साधनेची मुळाक्षरे – २४
प्रश्न : ध्यान म्हणजे नक्की काय?
श्रीअरविंद : ‘ध्याना’ची भारतीय संकल्पना स्पष्ट करण्यासाठी इंग्रजीमध्ये Meditation आणि Contemplation हे दोन शब्द वापरले जातात.
मनन –
एकाच विषयाचा वेध घेण्यासाठी म्हणून विचारांच्या एका सलग मालिकेवर मनाचे लक्ष केंद्रित करणे म्हणजे ‘मनन’ (Meditation).
चिंतन –
एकाग्रतेच्या बळावर, वस्तुचे, प्रतिमेचे किंवा संकल्पनेचे ज्ञान, मनामध्ये स्वाभाविकरित्या उदित व्हावे म्हणून, कोणत्यातरी एकाच वस्तुवर, प्रतिमेवर किंवा संकल्पनेवर मन एकाग्र करणे म्हणजे ‘चिंतन’ (Contemplation). हे दोन्ही प्रकार ही ध्यानाचीच दोन रूपं आहेत. कारण विचारावर असू दे, दृश्यावर असू दे किंवा ज्ञानावर असू दे, पण मानसिक एकाग्रता हे ध्यानाचे तत्त्व आहे.
आत्म-निरीक्षणात्मक एकाग्रता –
ध्यानाचे इतरही काही प्रकार आहेत. एके ठिकाणी सामी विवेकानंदांनी तुम्हाला तुमच्या विचारांपासून अलग होऊन मागे उभे राहायला सांगितले आहे. मनात विचार जसे येत आहेत तसे येत राहू देत, तुम्ही नुसते त्यांचे निरीक्षण करत राहायचे आणि ते काय आहेत हे जाणून घ्यायचे. याला ‘आत्म-निरीक्षणात्मक एकाग्रता’ असे म्हणता येईल.
मुक्तिप्रद ध्यान –
आत्म-निरीक्षणात्मक एकाग्रता ही दुसऱ्या एका प्रकाराकडे घेऊन जाते. मनामधून सर्व विचार काढून टाकणे; जेणेकरून, ते मन एक प्रकारची विशुद्ध सावध अशी पोकळी बनले पाहिजे म्हणजे त्यामध्ये दिव्य ज्ञान अवतरू शकेल आणि त्याचा ठसा उमटवू शकेल; त्यामध्ये सामान्य मानवी मनाच्या कनिष्ठ विचारांची लुडबुड असणार नाही आणि काळ्या फळ्यावर पांढऱ्या खडूने लिहावे तितकी स्पष्टता त्यामध्ये असेल. अशा प्रकारे, सर्व मानसिक विचारांचा त्याग ही योगाची एक पद्धत असल्याचे ‘गीते’मध्ये सांगितले आहे, असे तुम्हाला आढळून येईल आणि या पद्धतीला गीतेने पसंती दिलेली दिसते. ह्याला ‘मुक्तिप्रद ध्यान’ असे म्हणता येईल. कारण या ध्यानामुळे विचारांच्या यांत्रिक पद्धतीच्या गुलामीमधून मनाची मुक्तता होते. वाटले तर विचार करायचा किंवा नाही वाटले तर विचार करायचा नाही, असे करण्यास मनाला या ध्यानामुळे, मुभा मिळते. तसेच, स्वतःच्या विचारांच्या निवडीला मुभा मिळते किंवा वाटले तर, विचारांच्या अतीत होऊन, आपल्या तत्त्वज्ञानामध्ये ज्याला ‘विज्ञान’ असे म्हटले जाते त्या सत्याच्या शुद्ध बोधाप्रत जाण्याची मनाला मुभा मिळते.
‘मनन’ ही मानवी मनाला सर्वाधिक सोपी असणारी प्रक्रिया आहे पण त्याचे परिणाम अल्प असतात. ‘चिंतन’ ही अधिक कठीण पण परिणामांच्या दृष्टीने मोठी गोष्ट आहे. आत्म-निरीक्षण आणि विचारमालिकांपासून मुक्ती (मुक्तिप्रद ध्यान) या गोष्टी सर्वाधिक कठीण आहेत परंतु त्याचे फळ मात्र विशाल आणि महान असे असते. व्यक्ती स्वतःच्या कलानुसार आणि क्षमतेनुसार यापैकी कोणत्याही प्रकाराची निवड करू शकते. योग्य पद्धती म्हणायची झाली तर, ध्यानाच्या या सर्वच प्रकारांचा वापर करावा, प्रत्येक पद्धत तिच्या तिच्या स्थानी आणि तिच्या तिच्या उद्दिष्टांसाठीच वापरण्यात यावी. परंतु यासाठी एका दृढ श्रद्धेची, स्थिर धैर्याची आणि ‘योगा’चे आत्म-उपयोजन (self-application) करण्यासाठी प्रचंड ऊर्जेची आवश्यकता असते.
– श्रीअरविंद
(CWSA 36 : 293-294)