Posts

साधनेची मुळाक्षरे – ३६

मनुष्याचे पृष्ठस्तरीय हृदय हे पशुहृदयाप्रमाणेच प्राणसुलभ भावनांचे, विकारांचे असते. पशुहृदयाहून या मानवी हृदयाचा विकास अधिक विविधतेचा असतो, इतकेच. या हृदयाच्या भावनांवर स्वार्थी विकारांचे, आंधळ्या सहज-प्रवृत्तींचे आणि दोषपूर्ण, विकृत, बरेचदा अधोगतीच्या क्षुद्र जीवनप्रेरणांचे वर्चस्व असते. हे हृदय प्राणशक्तीच्या पतित कामनांनी, वासनांनी, क्रोधविकारांनी, क्षुद्र लोभांनी, तीव्र हव्यासांनी, हीन दीन मागण्यांनी वेढलेले आणि अंकित झालेले असते; प्रत्येक लहानमोठ्या ऊर्मीची गुलामगिरी करून ते हिणकस झालेले असते. भावनाशील हृदय आणि भुकेलेला संवेदनाप्रिय प्राण यांच्या भेसळीने मानवामध्ये खोटा वासनात्मा (A false soul of desire) निर्माण होतो; हे जे मानवाचे असंस्कृत व भयंकर अंग आहे, त्यावर बुद्धी विश्वास ठेवू शकत नाही, हे योग्यच आहे आणि त्यामुळे या अंगावर आपले नियंत्रण असावे असे बुद्धीला वाटते. या असंस्कृत, हटवादी अशा प्राणिक प्रकृतीवर बुद्धी जे नियंत्रण आणू शकते, किंबहुना, ते नियमन करण्यात ती यशस्वीदेखील होते, तरीपण ही प्राणिक प्रकृती नेहमीच अनिश्चित आणि फसवी राहते.

मानवाचा खरा आत्मा (The true soul) मात्र या पृष्ठस्तरीय हृदयात नसतो, तो प्रकृतीच्या प्रकाशमय गुहेत लपलेल्या खऱ्या अदृश्य हृदयात असतो. या हृदयामध्ये दिव्य ईश्वरी ‘प्रकाशा’त आपला आत्मा निवास करत असतो; या अगदी खोल असलेल्या शांत आत्म्याची जाणीव फार थोड्यांनाच असते. आत्मा सर्वांच्याच अंतरंगात आहे पण फारच थोड्यांना त्यांचा खरा आत्मा माहीत असतो, फारच थोड्यांना त्याच्याकडून थेट प्रेरणा आल्याचे जाणवते. तेथे, म्हणजे आपल्या खोल हृदयात, आपल्या प्रकृतीच्या अंधकारमय पसाऱ्याला आधार देणारी, ‘ईश्वरा’च्या तेजाची लहानशी ठिणगी असते व तिला केंद्र बनवून, तिच्याभोवती आपला अंतरात्मा, आपले चैत्य अस्तित्व, साकार आत्मा, आपल्यातील खरा ‘पुरुष’ वृद्धिंगत होतो. मानवातील हे चैत्य अस्तित्व वृद्धिंगत होऊ लागले आणि हृदय-स्पंदनांमध्ये त्याची भविष्यवाणी व प्रेरणा प्रतिबिंबित होऊ लागल्या म्हणजे, मानवाला त्याच्या आत्म्याची अधिकाधिक जाणीव होऊ लागते. तेव्हा मग वरच्या दर्जाचा पशू एवढेच त्याचे स्वरूप राहात नाही. स्वत:मधील देवत्वाची झलक प्राप्त झाल्यामुळे तो त्याविषयी सजग होऊ लागतो, सखोल जीवनाकडून व जाणिवांकडून येणाऱ्या अंत:सूचना तो अधिकाधिक मान्य करू लागतो; दिव्य गोष्टींकडील त्याची प्रवृत्तीही वाढीस लागते.

– श्रीअरविंद
(CWSA 23 : 150)

पुनर्जन्माच्या बाबतीत बोलायचे झाले तर हे मान्य करावे लागेल की, सर्व बाबतीत एकसारखाच नियम लागू होत नाही. काही लोकं मृत्युनंतर लगेचच जन्माला येतात – जर मुले त्यांच्या पालकांशी खूपच अनुबद्ध (attached) असतील तर बरेचदा अशा पालकांमधील काही भाग हा त्यांच्या मुलांमध्ये सामावला जातो. काही लोकांना मात्र, पुन्हा जन्माला येण्यासाठी शतकं आणि कधीकधी तर हजारो वर्षेही लागतात. त्यांच्यासाठी सुयोग्य असे माध्यम त्यांना लाभावे म्हणून, परिस्थिती परिपक्व होण्यापर्यंत ते थांबून राहतात.

जर एखादी व्यक्ती ही योगिक दृष्ट्या प्रगल्भ असेल तर, ती व्यक्ती पुढच्या जन्मातील स्वतःचा देह देखील (स्वत:च) घडवू शकते. ते शरीर जन्माला येण्यापूर्वी ती व्यक्ती त्याला आकार देते, साचा तयार करते, त्यामुळे त्याचा खराखुरा निर्माता ती व्यक्तीच असते, अशा वेळी या नवजात बालकाचे पालक हे आगंतुक, केवळ शारीरिक साधन असतात.

मला येथे सांगितले पाहिजे की, पुनर्जन्माबाबत काही गैरसमजुती सर्वसाधारणपणे आढळतात. व्यक्तीच्या अस्तित्वाचे काही घटक हे इतरांबरोबर सम्मीलित होतात आणि नवीन देहांच्या माध्यमातून कार्य करू लागतात, हे जरी खरे असले तरी लोकांची ही जी समजूत असते की, ते तसेच पुन्हा जन्माला येतात, ती मात्र घोडचूक आहे.

त्यांचे संपूर्ण अस्तित्व हे काही परत जन्माला येत नाही, कारण एवढेच की ‘स्वत:’ असे ते ज्याला खरोखर समजत असतात, ते त्यांचे खऱ्या अर्थाने पृथक झालेले असे व्यक्तित्व नसते; तर त्यांच्या बाह्य व्यक्तिमत्त्वालाच, नाम रूपात्मक व्यक्तिमत्त्वालाच ते ‘स्व’ असे समजत असतात. म्हणून ‘अ’ हा पुन्हा ‘ब’च्या रूपाने जन्माला आला असे म्हणणे चुकीचे आहे; कारण अ ही व्यक्ती ब ह्या व्यक्तीपासून ऐंद्रियदृष्टया भिन्न असते; त्यामुळे ब म्हणून ती जन्माला आली असे म्हणता येत नाही. जर तुम्ही असे म्हणाल की, चेतनेच्या एकाच धाग्याने, त्याच्या आविष्करणासाठी अ आणि ब यांचा साधन म्हणून उपयोग केला, तर आणि तरच ते म्हणणे योग्य ठरेल. कारण जे कायम टिकून राहते ते चैत्य अस्तित्व असते, बाह्य व्यक्तिमत्त्व म्हणजे काही चैत्य अस्तित्व नव्हे, बाह्य नाव वा रूप असणारे असे काही तरी म्हणजे चैत्य अस्तित्व नव्हे, तर चैत्य अस्तित्व हे खोल अंतरंगात असते.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 145-146)

व्यक्तित्वातील ज्या भेदांविषयी तुम्ही बोलत आहात, ती योगिक विकासातील आणि अनुभूतीतील एक आवश्यक अशी पायरी आहे.

आपण जणू काही दुपदरी अस्तित्व आहोत असे व्यक्तीला जाणवते, एक आंतरिक चैत्य अस्तित्व की, जे सत्य आहे असे वाटते आणि दुसरे अस्तित्व म्हणजे बाह्यवर्ती जीवनासाठी साधनभूत असणारे असे बाह्यवर्ती मानवी अस्तित्व. आंतरिकरित्या चैत्य अस्तित्वामध्ये जीवन जगणे व ईश्वराशी जोडलेले राहणे आणि त्याच वेळी बाह्य अस्तित्व बाह्यवर्ती कार्यामध्ये गुंतलेले असणे, हे जे काही तुम्हाला जाणवत आहे ती कर्मयोगाची पहिली पायरी आहे.

तुमच्या या अनुभवांमध्ये चुकीचे असे काही नाही; ते अनुभव अटळ आहेत आणि या पायरीवर अगदी स्वाभाविक असे आहेत. तुम्हाला या दोन्हीमधील सेतुबंधाची जाणीव होत नाही कारण, कदाचित या दोहोंना जोडणारे असे काय आहे ह्याविषयाची तुम्हाला अद्यापि जाण नाही. आंतरिक मन, आंतरिक प्राण, आंतरिक शरीर ह्या गोष्टी, चैत्य अस्तित्व आणि बाह्यवर्ती अस्तित्व यांना जोडणाऱ्या असतात. आणि त्याविषयी तुम्ही आत्ताच काळजी करण्याचे काही कारण नाही.

महत्त्वाची गोष्ट अशी की, जे आत्ता तुमच्याकडे आहे ते जतन करा, त्याला वाढू द्या, सतत चैत्य अस्तित्वात, तुमच्या सत् अस्तित्वात जगा. मग योग्य वेळी चैत्य जागृत होईल आणि प्रकृतीच्या उर्वरित सर्व घटकांना ईश्वराभिमुख करेल, जेणेकरून ह्या बाह्यवर्ती अस्तित्वाला देखील स्वत:हूनच ईश्वराच्या स्पर्शाची जाणीव होईल आणि ईश्वरच आपला कर्ताकरविता आहे ह्याची जाणीव होईल.

– श्रीअरविंद
(CWSA 30 : 344-345)