Posts

साधना, योग आणि रूपांतरण – १९१

योगामधील केंद्रवर्ती प्रक्रिया – भाग ०७

हृदय-चक्राने त्याच्या मागे असलेल्या सर्वाप्रत खुले होणे आणि मनाच्या चक्रांनी त्यांच्यापेक्षा वर असणाऱ्या सर्वाप्रत उन्मुख होणे या दोन गोष्टी येथे सर्वाधिक महत्त्वाच्या असतात. हृदय-चक्र हे चैत्य-पुरुषाप्रत (psychic being) खुले होते आणि मनाची चक्रं ही उच्चतर चेतनेप्रत खुली होतात आणि चैत्य पुरुष व उच्चतर चेतना यांच्यामधील परस्परसंबंध हेच तर सिद्धीचे मुख्य साधन असते. ही साधनेची मूलभूत संगती (rationale) आहे.

‘ईश्वरा’ने आपल्यामध्ये आविष्कृत व्हावे यासाठी तसेच, त्याने चैत्यपुरुषाद्वारे आपल्या सर्व प्रकृतीचा ताबा घेऊन, तिचे नेतृत्व करावे यासाठी त्यास हृदयामध्ये एकाग्रतापूर्वक आवाहन केल्याने पहिले खुलेपण (opening) घडून येते. साधनेच्या या भागाचा मुख्य आधार म्हणजे अभीप्सा, प्रार्थना, भक्ती, प्रेम व समर्पण या गोष्टी असतात. आणि आपण ज्याची अभीप्सा बाळगत असतो त्याच्या वाटेत अडसर बनू पाहणाऱ्या सर्व गोष्टींना नकार देणे ही बाबदेखील यामध्ये समाविष्ट असते.

आधी मस्तकामध्ये आणि नंतर मस्तकाच्या वर, चेतनेचे एककेंद्रीकरण केले असता तसेच ईश्वरी ‘शांती’, ‘सामर्थ्य’, ‘प्रकाश’, ‘ज्ञान’, ‘आनंद’ यांचे अस्तित्वामध्ये अवतरण घडून यावे म्हणून आवाहन केले असता, आणि आस व सातत्यपूर्ण इच्छा बाळगली असता दुसरी उन्मुखता घडून येते. (काही जणांबाबत आधी फक्त ‘शांती’ येते तर अन्य काही जणांबाबत, शांती व सामर्थ्य एकत्रितपणे येते.)

काही जणांना प्रथम ‘प्रकाशा’चा किंवा ’आनंदा’चा लाभ होतो किंवा मग त्यांच्यावर अचानकपणे ज्ञानाचा वर्षाव होतो. काही जणांच्या बाबतीत असे होते की, त्यांच्यामध्ये असणारी उन्मुखता ही, ऊर्ध्वस्थित असणाऱ्या एका विशाल अनंत ‘निरवते’चे, ‘शक्ती’चे, ‘प्रकाशा’चे किंवा ‘आनंदा’चे त्यांच्यासमोर प्रकटीकरण करते. आणि नंतर एकतर त्या व्यक्ती या गोष्टींप्रत आरोहण करतात किंवा मग या गोष्टी त्या व्यक्तींच्या कनिष्ठ प्रकृतीमध्ये अवरोहण करू लागतात. तर अन्य काही जणांच्या बाबतीत एकतर आधी मस्तकामध्ये अवरोहण होते नंतर हृदयाच्या पातळीवर अवरोहण होते, नंतर नाभी आणि नंतर त्याहून खाली आणि मग संपूर्ण देहाच्या माध्यमातून अवरोहण घडून येते किंवा मग एक प्रकारची अवर्णनीय (inexplicable) उन्मुखता आढळते, तेथे शांती, प्रकाश, व्यापकता किंवा शक्ती यांच्या अवरोहणाची कोणतीही जाणीव नसते. किंवा मग तेथे वैश्विक चेतनेमध्ये क्षितिजसमांतर खुलेपणा आढळून येतो किंवा अकस्मात विशाल झालेल्या मनामध्ये ज्ञानाचा प्रस्फोट झालेला आढळतो. यापैकी जे काही घडते त्याचे स्वागत केले पाहिजे; कारण सर्वांसाठी एकच एक असा निरपवाद नियम नसतो. परंतु सुरुवातीला शांती अवतरित झाली नाही (आणि समजा नीरवता, शक्ती, प्रकाश आणि आनंद यापैकी काहीही जरी अवतरित झाले तरी), व्यक्तीने अत्यानंदाने फुलून न जाण्याची किंवा संतुलन ढळू न देण्याची काळजी घेतली पाहिजे. काहीही असले तरी, ईश्वरी शक्ती, श्रीमाताजींची शक्ती जेव्हा अवतरित होते आणि ताबा घेते तेव्हाच मुख्य प्रक्रिया घडून येते, कारण तेव्हाच चेतनेच्या सुसंघटनेला प्रारंभ होतो आणि योगाला व्यापक अधिष्ठान प्राप्त होते. (क्रमश:)

– श्रीअरविंद (CWSA 30 : 327-328)

साधना, योग आणि रूपांतरण – १९०

योगामधील केंद्रवर्ती प्रक्रिया – भाग ०६

जेव्हा ‘शांती’ प्रस्थापित होते तेव्हा वरून ती उच्चतर किंवा ‘दिव्य शक्ती’ आपल्यामध्ये अवतरित होऊ शकते आणि आपल्यामध्ये कार्य करू शकते. ही दिव्य शक्ती सहसा प्रथम मस्तकामध्ये अवतरित होते आणि आंतरिक मनाची चक्रं मुक्त करते, नंतर ती शांती हृदय-चक्रामध्ये प्रवेश करते आणि आंतरात्मिक आणि भावनिक अस्तित्व पूर्णपणे मुक्त करते. नंतर ती शांती नाभीचक्रामध्ये आणि अन्य प्राणिक चक्रांमध्ये अवतरित होते आणि आंतरिक प्राणास मुक्त करते. नंतर ती मूलाधार आणि त्याच्याही खाली असणाऱ्या चक्रांमध्ये प्रविष्ट होते आणि आंतरिक शारीरिक अस्तित्व मुक्त करते.

ती दिव्य शक्ती एकाचवेळी मुक्तीसाठी आणि पूर्णत्वासाठी कार्य करत असते. ती संपूर्ण प्रकृतीचा एकेक भाग हाती घेते आणि त्यावर कार्य करते, जे निर्माण करणे आवश्यक आहे ते ती निर्माण करते. ज्याचे उदात्तीकरण करणे आवश्यक आहे त्याचे ती उदात्तीकरण करते. आणि नकार देण्यायोग्य जे काही आहे त्यास ती नकार देते. ती प्रकृतीमध्ये एकसूत्रता आणि सामंजस्य निर्माण करते आणि प्रकृतीमध्ये एक नवीन लय प्रस्थापित करते. ‘अतिमानसिक’ शक्ती आणि अस्तित्व अवतरित करून घेणे हे जर साधनेचे ध्येय असेल तर, ते ध्येय साध्य करणे जोपर्यंत शक्य होत नाही तोपर्यंत, ती अधिकाधिक उच्च, उच्चतर शक्ती आणि उच्चतर प्रकृतीची श्रेणीसुद्धा अवतरित करू शकते.

या गोष्टी हृदय-चक्रामध्ये असलेल्या चैत्य पुरुषाच्या (psychic being) कार्याद्वारे तयार केल्या जातात, त्या कार्याद्वारे या गोष्टींना साहाय्य पुरविले जाते आणि त्याच्या कार्याद्वारेच त्या प्रगत होत जातात. चैत्य पुरुष जेवढा अधिक खुला असेल, अग्रभागी आलेला असेल, सक्रिय असेल तेवढेच या ‘शक्ती’चे कार्य अधिक त्वरेने, अधिक सुरक्षित आणि अधिक सुलभ होऊ शकते. हृदयामध्ये जसजसे प्रेम व भक्ती आणि समर्पण वृद्धिंगत होत जाते, तसतसे साधनेचे विकसन अधिक वेगवान आणि परिपूर्ण होत जाते. कारण ज्या वेळी अवतरण आणि रूपांतरण घडून येते तेव्हा त्यामध्ये ‘ईश्वरा’शी चढतावाढता संपर्क होणे आणि ‘ईश्वरा’शी सायुज्य पावणे हे अध्याहृतच असते. (क्रमश:)

– श्रीअरविंद (CWSA 30 : 327)

साधना, योग आणि रूपांतरण – १८८

योगामधील केंद्रवर्ती प्रक्रिया – भाग ०४

सर्वोच्च आध्यात्मिक ‘आत्मा’ हा आपल्या व्यक्तित्वाच्या आणि शारीर-अस्तित्वाच्या मागे नसतो, तर तो सर्वस्वी त्याच्या पलीकडे, ऊर्ध्वस्थित असतो. आंतरिक चक्रांपैकी सर्वोच्च चक्र हे मस्तकामध्ये असते, तर सर्वात गहनतम चक्र हे हृदयामध्ये असते; परंतु जे चक्र थेटपणे ‘आत्म्या’प्रत खुले होते ते मस्तकाच्याही वर, शरीराच्या पूर्णपणे बाहेर म्हणजे ज्याला ‘सूक्ष्म शरीर’ असे संबोधले जाते, त्यामध्ये असते.

या (सर्वोच्च) आत्म्याला दोन पैलू असतात आणि त्यांच्या साक्षात्काराचे परिणाम हे या दोन पैलूंशी संबंधित असतात. एक पैलू हा अक्रिय, स्थितीमान (static) असतो. ही स्थिती व्यापक शांतीची, मुक्तीची व नीरवतेची असते. या शांत ‘आत्म्या’वर कोणत्याही कृतीचा वा अनुभवाचा काही परिणाम होत नाही. तो त्यांना निःपक्षपातीपणे आधार पुरवत असतो पण तो त्यांची निर्मिती करत असावा असे दिसत नाही, किंबहुना तो या साऱ्यापासून अलिप्तपणे, उदासीनपणे दूर उभा राहतो.

या आत्म्याचा दुसरा पैलू हा गतिशील असतो आणि विश्वात्मा म्हणून तो अनुभवास येतो, तो संपूर्ण वैश्विक कृतीला केवळ आधारच पुरवितो असे नाही तर तो ती कृती निर्माण करतो, आणि ती कृती स्वतःमध्ये सामावूनही घेतो. या वैश्विक कृतीमध्ये आपल्या शारीरिक अस्तित्वांशी संबंधित असलेल्या घटकांचाच नव्हे तर त्यांच्या अतीत असणाऱ्या सर्व घटकांचा, इहलोक आणि सर्व अन्य लोक, या विश्वाच्या भौतिक तसेच अतिभौतिक श्रेण्यांचा समावेशदेखील त्यामध्ये होतो. तसेच, सर्वांमध्ये वसत असलेला आत्मा एकच आहे याची आपल्याला जाणीव होते. इतकेच नाही तर, तो सर्वाच्या अतीत, परात्पर, सर्व व्यक्तिगत जन्माला किंवा वैश्विक अस्तित्वालाही ओलांडून जाणारा म्हणून संवेदित होतो.

सर्वांमध्ये वसत असलेल्या त्या एकामध्ये म्हणजे विश्वव्यापक आत्म्यामध्ये प्रविष्ट होणे म्हणजे अहंभावापासून मुक्त होणे. अशा वेळी, हा अहंभाव एकतर चेतनेमधील एक छोटीशी साधनभूत परिस्थिती बनून शिल्लक राहतो किंवा मग आपल्या चेतनेमधून तो पूर्णपणे नाहीसा होतो. यालाच ‘अहंभावाचे निर्वाण’ असे म्हणतात. सर्वांच्या अतीत असणाऱ्या परात्पर आत्म्यामध्ये प्रविष्ट होण्यामधून आपण वैश्विक चेतना आणि कृतीच्या पूर्णपणे अतीत होण्यास सक्षम होतो. विश्व-अस्तित्वामधून पूर्ण मुक्ती मिळविण्याचा तो एक मार्ग असू शकतो, यालाच ‘लय, मोक्ष, किंवा निर्वाण’ असे संबोधले जाते. (क्रमश:)

– श्रीअरविंद (CWSA 30 : 325-326)

साधना, योग आणि रूपांतरण – १८७

योगामधील केंद्रवर्ती प्रक्रिया – भाग ०३

खरा आत्मा (The real Self) हा पृष्ठभागावर नसतो तर तो खोल अंतरंगामध्ये आणि ऊर्ध्वस्थित असतो. अंतरंगामध्ये आंतरिक मन, आंतरिक प्राण, आंतरिक शरीराला आधार देणारा आत्मा असतो, आणि त्या आत्म्यामध्ये विश्वव्यापक होण्याची क्षमता असते. त्याच्याकडे स्वतःच्या आणि वस्तुमात्रांच्या ‘सत्या’शी थेट संपर्क साधण्याची क्षमता असते. त्याच्याकडे वैश्विक आनंदाची चव चाखण्याची क्षमता असते. त्याच्याकडे स्थूल भौतिक शरीराच्या दुःखभोगापासून आणि बंदिवान झाल्यामुळे आलेल्या क्षुद्रतेपासून मुक्ती मिळविण्याची क्षमता असते.

आजकाल अगदी युरोपमध्येसुद्धा, पृष्ठवर्ती भागाच्या मागे असणाऱ्या गोष्टीचे अस्तित्व वारंवार मान्य केले जात आहे, परंतु त्याचे स्वरूप समजावून घेण्यात त्यांची चूक होत आहे, त्याला ते ‘अवचेतन’ (subconscient) किंवा ‘प्रच्छन्न चेतना’ (subliminal) असे संबोधतात. वस्तुतः ते अस्तित्व त्याच्या स्वतःच्या पद्धतीने खूप सचेत असते; ते प्रच्छन्न नसते, फक्त ते पडद्याआड दडलेले असते इतकेच.

आमच्या मनोविज्ञानानुसार, ते अस्तित्व हे या छोट्या पृष्ठवर्ती व्यक्तिमत्त्वाशी, चेतनेच्या काही विशिष्ट चक्रांद्वारे जोडलेले असते, ‘योगा’मुळे आपल्याला त्यांची जाणीव होते. आपल्या आंतरिक अस्तित्वाचा काही अंशभाग या चक्रांच्या माध्यमातून बाह्य जीवनामध्ये पाझरतो, हा अंशभागच आपल्या जीवनाचा सर्वोत्तम भाग असतो आणि तो अंशभागच आपल्या कला, काव्य, तत्त्वज्ञान, आदर्श, धार्मिक आकांक्षा, ज्ञान आणि पूर्णत्वप्राप्तीसाठी केलेले प्रयत्न या गोष्टींना कारणीभूत ठरतो. परंतु ही आंतरिक चक्रं बहुतांशी, मिटलेली किंवा सुप्त असतात. ती खुली करणे आणि त्यांना जागृत व सक्रिय करणे हे ‘योगा’चे एक ध्येय असते.

ही चक्रं जसजशी खुली होतात, तशतशा आपल्यामध्ये आंतरिक अस्तित्वाच्या शक्ती आणि शक्यता उदयाला येऊ लागतात. प्रथमतः आपल्याला एका विशाल चेतनेची आणि नंतर वैश्विक चेतनेची जाणीव होते. त्यानंतर मात्र आपण मर्यादित जीवनं असणारी छोटीछोटी विलग व्यक्तिमत्त्वं म्हणून उरत नाही, तर आता आपण वैश्विक कृतीची केंद्र बनतो आणि त्यानंतर आपला वैश्विक शक्तींशी थेट संपर्क येतो. पृष्ठवर्ती व्यक्तित्व ज्याप्रमाणे वैश्विक शक्तींच्या हातचे अनिच्छुक बाहुले असते त्याप्रमाणे आपण बाहुले बनून राहण्याऐवजी, आता आपण विशिष्ट प्रमाणात सचेत बनू शकतो आणि प्रकृतीच्या लीलेचे ‘स्वामी’ बनू शकतो. मात्र हे किती प्रमाणात घडून येऊ शकते हे आंतरिक अस्तित्वाच्या विकासावर आणि त्याच्या उच्चतर आध्यात्मिक स्तरांप्रत असलेल्या ऊर्ध्वमुखी उन्मुखतेवर अवलंबून असते. त्याचवेळी हृदयचक्र खुले झाल्यामुळे, चैत्य पुरुषाची (psychic being) मुक्तता होते, आणि मग तो चैत्य पुरुष आपल्या अंतरंगामध्ये असणाऱ्या ‘ईश्वरा’ची आणि ऊर्ध्वस्थित असणाऱ्या उच्चतर ‘सत्या’ची आपल्याला जाणीव करून देण्याच्या दिशेने प्रगत होतो. (क्रमश:)

– श्रीअरविंद (CWSA 30 : 325)

विचारशलाका २५

 

पूर्णयोगामध्ये चक्रं ही संकल्पपूर्वक, प्रयत्नपूर्वक खुली केली जात नाहीत, तर ‘शक्ती’च्या अवतरणामुळे ती आपलीआपणच स्वत:हून खुली होतात. तांत्रिक साधनेमध्ये ती खालून वर, ऊर्ध्वगामी दिशेने खुली होत जातात, म्हणजे मूलाधार चक्र प्रथम खुले होते तर आपल्या पूर्णयोगामध्ये, चक्रं वरून खाली खुली होत जातात. तरीसुद्धा मूलाधारातून शक्तीचे आरोहण घडून येतेच.

*

‘पूर्णयोगा’मध्ये मज्जारज्जूमध्ये (कुंडलिनीच्या) प्रवाहाची कधीतरी जाणीव होते, जशी ती इतर नाडी-प्रवाहमार्गांमध्ये किंवा शरीराच्या विविध भागांमध्येही होते. परंतु ‘पूर्णयोगा’मध्ये बलपूर्वक किंवा हटातटाने कुंडलिनी जागृती केली जात नाही. या योगामध्ये, उच्च स्तरीय आध्यात्मिक चेतनेला जाऊन मिळण्यासाठी, कनिष्ठ चक्रांमधून चेतना शांतपणे वर चढत जाते आणि ‘ईश्वरी शक्ती’चे वरून अवतरण होते आणि ती ‘ईश्वरी शक्ती’ मन आणि शरीरावर तिचे कार्य करते. त्या कार्याची पद्धत व त्याच्या पायऱ्या प्रत्येक साधकामध्ये वेगवेगळ्या असतात. ‘दिव्य माते’वर पूर्ण ‘विश्वास’ आणि येणाऱ्या सर्व चुकीच्या सूचनांना व प्रभावांना दूर सारण्यासाठी आवश्यक असणारी ‘सतर्कता’ या गोष्टी म्हणजे ‘पूर्णयोगा’चा मुख्य नियम आहे.

– श्रीअरविंद [CWSA 29 : 460, 462]