साधना, योग आणि रूपांतरण – ३६
श्रीमाताजी : आपल्यामध्ये असणाऱ्या अंतरात्म्याची उपस्थिती आपल्याला जाणवावी आणि सरतेशेवटी त्याच्याशी आपल्याला तादात्म्य पावता यावे यासाठी, आजवर वेगवेगळ्या काळामध्ये आणि वेगवेगळ्या ठिकाणी बऱ्याच पद्धती सांगितल्या गेल्या आहेत. त्यापैकी काही पद्धती या मनोवैज्ञानिक असतात, काही धार्मिक तर काही अगदी यांत्रिकसुद्धा असतात. वास्तविक, प्रत्येक व्यक्तीने तिला सुयोग्य ठरेल अशी पद्धत स्वतः शोधली पाहिजे. आणि जर व्यक्तीकडे अतिशय उत्कट आणि दृढ अभीप्सा असेल, सातत्यपूर्ण आणि गतिमान संकल्प असेल तर, तिला या ना त्या मार्गाने ती पद्धत निश्चितपणे सापडते. बाह्यतः वाचन व अभ्यास, आणि आंतरिकरित्या एकाग्रता, ध्यान, प्रकटीकरण व अनुभूती यांच्या माध्यमातून व्यक्तीला तिच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यक असणारे साहाय्य मिळतेच.
साधक : यांत्रिक, धार्मिक आणि मनोवैज्ञानिक पद्धतींमध्ये काय फरक असतो?
श्रीमाताजी : विविध धर्मांनी ज्या पद्धतींचा स्वीकार केलेला असतो त्या पद्धती म्हणजे धार्मिक पद्धती. बहुतांशी धर्म आंतरिक सत्याविषयी काही बोलत नाहीत, ‘ईश्वरा’च्या संपर्कात येणे हीच एक गोष्ट त्यांच्या दृष्टीने महत्त्वाची असते.
ज्या पद्धतींमध्ये चेतनेच्या विविध स्तरांशी संबंध असतो, सर्व क्रियाकलापांमधून बाजूला होत ज्या पद्धतीमध्ये अंतरंगातील आत्म्याचा साक्षात्कार करून घेण्याचा प्रयत्न केला जातो; अलिप्तता, आत्म-तन्मयता (self-abstraction), एकाग्रता, उच्चतर सद्वस्तु, सर्व बाह्य गतिविधींचा परित्याग इत्यादी गोष्टींचा समावेश असलेली आंतरिक अवस्था जाणीवपूर्वकपणे तयार करण्याचा प्रयत्न केला जातो त्या पद्धतींची गणना मनोवैज्ञानिक पद्धतीमध्ये केली जाते. विचार, भावना आणि कृती यांच्यावर कार्य करणारी पद्धत ही मनोवैज्ञानिक पद्धत असते.
पूर्णपणे यांत्रिक साधनांवर आधारित असणाऱ्या पद्धती या यांत्रिक पद्धती असतात. त्यांचा विशिष्ट प्रकारे अवलंब केला तर व्यक्तीला त्यापासून लाभ होऊ शकतो. श्वासावरील नियंत्रणाची पद्धत हे उदाहरण पाहा. ही पद्धत कमीअधिक यांत्रिकपणे कार्य करते. परंतु विवेकानंदांनी त्यांच्या शिकवणुकीत सांगितल्याप्रमाणे, या पद्धतीच्या जोडीला कधीकधी व्यक्तीने विचारांची एकाग्रता करावी किंवा एखाद्या शब्दाचा जप करावा, असे सुचविण्यात येते. काही एका विशिष्ट टप्प्यापर्यंत तिचा उपयोग होतो पण नंतर ती पद्धत निष्प्रभ होते.
हे मानवी प्रयत्न विविध काळामध्ये आणि विविध ठिकाणी कमीअधिक प्रमाणात व्यक्तिगत स्तरावर यशस्वी झालेले आढळतात पण आजवर त्याचा कधीही सामुदायिक परिणाम साध्य झालेला नाही.
तुमच्या कृतींच्या माध्यमातून, तुमच्या अस्तित्वाच्या सत्याखेरीज तुमच्यामधील अन्य काहीही अभिव्यक्त होणार नाही, अशा एका आंतरिक संकल्पाच्या स्थितीमध्ये राहायचे आणि सर्वकाही त्या ‘सत्या’वरच अवलंबून राहील असे करायचे; ही मनोवैज्ञानिक पद्धत अधिक कठीण पण कितीतरी अधिक परिणामकारक असते. अर्थात तुम्ही काहीच करत नसाल तर ही पद्धत सोपी आहे पण या पद्धतीमुळे स्वतःचीच फसवणूक करून घेणे देखील अधिक सोपे असते.
जेव्हा तुम्ही सर्वांपासून दूर होऊन एकटे, पूर्णपणे शांत वातावरणात ध्यानाला बसता, आणि कमीअधिक सौम्य दृष्टीने स्वतःची परीक्षा करता तेव्हा तुम्ही अशी कल्पना करू लागता की, तुम्हाला कोणत्यातरी एखाद्या अद्भुत गोष्टीचा साक्षात्कार झाला आहे. परंतु जेव्हा तुम्हाला तुमच्या जीवनात हरघडी परीक्षेला सामोरे जावे लागते, तुमच्यातील अपूर्णता, तुमच्यातील दुर्बलता, दिवसभरातून शंभरवेळा तुमच्या मनात उद्भवणाऱ्या दुरिच्छायुक्त क्षुद्र गतिविधी यांविषयी जागरुक होण्याची संधी तुम्हाला वारंवार मिळते तेव्हा मग तुमचा स्वतःविषयीचा भ्रम मावळतो आणि परिणामतः तुमचे प्रयत्न अधिक प्रामाणिक होतात.
आणि म्हणूनच आपण एखाद्या अत्यंत मनोहारी, अतिशय आरामदायी, या जगापासून खूप दूर, फक्त स्वतःच्या छोट्याशा व्यक्तित्वाकडे लक्ष देता येईल अशा निर्जन अरण्यात आश्रम काढण्याऐवजी उलट, या जीवनातील सर्व कृती हाती घ्यायच्या आणि त्यांना होता होईल तेवढे सचेत बनवायचे आणि आपले इतर माणसांशी जे संबंध असतील त्या संबंधामध्ये असतानासुद्धा आपल्या सर्व आंतरिक गतिविधींविषयी अधिक सुस्पष्टपणे जागरुक राहायचे; हे प्रयत्न आपण येथे (श्रीअरविंद आश्रमात) करत आहोत. अडीअडचणींपासून दूर पळून जाणे हा त्यांच्यावर मात करण्याचा मार्ग कधीच होऊ शकत नाही. तुम्ही जर तुमच्या शत्रूला पाठ दाखवून पळ काढलात तर तुम्ही त्याला पराजित करू शकणार नाही आणि मग तुम्हाला पराजित करण्याची आयती संधीच तुम्ही त्या शत्रूला द्याल. आणि म्हणूनच आपण हिमालयातील कोणत्या गिरीशिखरावर नाही तर येथे पाँडिचेरीमध्ये आहोत. अर्थात हिमालयातील एखादे गिरीशिखर हे अगदी आनंददायी असेल हे मला मान्य आहे, पण कदाचित ते पाँडिचेरीएवढे परिणामकारक नसेल.
– श्रीमाताजी (CWM 15 : 303-305)