Posts

‘पूर्णयोगा’ची योगसूत्रे – ११

ईश्वरी इच्छा आपल्याकडून केव्हा कार्य करवून घेत आहे, हे आपल्याला कसे कळेल, असा प्रश्न तुम्ही विचाराल. ईश्वरी इच्छा ओळखणे अवघड नसते. ती निर्विवाद असते. तुम्ही योगमार्गावर फारसे प्रगत झालेला नसलात तरीही ती तुम्हाला ओळखता येते. तुम्हाला केवळ त्या इच्छेचा आवाज ऐकता आला पाहिजे, एक सूक्ष्मसा आवाज, जो इथे हृदयामध्ये असतो. एकदा का तुम्हाला हा आवाज ऐकण्याची सवय लागली की, ईश्वरी इच्छेच्या विरोधी असे जे काही तुम्ही कराल, तेव्हा तुम्हाला लगेचच अस्वस्थ वाटू लागेल. तुम्ही जर अयोग्य मार्गावरून तसेच चालत राहिलात तर मग तुम्ही खूपच अस्वस्थ होता. तुमच्या अस्वस्थतेसाठी तुम्ही काही भौतिक कारणे देऊ पाहाल आणि त्या मार्गावर तसेच चालत राहाल तर, मग ही अंत:संवेदन-क्षमता तुम्ही हळूहळू गमावून बसता आणि अंतिमतः तुम्ही सर्व प्रकारच्या चुकीच्या गोष्टी करत राहता आणि तरीही तुम्हाला अस्वस्थता जाणवत नाही. परंतु तुम्हाला किंचितशी जरी अस्वस्थता जाणवली आणि तुम्ही थांबलात व तुमच्या अंतरात्म्याला विचारलेत की, ”याचे कारण काय असेल?” तर तेव्हा तुम्हाला खरेखुरे उत्तर मिळेल आणि मग सर्व गोष्टी अगदी स्वच्छपणे कळून येतील. जेव्हा तुम्हाला काहीसे नैराश्य किंवा थोडीशीही अस्वस्थता जाणवते तेव्हा तुम्ही त्याला भौतिक समर्थन देण्याचा प्रयत्न करू नका. जेव्हा तुम्ही थांबता आणि त्या अस्वस्थतेचे कारण शोधू लागता तेव्हा तुम्ही अगदी सरळ आणि प्रामाणिक असले पाहिजे. सुरुवातीला तुमचे मन एक अगदी समर्थनीय आणि चांगलेसे स्पष्टीकरण रचेल. ते स्वीकारू नका, तर त्याच्या पलीकडे जाऊन पाहण्याचा प्रयत्न करा आणि विचारा, हे जे काही चालले आहे त्यापाठीमागे नेमके काय आहे? मी हे का करत आहे ? शेवटी, मनाच्या एका कोपऱ्यात, एक छोटासा तरंग दडून बसलेला आहे असे तुम्हाला आढळेल – तुमच्या दृष्टिकोनामध्ये असलेले एखादे छोटेसे चुकीचे वळण किंवा तिढा, जो साऱ्या अडचणींचे किंवा अस्वस्थतेचे कारण असतो.

…एखादी गोष्ट ईश्वराकडून आलेली आहे हे तुम्हाला सहजपणे कळू शकते. तुम्हाला मोकळे वाटते, तुम्ही स्वस्थ असता, तुम्ही शांत असता. पण जेव्हा काहीतरी स्वत:हून तुमच्या समोर येते आणि तुम्ही त्यावर झडप घालता आणि ओरडता, “हां, शेवटी मला जे हवे होते ते मला मिळालेच,” तेव्हा तुम्ही नक्की ओळखले पाहिजे की, हे ईश्वराकडून आलेले नाही. समत्व-वृत्ती ही ईश्वराशी एकत्व आणि सायुज्यता साधण्याची एक अत्यावश्यक अट आहे.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 08-10)

समर्पण – ४३

एक गोष्ट तुम्ही जाणून घेतली पाहिजे आणि ठरवली पाहिजे : ती अशी की, खरा ईश्वर जसा आहे तसा तो तुम्हाला हवा आहे की, तो जसा असावा अशी तुमची त्याच्याबद्दलची जी कल्पना आहे, त्याच्याशी मिळताजुळता असणारा असा तो तुम्हाला हवा आहे.

ईश्वराला तुम्ही जसे असावयास हवे आहात तसे बनण्याचे आणि तुम्ही जे करणे त्याला अपेक्षित आहे, ते तुम्ही त्याच्या इच्छेनुसार करण्याचे ठरवले आहे का?

तुम्हाला पाहिजे तसे, तुमच्या स्वतःच्या इच्छेनुसार ईश्वराने करावे व वर्तावे असे तुम्हाला वाटते? का तुम्ही ईश्वराप्रत प्रामाणिकपणाने आणि समग्रतेने समर्पण करण्याचे ठरवले आहे?

– श्रीमाताजी
(CWM 14 : 113)

समर्पण – २५

समर्पणाचा दृष्टिकोन हा प्रारंभापासूनच अगदी परिपूर्ण असा असू शकत नाही परंतु तो खराखुरा असू शकतो – जर केंद्रवर्ती इच्छा ही प्रामाणिक असेल आणि श्रद्धा व भक्ती असेल तर समर्पणाचा दृष्टिकोन खराखुरा असू शकतो.काही विरोधी गतिविधीदेखील असू शकतील, परंतु त्या गतिविधी मार्गामध्ये दीर्घ काळ अडसर बनू शकणार नाहीत आणि आंतरिक दृष्टिकोनाच्या व्यापकतेमध्ये आणि त्याच्या शक्तीमध्ये, कनिष्ठ भागांधील समर्पणाची अपूर्णता ही गंभीररित्या हस्तक्षेप करू शकणार नाही.

*

व्यक्तीने आपल्या मनाची आणि प्राणाचीइच्छा ईश्वरावर लादू नये तर ईश्वराची इच्छा स्वीकारून, तिचे अनुसरण करावे, हा साधनेचा खरा योग्य दृष्टिकोन आहे. “माझा हा हक्क आहे, माझी ही मागणी आहे, माझा हा दावा आहे, माझी ही गरज आहे, ही आवश्यकता आहे, तर मग मला ती गोष्ट का मिळत नाही?” असे व्यक्तीने म्हणता कामा नयेतर स्वतःला देऊ केले पाहिजे, समर्पित केले पाहिजे, व्यक्तीने दुःख करता कामा नये किंवा बंडही करता कामा नये, आणि ईश्वर जे काही देईल त्यात आनंद मानला पाहिजे, हाच अधिक चांगला मार्ग आहे. मग तुम्हाला जे काही प्राप्त होईल तीच तुमच्यासाठी सुयोग्य गोष्ट असेल.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 72), (CWSA 29:75)

समर्पण – २३

… तुमची इच्छा ही ईश्वरी इच्छेला उधार देऊन, तुम्ही साक्षात्कार अधिक त्वरेने घडवून आणू शकता. हे सुद्धा निराळ्या रूपातील समर्पणच असते. ज्यामुळे तुम्ही एखाद्या ठोकळ्यासारखे बनाल असे निष्क्रिय समर्पण तुमच्याकडून अपेक्षित नाही तर, तुम्ही तुमची इच्छा ही ईश्वरी इच्छेच्या स्वाधीन केली पाहिजे.

तुमच्यामध्ये एक इच्छा असते आणि ती तुम्ही अर्पण करू शकता. तुमच्या रात्रींविषयी जागृत होण्याच्या इच्छेचे उदाहरण घेऊ. जर तुम्ही निष्क्रिय समर्पणाचा दृष्टिकोन स्वीकारलात तर तुम्ही म्हणाल, “मी जेव्हा जागृत बनावे अशी ईश्वराची इच्छा असेल तेव्हा मी जागृत बनेन.”

दुसऱ्या बाजूने, जर तुम्ही तुमची इच्छा ईश्वराला समर्पित कराल तर तुम्ही अशी इच्छा बाळगायला सुरुवात कराल, आणि म्हणाल, “मी माझ्या रात्रींविषयी जागृत होईन.” येथे तुम्ही, असे असे व्हावे अशी इच्छा बाळगता, तुम्ही निष्क्रिय राहून नुसती वाट पाहत बसत नाही. “मी माझी इच्छा ईश्वरार्पण करत आहे. मला माझ्या रात्रींविषयी जागृत बनण्याची उत्कट इच्छा आहे, परंतु मला त्याचे ज्ञान नाही, ईश्वराच्या इच्छेद्वारे ते माझ्यामध्ये घडून यावे.” असा दृष्टिकोन जेव्हा तुम्ही बाळगता त्या वेळी समर्पण घडून येते.

तुमची इच्छा ही स्थिरपणे कार्यरत असली पाहिजे, एखादी विशिष्ट कृती किंवा एखादी विशिष्ट गोष्ट हवी म्हणून नाही तर, तुम्हाला अंतिमतः जे ध्येय साध्य करून घ्यायचे आहे त्यावर तुमची सारी उत्कट अभीप्सा एकवटलेली असली पाहिजे. ही पहिली पायरी. जर तुम्ही दक्ष असाल, जर तुम्ही सावधचित्त असाल तर, तुम्हाला काय केले पाहिजे यासंबंधी प्रेरणा स्वरूपात एखादी गोष्ट निश्चितपणे उमगेल आणि मग मात्र तुम्ही त्या पद्धतीने ती गोष्ट केली पाहिजे.

तुम्ही एक गोष्ट मात्र लक्षात ठेवली पाहिजे ती अशी की, तुमच्या कृतीचे परिणाम हे तुम्ही ज्याची अपेक्षा केली होती त्यापेक्षा वेगळे देखील असतील; पण त्यांचाही स्वीकार करणे म्हणजे समर्पण!

– श्रीमाताजी
(CWM 03 : 18-19)