Posts

आत्मशोधाच्या पाऊलवाटेवर… (२१)

…तुम्हाला योगाची हाक आलेली असू शकते आणि तुम्ही योगासाठी पात्रदेखील असू शकता, परंतु योगाचे विविध मार्ग आहेत आणि प्रत्येक मार्गाचे ध्येय व उद्दिष्ट भिन्न भिन्न असते. इच्छा-वासनांवर विजय मिळविणे आणि जीवनातील सामान्य नातेसंबंध बाजूला सारणे तसेच अनिश्चिततेकडून चिरस्थायी निश्चिततेप्रत वाटचाल करण्याचा प्रयत्न करणे या गोष्टी सर्व योगांमध्ये समानच असतात. व्यक्ती स्वप्न व निद्रा, तहान व भूक इत्यादी गोष्टींवर विजय मिळविण्याचाही प्रयत्न करू शकते. परंतु जीवनाविषयी किंवा जगाबद्दल कोणतेही कर्तव्य न बाळगणे किंवा संवेदना मारून टाकणे किंवा त्यांच्या कृतींना पूर्णपणे प्रतिबंध करणे या गोष्टी श्रीअरविंदांच्या योगाचा (पूर्णयोगाचा) भाग असू शकत नाहीत.

दिव्य ‘सत्या’चा ‘प्रकाश’, ‘शक्ती’, ‘परमानंद’ आणि त्याची गतिशील निश्चितता खाली उतरवून, त्यायोगे जीवन रूपांतरित करणे हे श्रीअरविंदांच्या ‘योगा’चे उद्दिष्ट आहे. हा ऐहिकाचा त्याग करणारा संन्यासवादी ‘योग’ नसून, हा दिव्य ‘जीवना’चा ‘योग’ आहे.

– श्रीअरविंद (CWSA 35 : 541-542)

आत्मशोधाच्या पाऊलवाटेवर… (१३)

उच्चतर चेतनेमध्ये उन्नत होणे आणि केवळ सामान्य प्रेरणांनिशी नव्हे तर, त्या उच्चतर चेतनेमध्ये राहून जीवन जगणे हे, येथे (श्रीअरविंद आश्रमामध्ये) आचरल्या जाणाऱ्या योगसाधनेचे उद्दिष्ट आहे. यामध्ये चेतनेच्या परिवर्तनाप्रमाणेच जीवनाचे परिवर्तनही अपेक्षित आहे.

सामान्य जीवनापासून संबंध तोडता येतील अशी परिस्थिती सर्वांनाच उपलब्ध असते असे नाही; आणि म्हणून अनुभवाचे एक क्षेत्र आणि साधनेतील प्राथमिक टप्प्यांवर द्यायचे स्वयं-प्रशिक्षण या भूमिकेतून ती माणसं सामान्य जीवन स्वीकारतात. पण त्यांनी सांसारिक जीवनाकडे ‘अनुभवाचे क्षेत्र’ म्हणून पाहण्याची, तसेच सहसा त्याच्याबरोबरीने ज्या ज्या गोष्टी येतात त्या साऱ्या सामान्य कल्पना, आसक्ती, सामान्य इच्छा यांपासून मुक्त होण्याची काळजी घेतली पाहिजे; अन्यथा असे जीवन म्हणजे एक लोढणे बनते, साधनेमधील तो अडथळा ठरतो. परिस्थितीमुळे व्यक्तीला जर तसे जीवन जगण्यास भाग पाडले नसेल तर, तुम्ही तुमचे सामान्य जीवन आहे तसेच चालू ठेवण्याची कोणतीच आवश्यकता नाही.

– श्रीअरविंद (CWSA 28 : 422)

विचार शलाका – ०५

पूर्वीच्या योगांच्या तुलनेत ‘पूर्णयोग’ नवीन आहे : व्यक्तीने केवळ स्वतःसाठी, स्वतःपुरता ईश्वराचा साक्षात्कार करून व्यक्तिगत सिद्धी प्राप्त करून घ्यावी हे येथे उद्दिष्ट नाही. व्यक्तीने केवळ अति-वैश्विक उपलब्धीच नव्हे तर येथील पृथ्वीचेतनेसाठी, वैश्विक अशी काही प्राप्ती करून घ्यावी हेही येथे अपेक्षित आहे. आजवर या पृथ्वी-चेतनेमध्ये, अगदी आध्यात्मिक जीवनामध्येसुद्धा सक्रिय नसलेली किंवा सुसंघटित नसलेली अतिमानसिक (supramental) चेतनेची शक्ती आणणे आणि ती शक्ती सुसंघटित करणे आणि ती थेटपणे सक्रिय होईल हे पाहणे, ही गोष्टसुद्धा साध्य करून घ्यायची आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 400)

आध्यात्मिक ज्ञानाचे मन ज्या एकमेव उद्दिष्टाकडे वळले पाहिजे ते उद्दिष्ट म्हणजे शाश्वत परब्रह्म होय. या इथे प्रकृतीच्या धुक्याने परिवेष्टित झालेला आणि अभ्राच्छादित झालेला आत्मा, त्या ‘शाश्वता’वर लक्ष स्थिर करून, स्वत:ची स्वाभाविक असणारी अशी अमर्त्यतेची आणि विश्वातीततेची मूळ चेतना पुन:प्राप्त करून घेऊन, तिचा आनंद घेतो.

– श्रीअरविंद
(CWSA 19 : 415)