आत्मशोधाच्या पाऊलवाटेवर… (११)
(आश्रमात राहणाऱ्या एका साधकामधील कनिष्ठ प्राणिक प्रकृती ही ईश्वरी शक्तीच्या प्रभावाला विरोध करत आहे. कधीकधी ईश्वरी-इच्छेचे रूप घेऊन स्वत:च्या प्राणिक इच्छा-वासनांची पूर्ती करू पाहत आहे. आपली घुसमट होत आहे, आपण अडकून पडलो आहोत असे त्या साधकाला वाटत आहे. तेव्हा श्रीअरविंद त्याला त्यामधून बाहेर पडण्याचा उपाय सांगतात, आणि नंतर त्याला पूर्णयोगाचे उद्दिष्ट काय आणि आपण आश्रमात कशासाठी आहोत, हे स्पष्ट करत आहेत.)
येथे (श्रीअरविंद आश्रमात) जर कोणत्या एकमेव कृतीला स्थान असेल ती कृती म्हणजे ते अतिमानस, ते दिव्य ‘सत्य’ या पृथ्वीतलावर उतरवणे ही होय. ते दिव्य ‘सत्य’ केवळ मनामध्ये आणि प्राणामध्येच नाही तर, शरीरामध्ये आणि अगदी ‘जडभौतिका’मध्ये देखील उतरवायचे आहे. अहंच्या फैलावण्यावरील सर्व ‘मर्यादा’ काढून टाकणे किंवा त्याला मुक्त वाव देणे आणि मानवी मनाच्या संकल्पनांच्या परिपूर्तीसाठी किंवा अहं-केंद्रित प्राण-शक्तीच्या इच्छा-वासनांच्या पूर्तीसाठी अमर्याद वाव देणे हे आपले उद्दिष्ट नाही. आपण कोणीच येथे ‘आपल्याला जे वाटते ते करण्यासाठी’ आलेलो नाही, किंवा आपल्याला जे करावेसे वाटते ते ज्या जगामध्ये करता येईल असे जग निर्माण करण्यासाठीसुद्धा आपण येथे आलेलो नाही. तर ‘ईश्वराच्या इच्छे’नुसार वागण्यासाठी आपण इथे आलो आहोत. तसेच ज्या जगामध्ये, ‘ईश्वरी इच्छा’ ही तिचे सत्य – मानवी अज्ञानाने विरूप न होता किंवा प्राणिक इच्छेमुळे विकृत न होता, किंवा चुकीच्या पद्धतीने त्याचे आकलन न होता – आविष्कृत करू शकेल अशा एका जगाची निर्मिती करण्यासाठी आपण इथे आहोत.
अतिमानस योगाच्या साधकाने जे कार्य करायचे आहे ते काही त्याचे स्वतःचे कार्य नव्हे, की जिथे तो त्याच्या स्वतःच्या अटी लादू शकेल; तर हे ‘ईश्वरी’ कार्य आहे आणि ते कार्य ‘ईश्वरा’ने नेमून दिलेल्या अटींनुसारच केले गेले पाहिजे. आपला योग हा आपल्यासाठी नाही तर तो ‘ईश्वरा’साठी आहे. आपल्याला आपले स्वतःचे वैयक्तिक आविष्करण करण्यासाठी धडपडायचे नाही; किंवा सर्व मर्यादांमधून, सर्व बंधनांमधून मुक्त झालेल्या वैयक्तिक अहंच्या आविष्करणासाठी देखील धडपडायचे नाही, तर आपले सारे प्रयत्न हे ‘ईश्वरा’च्या आविष्करणासाठी असले पाहिजेत.
– श्रीअरविंद (CWSA 31 : 161-162)