Posts

तपस्या म्हणजे आत्मपीडन असा सर्वसाधारणपणे एक गैरसमज असतो. आणि जेव्हा एखादी व्यक्ती तपस्येविषयी बोलू लागते तेव्हा आपण तपस्व्याच्या कठोर शिस्तीचा विचार करतो. शारीरिक, प्राणमय, आणि मानसिक जीवनाचे आध्यात्मिक जीवनामध्ये परिवर्तन करण्याचे महाकठीण काम टाळण्यासाठी, असे परिवर्तन अशक्यच आहे असे तो तपस्वी प्रतिपादन करतो. आणि हे जीवन म्हणजे निरर्थक ओझे, एक बंधन आहे किंवा सर्व प्रकारच्या आध्यात्मिक प्रगतीस पायबंद घालणारे आहे अशा भावनेने तो निर्दयपणे त्याला दूर लोटतो; निदानपक्षी, जीवन म्हणजे न सुधारता येणारी अशी एक गोष्ट आहे, प्रकृतिधर्मानुसार अथवा परमेश्वरकृपेने मृत्यूच्या माध्यमातून आपली जीवनातून सुटका होईपर्यंत कमी अधिक आनंदाने वाहिलेच पाहिजे असे ते एक ओझे आहे असे तो तपस्वी मानतो. किंवा फारतर, उन्नति करून घेण्याकरता ऐहिक जीवन हे एक क्षेत्र आहे म्हणून त्याचा व्यक्तीने जास्तीत जास्त फायदा करून घेतला पाहिजे, व पूर्णतेच्या ज्या अवस्थेमध्ये ही जीवनपरीक्षा अनावश्यक ठरून तिचा अंत होईल अशा अवस्थेपर्यंत शक्य तितक्या लवकर जाऊन पोहोचले पाहिजे असे तो तपस्वी मानतो. Read more