Posts

दुर्दैवाने, या जगामध्ये मोठ्या प्रमाणात दुरिच्छा सुद्धा आहे. आणि त्या विविध प्रकारच्या दुरिच्छांमध्ये, काही अज्ञान व मूर्खपणातून येणाऱ्या छोट्या छोट्या दुरिच्छा असतात; दुष्टपणातून येणाऱ्या काही वाईट दुरिच्छा असतात आणि अदैवी शक्तींचा परिणाम म्हणून उद्भवणाऱ्या अत्यंत भयावह अशा दुरिच्छासुद्धा असतात. तर, अशा सगळ्या दुरिच्छा वातावरणात असतात (मी हे तुम्हाला घाबरविण्यासाठी सांगत नाहीये. कारण व्यक्तीने कशालाच घाबरता कामा नये.)

आणि मग या गोष्टी तुमच्यावर हल्ला करतात, कधीकधी हेतुपुरस्सर, तर कधी अहेतुकपणे. अहेतुकपणे कशा? तर इतर व्यक्तींच्या माध्यमातून. ज्यांच्यावर हल्ला झालेला असतो, त्याविषयी त्यांना काहीच माहीत नसते आणि त्याविषयी काही कल्पनाही नसताना, त्या व्यक्ती तो संक्रमित करतात. खरंतर, ते पहिले शिकार झालेले असतात. आणि ते त्यांचा आजार दुसऱ्यामध्ये संक्रमित करतात.

पण काही हल्ले हे हेतुपुरस्सर केलेले असतात. आपण एके दिवशी दुष्ट माणसं आणि त्यांच्या मानसिक रचनांविषयी बोलत होतो, ती माणसं तुमचं नुकसान व्हावं म्हणून हेतुपूर्वक तशा मानसिक रचना निर्माण करतात. आणि याहीपलीकडे जाणारी काही माणसं असतात.

ज्याला ‘काळी जादू’ म्हणतात, ते म्हणजे दिशाभूल झालेले विकृत गूढशास्त्र आहे, व्यक्तीने कधीही त्याच्या वाट्यास जाता कामा नये. पण दुर्दैवाने काही जण मात्र अगदी दुष्टपणाने त्याच्या नादी लागतात. तो भ्रम असतो किंवा ती अंधश्रद्धा असते, असे मानू नका, कारण ते खरेखुरे आहे. अशी काही माणसं असतात, त्यांना ही जादू कशी करावयाची ते माहीत असते आणि ती ते करतात. आणि त्यांच्या त्या जादूने ते अत्यंत घृणास्पद असे परिणाम घडवून आणतात.

अर्थात हे लक्षात घेतले पाहिजे की, जेव्हा तुमच्यामध्ये भीती नसते आणि तुम्ही संरक्षणामध्ये रहात असता तेव्हा तुम्ही सुरक्षित असता. पण हे केव्हा, ती अट महत्त्वाची आहे. आणि जर ती अट तुम्ही सदासर्वकाळ पाळली नाहीत तर, अत्यंत अनिष्ट अशा गोष्टीसुद्धा घडू शकतात. जोवर तुम्ही ताकदवान अशा स्थितीत असता, अगदी शुद्ध अशा स्थितीत असता, जेव्हा तुम्ही अजेय स्थितीत असता, अशा स्थितीत असताना तुमच्या विरोधात जर कोणी काही केले तर, ती गोष्ट आपोआपपणे त्यांच्यावरच जाऊन आदळते. टेनिसचा चेंडू भिंतीवर फेकला तर, तो जसा तुमच्याकडेच परत येतो; अगदी त्याचप्रमाणे ती गोष्ट त्यांच्याकडे परत जाते, कधीकधी तर जास्तच ताकदवान बनून जाते आणि अशा रीतीने त्यांना त्यांच्या स्वतःच्याच दुष्टपणाची शिक्षा मिळालेली असते. पण अर्थातच ज्या व्यक्तीविरुद्ध ती काळी जादू करण्यात आली होती, त्या व्यक्तीच्या आंतरिक शक्तीवर आणि शुद्धतेवर हे सारे काही अवलंबून असते. मी अशी अनेक उदाहरणे पाहिलेली आहेत, अनुभवलेली आहेत.
(क्रमश:)

– श्रीमाताजी

(CWM 05 : 171-181)