Posts

श्रीअरविंद : निर्भरतेची वृत्ती हे परिपूर्ण साधनेचे महान रहस्य आहे. कोणतीही परिस्थिती असली तरी किंवा कोणतीही अडचण आली तरी, ईश्वरावर विसंबून राहणे म्हणजे ‘निर्भर’ असणे. जेव्हा सारे काही सुरळीत चालू असते तेव्हा ‘निर्भर’ असणे याला विशेष काही अर्थ नाही.

साधक : जेव्हा प्राणाचा क्षोभ होतो तेव्हा हे निर्भर असणे मी कायम कसे टिकवून ठेवू ? नकार देऊन ? की अलिप्त राहून ?

श्रीअरविंद : प्रथम अलिप्तता, नंतर अलिप्ततेसहित नकार.

साधक : पण जेव्हा आतूनच एक प्रकारचा असमाधानाचा सूक्ष्मसा ताण जाणवत असतो तेव्हा मी स्वतःला अलिप्त कसे ठेवू?

श्रीअरविंद : त्या असमाधानापासून अलिप्त होऊन. …स्वतःमधील जो ‘साक्षी’ आहे त्याने मागे उभे राहणे आणि येणाऱ्या स्पंदनांकडे ती स्वतःची (आपल्या आत्म्याची स्पंदने) आहेत असे समजण्यास नकार देणे, ती स्पंदने म्हणजे आपल्या गतकालीन प्रकृतीची सवय आहे किंवा सार्वत्रिक प्रकृतीचे आपल्यावर झालेले आक्रमण आहे, अशा रीतीने त्यांच्याकडे पाहाणे. असे समजून त्यांना हाताळणे म्हणजे अलिप्त होणे. हे अवघड आहे असे वाटू शकते पण व्यक्ती चिकाटीने प्रयत्न करत राहिली तर तिला ते चांगल्या रीतीने साध्य होते.

– [Nirodbaran’s Correspondence with Sri Aurobindo, Vol. II : 650-657]

श्रीमाताजी : मी तुम्हाला काय सांगितले ते लक्षात असू दे. ‘मी’चा शोध घेण्यासाठी कष्ट घ्या. तुमच्यासमोर जो मार्ग मी आखून दिला आहे त्यावर मार्गक्रमण करा. या कार्याइतके अन्य कोणतेच कार्य महत्त्वाचे नाही. याच्याशी तुलना करता इतर कोणतेच कार्य इतके महत्त्वाचे नाही. ‘ईश्वरा’चा शोध घ्यायचा. हेच जीवन आहे, हेच ध्येय आहे, हाच आनंदठेवा आहे. ‘ईश्वरा’वर निस्सीम ‘प्रेम’ करा जेणेकरून ‘तो’ नेहमीच तुमच्यासोबत राहील. सर्व कार्याचा कर्ता-करविता ‘तो’च असू द्यावा. ‘तो’ तुमच्यासोबत कर्म करतो. ‘तो’ तुमच्याबरोबर धडपड करतो, प्रयत्नांची पराकाष्ठा करतो. ‘तो’ प्रत्येक पावलागणिक तुम्हाला मार्गदर्शन करतो. फक्त ‘ईश्वर’च.

– [The Supreme by Mona Sarkar : 97]

व्यक्तीमधील ‘आत्मा’ आणि वैश्विक ‘आत्मा’ हे एकच आहेत; प्रत्येक विश्वामध्ये, प्रत्येक व्यक्तीमध्ये, प्रत्येक वस्तुमध्ये, प्रत्येक कणामध्ये दिव्य अस्तित्व आहे आणि त्याचे आविष्करण करणे हे माणसाचे जीवितकार्य आहे. ते कार्य करण्यासाठी व्यक्तीला आधी त्याच्या अंतरंगात असणाऱ्या या ‘ईश्वरी अस्तित्वा’ची जाणीव झाली पाहिजे. …एकदा का ही सखोल चेतना प्राप्त करून घेतली की मग मात्र आपली भूमिकाच बदलून जाते. त्यामुळे आपले आकलन व्यापक होते, आपल्यामध्ये करूणेचा उदय होतो.

– श्रीमाताजी [CWM 02 : 41-42]

व्यक्तीमध्ये जर ‘ईश्वरा’चे अस्तित्व नसते, व्यक्तीच्या गाभ्यामध्ये जर ‘ईश्वरा’चे अस्तित्वच नसते, तर व्यक्तीला ‘ईश्वरा’ची जाणीव कधीच होऊ शकली नसती, ती एक अशक्यप्राय गोष्ट ठरली असती. …तुमच्या अंतरंगामध्ये ‘ईश्वर’ आहे आणि तुम्ही ‘ईश्वरा’मध्ये आहात, हे ज्या क्षणी तुम्हाला या किंवा त्या मार्गाने आकलन होते, जाणवते, किंवा जाणवायला सुरूवात होते, आणि जेव्हा तुम्ही ते मान्य करता, तेव्हा तुमचे दार साक्षात्काराच्या दिशेने किंचितसे खुले होते, किलकिले होते. नंतर कधीतरी मग अभीप्सा निर्माण झाली, ‘ईश्वरा’ला जाणून घेण्याची आणि ‘ईश्वर’च बनण्याची तीव्र निकड निर्माण झाली तर त्यामुळे, म्हणजे त्या तीव्र निकडीमुळे, ते किलकिले झालेले दार, व्यक्तीचा आतपर्यंत शिरकाव होईल इतके खुले होते. आणि एकदा का व्यक्तीचा आत शिरकाव झाला की, व्यक्तीला ‘आपण कोण आहोत’ याची जाणीव होते.

– श्रीमाताजी [CWM 07 : 236]

साधनेची मुळाक्षरे – २३

(श्रीअरविंद The Mother या ग्रंथामध्ये श्रीमाताजींचे स्वरूप उलगडवून दाखवीत आहेत, त्या ग्रंथातील हा अंशभाग…)

त्या एकमेवाद्वितीय आद्य विश्वातीत ‘शक्ती’चे – ‘श्रीमाताजीं’चे स्थान सर्व विश्वांच्या वर असते आणि त्या स्वतःमध्ये ‘परम ईश्वरा’ची शाश्वत चेतना बाळगून असतात. त्या एकट्या, परम ‘शक्ती’ आणि अनिर्वचनीय अशी ‘उपस्थिती’ स्वतःमध्ये साठवून असतात; जी ‘सत्यं’ आविष्कृत होणे आवश्यकच आहेत अशा ‘सत्यां’ना त्यांनी साद घातलेली असते; अशी सत्यं त्यांनी स्वतःमध्ये सामावून घेतलेली असतात; श्रीमाताजींच्या अनंत चेतनेच्या प्रकाशामध्ये गुप्त असणारी अशी जी सत्यं असतात, ती ‘सत्यं’ ‘परमरहस्या’मधून त्या खाली आणतात आणि श्रीमाताजी स्वत:च्या सर्वसामर्थ्यवान शक्तीमध्ये व असीम जीवनामध्ये आणि विश्वगत शरीरामध्ये, त्या सत्यांना शक्तिरूप प्रदान करतात. ‘परमेश्वर’ श्रीमाताजींमध्ये शाश्वत ‘सच्चिदानंद’ म्हणून कायमस्वरूपी आविष्कृत झालेला आहे; श्रीमाताजींद्वारे तो विश्वांमध्ये ‘ईश्वर-शक्ती’ या एका आणि दुहेरी चेतनेमध्ये आणि ‘पुरुष-प्रकृती’ या दुहेरी ‘तत्त्वां’द्वारे आविष्कृत झालेला आहे; श्रीमाताजींद्वारे त्याने ‘विश्वां’मध्ये आणि विविध ‘स्तरां’वर, ‘देवदेवता’ आणि त्यांच्या ‘शक्ती’ यांच्या माध्यमातून मूर्तरूप धारण केले आहे; आणि ज्ञात तसेच अज्ञात विश्वांमधील सर्वकाही त्यांच्याचमुळे साकार झाले आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 32 : 14-15)

साधनेची मुळाक्षरे – २२

एकमेव ‘ईश्वर’च सत्य आहे – उर्वरित सर्व मिथ्या आहे. आणि असे असूनसुद्धा ‘ईश्वर’च सर्वत्र आहे – संतांमध्ये आणि पापी व्यक्तीमध्ये सुद्धा तो विद्यमान आहे.

*

एकमेव ‘ईश्वर’च सत्य आहे – उर्वरित सर्व भ्रम आहे. आणि असे असूनसुद्धा ‘ईश्वर’च सर्वत्र व्यापलेला आहे – ऋषीमुनींमध्ये आणि अज्ञानी व्यक्तीमध्ये सुद्धा तो विद्यमान आहे.

*

एकमेव ‘ईश्वर’च प्रेम आहे – उर्वरित सर्व गोष्टी म्हणजे स्वार्थी भावुकता आहे. परंतु ‘ईश्वरी’ प्रेम हे सर्वत्र आणि सर्व वस्तुमात्रांमध्ये विद्यमान आहे.

– श्रीमाताजी
(White Roses : 37-38)

साधनेची मुळाक्षरे – २१

एक गोष्ट अगदी एक क्षणभरसुद्धा विसरू नका की, हे सारे त्या परमेश्वराने निर्माण केले आहे, ‘त्या’ने ते स्वतःमधूनच निर्माण केलेले आहे. ‘तो’ या साऱ्यांमध्ये फक्त उपस्थितच आहे असे नाही तर, ‘तो’ स्वतःच हे सारेकाही आहे. केवळ अभिव्यक्ती आणि आविष्करण यामध्ये एवढाच काय तो फरक आहे.

तुम्ही ही गोष्ट विसरलात तर, सर्वकाही गमावून बसाल.

*

साधक : ‘ईश्वर’ सर्व वस्तुमात्रांमध्येच, म्हणजे अगदी कचरापेटीमध्ये देखील असतो का?

श्रीमाताजी : हे संपूर्ण विश्व ‘ईश्वरा’चे आविष्करण आहे, परंतु या आविष्करणाचा प्रारंभ उगमाशी असलेल्या अगदी अचेतनतेपासून होतो आणि तेथून ते या चेतनेप्रत हळूहळू उन्नत होत राहते.

– श्रीमाताजी
(CWM 15 : 05)

साधनेची मुळाक्षरे – २०

शारीरिक किंवा भौतिक स्तरावर ‘ईश्वर’ स्वतःला सौंदर्याद्वारे अभिव्यक्त करतो; मानसिक स्तरावर ज्ञानाद्वारे, प्राणिक स्तरावर शक्तिद्वारे, आणि आंतरात्मिक स्तरावर प्रेमाद्वारे तो स्वतःला अभिव्यक्त करतो.

आपण जेव्हा पुरेसे उन्नत होतो तेव्हा हे चारही पैलू एकाच चेतनेमध्ये, प्रेम, तेजस्विता, शक्तिमानता, सौंदर्य या साऱ्यांनी परिपूर्ण, सर्वांना सामावून घेत, सर्वांमध्ये व्याप्त अशा रीतीने, परस्परांशी संयुक्त होतात, असा शोध आपल्याला लागतो.

वैश्विक लीलेला समाधानी करण्यासाठीच ही चेतना स्वतःला आविष्करणाच्या विविध स्तरांवर वा पैलूंमध्ये विभाजित करते.

– श्रीमाताजी
(CWM 15 : 06)

विचार शलाका – २५

(‘पूर्णयोग’ साध्य करायचा असेल तर व्यक्तीने कोणती गोष्ट नीट समजून घ्यायला हवी, ती गोष्ट श्रीमाताजी येथे सांगत आहेत. एखाद्या व्यक्तीची ईश्वरविषयक जी काही संकल्पना असते, ती म्हणजेच केवळ ईश्वर नाही, तर इतरांच्या त्याच्याविषयीच्या ज्या काही संकल्पना असतील त्या संकल्पनांनुसार देखील ईश्वर असू शकतो, आणि कोणाच्याच संकल्पनेत बसू शकणार नाही असाही तो असू शकतो, हे व्यक्तीने समजून घेतले पाहिजे असे श्रीमाताजी सांगत आहेत. त्या पुढे म्हणतात..)

सहजस्फूर्तपणे किंवा ईश्वराबाबत पुसटशीही जाणीव नसताना देखील, लोक त्यांच्या त्यांच्या संकल्पनेला साजेसे ‘ईश्वरा’ने असावे असा आग्रह धरतात. विचार न करताच अगदी उत्स्फूर्तपणे ते तुम्हाला सांगतात, “हा ईश्वर आहे, हा ईश्वर नाही!’ वास्तविक, ईश्वराबद्दल ते असे कितीसे जाणत असतात?

… “दिव्यत्व म्हणजे काय?” असे तुम्ही त्यांना विचारले तर मात्र उत्तर देणे त्यांना कठीण जाते, त्यांना काहीच माहीत नसते. …एखाद्या व्यक्तीला जाण जेवढी कमी, तेवढी ती व्यक्ती एखाद्या गोष्टीविषयी अधिक मतं बनविते, हे निखालस सत्य आहे. आणि जेवढी एखाद्या व्यक्तीला जाण अधिक, तेवढी ती मतप्रदर्शन कमी करते. आणि पुढे पुढे तर एक वेळ अशी येते की, जेव्हा व्यक्ती निरीक्षण करू लागते पण कोणतेही मत बनविणे तिला अशक्य होऊन बसते. व्यक्ती गोष्टी पाहू शकते, त्या जशा आहेत अगदी तशा त्या पाहू शकते, त्यांच्यातील परस्परसंबंध ती पाहू शकते, त्यांच्या त्यांच्या जागी ठेवून त्या गोष्टी ती पाहू शकते, त्या सद्यस्थितीत जिथे आहेत आणि जिथे त्या असायला पाहिजेत यातील फरक व्यक्तीला उमगतो. – या दोहोंमधील ही तफावत ही जगातील एक फार मोठी अव्यवस्था आहे हे सुद्धा अशा व्यक्तीला दिसते – पण ती व्यक्ती त्यावर टिप्पणी करत नाही, ती फक्त निरीक्षण करते.

आणि एक क्षण असा येतो की जेव्हा, “हा ईश्वर आहे आणि तो ईश्वर नाही” असे म्हणणे देखील त्या व्यक्तीला अवघड जाते. कारण, खरे सांगायचे तर, एक काळ असा येतो की, तिच्या दृष्टीला संपूर्ण विश्वच अशा समग्रपणे, सर्वंकष रीतीने दिसू लागते की तिला हे कळून चुकते की, येथे कशालाही धक्का न पोहोचू देता, येथील एकही गोष्ट या विश्वापासून वेगळी काढता येणे अशक्य आहे.

आणि अजून एकदोन पावले पुढे गेल्यावर व्यक्तीला निश्चितपणे असे कळते की, ‘ईश्वर-विरोधी’ वाटल्यामुळे आपल्याला ज्याचा धक्का बसला होता, ती गोष्ट केवळ तिच्या योग्य जागी नाही इतकेच. प्रत्येक गोष्ट अगदी तिच्या अचूक जागीच असली पाहिजे. तसेच, या आविष्कृत झालेल्या विश्वामध्ये सातत्याने नवनवीन तत्त्वांची, घटकांची भर घातली जात असते, त्या घटकांच्या सुसंवादी प्रगतिशील अशा व्यवस्थेमध्ये जेणेकरून तिचा प्रवेश होणे शक्य होईल, इतपत ती गोष्ट लवचिक, घडणसुलभ (plastic) देखील असली पाहिजे.

– श्रीमाताजी
(CWM 08 : 01-02)

विचार शलाका – २४

शरीराकडे ते जणू प्रेत आहे असे समजून पाहाणे, हे संन्यासवाद्यांचे लक्षण आहे. हा निर्वाणाचा मार्ग आहे. ही संकल्पना ऐहिक जीवनाच्या संकल्पनेशी मिळतीजुळती नाही. प्रत्येक गोष्टीमध्ये आनंद असला पाहिजे, चैतन्यामध्ये जेवढा आनंद आहे तेवढाच तो शरीरामध्येही असला पाहिजे. देह हा चैतन्याने बनलेला असतो, त्यामुळे देह हा देखील ‘ईश्वरा’चेच रूप आहे. मी या विश्वातील सर्व वस्तुमात्रांमध्ये ‘ईश्वरा’ला पाहतो. येथील सर्व काही हे ‘ब्रह्म’च आहे, ‘वासुदेव’, ‘ईश्वर’ हाच सर्व काही आहे, (सर्वम् इदम् ब्रह्म, वासुदेवं सर्वमिति) ही दृष्टी वैश्विक आनंद मिळवून देते. आनंदाच्या सघन लहरी अगदी शरीरामधूनही उठत राहतात. या अवस्थेत, आध्यात्मिक भावनेने भरलेले असतानासुद्धा, व्यक्ती हे ऐहिक जीवन, वैवाहिक जीवन जगू शकते. प्रत्येक कृतीमध्ये व्यक्तीला दिव्यत्वाचा आनंददायी आत्माविष्कार आढळतो.

– श्रीअरविंद
(CWSA 09 : 367)