Tag Archive for: कंटाळा

 

व्यक्ती तरुण असो किंवा वृद्ध असो, तिने जर प्रगती केली नाही तर तिला कंटाळा येतो. प्रगती करण्यासाठीच आपण या पृथ्वीवर आलो आहोत. प्रगतीविना हे जीवन किती कंटाळवाणे होऊन जाईल! बरेचदा जीवन एकसुरी, नीरस असते. त्यामध्ये काही मजाच नसते. ते बरेचदा सुंदरही नसते. परंतु तुम्ही त्या जीवनाकडे जर प्रगती करण्याचे क्षेत्र म्हणून पाहिलेत तर मग मात्र प्रत्येक गोष्ट बदलून जाते, प्रत्येक गोष्ट स्वारस्यपूर्ण बनते आणि मग कंटाळा या गोष्टीला जागाच राहत नाही.

पुढच्या वेळी जेव्हा कधी तुम्हाला कंटाळा येईल तेव्हा काहीच न करता वेळ वाया घालवण्यापेक्षा हा कंटाळा कशामुळे येत आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करा. त्यातही तुमच्याकडे जर निरीक्षण क्षमता असेल आणि तुम्ही खरोखरच (कंटाळा म्हणजे नक्की काय हे) समजून घ्यायचा प्रयत्न केलात तर तुम्हाला लवकरच असे लक्षात येईल की, जणू एक प्रकारचा चमत्कार झाला आहे आणि आता तुम्हाला कंटाळवाणे वाटत नाहीये. हा उपाय प्रत्येक गोष्टीबाबतच लागू पडतो.

कधीकधी काही विशिष्ट परिस्थितीमध्ये, प्रत्येक गोष्टच उदासवाणी, कंटाळवाणी, वेडेपणाची वाटू लागते. त्याचा अर्थ असा की तुम्हीदेखील त्या परिस्थितीइतकेच कंटाळवाणे झाला आहात आणि त्यातून हे दर्शविले जाते की, तुम्ही तेव्हा प्रगती करत नसता. ही कंटाळवाणेपणाची जणू एक लाट असते. या कंटाळवाणेपणासारखी, आपल्या जीवनाच्या प्रयोजनाशी विरोधी असणारी अशी अन्य कोणतीच गोष्ट असू शकत नाही. अशा वेळी तुम्ही प्रयत्नपूर्वक स्वतःला असे सांगितले पाहिजे की, “मला आलेल्या या कंटाळ्याचा अर्थ असा आहे की, मला काहीतरी नवीन शिकले पाहिजे, मी माझ्यामध्ये काहीतरी प्रगती केली पाहिजे, माझ्यामधील जडत्वावर विजय मिळविला पाहिजे, माझ्यातील एखाद्या दुर्बलतेवर मी मात केली पाहिजे.”

कंटाळा ही चेतनेची सुस्ती असते. त्यावरील उपाय तुम्ही तुमच्या स्वतःमध्येच शोधण्याचा प्रयत्न केलात तर, तो कंटाळा त्वरित नाहीसा होऊन जाईल. बरेचदा लोकांना जेव्हा कंटाळवाणे वाटते तेव्हा चेतनेमध्ये एक पायरी उन्नत होण्याचा प्रयत्न करण्याऐवजी, ते एक पायरी खाली घसरतात. ते आधी जिथे होते त्यापेक्षाही अजून एक पायरी खाली उतरतात आणि मूर्खपणाच्या गोष्टी करत राहतात, त्यांचा कंटाळवाणेपणा घालविण्यासाठी ते काहीतरी अचकटविचकट गोष्टी करत राहतात. आपले मनोरंजन करण्याच्या नावाखाली ते स्वतःला एका धुंदीमध्ये, नशेमध्ये बुडवून टाकतात; स्वतःची तब्येत बिघडवून घेतात आणि मेंदू मृतवत करून टाकतात; विचारशक्ती गमावून बसतात. स्वतःचे असे पतन करण्याऐवजी जर त्यांनी स्वतःचे उन्नयन केले तर, त्यांनी प्रगती करण्याच्या या संधीचा सदुपयोग केला असे म्हणता येईल.
(उत्तरार्ध उद्या…)

– श्रीमाताजी (CWM 12 : 74)

तुम्हाला जेव्हा एखाद्या गोष्टीचा कंटाळा आलेला असतो, तुम्हाला एखादी गोष्ट वेदनादायी किंवा अगदी अस्वस्थ करणारी वाटत असते, अशा वेळी जर तुम्ही काळाच्या (time) अनंततेचा आणि अवकाशाच्या (space) असीमतेचा विचार करायला सुरुवात केलीत, आजवर जे काही घडून गेले आहे आणि येथून पुढे जे घडणार आहे, त्याचा तुम्ही विचार केलात आणि आत्ताचा क्षण हा अनंत काळामधील खरोखरच एका श्वासाइतकाच आहे असा तुम्ही विचार केलात तर, काळाच्या अनंततेमध्ये असणाऱ्या या एका एवढ्याशा क्षणामुळे अस्वस्थ होणे हे तुम्हाला अगदीच हास्यास्पद वाटू लागेल. …खरोखरच, काळाच्या अनंततेमध्ये एका क्षणाचे मोल ते काय? खरोखरच व्यक्तीला हे प्रत्यक्षात उतरवता आले तर….

डोळ्यांसमोर चित्र आणा की, ज्या इवल्याशा पृथ्वीवर आपण वावरत असतो, ते आपण म्हणजे एक किती किरकोळ व्यक्ती आहोत आणि त्यामध्ये चेतनेचा हा एक चिमुकला कण आहे, एक क्षण आहे, ज्यामुळे आत्ता तुम्ही दुखावल्यासारख्या झाले आहात किंवा तुम्हाला तो दु:खद वाटत आहे तो क्षण डोळ्यांसमोर आणा. वास्तविक, हा क्षण तुमच्या अस्तित्वाचा एक अगदी छोटासा क्षण आहे. आणि खुद्द तुम्हीसुद्धा यापूर्वीच्या अनेक प्रसंगांमधून येथवर आलेला असता आणि यापुढेही अनेक गोष्टी घडायच्या असतात. तेव्हा ज्या गोष्टी आत्ता तुमच्यावर एवढा परिणाम करत आहेत त्या अजून दहा वर्षांनी तुम्ही कदाचित पूर्णपणे विसरून गेलेला असाल किंवा जरी अगदी त्या गोष्टी आठवल्याच तर तुम्ही स्वतःच म्हणाल की, “मी या गोष्टीला इतके का बरे महत्त्व दिले होते?”

तुम्हाला खरोखरच जाणवू लागते की, स्वतःला आणि आपल्याबाबतीत जे घडते आहे त्याला इतके महत्त्व देणे, हे किती हास्यास्पद आहे. तुम्ही जर ही गोष्ट अगदी सुयोग्य रितीने केलीत तर, अगदी तीन मिनिटांमध्ये सारे दुःख नाहीसे होईल. इतकेच काय पण एखादी अगदी तीव्र वेदनासुद्धा अशाच पद्धतीने नाहीशी होईल. त्यासाठी एकाग्रता करायची आणि स्वतःला अनंताच्या व काळाच्या पटलावर ठेवायचे. सर्व अस्वस्थता निघून जाते आणि व्यक्ती तिला भेडसावणाऱ्या त्या त्रासदायक गोष्टीपासून मोकळी होते. ही गोष्ट योग्य पद्धतीने कशी करायची हे माहीत असेल तर, व्यक्ती सर्व आसक्तीपासून आणि अगदी निरतिशय दुःखामधून बाहेर पडू शकते. ही पद्धत तुम्हाला तुमच्या क्षुद्र अहंच्या जाणिवेतून त्वरित बाहेर काढते.

– श्रीमाताजी [CWM 06 : 345-346]

(पूर्वार्ध)

जीवनामध्ये कित्येक वेळा एक प्रकारचे रिकामपण जाणवते, कधी एखादा रिकामा क्षण किंवा काही मिनिटे किंवा कधीकधी त्याहूनही अधिक वेळ मिळतो. अशा वेळी तुम्ही काय करता? तुम्ही स्वतःचे लक्ष लगेचच दुसरीकडे कोठेतरी वळविण्याचा प्रयत्न करता आणि वेळ जाण्यासाठी मूर्खपणाच्या या नाही तर त्या गोष्टी शोधून काढता. ही गोष्ट सर्वत्र दिसून येते. लहानमोठे सारेच जण कंटाळा येऊ नये म्हणून, काही ना काही तरी करत राहण्यात वेळ घालवितात. कंटाळा या गोष्टीचा त्यांना सर्वात जास्त तिटकारा असतो आणि मूर्खपणाच्या गोष्टी करत राहणे हा त्यांचा, त्या कंटाळ्यापासून सुटका करून घेण्याचा मार्ग असतो.

पण कंटाळ्यापासून सुटका करून घेण्याचा एक अधिक चांगला मार्ग आहे. तो म्हणजे पुढील गोष्टी लक्षात ठेवायच्या – जेव्हा तुम्हाला थोडा रिकामा वेळ मिळतो, एक तास असो किंवा काही मिनिटे असोत, तेव्हा स्वतःला सांगा, “निदान आता तरी मला काही वेळ एकाग्र होण्यासाठी, विखुरलेल्या ‘मी‌’चे एकत्रीकरण करण्यासाठी, जीवनाचे उद्दिष्ट पुनर्जीवित करण्यासाठी, सत्य आणि शाश्वत यांच्याप्रत स्वतःला समर्पित करण्यासाठी मिळाला आहे. (तो वेळ मी व्यर्थ दवडता कामा नये.)’’

तुम्ही जेव्हा बाह्य परिस्थितीने गांजलेले नसता तेव्हा, त्या प्रत्येक वेळी तुम्ही जर मी आत्ता सांगितले त्याप्रमाणे केलेत तर, तुम्ही (योग)मार्गावर वेगाने प्रगती करत आहात, असे तुम्हाला आढळेल. वायफळ गप्पांमध्ये, निरुपयोगी गोष्टींमध्ये किंवा तुमची चेतना ज्यामुळे निम्न पातळीवर उतरते अशा गोष्टींचे वाचन करण्यामध्ये तुमचा वेळ घालविण्यापेक्षा किंवा तुम्हाला विचलित करणाऱ्या इतर सर्व गोष्टींमध्ये वेळ घालविण्यापेक्षा, वर सांगितलेल्या गोष्टींसाठी म्हणजेच योग्य कारणांसाठी वेळ व्यतीत करणे अधिक उत्तम…

(उत्तरार्ध उद्या…)

– श्रीमाताजी (CWM 03 : 250)

आध्यात्मिकता ४०

(पूर्वार्ध)

जीवनामध्ये कित्येक वेळा एक प्रकारचे रिकामपण जाणवते, कधी एखादा रिकामा क्षण, किंवा काही मिनिटे, किंवा कधीकधी त्याहूनही अधिक वेळ मिळतो. आणि तेव्हा तुम्ही काय करता? तुम्ही स्वतःचे लक्ष लगेचच दुसरीकडे कोठेतरी वळविण्याचा प्रयत्न करता आणि वेळ जाण्यासाठी मूर्खपणाच्या या नाहीतर त्या गोष्टी शोधून काढता. ही अगदी सार्वत्रिक बाब आहे. लहानमोठे सारेच जण, कंटाळा येऊ नये म्हणून, काही ना काही तरी करत राहण्यात वेळ घालवितात. कंटाळा या गोष्टीचा त्यांना सर्वात जास्त तिटकारा असतो आणि त्या कंटाळ्यापासून सुटका करून घेण्याचा त्यांचा मार्ग म्हणजे मूर्खपणाच्या गोष्टी करत राहणे हा असतो.

पण, कंटाळ्यापासून सुटका करून घेण्याचा, त्यापेक्षा एक अधिक चांगला मार्ग आहे, तो म्हणजे स्मरण ठेवणे. तुमच्याजवळ जेव्हा थोडासा रिकामा वेळ असतो, एक तास असो किंवा काही मिनिटे असोत, स्वतःला सांगा, “निदान आता तरी मला काही वेळ एकाग्र होण्यासाठी, विखुरलेल्या ‘मी’चे एकत्रीकरण करण्यासाठी, जीवनाचे प्रयोजन जगण्यासाठी, ‘सत्य’ आणि ‘शाश्वता’प्रत स्वतःला समर्पित करण्यासाठी मिळाला आहे.”

तुम्ही जेव्हा बाह्य परिस्थितीने गांजलेले नसता तेव्हा, त्या प्रत्येक वेळी तुम्ही जर अशा गोष्टी केल्यात तर, तुम्ही या मार्गावर वेगाने प्रगती करत आहात, असे तुम्हाला आढळेल. तुमचा वेळ वायफळ गप्पांमध्ये, निरुपयोगी गोष्टींमध्ये, तुमची चेतना ज्यामुळे निम्नतर पातळीवर उतरते अशा गोष्टींचे वाचन करण्यामध्ये घालविण्यापेक्षा; तसेच तुम्हाला चंचल, विचलित करणाऱ्या इतर सर्व गोष्टींमध्ये वेळ घालविण्यापेक्षा, वर सांगितलेल्या गोष्टींसाठी म्हणजेच योग्य कारणांसाठी वेळ व्यतीत करणे अधिक उत्तम.

– श्रीमाताजी [CWM 03 : 250]