आध्यात्मिकता १४
अध्यात्म-साधनेसाठी ‘प्रामाणिकपणा’ ही अगदी अत्यावश्यक गोष्ट असते आणि कुटिलता हा त्यामधील कायमचा अडथळा असतो. ‘सात्त्विक वृत्ती ही आध्यात्मिक जीवनासाठी नेहमीच योग्य आणि सज्ज असते आणि राजसिक वृत्ती ही मात्र इच्छाआकांक्षाच्या भाराने दबून गेलेली असते,’ असे मानले जाते.
त्याच वेळी हेही खरे आहे की, ‘आध्यात्मिकता’ ही गोष्ट द्वंद्वातीत असते आणि त्यासाठी जर का कोणती गोष्ट आवश्यक असेलच तर ती म्हणजे खरी ऊर्ध्वमुख अभीप्सा! आणि ही अभीप्सा सात्त्विक वृत्तीच्या व्यक्तीइतकीच राजसिक वृत्तीच्या व्यक्तीमध्येही उदित होऊ शकते. जशी एखादी सात्त्विक वृत्तीची व्यक्ती तिच्या गुणांच्या अतीत होऊ शकते तशीच, राजसिक वृत्तीची व्यक्तीही तिच्या अवगुणांच्या, इच्छाआकांक्षांच्या अतीत होऊन, ‘ईश्वरी विशुद्धता’, ‘प्रकाश’ आणि ‘प्रेम’ यांच्याकडे वळू शकते.
अर्थात, व्यक्ती जेव्हा स्वतःच्या कनिष्ठ प्रकृतीवर विजय प्राप्त करून घेईल आणि स्वतःमधून त्या कनिष्ठ प्रकृतीला हद्दपार करेल तेव्हाच ही गोष्ट घडून येईल. कारण ती जर पुन्हा कनिष्ठ प्रकृतीमध्ये जाऊन पडली, तर ती व्यक्ती मार्गच्युत होण्याची देखील (to fall from the path) शक्यता असते किंवा अगदीच काही नाही तर, जोपर्यंत ती कनिष्ठ प्रकृतीमध्ये रमलेली असते तोपर्यंत तिची आंतरिक प्रगती खुंटलेली असते.
परंतु धार्मिक आणि आध्यात्मिक इतिहासामध्ये, मोठमोठ्या गुन्हेगारांचे महान संतांमध्ये किंवा अवगुणी वा कमी गुणवान व्यक्तींचे आध्यात्मिक साधकांमध्ये आणि ईश्वर-भक्तांमध्ये रूपांतर होताना वारंवार आढळून आले आहे. उदाहरणार्थ युरोपमध्ये सेंट ऑगस्टिन, भारतामध्ये चैतन्याचे जगाई आणि मधाई (चैतन्य महाप्रभुंचे शिष्य), बिल्वमंगल आणि त्यांच्यासारखी अनेक उदाहरणे आहेत. जो कोणी ‘ईश्वरा’च्या घराचे दरवाजे अगदी प्रामाणिकपणे ठोठावतो, त्याच्यासाठी ते कधीच बंद नसतात; मग त्या माणसाने भूतकाळात कितीही ठोकरा खाल्लेल्या असोत किंवा कितीही चुका केलेल्या असोत.
मानवी गुण आणि मानवी दोष म्हणजे अंतरंगात असणाऱ्या ईश्वरी तत्त्वावर असणारी अनुक्रमे तेजस्वी व काळोखी आवरणे असतात. पण जेव्हा ही आवरणे भेदली जातात तेव्हा, ‘आत्म्या’च्या उच्चतेकडे जाताना, ती दोन्हीही चांगली भाजून निघतात.
– श्रीअरविंद [CWSA 29 : 42]