Posts

जागरुकता दोन प्रकारची असते, सक्रिय आणि निष्क्रिय.

तुमच्या हातून एखादी चूक घडणार असेल, तुम्ही एखादा चुकीचा निर्णय घेणार असाल, जर तुम्ही दुबळे ठरण्याचा किंवा तुम्ही एखाद्या प्रलोभानास बळी पडण्यास स्वत:ला मुभा देत असाल तर अशा वेळी (निष्क्रिय) जागरुकता तुम्हाला धोक्याचा इशारा देते. तर सक्रिय जागरुकता ही प्रगतीची संधी मिळविण्यासाठी धडपडत असते, त्वरेने प्रगती करता यावी म्हणून, प्रत्येक परिस्थितीचा उपयोग करून घेण्यासाठी ती प्रयत्नशील असते.

तुमचे पतन होण्यापासून तुम्हाला रोखणे आणि प्रगतिपथावरून वेगाने वाटचाल करणे या दोहोंमध्ये पुष्कळच फरक आहे. आणि या दोन्ही गोष्टी आवश्यकच आहेत. जो जागरूक नाही, दक्ष नाही तो जणूकाही आधीच मरण पावलेला असतो. जीवनाच्या आणि अस्तित्वाच्या खऱ्या प्रयोजनाशी असणारा संपर्क तो केव्हाच गमावून बसलेला असतो. अशा रीतीने, घटिका जातात, वेळ, परिस्थिती निघून गेलेली असते, जीवन निरर्थकपणे सरून जाते, हाती काहीही गवसत नाही आणि मग तुम्ही कधीतरी झोपेतून, सुस्तीतून जागे होता आणि स्वत:ला अशा एका गर्तेत पाहता की, जेथून सुटका होणे हे अतिशय कठीण असते.

– श्रीमाताजी [CWM 03 : 202-203]

जागरुकता (Vigilance) म्हणजे नित्य जागृत असणे, दक्ष असणे, ‘प्रामाणिक’ असणे – तुम्हाला कोणत्याच गोष्टीने आश्चर्याचा धक्का बसता कामा नये. जेव्हा तुम्हाला साधना करायची असते, तेव्हा तुमच्या जीवनात प्रत्येक क्षणाला तुम्हाला निवड करायची असते – ध्येयाप्रत जाणाऱ्या मार्गावर पाऊल टाकायचे की, गाढ झोपी जायचे, किंवा “आत्ताच नको, नंतर पाहू” असे म्हणत, मार्गात मध्येच बसून राहायचे, यांपैकी एकाची प्रत्येक क्षणी निवड करायची असते. तुम्हाला खाली खेचणाऱ्या गोष्टींना प्रतिकार करायचा एवढाच जागरूकतेचा अर्थ नाही; तर एखाद्या दुर्बलतेवर मात करण्याची संधी, प्रलोभनाला बळी पडण्यापासून रोखण्याची संधी, काहीतरी नवीन शिकण्याची संधी, एखाद्या गोष्टीमध्ये सुधारणा करण्याची संधी, कशावर तरी प्रभुत्व मिळविण्याची संधी यांपैकी कोणतीच संधी गमावू द्यायची नाही, म्हणजेच, प्रगतीकडे घेऊन जाणारी एकही संधी गमावू नये यासाठी जागरुक राहायचे हा सुद्धा त्याचा अर्थ आहे. एरवी तुम्हाला जी गोष्ट करायला काही वर्षे लागली असती तीच गोष्ट, तुम्ही जर जागरुक असाल तर, काही दिवसांतच साध्य करून घेऊ शकता. तुम्ही जर जागरूक असाल, दक्ष असाल तर, तुमच्या जीवनातील प्रत्येक परिस्थितीला, प्रत्येक कृतीला, प्रत्येक गतिविधींना, तुम्ही तुमच्या ध्येयाच्या निकट जाण्याचे निमित्त बनविता.

– श्रीमाताजी [CWM 03 : 202-203]

पूर्णयोग आणि बौद्धमत – ०८

धम्मपद : सावधानता हा अमरत्वाकडे वा निर्वाणाकडे नेणारा मार्ग आहे, बेसावधपणा हा मृत्यूकडे नेणारा मार्ग आहे. सावध मनुष्य कधीही मृत्यू पावत नाही, बेसावध मनुष्य हा मृतवतच असतो.

श्रीमाताजी : सावधानता म्हणजे नित्य जागृत असणे, दक्ष असणे, प्रामाणिक असणे – कोणत्याच गोष्टीने आश्चर्याचा धक्का बसता कामा नये. जेव्हा तुम्हाला साधना करावयाची असते, तेव्हा जीवनात प्रत्येक क्षणाला तुम्हाला निवड करावयाची असते – ध्येयाप्रत जाणाऱ्या मार्गावर पाऊल टाकावयाचे की गाढ झोपी जायचे, “आत्ताच नको, नंतर पाहू” असे म्हणत, मार्गात मध्येच बसून राहावयाचे, यांपैकी एकाची हरक्षणी निवड करावयाची असते.

तुम्हाला खाली खेचणाऱ्या गोष्टींना प्रतिकार करावयाचा एवढाच सावधानतेचा अर्थ नाही, तर प्रगतीकडे घेऊन जाणारी कोणतीही संधी तुम्ही गमावणार नाही यासाठी जागरुक राहावयाचे हाही त्याचा अर्थ आहे. एखाद्या दुर्बलतेवर मात करण्याची संधी, प्रलोभनाला बळी पडण्यापासून रोखणे, काही नवीन शिकण्याची, काही दुरुस्त करण्याची, कशावर तरी प्रभुत्व मिळविण्याची संधी न गमावणे म्हणजे सावधानता होय. तुम्ही जर का सावध असाल, जागरुक असाल तर तुम्हाला जे करावयास काही वर्ष लागली असती, ते तुम्ही काही दिवसांतच साध्य करून घेऊ शकता. तुम्ही जर सावध असाल, दक्ष असाल तर तुमच्या जीवनातील प्रत्येक परिस्थितीला, प्रत्येक कृतीला, प्रत्येक हालचालीला, तुमच्या ध्येयाप्रत घेऊन जाणाऱ्या संधीमध्ये तुम्ही बदलवून टाकू शकता.

सावधानता दोन प्रकारची असते, सक्रिय आणि निष्क्रिय. तुमच्या हातून एखादी चूक घडणार असेल, जर तुम्ही एखादा चुकीचा निर्णय घेणार असाल, जर तुम्ही दुबळे ठरण्याचा वा तुम्ही मोहात पडण्याचा क्षण असेल तर अशा वेळी सावधनता तुम्हाला धोक्याचा इशारा देते. तर प्रगतीच्या संधीच्या शोधात असणारी सक्रिय सावधानता ही प्रत्येक परिस्थितीचा उपयोग करून घेऊन त्वरेने प्रगती करण्यासाठी धडपडत असते.

तुम्हाला पडण्यापासून वाचविणे आणि प्रगतिपथावरून वेगाने वाटचाल करणे या दोहोंमध्ये पुष्कळच फरक आहे. आणि या दोन्ही गोष्टी आवश्यकच आहेत.

जो सावधान, दक्ष नाही तो जणू काही आधीच मरण पावलेला असतो. जीवनाच्या आणि अस्तित्वाच्या खऱ्या हेतूशी त्याचा असणारा संपर्क तो केव्हाच गमावून बसलेला असतो.

अशा रीतीने, घटिका जातात, वेळ, परिस्थिती निघून गेलेली असते, जीवन निरर्थकपणे सरून जाते, हाती काहीही गवसत नाही आणि मग तुम्ही कधीतरी झोपेतून, सुस्तीतून जागे होता आणि स्वत:ला अशा एका विवरात पाहता की, जेथून सुटका होणे हे अतिशय कठीण असते.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 202-203)