Posts

साधनेची मुळाक्षरे – १७

(श्रीअरविंद लिखित एका पत्रामधून…)

तुम्ही ज्या सर्व अडचणींचे वर्णन करत आहात त्या गोष्टी बहुतेक सर्वच माणसांच्या बाबतीत अगदी स्वाभाविकपणे येत असतात. एखादी व्यक्ती शांतपणे ध्यानाला बसलेली असते तेव्हा तिला ईश्वराचे स्मरण राखणे आणि ईश्वरी उपस्थितीची जाणीव ठेवणे तुलनेने सोपे असते; पण व्यक्तीला कामामध्ये व्यग्र राहावे लागत असेल तर तसे करणे तिला अधिक कठीण असते. कर्मामधील चेतना आणि स्मरण हे क्रमाक्रमानेच यायला हवे, ते एकदमच एकावेळी होईल अशी अपेक्षा तुम्ही बाळगता कामा नये, कोणालाच ते तसे एकदम साध्य होत नाही. ते दोन मार्गांनी घडते – पहिला मार्ग म्हणजे, व्यक्तीने ‘श्रीमाताजीं’चे स्मरण राखण्याचा सराव केला तर आणि व्यक्ती जेव्हा काहीतरी करते तेव्हा त्या प्रत्येक वेळी ती कृती ‘श्रीमाताजीं’ना अर्पण करण्याचा व्यक्तीने सराव केला तर (कर्म करत असताना सर्वकाळ नाही, तर कर्मारंभी किंवा व्यक्तीला जेव्हा जेव्हा स्मरण होईल तेव्हा) मग ती गोष्ट हळूहळू सोपी आणि प्रकृतीच्या दृष्टीने सवयीची होऊन जाते. दुसरा मार्ग म्हणजे – ध्यानामुळे आंतरिक चेतना विकसित होऊ लागते, जी चेतना एकाएकी किंवा अचानकपणे नाही तर, कालांतराने, आपोआप अधिकाधिक चिरस्थायी बनत जाते. कार्यकारी असणाऱ्या बाह्यवर्ती चेतनेहून विभिन्न असणाऱ्या या चेतनेची व्यक्तीला जाणीव होऊ लागते. कर्म करत असताना व्यक्तीला सुरुवातीला या विभिन्न चेतनेची जाणीव होत नाही, पण जेव्हा कर्म थांबते तेव्हा लगेचच व्यक्तीला असे जाणवते की, ती चेतना पूर्ण वेळ मागून आपल्याकडे लक्ष ठेवून होती; नंतर मग कर्म चालू असतानादेखील तिची जाणीव होऊ लागते, जणू काही आपल्या अस्तित्वाचे दोन भाग आहेत, अशी व्यक्तीला जाणीव होते. एक अस्तित्व निरीक्षण करत आहे आणि मागे राहून आधार पुरवीत आहे तसेच ‘श्रीमाताजीं’चे स्मरण करत आहे आणि दुसरे अस्तित्व कर्म करत आहे, अशी व्यक्तीला जाणीव होते. असे जेव्हा घडते तेव्हा सत्य-चेतनेनिशी कर्म करणे अधिकाधिक सोपे होते.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 259)

साधनेची मुळाक्षरे – १३

काम करत असताना ‘ईश्वरी उपस्थिती’ चे स्मरण ठेवणे हे सुरुवातीला सोपे नसते; परंतु काम संपल्यासंपल्या लगेचच जरी त्या उपस्थितीची जाणीव व्यक्तीला पुनरुज्जीवित करता आली तरी ठीक आहे. कालांतराने काम करत असतानाच त्या उपस्थितीची जाणीव आपोआपपणे होऊ लागेल.

*

समर्पणाचा नुसता दृष्टिकोन असून चालणार नाही तर, प्रत्येक कर्मच ‘श्रीमाताजीं’ना अर्पण केले पाहिजे म्हणजे मग तो दृष्टिकोन सदासर्वदा जीवित राहील. काम करत असताना त्या वेळामध्ये ध्यान करता कामा नये, कारण त्यामुळे कर्मामधून लक्ष निघून जाईल, परंतु ज्याच्याप्रत तुम्ही ते कर्म अर्पण करणार आहात त्या ‘एकमेवाद्वितीया’चे स्मरण तुमच्यामध्ये कायम असले पाहिजे. ही केवळ एक पहिली प्रक्रिया आहे; कारण, पृष्ठवर्ती मन कर्म करत असताना, ‘ईश्वरी उपस्थिती’च्या संवेदनेवर तुमच्या अंतरंगातील शांत अस्तित्व एकाग्र असल्याची सातत्यपूर्ण जाणीव जर तुम्हाला असू शकेल, किंवा ‘श्रीमाताजीं’ची शक्तीच कार्य करत आहे आणि तुम्ही केवळ एक माध्यम आहात किंवा एक साधन आहात अशी जाणीव जर तुम्हाला नेहमीच होऊ लागली तर मग, ईश-स्मरणाच्या जागी, ‘योगसाक्षात्कार’ स्वतःहूनच नित्य घडू लागेल तसेच कर्म करत असताना ईश्वराशी ऐक्य होण्यास सुरुवात होईल.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 258-259), (CWSA 32 : 247)