श्रीअरविंदांच्या जन्मापर्यंत, अध्यात्म आणि धर्म हे भूतकाळातील व्यक्तिमत्त्वांभोवती, विभूतींभोवती केंद्रित झालेले होते, आणि ‘पृथ्वीवरील जीवनास नकार’ या उद्दिष्टाकडे ते निर्देश करीत असत. तेव्हा, तुम्हाला दोन पर्यायामधून एकाची निवड करावी लागे : सुखदुःख, आनंद व दु:खभोग यांच्या रहाटगाड्यामध्ये फिरत असलेले, आणि तुम्ही योग्य आचरण केले नाहीत तर, नरकवासाची धमकी देणारे ‘इहलोका’तील जीवन हा एक पर्याय आणि दुसऱ्याच विश्वामध्ये, ‘परलोका’मध्ये पलायन, स्वर्ग, निर्वाण, मोक्ष हा दुसरा पर्याय असे…
या दोहोंमधून एकाची निवड करायची झाली तर निवडीसाठी फारसा वावच नसे, कारण दोन्ही पर्याय तितकेच वाईट असत. या मूलभूत चुकीमुळेच भारतामध्ये दुर्बलता आली, भारताचे अवमूल्यन झाले, हे श्रीअरविंदांनी आपल्याला सांगितले…
या पार्थिव जीवनापासून पलायन करून सत्य गवसणार नाही तर त्यामध्येच राहून, त्याचे परिवर्तन करून, त्याला ‘दिव्य’ बनविण्यामध्येच सत्य सामावलेले आहे; असे केल्याने या ‘भौतिक जगा’मध्येच ‘ईश्वरा’चे आविष्करण घडून येईल, हे श्रीअरविंदांनी दाखवून दिले.
– श्रीमाताजी
(CWM 12 : 210-211)
*