Posts

अमृतवर्षा ०४

 

आपल्याला समग्र रूपांतरण हवे आहे; शरीराचे आणि त्याच्या सर्व क्रियांचे रूपांतरण हवे आहे. पूर्वी जेव्हा रूपांतरणाविषयी बोलले जात असे तेव्हा तेथे केवळ आंतरिक चेतनेचे रूपांतरणच अभिप्रेत असे. ही सखोल चेतना स्वत:मध्ये शोधण्याचा व्यक्ती प्रयत्न करत असे; हे करत असताना, आंतरिक गतिविधींवरच लक्ष केंद्रित करायचे असल्याने, शरीराला आणि त्याच्या क्रियाकलापांना, ती व्यक्ती एक लोढणं समजत असे; आणि निरुपयोगी गोष्ट म्हणून त्यास ती धुडकावून देत असे.

परंतु, हे पुरेसे नसल्याचे श्रीअरविंदांनी स्पष्ट केले. जडभौतिक जगताने देखील या रूपांतरणामध्ये सहभागी व्हावे आणि त्यानेही या गहनतर ‘सत्या’ची अभिव्यक्ती करावी, अशी त्या ‘सत्या’कडून मागणी होत आहे, हे त्यांनी स्पष्ट केले आहे.

परंतु लोकांनी जेव्हा हे ऐकले तेव्हा त्यांच्यापैकी बऱ्याच जणांना असे वाटले की, अंतरंगामध्ये काय घडत आहे याची अजिबात काळजी न करतादेखील शरीर आणि त्याच्या क्रिया यांचे रूपांतरण घडविणे शक्य आहे, – अर्थात हे खरे नाही.

हे शारीरिक रूपांतरणाचे कार्य हाती घेण्यापूर्वी, – हे कार्य म्हणजे, जे सर्वात अवघड असे कार्य आहे ते हाती घेण्यापूर्वी – तुमची आंतरिक चेतना ही ‘सत्या’मध्ये दृढपणे, सघनपणे प्रस्थापित झालेली असली पाहिजे; म्हणजे मग हे रूपांतरण म्हणजे त्या ‘सत्या’चा चरम आविष्कार असेल – किमान आत्ताच्या घडीपुरता तरी ‘चरम’.

या रूपांतरणाचा प्रारंभबिंदू असतो ग्रहणशीलता! रूपांतरण प्राप्त करून घेण्यासाठीची ही अत्यावश्यक अट आहे. त्यानंतर चेतनेमध्ये परिवर्तन घडून येते.

चेतनेचे हे परिवर्तन आणि त्याची पूर्वतयारी यांची तुलना नेहमी अंड्यातील कोंबडीच्या पिलाच्या घडणीशी केली जाते. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत अंडे जसेच्या तसे असते, त्यामध्ये काहीही बदल दिसत नाही आणि जेव्हा ते पिल्लू आत पूर्ण विकसित झालेले असते, पूर्णतया जिवंत झालेले असते, तेव्हा ते त्याच्या छोट्याशा चोचीने त्या कवचाला टोचे मारते आणि त्यातून बाहेर पडते.

चेतनेच्या परिवर्तनाच्या क्षणीसुद्धा असेच काहीसे घडून येते. दीर्घ काळपर्यंत काहीच घडत नाही असेच तुम्हाला वाटत असते; तुमची चेतना नेहमीप्रमाणेच आहे, त्यात काहीच बदल नाही असेच तुम्हाला वाटत असते. तुमच्यापाशी जर का तीव्र अभीप्सा असेल तर तुम्हाला कधीकधी विरोधदेखील जाणवतो; जणूकाही तुम्ही एखाद्या भिंतीवर धक्के देत असता पण ती काही ढासळत नाही. पण जेव्हा तुमची अंतरंगातून तयारी झालेली असते तेव्हा एक शेवटचा प्रयत्न – तुमच्या अस्तित्वाच्या कवचाला धक्के देण्याचा एक प्रयत्न पुरेसा ठरतो आणि मग सर्वकाही खुले होते आणि तुम्ही एका आगळ्यावेगळ्या चेतनेमध्ये उन्नत झालेले असता.

 

– श्रीमाताजी [CWM 04 : 18-19]

कर्म आराधना – ३०

‘ईश्वरी शक्ती’ ग्रहण करण्याची क्षमता येण्यासाठी आणि त्या शक्तीला तुमच्या माध्यमातून बाह्यवर्ती जीवनातील गोष्टींमध्ये कार्य करू देण्यासाठी तीन अटी आवश्यक असतात –

०१) अचंचलता, समता : घडणाऱ्या कोणत्याही घटनेने विचलित न होणे, मन स्थिरचित्त आणि दृढ राखणे, घडणाऱ्या घटनांकडे हा विविध शक्तींचा खेळ आहे या दृष्टीने पाहणे आणि स्वतः मनाने समचित्त राहणे.

०२) असीम श्रद्धा : जे सर्वोत्कृष्ट आहे तेच घडेल ही श्रद्धा बाळगणे, पण त्याबरोबरच, व्यक्ती जर स्वतःला खरेखुरे साधन बनवू शकली तर, त्याचे फळ ‘कर्तव्यम् कर्म’ अशा स्वरूपाचे असेल. म्हणजे, ‘ईश्वरी प्रकाशा’चे मार्गदर्शन प्राप्त झालेल्या व्यक्तीच्या इच्छेला, जे कर्म करण्याची आवश्यकता भासेल तसे, ते कर्म असेल.

०३) ग्रहणशीलता : ‘ईश्वरी शक्ती’चा स्वीकार करण्याची व तिचे अस्तित्व अनुभवण्याची व त्यामध्ये ‘श्रीमाताजीं’ची उपस्थिती अनुभवण्याची ताकद म्हणजे ग्रहणशीलता. तसेच व्यक्तीने स्वत:च्या दृष्टीला, इच्छेला आणि कृतीला मार्गदर्शन करण्याची मुभा त्या ‘ईश्वरी शक्ती’ला देऊन, तिला कार्य करू देणे म्हणजे ग्रहणशीलता होय. व्यक्तीला जर या शक्तीची आणि तिच्या उपस्थितीची जाणीव होऊ शकली आणि व्यक्तीने कर्मातील चेतनेला या घडणसुलभतेचे (plasticity) वळण लावले तर, अंतिम परिणामाची खात्री असते. (अर्थात ही घडणसुलभता केवळ ‘ईश्वरी शक्ती’बाबतच असली पाहिजे, त्यामध्ये कोणत्याही परक्या तत्त्वाची सरमिसळ होऊ देता कामा नये.)

– श्रीअरविंद
[CWSA 29 : 266]

माझे प्रेम सततच तुझ्या बरोबर आहे. पण जर तुला ते जाणवत नसेल तर त्याचे कारण हेच की, तू ते स्वीकारण्यास सक्षम नाहीस. तुझी ग्रहणशीलता उणी पडत आहे, ती वाढविली पाहिजे. आणि त्यासाठी तुला स्वत:ला खुले केले पाहिजे आणि व्यक्ती स्वत:ला तेव्हाच खुली करू शकते, जेव्हा ती स्वत:चे आत्मदान करते.

तू नक्कीच कळत वा नकळतपणे, शक्ती आणि ईश्वरी प्रेम तुझ्याकडे खेचू पाहत आहेस. ही पद्धत चुकीची आहे. कोणतेही आडाखे न बांधता, कोणत्याही परतफेडीची अपेक्षा न बाळगता, स्वत:चे आत्मदान कर म्हणजे मग तू ग्रहणक्षम होऊ शकशील.

(CWM 14 : 148)

प्रश्न : ग्रहणशीलता कशावर अवलंबून असते?

श्रीमाताजी : ती मूलत: प्रामाणिकपणावर अवलंबून असते. खरोखरच व्यक्तीला ईश्वरी शक्ती ग्रहण करण्याची इच्छा आहे का ह्यावर ती अवलंबून असते. मला असे वाटते की, ह्यासाठी प्रामाणिकपणा आणि विनम्रता हे मुख्य घटक आहेत.

आत्मप्रौढीइतकी दुसरी कोणतीच गोष्ट तुम्हाला एव्हढी बंधनात अडकवत नाही. जेव्हा तुम्ही स्व-संतुष्ट असता, तेव्हा तुमच्यामध्ये अशा प्रकारची एक आढ्यता असते की, जी तुमच्यामध्ये काही कमतरता आहे हे मान्य करण्यास तयारच नसते, तुमच्याकडून काही चुका झाल्या आहेत, तुम्ही अपूर्ण आहात, तुम्ही परिपूर्ण नाही. …अशा कोणत्याही गोष्टी मान्य करण्यास ती तयार नसते. तुमच्या स्वभावामध्ये, प्रकृतीमध्ये असे काहीतरी असते की, जे अशाप्रकारे आडमुठे बनते, त्याला हे मान्यच करावयाचे नसते – आणि तीच गोष्ट तुमच्या ग्रहणशीलतेमध्ये बाधा उत्पन्न करते. वास्तविक, तुम्हीच हा प्रयत्न करून पाहा, अनुभव घ्या.

जर इच्छाशक्तीच्या प्रयत्नाद्वारे, तुमच्या अस्तित्वाच्या अगदी अंशभागाद्वारे जरी तुम्ही हे मान्य करू शकलात की, “अं, हो, मी चुकलो खरा, मी असे करायला नको होते आणि मी असे वागायला नको होते, मला असे वाटायला नको होते, हो, ती चूकच आहे.”

जर का तुम्ही ते मान्य करू शकलात, तर सुरुवाती सुरुवातीला, तुम्हाला वाईट वाटते पण जेव्हा तुम्ही त्यावर ठाम राहता, तेव्हा अगदी ताबडतोब तुमच्यातील आजवर बंदिस्त असलेला तो भाग खुला होतो. तो खुला होतो आणि अगदी विलक्षण रीतीने प्रकाशाचा ओघच जणू आत प्रवेश करतो आणि मग नंतर मात्र तुम्हाला खूप आनंदी वाटते. इतके आनंदी वाटते की, तुम्ही स्वत:लाच प्रश्न करू लागता, ‘हा ओघ थोपविण्याचा वेडेपणा मी इतका काळ का केला होता?”

– श्रीमाताजी
(CWM 06 : 117)

ग्रहणशीलता म्हणजे ईश्वरी शक्तीचा स्वीकार करण्याची आणि तिचे अस्तित्व अनुभवण्याची शक्ती होय. त्यामध्ये श्रीमाताजींची उपस्थिती अनुभवणे हेही अनुस्यूत आहे. व्यक्तीने स्वत:च्या दृष्टीला, इच्छेला आणि कृतीला मार्गदर्शन करण्याचे कार्य श्रीमाताजींना करू देणे म्हणजे ग्रहणशीलता होय.

(CWSA 29:266)

मर्त्य अर्धजागृत अस्तित्वाला कवेत घेणाऱ्या आणि मर्त्य अस्तित्वाच्या आधीपासूनच वर व मागेही अस्तित्वात असणाऱ्या अशा महान दिव्य चेतनेला, स्वत:च्या सर्व अंगांनिशी आणि सर्व स्तरांवर, कोणतीही मर्यादा येऊ न देता, स्वीकारता येणे शक्य व्हावे म्हणून, प्रकृतीने स्वत:ला व्यापकतेने खुले करणे म्हणजे उन्मुखता (opening) होय.

(CWSA 12 : 169)

– श्रीअरविंद