Posts

साधनेची मुळाक्षरे – ०५

मन स्थिर करण्यासाठी व आध्यात्मिक अनुभूती मिळविण्यासाठी, प्रकृतीचे शुद्धिकरण होणे आणि तिची तयारी होणे आवश्यक असते. यासाठी कधीकधी अनेक वर्षेसुद्धा लागतात. योग्य वृत्तीने केलेले कर्म हा यासाठी सर्वांत सोपा मार्ग आहे – म्हणजेच इच्छा किंवा अहंकारविरहित असलेले कर्म; इच्छा, मागणी किंवा अहंकाराची कोणतीही स्पंदने निर्माण झाली की त्याला लगेच नकार देत केलेले कर्म; ‘दिव्य माते’ प्रत अर्पण म्हणून केलेले कर्म; ‘दिव्य माते’चे स्मरण करत आणि तिच्या शक्तीने आविष्कृत व्हावे आणि कार्य हाती घ्यावे म्हणून केलेली तिची प्रार्थना, की ज्यामुळे केवळ आंतरिक शांततेतच तुम्हाला तिची (दिव्य मातेची) उपस्थिती आणि तिचे कार्यकारकत्व जाणवू शकेल असे नव्हे तर, कर्मामध्येदेखील ते तुम्हाला जाणवू शकेल.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 226)

प्रश्न : भौतिक जाणिवेमध्ये आणि पूर्णत: भौतिक परिस्थितीमध्ये आपल्याला सदासर्वकाळ अडकवून ठेवणाऱ्या भौतिक जाणिवेमधून बाहेर कसे पडावे?

श्रीमाताजी : ते करण्याचे अगणित मार्ग आहेत. बौद्धिक, भावनिक, कलात्मक आणि आध्यात्मिक मार्ग आहेत. आणि साधारणपणे, ज्याला जो मार्ग सर्वाधिक सोपा वाटतो तो मार्ग त्याने अवलंबणे कधीही चांगले. कारण सर्वात अवघड असे जे आहे त्यापासून सुरुवात करावयाची म्हटले तर काहीच हाती लागणार नाही. आणि इथेच आपण श्रीअरविंदांनी ‘The Synthesis of Yoga’ या ग्रंथामध्ये सांगितल्याप्रमाणे ज्ञानमार्ग, भक्तिमार्ग किंवा कर्ममार्ग यांपाशी परत येऊन पोहोचतो. ह्यातील कर्ममार्ग हा प्रामुख्याने तुम्हाला भौतिक जीवनाशी जोडून ठेवतो आणि त्यामध्येच मुक्तीचा शोध घेण्यास प्रवृत्त करतो. कदाचित हा सर्वात परिणामकारक पण सर्वात अवघड असा मार्ग आहे.

बहुतांशी मुमुक्षू लोकांना ध्यानाचा, एकाग्रतेचा मार्ग, ह्या भौतिक जीवनापासून दूर राहण्याचा, भौतिक क्रियाकलापांचा परित्याग करण्याचा मार्ग हा कर्ममार्गापेक्षा निश्चितपणे सोपा वाटतो. पण, ते भौतिक चेतनेला ती जशी आहे तशीच सोडून देतात, तिच्यामध्ये कोणतेही परिवर्तन घडवून न आणता, तशीच सोडून देतात; ह्या मार्गामध्ये, व्यक्ती जोवर एखाद्या साधु वा संन्याशाप्रमाणे सक्रिय जीवन बाजूला सारत नाही आणि सदासर्वदा ध्यानामध्ये निमग्न राहत नाही तोवर तिला काहीच साध्य होत नाही. म्हणजेच, व्यक्तित्वाचा एक संपूर्ण भाग रुपांतरित झाल्याविना तसाच शिल्लक राहतो. त्यांच्यासाठी रूपांतरण करणे हा उपाय नसून, परित्याग करणे, शक्य तितक्या त्वरेने या शरीरातून बाहेर पडणे हाच केवळ त्यावरील उपाय असतो. पूर्वी योगसाधनेमध्ये हेच अभिप्रेत असे आणि साहजिकच ते अधिक सोपे होते. पण आपल्याला हवे आहे ते हे नाही.

आपल्याला शारीरिक, भौतिक जाणिवेचे रूपांतरण हवे आहे, त्याचा परित्याग करणे अभिप्रेत नाही. आणि येथेच श्रीअरविंदांनी अगदी थेट आणि अगदी परिपूर्ण असा परमेश्वराप्रत नेणारा समर्पणाचा मार्ग सुचविलेला आहे. क्रमश: अधिकाधिक समग्र होत जाणारे आणि भौतिक बाबींचा व भौतिक जाणिवेचादेखील समावेश करून घेणारे समर्पण. आणि व्यक्ती ते करण्यामध्ये यशस्वी झाली तर शरीर, भौतिक हे मार्गातील धोंड न ठरता, साहाय्यक बनते.

– श्रीमाताजी
(CWM 08 : 299-300)

प्रत्येक मानवी कर्म ईश्वराच्या इच्छेला समर्पित करावे हे साध्य कर्ममार्ग मानवाच्या समोर ठेवतो. या मार्गाचा आरंभ, आमच्या कर्मामागे असणारा अहंभावप्रधान हेतू आम्ही सर्वथा टाकून द्यावा, स्वार्थी हेतूने कोणतेही कर्म आम्ही करू नये, सांसारिक फळासाठी कोणतेही कर्म आम्ही करू नये या व्रतापासून होतो. या त्यागाच्या व्रताने कर्ममार्ग हा आमचे मन व आमची इच्छा शुद्ध करू शकतो; या शुद्धिकरणाचा परिणाम म्हणून आम्हाला सहजच ही जाणीव होऊ लागते की, महान विश्वशक्ती हीच आमच्या सर्व कर्मांची खरी कर्ती आहे; आणि या शक्तीचा स्वामी ईश्वर हा या कर्माचा खरा स्वामी व नेता आहे; व्यक्ती हा केवळ एक मुखवटा आहे; व्यक्ती ही सबब आहे; या शक्तीचे ती एक साधन आहे. किंवा अधिक सकारात्मकपणे सांगावयाचे झाले तर व्यक्ती हे कर्माचे व सांसारिक संबंधाचे जाणीवयुक्त केंद्र आहे असे वर्णन करता येईल. कर्मयोगी कर्माची निवड व त्याची दिशा अधिकाधिक जाणीवपुर:सर ईश्वराच्या इच्छेवर आणि विश्वशक्तीवर सोपवितो. आमचे कर्म व आमच्या कर्माची फळे शेवटी ईश्वराला व त्याच्या विश्वशक्तीला समर्पण करण्यात येतात. आमचा आत्मा दृश्यांच्या कैदेत असतो तो मुक्त व्हावा; आमचा आत्मा प्रापंचिक व्यापारांच्या प्रतिक्रियांच्या बंधनात असतो, तो त्या बंधनातून मुक्त व्हावा हा या समर्पणाच्या मागचा हेतू असतो. भक्तिमार्ग व ज्ञानमार्ग यांच्याप्रमाणे कर्ममार्गही नामरूपात्मक अस्तित्वातून मुक्त होऊन परमात्म्यांत विलीन होण्यासाठी वापरला जातो.

– श्रीअरविंद
(CWSA 23 : 09-10)