैत्य पुरुषाच्या पद्धतीनुसार, संघर्ष करणाऱ्या प्राणाच्या पद्धतीनुसार, बंदिवान होऊन दुःख भोगणाऱ्या शारीरिक प्रकृतीच्या पद्धतीनुसार, त्या साधनभूत झालेल्या व्यक्तींमध्ये रूपांतर घडून यावे असा त्यांचा प्रयत्न असतो.

परमशक्तीच्या संकल्पाद्वारे अशा काही अटी घालून देण्यातआलेल्या आहेत, बऱ्याचशा गुंतागुंतीच्या गाठी आहेत, ज्या आधी सैल करणे आवश्यक आहे; कारण त्या अचानकपणे कापून टाकता येत नाहीत.आजवर दीर्घकाळ ज्या जहागिऱ्यांवर व प्रांतांवर ज्यांनी अधिराज्य केले होते त्या असुरांनी व राक्षसांनी, ह्या विकसनगामी पार्थिव प्रकृतीवर ताबा मिळविलेला आहे. त्यांना त्यांच्या त्यांच्या प्रांतांमध्ये जाऊन, त्यांच्या अटींनुसार, त्यांच्याशी दोन हात करण्याची आणि त्यांच्यावर विजय प्राप्त करून घेण्याची आवश्यकता आहे. आपल्यातील मानवाला त्याच्या मर्यादांच्या अतीत जाण्यासाठी तयार केले पाहिजे, त्याला त्या दिशेने घेऊन गेले पाहिजे पण आत्तातरी मानव या मर्यादांच्या खूप पलीकडे असणाऱ्या अशा रूपांकडे अचानकपणे उचलले जाण्याच्या दृष्टीने खूपच दुर्बल आणि अंधकारपूर्ण आहे.

ईश्वरी चेतना व शक्ती अस्तित्वात आहेत आणि प्रत्येक क्षणी, जी गोष्ट करणे गरजेची आहे ती गोष्ट, त्या परिश्रमपूर्वक करत असतात. जो आदेश देण्यात आला आहे त्यानुसार त्या नेहमीच पावले उचलत असतात आणि जे पूर्णत्व अस्तित्वात यावयाचे आहे त्याला ती ईश्वरी चेतना ह्या अपूर्णतेमध्येच आकारास आणत असते.

…जर तुम्ही मनालाच अनुसरत राहिलात तर, श्रीमाताजी अगदी तुमच्या समोर प्रत्यक्षपणे जरी प्रकट झाल्या तरीही ते मन श्रीमाताजींना ओळखू शकणार नाही. आत्म्याचे अनुसरण करा, तुमच्या मनाला अनुसरू नका. जे मन बाह्य रूपांकडे धाव घेते त्या मनाला न अनुसरता, सत्याला प्रतिसाद देणाऱ्या आत्म्याचे अनुसरण करा. ईश्वरी शक्तीवर विश्वास ठेवा; ती तुमच्यातील देवसदृश घटकांना मुक्त करेल आणि त्यांना दिव्य प्रकृतीच्या अभिव्यक्तीचा आकार देईल.

– श्रीअरविंद
(CWSA 32 : 24-26)

प्रश्न : श्रीमाताजी, आम्ही आमची जाणीव व्यापक कशी करावी?

श्रीमाताजी : जाणीव व्यापक करण्याचे अनेक मार्ग आहेत. सर्वात सोपा मार्ग म्हणजे, कोणत्यातरी व्यापक, विशाल गोष्टीशी स्वत:ला एकरूप करणे. उदाहरणार्थ, अगदी संकुचित व मर्यादित असा एखादा विचार, एखादी इच्छा, जाणीव यांत तुम्ही पूर्णपणे बंदिस्त झाले आहात असे जेव्हा तुम्हाला वाटते, आणि जणुकाही एखाद्या कवचात तुम्ही कोंडले गेले आहात असे जेव्हा तुम्हाला वाटते, अशा वेळी जर कोणत्या तरी विशाल गोष्टीबद्दल विचार करण्यास तुम्ही सुरुवात केलीत तर तुमची जाणीव तुम्ही काहीशी व्यापक करू शकाल…

उदाहरणार्थ, महासागराच्या पाण्याचा अफाट विस्तार. तुम्ही जर खरोखरच अशा महासागराचा विचार करू लागलात आणि तो किती दूर दूर दूर दूरवर, सर्व बाजूंनी असा पसरला आहे असा विचार केलात तर, तुमच्या मानाने तो इतका विशाल, इतका अथांग आहे, की तुम्हाला त्याचा किनारा दिसू शकत नाही, तुमची दृष्टी त्याच्या कोणत्याच टोकापर्यंत पोहोचू शकत नाही, मागे नाही, पुढे नाही, उजव्या बाजूला नाही, डाव्या बाजूला नाही… तो विशाल, खूप विशाल, खूप खूप विशाल आहे… तुम्ही असा विचार केलात, तर तुम्हाला असे वाटू लागते, की आपण अशा महासागरावर तरंगत आहोत की, ज्याला कोणती मर्यादाच नाही. अशी कल्पना करणे सोपे आहे. असे केले म्हणजे तुमची जाणीव तुम्ही काहीशी व्यापक करू शकाल.

काहीजण आकाशाकडे पाहायला लागतात आणि नंतर ते त्या तारकांच्या मधल्या अवकाशाची कल्पना करतात… त्या अनंत विस्तारामध्ये पृथ्वी अगदी एखाद्या ठिपक्याप्रमाणे आहे आणि तुम्ही तर या पृथ्वीवर त्याहूनही लहानशा ठिपक्याप्रमाणे, मुंगीपेक्षाही लहानशा ठिपक्याप्रमाणे आहात असे तुम्हाला वाटते. अशा आकाशाकडे पाहता पाहता तुम्हाला असे वाटू लागते की, आपण या अनंत अवकाशात, तारका, ग्रह यांच्या मधील अवकाशात तरंगत आहोत. पुढे पुढे जाण्यासाठी तुम्ही अधिकाधिक विशाल होत जाता. काही जण अशा रीतीने व्यापक होण्यात यशस्वी होतात.
(उत्तरार्ध उद्या…)

– श्रीमाताजी
(CWM 06 : 344-45)

तुम्ही कोणत्यातरी अगदी क्रियाशील कृतीमध्ये गुंतलेले असाल उदा. बास्केटबॉल खेळणे, ज्यामध्ये खूप वेगवान हालचाली कराव्या लागतात. असे असतानादेखील, तुम्ही ईश्वरावरच्या आंतरिक ध्यानाचा आणि एकाग्रतेचा तुमचा भाव ढळू देता कामा नये.

आणि जर तुम्ही तसे करू शकलात तर तुम्हाला दिसेल की, तुम्ही जे काही करत असता त्याच्या गुणवत्तेमध्ये सुधारणा झाली आहे; ती गोष्ट तुम्ही फक्त उत्तमच करता असे नाही, तर तुम्ही ती अगदी अपेक्षेपेक्षाही अधिक सामर्थ्यानिशी करता.

आणि त्याचवेळी तुम्ही तुमची चेतना इतक्या उंचीवर नेऊन ठेवता, इतकी शुद्ध राखता की, तुम्हाला तेथून पुढे कोणीच धक्का लावू शकत नाही. आणि लक्षात घ्या की हे इथपर्यंत होते की, एखादी दुर्घटना जरी घडली तरी ती तुम्हाला कोणतीही बाधा पोहोचवू शकत नाही.

अर्थातच, हे अत्युच्च शिखर आहे. ज्याची व्यक्तीने आस बाळगावी असे हे शिखर आहे.

– श्रीमाताजी
(CWM 04 : 121)

प्रश्न : भौतिक जाणिवेमध्ये आणि पूर्णत: भौतिक परिस्थितीमध्ये आपल्याला सदासर्वकाळ अडकवून ठेवणाऱ्या भौतिक जाणिवेमधून बाहेर कसे पडावे?

श्रीमाताजी : ते करण्याचे अगणित मार्ग आहेत. बौद्धिक, भावनिक, कलात्मक आणि आध्यात्मिक मार्ग आहेत. आणि साधारणपणे, ज्याला जो मार्ग सर्वाधिक सोपा वाटतो तो मार्ग त्याने अवलंबणे कधीही चांगले. कारण सर्वात अवघड असे जे आहे त्यापासून सुरुवात करावयाची म्हटले तर काहीच हाती लागणार नाही. आणि इथेच आपण श्रीअरविंदांनी ‘The Synthesis of Yoga’ या ग्रंथामध्ये सांगितल्याप्रमाणे ज्ञानमार्ग, भक्तिमार्ग किंवा कर्ममार्ग यांपाशी परत येऊन पोहोचतो. ह्यातील कर्ममार्ग हा प्रामुख्याने तुम्हाला भौतिक जीवनाशी जोडून ठेवतो आणि त्यामध्येच मुक्तीचा शोध घेण्यास प्रवृत्त करतो. कदाचित हा सर्वात परिणामकारक पण सर्वात अवघड असा मार्ग आहे.

बहुतांशी मुमुक्षू लोकांना ध्यानाचा, एकाग्रतेचा मार्ग, ह्या भौतिक जीवनापासून दूर राहण्याचा, भौतिक क्रियाकलापांचा परित्याग करण्याचा मार्ग हा कर्ममार्गापेक्षा निश्चितपणे सोपा वाटतो. पण, ते भौतिक चेतनेला ती जशी आहे तशीच सोडून देतात, तिच्यामध्ये कोणतेही परिवर्तन घडवून न आणता, तशीच सोडून देतात; ह्या मार्गामध्ये, व्यक्ती जोवर एखाद्या साधु वा संन्याशाप्रमाणे सक्रिय जीवन बाजूला सारत नाही आणि सदासर्वदा ध्यानामध्ये निमग्न राहत नाही तोवर तिला काहीच साध्य होत नाही. म्हणजेच, व्यक्तित्वाचा एक संपूर्ण भाग रुपांतरित झाल्याविना तसाच शिल्लक राहतो. त्यांच्यासाठी रूपांतरण करणे हा उपाय नसून, परित्याग करणे, शक्य तितक्या त्वरेने या शरीरातून बाहेर पडणे हाच केवळ त्यावरील उपाय असतो. पूर्वी योगसाधनेमध्ये हेच अभिप्रेत असे आणि साहजिकच ते अधिक सोपे होते. पण आपल्याला हवे आहे ते हे नाही.

आपल्याला शारीरिक, भौतिक जाणिवेचे रूपांतरण हवे आहे, त्याचा परित्याग करणे अभिप्रेत नाही. आणि येथेच श्रीअरविंदांनी अगदी थेट आणि अगदी परिपूर्ण असा परमेश्वराप्रत नेणारा समर्पणाचा मार्ग सुचविलेला आहे. क्रमश: अधिकाधिक समग्र होत जाणारे आणि भौतिक बाबींचा व भौतिक जाणिवेचादेखील समावेश करून घेणारे समर्पण. आणि व्यक्ती ते करण्यामध्ये यशस्वी झाली तर शरीर, भौतिक हे मार्गातील धोंड न ठरता, साहाय्यक बनते.

– श्रीमाताजी
(CWM 08 : 299-300)

जेव्हा तुम्ही इतरांसोबत काही काम करत असता त्यावेळी जर तुम्हाला एखादी गोष्ट पटली नाही तर ती दिव्य कृपा आहे, प्रगती करण्यासाठी तुम्हाला देण्यात आलेली ती एक उत्तम संधी आहे असे समजा.

आणि हे सोपे आहे : तुम्ही ह्या बाजूने असण्याऐवजी त्या बाजूने असता. तुम्ही स्वत:कडे पाहण्याऐवजी, तुम्ही त्या दुसऱ्या माणसामध्ये प्रवेश करता आणि तेथून पाहता. त्यासाठी तुमच्यापाशी थोडीशी कल्पनाशक्ती हवी; तुमच्या विचारांवर, तुमच्या कृतीवर थोडेसे अधिक प्रभुत्व हवे. पण हे काही तितकेसे कठीण नाही. जर तुम्ही थोडासाही प्रयत्न करून पाहाल तर, कालांतराने तुम्हाला ते खूप सोपे वाटू लागेल.

तुम्ही केवळ पाहणे आणि “हे असे का आहे? ते तसे का आहे? त्याने तसे का केले? तो तसे का म्हणाला?” असले स्वतःशीच बोलत बसणे, केवळ मानसिक प्रयत्न करणे पुरेसे नाही. त्यातून तुम्हाला काहीच साध्य होणार नाही. असेच करत राहिलात तर तुम्हाला काहीच समजणार नाही. तुम्ही सर्व प्रकारच्या स्पष्टीकरणाची कल्पना करत राहाल, जी अगदीच निरुपयोगी असतील आणि “तो माणूस मूर्ख आहे, दुष्ट आहे.” असे म्हणायला लागण्यापलीकडे त्याचा काहीच उपयोग होणार नाही.

उलट, जर तुम्ही थोडासा प्रयत्न केलात, तुमच्या पासून दूर एखादी दूरस्थ वस्तू असल्याप्रमाणे त्याकडे पाहण्याऐवजी, जर तुम्ही त्याच्या अंतरंगात शिरण्याचा प्रयत्न केलात, तुम्ही आत शिरलात, तुमच्या समोर जो माणूस आहे त्याच्या डोक्यात शिरकाव कारण्याचा प्रयत्न केलात तर तुम्ही एकाएकी, स्वत:ला दुसऱ्या बाजूला पाहाल; तुम्ही स्वत:कडेच पाहाल आणि आता तुम्हाला व्यवस्थितपणे कळेल की, तो तसे का म्हणत आहे; सर्वकाही सुस्पष्ट असेल, का, कशामुळे, कारण काय, त्या गोष्टीमागची त्याची भावना…सारे सारे काही. तुम्हाला दिवसातून शंभर वेळा असे करण्याची संधी मिळेल असा हा प्रयोग आहे. सुरुवाती सुरुवातीला तुम्हाला त्यात काही फारसे यश येणार नाही पण जर तुम्ही चिकाटीने प्रयत्न करत राहिलात तर तुम्ही लक्षणीयरित्या यशस्वी झालेले असाल; त्यामुळे जीवनात एका मोठेच स्वारस्य निर्माण होते.

ज्यामुळे तुमची खरोखरीच प्रगती होते असे हे कार्य आहे. कारण ज्या क्षुद्र अशा चिखलामध्ये तुम्ही स्वतःला छान रीतीने कोंडून घेतलेले असते आणि ज्यामुळे तुम्ही प्रत्येक गोष्टीवर अडखळत राहता, त्यामधून हे कार्य तुम्हाला बाहेर काढते.

प्रकाशावर आपटत राहणारे किडे तुम्ही पाहिले आहेत ना? व्यक्तीची जाणीव ही काहीशी तशीच असते, ती प्रत्येक वस्तुवर ठोकर खात राहते, कधी इकडे कधी तिकडे, कारण त्या गोष्टी तिच्यासाठी परक्या असतात. पण ठोकरा खात राहण्याऐवजी व्यक्ती जर अंतरंगात प्रवेश करेल तर ती त्या गोष्टीचा एक हिस्साच बनून जाते. अशा रीतीने व्यक्ती स्वत:ला व्यापक बनविते, मोकळेपणाने श्वास घेते, आतमध्ये वावरायला पुरेशी जागा असते, तेव्हा व्यक्ती कशावर तरी जाऊन धडपडत नाही, ती आत प्रवेश करते, खोलवर जाते आणि तिला सारे काही समजून येते.

– श्रीमाताजी
(CWM 09 : 220-221)

परिपूर्ण जाणीव प्राप्त करून घेण्याचा मार्ग म्हणजे तुमची सद्यस्थितीतील जाणीव ही तिच्या सवयी व मर्यादा यांच्या पलीकडे वाढविणे; तिला शिक्षण देणे, तिला दिव्य प्रकाशाच्या दिशेने विकसित करणे, तिच्यामध्ये दिव्य प्रकाशाला त्याचे कार्य मुक्तपणे आणि पूर्णपणे करू देणे.

परंतु तो दिव्य प्रकाश तेव्हाच त्याचे कार्य पूर्णपणे आणि निर्विघ्नपणे पार पाडू शकतो जेव्हा तुम्ही तुमच्या सर्व लालसा आणि भीती यांच्यापासून मुक्त झालेले असता; जेव्हा तुमच्यामध्ये कोणतेही मानसिक पूर्वग्रह नसतात; कोणत्याही प्राणिक आवडीनिवडी नसतात; तुम्हाला बंधनात पाडणारी किंवा पीडा देणारी, कोणतीही शारीरिक भयशंकितता नसते किंवा कसलेही आकर्षण नसते.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 101)

प्रश्न : “जेव्हा व्यक्ती अडचणीमध्ये असेल तेव्हा तिने स्वत:ला विशाल, व्यापक करावे,” ह्याचा अर्थ कसा लावावा?

श्रीमाताजी : मी येथे योगमार्गावरील अडचणींविषयी बोलत आहे; आकलन करून घेण्यातल्या अडचणी, मर्यादा, अडथळ्यांसारख्या. मला म्हणावयाचे असते की तुमच्या जाणिवेच्या कक्षा विशाल करा.

अडचणी या नेहमीच अहंकारामधून उद्भवतात. म्हणजे तुम्ही परिस्थितीला, घटनांना, तुमच्या अवतीभवतीच्या माणसांना, किंवा तुमच्या जीवनातील स्थितीला ज्या कमीअधिक अहंजन्य वैयक्तिक प्रतिक्रिया देता, त्यामधून अडचणी उद्भवतात. तुमच्याहून अधिक उन्नत आणि अधिक विशाल अशा वास्तवाशी एकात्म होण्यापासून जेव्हा तुमची जाणीव तुम्हाला रोखते, म्हणजे जेव्हा व्यक्ती एक प्रकारच्या कवचामध्ये, कोशामध्ये जखडून पडल्यासारखी होते तेव्हा त्या भावनेतूनदेखील अडचणी उद्भवतात.

व्यक्ती नक्कीच असा विचार करू शकते की, तिला विशाल व्हावयाचे आहे; तिला विश्वात्मक व्हावयाचे आहे, तिच्यामध्ये अहंकार असता कामा नये; सर्व काही त्या ईश्वराचीच अभिव्यक्ती आहे, अशा तऱ्हेच्या अनेक गोष्टींचा व्यक्ती विचार करू शकते पण हा काही खात्रीशीर उपाय नाही कारण बऱ्याचदा व्यक्तीला तिने काय करावे हे माहीत असते पण या ना त्या कारणामुळे ती ते करत नाही.

पण समजा जर का तुम्हाला क्लेश झाले, दुःखभोग, उद्रेक, वेदना किंवा अगतिकतेची भावना या साऱ्यांना सामोरे जावेच लागले – या मार्गामध्ये आड येणाऱ्या ह्या साऱ्या गोष्टी म्हणजेच तुमच्या अडचणी आहेत – अशा वेळी जर तुम्ही शारीरिक दृष्ट्या म्हणजे, तुमच्या शारीर जाणिवेने स्वत:ला व्यापक करू शकलात, जर तुम्ही स्वत:ला उलगडू शकलात – एखादा कापडाचा तागा असावा आणि घड्यांवर घड्या याप्रमाणे तो बांधलेला असावा त्याप्रमाणे तुम्ही त्या तशा घड्यांमध्ये बंदिस्त झाला आहात अशी तुम्हाला जाणीव झाली तर – तेव्हा तुम्हाला जर बांधल्याप्रमाणे, घुसमटल्याप्रमाणे वाटत असेल, तुम्हाला जर त्रास होत असेल किंवा तुमच्या हालचाली नि:शक्त होऊन जात असतील; एखादा कापडाचा खूप घटट् बांधलेला तागा असावा; एखादे खूप घट्ट, चापूनचोपून बांधलेले गाठोडे असावे अशी तुम्हाला जाणीव होत असेल तर जमिनीवर एखादा कागदाचा वा कापडाचा तुकडा उलगडावा तसे तुम्ही स्वत:वरील घड्या, सुरकुत्या दूर करू शकलात, स्वत:ला दोन्ही बाहू फैलावून ताणू शकलात, आणि जमिनीवर पडून स्वत:ला विशाल, जेवढे शक्य आहे तेवढे विशाल बनविण्याचा प्रयत्न केलात; स्वत:ला खुले करून, ज्याला मी ‘प्रकाशाचे मुख’ म्हणते त्या प्रति पूर्ण निष्क्रियपणाचा भाव राखत, खुले करू शकलात आणि स्वत:च्या अडीअडचणींमध्ये स्वत:ला परत लपेटून घेतले नाहीत, आणि त्या दुप्पट केल्या नाहीत, म्हणजेच त्यामध्ये अडकून पडला नाहीत, म्हणजे स्वत:मध्येच गुंतून पडला नाहीत तर; एवढेच नाही तर, शक्य तितके स्वत:ला उलगडविण्याचा प्रयत्न केलात, तुमची अडचण वरून येणाऱ्या त्या प्रकाशासमोर मांडलीत तर, आणि जर का तुम्ही हे सर्व क्षेत्रांमध्ये करू शकलात, आणि अगदी तुम्ही मानसिकरित्या हे करण्यामध्ये जरी यशस्वी झाला नाहीत तरी – कारण ते बऱ्याचदा अवघड असते – तुम्ही शारीरिकदृष्ट्या, अगदी भौतिक अर्थाने देखील जरी तुम्ही तशी कल्पना करू शकलात, तर जेव्हा तुम्ही स्वत:ला खुले करण्याचे, स्वत:ला ताणण्याचे, पसरविण्याचे काम पूर्ण करता तेव्हा तुमच्या अडचणींपैकी तीनचतुर्थांश अडचणी पळून गेल्या असल्याचे तुम्हाला आढळेल.

आणि त्यानंतर त्या प्रकाशाप्रत स्वत:ला ग्रहणशील बनविण्याचे शिल्लक राहिलेले थोडेसे काम पूर्ण केले की तो एक चतुर्थांश भाग देखील नाहीसा होऊन जाईल.

स्वत:च्या अडीअडचणींशी स्वत:च्या विचारांच्या साहाय्याने झगडत राहण्यापेक्षा हे कितीतरी अधिक पटीने सोपे आहे कारण जर तुम्ही स्वत:शीच चर्चा करू लागलात तर, तुमच्या मताच्या बाजूने आणि विरोधी बाजूनेसुद्धा तुम्हाला पुष्कळ युक्तिवाद आढळतील आणि ते इतके पटण्यासारखे असतील की, उच्चतर प्रकाशाशिवाय त्यांमधून बाहेर पडणेच अशक्य होऊन जाईल.

येथे तुम्ही अडीअडचणीच्या विरोधात झगडत नाही, तुम्ही स्वत:ला पटवून देण्याचा प्रयत्नही करत नाही. सूर्यासमोर सागरकिनारी वाळूमध्ये पडून राहावे त्याप्रमाणे तुम्ही केवळ स्वत:ला प्रकाशाप्रत खुले करता आणि त्या प्रकाशाला तुमच्या मध्ये कार्य करू देता, बस् इतकेच.

– श्रीमाताजी
(CWM 08 : 285-287)

प्रश्न : स्वत:च्या जाणिवेमध्ये बदल कसा करायचा?

श्रीमाताजी : अर्थातच ह्याचे विविध मार्ग आहेत पण प्रत्येक व्यक्तीने स्वत:च्या आवाक्यातील मार्गाचा अवलंब करावयास हवा. आपल्या मार्गाचा संकेत हा बहुधा उत्स्फूर्तपणे, एखाद्या अनपेक्षित अनुभवाद्वारे मिळून जातो. प्रत्येकाच्या बाबतीत त्यात काही ना काही फरकही आढळून येतो.

उदाहरणार्थ, एखाद्याला पृष्ठभागावर क्षितिजसमांतर पसरलेल्या अशा अगदी सामान्य जाणिवेचे भान असू शकते; ती एकाचवेळी वस्तुमात्रांच्या पृष्ठवर्ती भागामध्ये कार्य करते. त्या व्यक्तीचा वरवरच्या बाह्यवर्ती गोष्टी, माणसे, परिस्थिती यांच्याशी संपर्क असतो आणि कधीतरी, जसे मी म्हटले त्याप्रमाणे, प्रत्येकाबाबत ही गोष्ट भिन्न भिन्न असते – अचानक, या ना त्या कारणाने वस्तुमात्राकडे समपातळीवरून क्षितिजसमांतर पद्धतीने पाहण्याऐवजी व्यक्ती वर उचलली जाते; तुम्ही अकस्मात इतरांवर प्रभुत्व मिळविता, त्यांच्याकडे वरून पाहता; तुमच्या जवळपास असणाऱ्या छोट्या छोट्या असंख्य गोष्टी पाहण्यापेक्षा आता तुम्ही त्या त्यांच्या समग्रतेने पाहता; जणू काही तुम्हाला कोणीतरी वर उचलून घेतलेले असते आणि तुम्ही पर्वतशिखरावरून किंवा विमानातून पाहता. अशा वेळी प्रत्येक छोटेमोठे बारकावे न्याहाळत बसण्यापेक्षा, तुम्ही त्या गोष्टी त्यांच्या त्यांच्या पातळीवरून पाहता, तुम्ही या सर्व गोष्टींकडे एकात्मतेने आणि फार फार उंचावरून पाहता.

हा अनुभव प्राप्त करून घेण्याचे विविध मार्ग आहेत पण बहुधा हा अनुभव एखाद्या दिवशी अचानकपणे योगायोगाने येऊन जातो किंवा कधीकधी असेही होते की, या अनुभवाच्या अगदी विरोधी असाही अनुभव येतो पण आपण तेथेच येऊन पोहोचतो. व्यक्ती अचानकपणे अगदी खोलवर बुडी मारते, आपल्या अवतीभवती दिसणाऱ्या, जाणवणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्यापासून दूर, खोलवर बुडी मारते; या साऱ्या गोष्टी तिला आता दूरस्थ, वरवरच्या, अगदी किरकोळ अशा भासू लागतात; ती व्यक्ती आंतरिक शांततेमध्ये, आंतरिक शांतीमध्ये, वस्तुमात्रांविषयीच्या आंतरिक दृष्टीमध्ये प्रवेश करते. त्या व्यक्तीला वस्तुमात्राविषयी व आजूबाजूच्या परिस्थितीविषयी अगदी अंतरंगातून आकलन होते आणि त्यामुळे सर्वांचे मूल्यच बदलून जाते. विविध अशा बाह्य रूपांपाठीमागे असलेल्या एका सखोल एकात्मतेची, एकरूपतेची जाणीव मग त्या व्यक्तीला होते. किंवा कधीकधी, अचानकपणे, मर्यादितपणाची जाणीवच नाहीशी होते आणि व्यक्तीचा आदिअंतरहित अशा अनिश्चित काळाच्या, की जो आजवर होता आणि पुढेही कायमच असणार आहे अशा काळाच्या अनुभूतीमध्ये प्रवेश होतो.

तुमच्या आयुष्यात, हे अनुभव अचानकपणे वीजेप्रमाणे क्षणार्धात येतात; तुम्हाला कळतही नाही ते का आणि कसे आले… ते अगणित असतात, ते व्यक्तीव्यक्तीनुसार भिन्न भिन्न असतात, पण ह्या एका निमिषार्धातील अनुभवामुळे तुम्ही त्या गोष्टीचा धागा पकडू शकता.

व्यक्तीने असे लक्षात ठेवले पाहिजे की, तिने त्या अनुभवाच्या तळाशी गेले पाहिजे, ते क्षण पुन्हा जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे, तो अनुभव पुन्हा आठवून पाहिला पाहिजे, त्याची आस बाळगली पाहिजे, त्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. हा प्रारंभबिंदू असतो; आणि तुम्हाला तुमचा मार्ग कोणता ते सुचविणारा जो धागा, जो संकेत देण्यात आला होता त्याचे प्रयोजन आता येथे संपलेले असते.

ज्यांच्याबाबतीत त्यांच्या आंतरिक अस्तित्वाचा, त्यांच्या अस्तित्वाच्या सत्याचा त्यांना शोध लागणार हे निर्धारित झालेले असते त्यांच्या जीवनात एखादी तरी अशी वेळा असते की, जेव्हा ते त्यांचे उरत नाहीत, वीज चमकून जावी त्याप्रमाणे एखादा क्षणही पुरेसा असतो. व्यक्तीने कोणता मार्ग अनुसरावा हे सुचविण्यासाठी ते पुरेसे असते; हेच ते द्वार असते की जे या मार्गाकडे उघडले जाते. तेव्हा तुम्ही या द्वारातून प्रवेश करावयास हवा. आणि अधिक खरेखुरे, अधिक समग्र अशा कशाकडे तरी घेऊन जाणारी एक नवीनच स्थिती प्राप्त व्हावी म्हणून अथक चिकाटीने, सातत्याने प्रयत्नशील राहावयास हवे.

नेहमीच अनेकानेक मार्ग सांगण्यात आलेले आहेत पण तुम्हाला आजवर शिकविण्यात आलेले मार्ग, तुम्ही पुस्तकातून वाचलेले मार्ग किंवा एखाद्या शिक्षकाकडून ऐकलेले मार्ग यामध्ये ती परिणामकारकता नसते; जी परिणामकारकता कोणत्याही सुस्पष्ट कारणाविना आलेल्या या उत्स्फूर्त अनुभवामध्ये असते. ते आत्म्याच्या जागृतीचे सहजतेने उमलणे असते; एका क्षणासाठी तुमचा तुमच्या चैत्य पुरुषाशी आलेला तो संपर्क असतो; त्यातून तुमच्या आवाक्यात असलेला, तुमच्यासाठी सर्वोत्तम असा मार्ग कोणता, हे तुम्हाला दर्शविण्यात आलेले असते. ध्येयपूर्तीसाठी त्या मार्गाचे चिकाटीने अनुसरण करणे एवढेच आता तुम्हाला करावयाचे असते – हा एक क्षण असतो जो तुम्हाला कशी व कोठून सुरुवात करावयाची हे दाखवून देतो.

काही जणांना हा अनुभव रात्री स्वप्नामध्ये येतो, एखाद्याला तो कोणत्याही आकस्मिक क्षणी येऊ शकतो; कधीतरी कोणाला असे काहीतरी दिसते की, ज्यामुळे त्याच्यामध्ये एक नवीनच जाणीव उदयास येते. काहीतरी ऐकण्यात येते, एखादे सुंदर निसर्गदृश्य, सुमधुर संगीत, वाचण्यात आलेले काही शब्द, किंवा जीवापाड एकाग्रतेने केलेले प्रयास, त्याची तीव्रता असे ते काहीही असू शकते, हा अनुभव येण्याचे अक्षरश: हजारो मार्ग आणि हजारो कारणे आहेत.

पण मी पुन्हा तेच सांगते, की ज्यांना साक्षात्कार होणार हे निश्चित असते त्यांना त्यांच्या आयुष्यात एकदातरी असा हा अनुभव येतोच येतो. भले तो क्षणिक असेल, भले त्यांना तो अनुभव अगदी बालपणी आलेला असेल पण आयुष्यात एकदा तरी सत्य-चेतना काय ह्याचा अनुभव त्यांना आलेला असतो. कोणता मार्ग अनुसरला पाहिजे हे सूचित करणारा तो सर्वोत्तम संकेत असतो.

व्यक्तीने त्याचा स्वत:च्या अंत:करणात शोध घ्यावा, किंवा तो ध्यानात ठेवावा, वा त्याचे निरीक्षण करावे, व्यक्तीने काय चालू आहे त्याची नोंद घ्यावी, त्याकडे लक्ष पुरवावे, बस्, इतकेच पुरेसे असते.

कधीकधी, व्यक्ती एखादी अगदी उदारतेने केलेली कृती पाहते, जगावेगळे असे काहीतरी कानावर पडते, उदारता, आत्म्याची थोरवी किंवा एखाद्या धाडसी वीराने केलेली कृती व्यक्ती पाहते, कधीकधी काही विशेष प्रतिभासंपन्न अशा गोष्टी पाहते किंवा एखादी गोष्ट अत्यंत असाधारण पद्धतीने, सुंदरतेने केली असल्याचे व्यक्ती पाहते, ते करणाऱ्या व्यक्तीशी तिची गाठभेठ होते; अशा प्रत्येक वेळी व्यक्तीच्या मनामध्ये एक प्रकारचा उत्साह, एक प्रकारचे कौतुक, एक प्रकारची कृतज्ञता अचानकपणे दाटून येते आणि त्यातूनच अभूतपूर्व अशा आनंदाची, एका उबदार, प्रकाशमय, चेतनेच्या एका नव्या स्थितीकडे घेऊन जाणारी द्वारे खुली होतात. हा देखील तो संकेताचा धागा पकडण्याचा एक प्रकार आहे. हजारो मार्ग आहेत, व्यक्तीने फक्त सावधचित्त असले पाहिजे आणि निरीक्षण केले पाहिजे.

ह्यासाठी सर्वप्रथम स्वत:ला या जाणिवेतील परिवर्तनाची निकड भासली पाहिजे; मला माझ्या ध्येयाप्रत घेऊन जाणारा हाच तो मार्ग आहे हे तुम्ही स्वीकारले पाहिजे आणि एकदा का तुम्ही ते तत्त्व स्वीकारले की, मग तुम्ही जागरुक राहिले पाहिजे. तेव्हा तुम्हाला आढळेल की, खरोखरच तुम्हाला ते गवसते. आणि एकदा का ते गवसले की, कोणतीही चलबिचल न होऊ देता, तुम्ही वाटचालीला सुरुवात केली पाहिजे.

व्यक्तीने आत्मनिरीक्षण करावयास हवे, कायम सावध असावयास हवे, हा प्रारंभबिंदू आहे; तिने सदानकदा उदासीन, अनुत्सुक असू नये; सदोदित अनास्था बाळगू नये.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 101)

सर्वसाधारणपणे आपण अज्ञानामध्ये जीवन जगत असतो आणि आपल्याला ईश्वर काय आहे हे माहीत नसते. सामान्य प्रकृतीच्या शक्ती ह्या अदिव्य शक्ती असतात कारण त्या अहंकार, इच्छावासना आणि अचेतनेचा जणू काही एक पडदाच विणतात की, ज्यामुळे ईश्वर आपल्यापासून झाकलेला राहतो.

जी चेतना, ईश्वर काय आहे ते जाणते आणि त्यामध्ये जाणीवपूर्वक अधिवास करते, अशा उच्चतर आणि गाढतर चेतनेमध्ये आपला प्रवेश व्हावयाचा असेल तर, कनिष्ठ प्रकृतीच्या शक्तीपासून आपली सुटका झाली पाहिजे आणि दिव्य शक्तीच्या कृतीसाठी आपण स्वतःला खुले केले पाहिजे; जेणेकरून ती दिव्य शक्ती आपल्या जाणिवेचे दिव्य प्रकृतीमध्ये परिवर्तन घडवून आणेल. दिव्यत्वाच्या या संकल्पनेपासून आपण प्रारंभ केला पाहिजे. या सत्याचा साक्षात्कार जाणिवेच्या विकसनातून आणि तिच्या परिवर्तनामधूनच होणे शक्य आहे.

– श्रीअरविंद (CWSA 28 : 07-08)