Posts

(श्रीअरविंद लिखित एका पत्रामधून…)

तुम्ही कार्यासाठी जोपर्यंत त्या ‘शक्ती’चा उपयोग केलात आणि तुम्ही जोपर्यंत त्या कार्याला धरून राहिलात तोपर्यंत त्या शक्तीचे साहाय्य तुम्हाला लाभले. त्या कार्याचे स्वरूप हे धार्मिक आहे की अ-धार्मिक ही बाब प्रथमतः तितकीशी महत्त्वाची नसते, ज्या दृष्टिकोनातून ते कार्य केले जाते तो आंतरिक दृष्टिकोन महत्त्वाचा असतो. तो दृष्टिकोन आंतरात्मिक (psychic) नसून प्राणिक (vital) असेल, तर अशा वेळी व्यक्ती स्वतःला त्या कार्यात झोकून देते आणि आंतरिक संपर्क गमावून बसते. आणि तो दृष्टिकोन जर आंतरात्मिक असेल तर, व्यक्तीचा आंतरिक संपर्क टिकून राहतो, आणि त्या कार्याला ‘शक्ती’चे साहाय्य लाभत आहे किंवा ती ‘शक्ती’च ते कार्य करत आहे, असे त्या व्यक्तीला जाणवते आणि साधना प्रगत होत राहते.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 271)

कर्म आराधना – १४

एका नवीन गोष्टीच्या उभारणीसाठी आधीची गोष्ट मोडावी लागणे हे काही चांगले धोरण नव्हे. जे समर्पित झालेले आहेत आणि जे ‘ईश्वरा’साठी कार्य करू इच्छितात त्यांनी धीर धरला पाहिजे आणि गोष्टी योग्य क्षणी व योग्य पद्धतीने करण्यासाठी, वाट कशी पाहावी हे त्यांनी जाणून घेतले पाहिजे.
*
एखादे कार्य हाती घ्यायचे आणि ते तसेच अर्धवट सोडून द्यायचे आणि पुन्हा एखादे नवीन कार्य करायला लागायचे, ही काही तितकीशी हितकर सवय नाही.

– श्रीमाताजी
(CWM 14 : 306)