Posts

ज्या प्रकाशाच्या आधारे कृती करायची तो प्रकाशच गवसलेला नसेल तर कृतिप्रवणतेवरील हा सगळा भर निरर्थक ठरतो. योगामधून जीवन वगळता कामा नये, योगामध्ये जीवनाचा समावेश असलाच पाहिजे, याचा अर्थ जीवन आहे तसेच स्वीकारण्यासाठी, म्हणजे त्याच्या अडखळणाऱ्या अज्ञानानिशी, दुःखानिशी, मानवी इच्छा आणि तर्कबुद्धी यांच्या अंधकारमय गोंधळानिशी जीवन स्वीकारण्यासाठी आपण बांधील आहोत, असा होत नाही. जीवन ज्या आवेगांची, उपजत प्रेरणांची अभिव्यक्ती करत असते त्या साऱ्यानिशी जीवनाचा स्वीकार करण्यासाठी आपण बांधील आहोत, असा याचा अर्थ होत नाही.

सातत्याने नवप्रवाह निर्माण करणाऱ्या मानवी बुद्धीमुळे आणि ऊर्जेमुळे सारे काही ठीक होईल असे कृतिप्रवणतेच्या समर्थकांना वाटत असते. परंतु मानवी बुद्धीचा एवढा प्रचंड विकास आणि ज्याला इतिहासामध्ये तुलनाच नाही अशा ऊर्जेच्या अचाट उत्पादनानंतरसुद्धा झालेली जगाची सद्यस्थिती आपण पाहू लागलो तर, कृतिप्रवणतेचे समर्थक ज्या भ्रमामध्ये राहून (त्यांच्या कृतीमुळे सारे काही ठीक होईल या भ्रमामध्ये राहून) परिश्रम करत असतात त्या भ्रमाचा, जगाची सद्यस्थिती म्हणजे सूचक पुरावाच असल्याचे आढळते.

(कृतिप्रवणतेच्या समर्थनाची भूमिका आणि योगाची भूमिका यातील फरक श्रीअरविंद येथे स्पष्ट करत आहेत…) केवळ चेतनेच्या परिवर्तनाद्वारेच या जीवनाचा खरा आधार शोधला जाऊ शकतो, ही ‘योगा’ची भूमिका आहे; अंतरंगाकडून बहिरंगाकडे हा येथे खरंतर नियम असतो. परंतु अंतरंग म्हणजे पृष्ठभागाच्या मागे अर्धापाऊण इंच आतमध्ये असा त्याचा अर्थ होत नाही. व्यक्तीने आत खोलवर जाऊन आपल्या ‘आत्म्या’चा, ‘स्व’चा, आपल्या अंतरंगामध्ये असणाऱ्या ‘दिव्य सद्वस्तु’चा शोध घेतला पाहिजे आणि तेव्हाच आपले जीवन ही खरी अभिव्यक्ती ठरू शकेल; आपण म्हणजे आजवर जी एक अपुरी, अपरिपूर्ण, नेहमीच पुनरावृत्त होणारी गोंधळलेली, धूसर आणि अंध वस्तू होतो त्याऐवजी, आपण काय असू शकतो त्याची, आपले जीवन ही खरी अभिव्यक्ती ठरू शकेल.

आपल्या जुन्याच गोंधळात राहायचे आणि अपघाताने, योगायोगाने का होईना पण कोणतातरी एखादा नवीनच शोध लागेल अशा आशेने अंधारात चाचपडत राहायचे की, जोपर्यंत आपल्या अंतरंगामध्ये व बाहेरही असणाऱ्या देवतेचा शोध आपल्याला लागत नाही आणि आपण आपल्या अंतरंगामध्ये तिची मूर्ती घडवत नाही तोपर्यंत, मागे राहून, अंतरंगातील ‘प्रकाशा’चा शोध घ्यायचा, या दोन्हीमधून आपल्याला एका गोष्टीची निवड करायची आहे.

– श्रीअरविंद [CWSA 28 : 444]

आंतरिक आधार शोधण्यासाठी व्यक्तीने, आपल्या आंतरिक अस्तित्वाच्या अत्यंत सखोल गुहेमध्ये बुडी मारली पाहिजे; व्यक्तीने आत अधिक आत, खोल, अधिक खोल उतरले पाहिजे. मनावर उमटलेले सारे ठसे बाजूला सारून, अक्षुब्ध, अविचल शांतीच्या शोधात, एका स्तरानंतर दुसऱ्या स्तरावर, एका चेतनेनंतर दुसऱ्या चेतनेकडे, असे अगदी खोल गाभ्यातच प्रविष्ट झाले पाहिजे. अस्तित्वाच्या या अतीव अचंचलतेमध्ये (quietude), साऱ्या बाह्य गोंगाटापासून दूर, साऱ्या दुःखयातनांपासून दूर, विचार, कल्पनांपासून दूर, साऱ्या संवेदनांपासून अगदी दूर जात, जिथे अहंकार अस्तित्वातच नसतो अशा स्थानी, ईश्वराचे ‘अस्तित्व’ अनुभवण्यासाठी व्यक्तीने अगदी काळजीपूर्वकपणे अंतरंगामध्ये प्रविष्ट झालेच पाहिजे.

तेथूनही अजून पुढे जावे लागते, शोध घेण्यासारखे बरेच काही शिल्लक असते, जेथे सर्व-शक्तिमान, सर्व-सिद्धिदायिनी ईश्वरी ‘शक्ती’ स्पंदित होत असते, त्या शक्तीकडे चेतना अभिमुख करणे आवश्यक असते. जिथे कोणतीही कृती शिल्लक राहात नाही, कोणताही ठसा उमटलेला नाही, अहंकार नाही, स्वतंत्र अस्तित्व शिल्लक नाही, अन्य काहीही नाही तर फक्त आनंदलहरी आहेत, आणि ज्या ठायी एक परिपूर्ण समत्व असते असे एक स्पंदन; असे एक स्पंदन की जे साऱ्याचे उगमस्थान असते, तिथपर्यंत व्यक्तीने खोल खोल गेले पाहिजे. या परिपूर्ण आणि अक्षर, अविकारी शांतीमध्ये एकात्म पावले पाहिजे, ते ऐक्य अनुभवले पाहिजे…

-श्रीमाताजी [The Supreme by Mona Sarkar]

श्रीमाताजी : मी तुम्हाला काय सांगितले ते लक्षात असू दे. ‘मी’चा शोध घेण्यासाठी कष्ट घ्या. तुमच्यासमोर जो मार्ग मी आखून दिला आहे त्यावर मार्गक्रमण करा. या कार्याइतके अन्य कोणतेच कार्य महत्त्वाचे नाही. याच्याशी तुलना करता इतर कोणतेच कार्य इतके महत्त्वाचे नाही. ‘ईश्वरा’चा शोध घ्यायचा. हेच जीवन आहे, हेच ध्येय आहे, हाच आनंदठेवा आहे. ‘ईश्वरा’वर निस्सीम ‘प्रेम’ करा जेणेकरून ‘तो’ नेहमीच तुमच्यासोबत राहील. सर्व कार्याचा कर्ता-करविता ‘तो’च असू द्यावा. ‘तो’ तुमच्यासोबत कर्म करतो. ‘तो’ तुमच्याबरोबर धडपड करतो, प्रयत्नांची पराकाष्ठा करतो. ‘तो’ प्रत्येक पावलागणिक तुम्हाला मार्गदर्शन करतो. फक्त ‘ईश्वर’च.

– [The Supreme by Mona Sarkar : 97]

श्रीमाताजी : मी सतत तुमच्या सोबत असते आणि या आंतरिक ‘उपस्थिती’विषयी जागृत होणे हा साधनेमधील सर्वांत महत्त्वाच्या मुद्द्यांपैकी एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. तुम्ही ‘क्ष’ला विचारा, तो तुम्हाला सांगेल की ही ‘उपस्थिती’ हा काही केवळ श्रद्धेचा विषय किंवा केवळ मानसिक कल्पनेचा खेळ नाही, तर ती अतिशय सघन अशी वस्तुस्थिती आहे, आणि चेतनेसाठी ती अगदी एखाद्या जडभौतिक गोष्टीप्रमाणे खरीखुरी आणि इंद्रियगम्य असते.

*

साधक : ज्याच्यामुळे मला ईश्वरी ‘उपस्थिती’ची जाणीव सदासर्वदा आणि सर्वत्र होईल अशा प्रकारच्या ईश्वरी ‘प्रेमा’चा उगम मी कोठे व कसा शोधू?

श्रीमाताजी : त्यासाठी तुम्ही आधी ‘ईश्वरा’चा शोध घेतला पाहिजे, एकतर तो शोध तुम्ही आंतरिकीकरणाच्या (interiorisation) आणि एकाग्रतेच्या साहाय्याने तुमच्या स्वतःमध्ये घेतला पाहिजे, किंवा तो शोध तुम्ही प्रेमाच्या आणि आत्म-त्यागाच्या माध्यमातून माझ्यामध्ये किंवा श्रीअरविंदांमध्ये घेतला पाहिजे. एकदा का तुम्हाला ‘ईश्वरा’चा शोध लागला की मग अगदी स्वाभाविकपणे तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये, सर्वत्र त्याचेच दर्शन घडू लागेल.

*

‘ईश्वरा’शी ऐक्य पावण्याचे दोन मार्ग आहेत. एक मार्ग म्हणजे हृदयामध्ये चित्त एकाग्र करायचे आणि ‘त्या’च्या ‘अस्तित्वा’चा शोध लागेपर्यंत अंतरंगामध्ये, आत आत खोलवर जायचे. आणि दुसरा मार्ग म्हणजे ‘ईश्वरा’च्या हाती स्वतःला सोपवून द्यायचे, आणि आईच्या कुशीत जसे लहानगे मूल विसावते तसे त्याच्या कुशीमध्ये, संपूर्ण समर्पणाच्या भावनेने विसावायचे. आणि या दोन मार्गांपैकी दुसरा मार्ग मला स्वतःला अधिक सोपा वाटतो.

– श्रीमाताजी [CWM 16 : 160-161]

ज्या ‘ईश्वरा’च्या प्राप्तीची आपण इच्छा बाळगतो तो कोणी दूरस्थ आणि अप्राप्य नाही. ‘तो’ त्याच्या स्वनिर्मित सृष्टीच्या अंतस्थ गाभ्यात विद्यमान आहे आणि आपल्याकडून ज्या कृतीची त्याला अपेक्षा असते ती कृती म्हणजे ‘त्या’चा शोध. तसेच आपल्या व्यक्तिगत रूपांतरणाच्या साहाय्याने ‘त्या’ला जाणण्यास, ‘त्या’च्याशी एकत्व पावण्यास, आणि अखेरीस जाणीवपूर्वक ‘त्या’ला अभिव्यक्त करण्यास आपण समर्थ बनणे ही होय. याच गोष्टीसाठी आपण स्वतःला समर्पित केले पाहिजे, हेच आपल्या अस्तित्वाचे प्रयोजन आहे. आणि या श्रेष्ठ साक्षात्काराच्या दिशेने पडणारे आपले पहिले पाऊल म्हणजे अतिमानसिक ‘चैतन्या’चे आविष्करण.

– श्रीमाताजी [CWM 13 : 347]