Posts

विचार शलाका – ३९

(श्रीअरविंद यांनी एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून…)

तुम्हाला जेव्हा ज्ञान होईल तेव्हा कळेल की, ‘देव’च तुमचा गुरु आहे. योगाची स्वाभाविक प्रक्रिया घडून यावी म्हणून, अनंत प्रज्ञेने तुमच्या जीवनातील प्रत्येक लहानसहान आंतरिक आणि बाह्य परिस्थिती कशी सूक्ष्मपणाने नियोजित केली आहे, त्याची कशी अंमलबजावणी केली आहे, हे तुमच्या लक्षात येईल. आंतरिक व बाह्य प्रवृत्तींना परस्परांवर कार्य करता यावे म्हणून, त्या कशा रीतीने रचल्या आहेत, कशा रीतीने एकत्रित आणल्या आहेत, जेणेकरून त्या प्रवृत्ती, पूर्णत्वामध्ये अपूर्णतांवर काम करू शकतील, हे तुम्हाला उमगेल. तुमच्या उन्नतीसाठी सर्वशक्तिमान प्रेम आणि प्रज्ञा कार्यरत आहेत. त्यामुळे जरी खूप वेळ लागताना दिसत असला तरी त्याविषयी काळजी करण्याचे काही कारण नाही, परंतु जेव्हा अपूर्णता आणि अडथळे उद्भवताना दिसतील तेव्हा अप्रमत्त (सावध) राहा, धीर धरा आणि उत्साह टिकवून ठेवा आणि इतर सारे काही ‘देवा’वर सोपवून द्या.

काळ आवश्यक आहे. तुमच्यामध्ये प्रचंड कार्य चालू आहे, तुमच्या समग्र मानवी प्रकृतीचे दिव्य प्रकृतीमध्ये रूपांतरण घडविण्याचे, उत्क्रांतीच्या अनेक शतकांचे कार्य काही थोड्या वर्षांमध्ये घडविण्याचे कार्य तुमच्यामध्ये सुरु आहे, त्यामुळे काळ आवश्यकच आहे. तुम्ही काळाविषयी कुरकूर करता कामा नये. इतरही काही मार्ग असतात की, ज्यामधून तुम्हाला त्वरित परिणाम दिसून येतात; तुम्ही स्वतःच करू शकाल, अशा काही निश्चित क्रिया ते मार्ग तुम्हाला देतात; तुम्ही काही (साधना) करत आहात, आज इतके अधिक प्राणायाम केले, आज इतक्या जास्त वेळ आसन स्थिर केले, आज इतक्या अधिक वेळा जप केला, इतके इतके केले, त्यातून तुम्ही निश्चित अशी किती प्रगती केली ते कळून येते आणि या भावनांच्या माध्यमातून तुमच्या अहंकाराला समाधान लाभते. त्या साऱ्या मानवी पद्धती झाल्या, परंतु अनंत ‘शक्ती’ अशा पद्धतीने कार्य करत नाही. ती सावकाशपणे वाटचाल करते, कधीकधी तर ती तिच्या ध्येयाप्रत अव्यक्त गतीने वाटचाल करते, कुठे ती प्रगती करताना दिसते, तर कधी मध्येच थांबलेली दिसते, आणि पुढे मग केव्हातरी अगदी जोरकसपणाने आणि विजयी रीतीने, तिने जे भव्य कार्य उभारले आहे ते आपल्यासमोर उघड करते.

उपरोक्त कृत्रिम मार्ग हे मानवी बुद्धीने काढलेल्या कालव्यांप्रमाणे असतात; त्यामधून तुम्ही सुलभपणे, सुरक्षितपणे आणि खात्रीपूर्वक प्रवास करू शकता पण तो प्रवास एका स्थानापासून दुसऱ्या स्थानापर्यंत अशा प्रकारचा असतो. पण एकदा का तुम्ही पूर्णयोगाचा मार्ग निवडलात की, मग तुम्ही त्या मार्गालाच धरून राहिले पाहिजे. हा मार्ग मात्र विस्तृत आणि पथविरहित समुद्रासारखा आहे की, ज्यामध्ये अनंताच्या स्वातंत्र्यामध्ये तुमचा प्रवेश झालेला असतो आणि तुम्ही या जगातील विविध प्रांतांमध्ये मुक्तपणे विहार करू शकता. तुम्हाला जर का कशाची आवश्यकता असेल, तर ती एका जहाजाची, त्याला दिशा देणाऱ्या चक्राची, दिशादर्शक यंत्राची, प्रेरक शक्तीची आणि कुशल कप्तानाची!

‘ब्रह्मविद्या’ हे आहे तुमचे जहाज, श्रद्धा म्हणजे दिशा देणारे चक्र, आत्म-समर्पण हे आहे तुमचे दिशादर्शक यंत्र, ईश्वराच्या आज्ञेनुसार जगताची निर्मिती करणारी, त्यांना दिशा देणारी आणि त्यांचा विनाश घडवून आणणारी शक्ती ही आहे तुमची प्रेरकशक्ती आणि स्वतः ‘देव’च तुमचा कप्तान आहे. परंतु त्याचा कार्य करण्याचा स्वतःचा असा एक मार्ग आहे आणि त्या प्रत्येक गोष्टीसाठी त्याचा स्वतःचा असा एक काळ आहे. त्याच्या मार्गाकडे लक्ष ठेवून राहा आणि त्याच्या योग्य काळाची वाट पाहा.

– श्रीअरविंद
(CWSA 13 : 87-88)

मूल अगदी लहान असल्यापासूनच जोपासायला हवा असा एक गुण आहे, तो म्हणजे अस्वस्थ करणारी भावना (uneasiness). जेव्हा एखादी चुकीची गोष्ट हातून घडते तेव्हा स्वाभाविकपणे मनात निर्माण होणारी नैतिक असमतोलाची अस्वस्थ करणारी भावना! अमुक अमुक गोष्टी करावयाच्या नाहीत असे सांगितले असते म्हणून नव्हे किंवा शिक्षेला घाबरूनही नव्हे, तर ती अस्वस्थता स्वाभाविकपणे मनात उत्पन्न होते. उदाहरणार्थ, एखादे मूल खोड्या करून जेव्हा त्याच्या वर्गमित्राला इजा करते तेव्हा, जर ते सहज, स्वाभाविक अशा अवस्थेत असेल तर त्याला अस्वस्थ वाटते. त्याला त्याच्या अस्तित्वाच्या खोल आत कुठेतरी दुःख जाणवते, कारण त्याने जे काही केलेले असते ते त्याच्या आंतरिक सत्याच्या विरूद्ध असते.

व्यक्ती कितीही शिकलेली असो, कितीही विचार करणारी असो, तरीही अंतरंगात खोलवर असे काहीतरी असते की ज्याला पूर्णत्वाची, महानतेची, सत्याची संवेदना असते आणि या सत्याला विरोध करणाऱ्या सर्व प्रकारच्या गतिविधींची दु:खदायक संवेदना असते. आणि अवतीभोवतीच्या निंदनीय अशा उदाहरणांमुळे, बाह्य वातावरणामुळे ते मूल बिघडलेले नसेल, म्हणजेच ते त्याच्या सहज स्वाभाविक अवस्थेमध्ये असेल, तर जेव्हा त्याच्याकडून त्याच्या अस्तित्वाच्या सत्याच्या विरोधी असे काही घडते तेव्हा कोणीही काहीही न सांगता देखील, त्या मुलाला एक प्रकारची अस्वस्थता जाणवते.आणि म्हणून त्या मुलामध्ये टिकून असलेल्या ह्या अस्तित्वाच्या सत्यावरच त्याच्या प्रगतीसाठीचे पुढचे सारे प्रयत्न आधारले गेले पाहिजेत….

केवळ एकच सच्चा मार्गदर्शक असतो, तो म्हणजे आंतरिक गुरु, आंतरिक मार्गदर्शक….

जर एखाद्या मुलाला अनर्थकारक असे शिक्षण मिळाले तर, त्या शिक्षणाद्वारे ही छोटीशी आंतरिक गोष्ट नाहीशी करण्याचा जोरकस प्रयत्न होतो. आणि कधीकधी हा प्रयत्न इतका यशस्वी होतो की, त्यामुळे त्या आंतरिक मार्गदर्शकाबरोबरचा सर्व संपर्कच व्यक्ती हरवून बसते. आणि त्याचबरोबर चांगले आणि वाईट यांतील फरक ओळखण्याची शक्तीही ती व्यक्ती गमावून बसते. म्हणून मी सांगत असते की, अगदी बालपणापासूनच मुलांना आंतरिक वास्तवाची, अस्तित्वाची जाणीव करून द्यावयास हवी. हे अस्तित्व त्यांच्या अंतरंगात आहे, पृथ्वीच्या अंतर्यामी आहे, विश्वाच्या अंतर्यामी आहे आणि ती मुलं, ही पृथ्वी, हे विश्व ह्या आंतरिक सत्याचे कार्य या नात्यानेच अस्तित्वात आहेत, आणि त्याविना कशाचेच अस्तित्व असू शकणार नाही. आणि हाच विश्वाचा खरा आधार असल्याने, स्वाभाविकपणे हीच गोष्ट विजयी होणार आहे. आणि जोवर ही गोष्ट अस्तित्वात आहे तोवर तिच्या विरोधी अशी कोणतीच गोष्ट टिकून राहू शकणार नाही.

लहान मुलाला तात्विक स्पष्टीकरण देणे गरजेचे नाही, पण त्याला ह्या आंतरिक स्वास्थ्याच्या, समाधानाच्या भावनेचा अनुभव द्यायला हवा. जेव्हा एखादी चुकीची, विरोधी गोष्ट करण्यापासून ती आंतरिक छोटीशी गोष्ट त्याला अडविते, तेव्हा त्याला जो मनस्वी आनंद होतो त्याची जाणीव त्याला करून द्यायला हवी. आणि अशा प्रकारच्या अनुभवावरच सर्व प्रकारचे शिक्षण आधारित असावे. मुलाची अशी धारणा व्हायला हवी की, जर त्याला हे आंतरिक समाधान मिळाले नाही तर, काहीच टिकू शकणार नाही कारण आंतरिक समाधान हीच एकमेव गोष्ट चिरस्थायी आहे.

– श्रीमाताजी
(CWM 04 : 24-25)

आमच्या हृदयांत गुप्त असलेला आंतरिक मार्गदर्शक, जगद्गुरू हा पूर्णयोगाचा श्रेष्ठ मार्गदर्शक आणि गुरु आहे. हा आंतरिक जगद्गुरू आपल्या ज्ञानाच्या तेजस्वी प्रकाशाने आमचा अंधकार नाहीसा करतो; हा प्रकाश आमच्या ठिकाणी, या आंतरिक जगद्गुरूच्या वाढत्या वैभवाच्या आत्माविष्काराचे रूप घेतो. हा गुरु आमच्या ठिकाणी क्रमाक्रमाने त्याचे स्वाभाविक स्वातंत्र्य, आनंद, प्रेम, सामर्थ्य आणि अमृतत्व अधिकाधिक प्रमाणात व्यक्त करतो. तो आपले स्वतःचे दिव्य उदाहरण आमच्या मानवी पातळीच्या वरती आमचे साध्य म्हणून ठेवतो; त्याचे ध्यान आमची कनिष्ठ प्रकृती करते, आणि अंतिमत: ती ज्याचे ध्यान करते त्याची जणू प्रतिमूर्तीच बनून जाते. तो स्वत:चे अस्तित्व आणि त्याचा प्रभाव आमच्यामध्ये ओतून, विश्वात्मक ईश्वराशी आणि विश्वातीत ईश्वराशी एकरूपता प्राप्त करून देण्याची क्षमता आमच्या ठायीं निर्माण करतो.

या आंतरिक गुरुची कार्यरीती, कार्यपद्धती कोणती असते? तर त्याला कोणतीच एकच एक पद्धती नसते; व सर्व पद्धती ह्या त्याच्याच आहेत हे या प्रश्नाचे उत्तर आहे.

प्रकृतीत ज्या उच्चतम प्रक्रियांची व व्यापारांची पात्रता असेल, त्या प्रक्रियांचे व व्यापारांचे स्वाभाविक संघटन ही त्या गुरूची कार्यपद्धती आहे. क्षुद्रांत क्षुद्र तपशिलाच्या गोष्टी, अगदी महत्त्वशून्य दिसणाच्या क्रिया आणि सर्वात मोठ्या गोष्टी व क्रिया यांच्याकडे या पद्धतीत सारख्याच काळजीने, सारख्याच बारकाईने लक्ष दिले जाते आणि या सर्वांना शेवटी प्रकाशाच्या क्षेत्रात उचलून घेऊन त्यांचे परिवर्तन घडवून आणण्यात येते. कारण ह्या आंतरिक गुरुच्या योगामध्ये उपयोगात येऊ शकणार नाही इतकी कोणतीच गोष्ट क्षुल्लक नाही व मिळवण्यासाठी धडपडावे एवढी कोणतीच गोष्ट मोठीदेखील नाही. जो ईश्वराचा सेवक आणि शिष्य आहे, त्याला गर्व वाहण्याचे, मी मी म्हणण्याचे काहीच कारण नसते; कारण त्याच्यासाठी सर्व काही करण्याची व्यवस्था वरून होत असते. त्याचप्रमाणे या सेवक शिष्याला स्वतःच्या वैयक्तिक दोषांमुळे, स्वतःच्या प्रकृतीतील अडचणींमुळे निराश होण्याचा अधिकार नसतो, कारण त्याच्या ठिकाणी कार्य करणारी शक्ति ही अ-वैयक्तिक (Impersonal) किंवा अति-वैयक्तिक (Superpersonal) आणि अनंत (Infinite) अशी असते.

आमच्या अंतरंगातील गुरू ज्या पद्धतीचा वापर करतो त्याच पद्धतीचा वापर यथाशक्य पूर्णयोगाचा गुरू करत राहील. अर्थात शिष्याची प्रकृती पाहून त्या प्रकृतीला धरूनच पूर्णयोगाचा गुरु त्याला मार्गदर्शन करीत जाईल.

गुरूला तीन साधने उपलब्ध असतात. शिष्याला शिकवण देणे, आपले उदाहरण शिष्यासमोर ठेवणे, आपला मूक प्रभाव शिष्यावर पडेल असे करणे. गुरूने आपली अस्मिता, आपली मते शिष्यावर लादावी, शिष्याने आपले मन मोकळे ठेवून गुरु देईल ते, त्यांत विचार न करतां मान्य करून साठवावे, असा भलता मार्ग शहाणा गुरु सांगणार नाही; तो शिष्याच्या मनात केवळ बीज टाकील, विचाराचे उत्पादनक्षम असे खात्रीचे बीज टाकील आणि शिष्याच्या मनातील ईश्वर त्या बीजाची जोपासना करील अशी श्रद्धा ठेवील. शहाणा गुरु पाठ देण्यापेक्षा, शिष्याच्या आंतरिक शक्ति जागृत करण्याकडे अधिक लक्ष देईल. शिष्याच्या आंतरिक शक्ति, आंतरिक अनुभव स्वाभाविक प्रक्रियेने, मोकळ्या वातावरणात वाढावे असा प्रयत्न करील. तो शिष्याला एखादी कार्यपद्धति शिकवताना हे स्पष्ट करील की, ही पद्धति त्याला एक उपयुक्त उपाय म्हणून, उपयुक्त साधन म्हणून शिकवलेली आहे; तीच उपयोगांत आणली पाहिजे, ती उपयोगात आणलीच पाहिजे असे कोणतेहि बंधन त्याजवर नाहीं; तिला त्याने शिरोधार्य आचारसूत्राचे, ठाम दिनचर्येचे स्वरूप देऊ नये.

शहाणा गुरु या गोष्टीची काळजी घेईल की, शिष्याने त्याला शिकवलेल्या साधनाला मर्यादा घालणाऱ्या भिंतीचे स्वरूप देऊ नये. त्याला शिकवलेली प्रक्रिया त्याने यांत्रिक बनवून ठेवू नये. शहाण्या गुरूचे काम इतकेच राहील की, त्याने शिष्याच्या अंत:करणात दिव्य प्रकाश जागवावा, दिव्य शक्ति तेथे क्रियाशील होईल असे करावे; तो स्वत: या दिव्य प्रकाशाचा व दिव्य शक्तीचा केवळ वाहक असतो, त्यांना वाहून नेणारे केवळ शरीर असतो, त्यांच्या हातातले एक साहाय्यक साधन असतो.

गुरूने दिलेल्या पाठापेक्षा गुरूचे उदाहरण अधिक सामर्थ्यशाली असते; पण, बाह्य कृतीच्या उदाहरणाला किंवा वैयक्तिक शीलाच्या उदाहरणाला फार महत्त्व नसते. या उदाहरणांनाहि त्यांचे स्थान असते, उपयोग असतो; परंतु दुसऱ्याच्या ठिकाणी सर्वात जास्त अभीप्सा उत्तेजित करणारी मध्यवर्ति गोष्ट म्हणजे गुरूच्या ठिकाणी असलेला दिव्य साक्षात्कार, जो त्याचे सर्व जीवन, त्याची आंतरिक अवस्था व त्याच्या सर्व क्रिया नियंत्रित करतो. हा सार्वत्रिक सारभूत घटकाच्या स्वरूपाचा असतो; त्याहून दुसरे सर्व, गुरूच्या वैयक्तिक अस्मितेचा व उपाधीचा (Circumstance) भाग असतो. गुरूच्या अंतरीचा हा क्रियाशील साक्षात्कार साधक-शिष्याच्या अंतरंगाला प्रतीत व्हावयास हवा; साधक-शिष्याने आपल्या प्रकृतीनुसार हा साक्षात्कार स्वत:च्या ठिकाणी निर्माण करून अनुभवावयास हवा; गुरूच्या बाह्य वर्तनाचे अनुकरण करण्याच्या भानगडींत शिष्याने पडू नये; हे अनुकरण शिष्याच्या ठिकाणी सुयोग्य स्वाभाविक फलनिष्पत्ति करण्याऐवजी त्याच्या ठिकाणची निर्माणशक्ति शून्यवत् करील, असाच संभव अधिक आहे.

गुरूच्या उदाहरणाहून त्याच्या अस्मितेचा मूक प्रभाव हा अधिक महत्त्वाचा, सामर्थ्यवान् असतो. गुरूचा शिष्यावर बाह्यवर्ती अधिकार जो असतो त्याला आम्ही प्रभाव म्हणत नाही; गुरूच्या संपर्कात जे सामर्थ्य असते, त्याच्या केवळ उपस्थितीचे जे सामर्थ्य असते, त्याचा आत्मा दुसऱ्याच्या आत्म्याच्या निकट असल्याने त्या दुसऱ्या आत्म्यात, शब्दाचा उपयोग न करता, गुरु आपली अस्मिता व आपली आध्यात्मिक संपत्ति ज्या आपल्या मूक सामर्थ्याच्या बळावर ओततो त्या बळाला ‘प्रभाव’ असे नाव आम्ही देतो. गुरूचे हे सर्वश्रेष्ठ लक्षण आहे. श्रेष्ठ गुरु हा तितकासा पाठ देणारा गुरु नसतो; तो आपल्या भोवतालच्या सर्व ग्रहणशील साधकांमध्ये आपल्या केवळ उपस्थितीने दिव्य जाणीव ओतणारा आणि या दिव्य जाणिवेचीं घटकभूत तत्त्वे, प्रकाश, सामर्थ्य, शुद्धता आणि आनंद ओतणारा असतो.

पूर्णयोगाच्या गुरूचे आणखी एक लक्षण हे असेल की, तो आपल्या गुरुपणाची बढाई मारणार नाहीं; कारण त्याच्या ठिकाणीं सामान्य मानवाचा पोकळ डौल आणि वृथा आत्मगौरव करण्याची भावना असणार नाही. जर त्याला काही काम असेल तर, त्याची भावना अशी असेल की, ते काम ईश्वराने त्याजकडे सोपविलेले काम आहे; तो केवळ ईश्वराच्या इच्छेचा वाहक आहे, पात्र आहे, प्रतिनिधि आहे. आपल्या मानव बंधूंना मदत करणारा मानव, बालांचा नायक (नेता) असलेला एक बाल, अनेक दीप उजळणारा एक दीप, आत्म्यांना जागे करणारा एक जागृत आत्मा आहे असे तो मानील, आणि तो उच्चतम अवस्थेतील असेल तर तो ईश्वराची एक विशिष्ट शक्ति वा रूप असेल आणि तो स्वत:कडे ईश्वराच्या इतर शक्तींना येण्यासाठी हाक देणारा असेल.

– श्रीअरविन्द
(CWSA 23 : 61-62)