इच्छापूर्तीपेक्षा इच्छेवर विजय मिळविण्यामध्ये अधिक आनंद आहे असे बुद्धाने म्हटले आहे. हा अनुभव प्रत्येक जण घेऊ शकतो, कारण तो अनुभव खरोखरच रोचक असतो.
कोणा एका स्त्रीला पॅरीसमध्ये मॅसिनेटच्या ऑपेराच्या पहिल्या प्रयोगाला बोलाविण्यात आले होते. बहधा मॅसिनेटच्या…हो बहुधा, आता मला नक्की आठवत नाही की तो कोणाचा ऑपेरा होता. त्याचा विषय उत्तम होता, प्रयोगही उत्तम होता, संगीतही ठीकठाक होते. कलाक्षेत्राच्या मंत्रिमहोदयांना सरकारी नाट्यगृहात जेथे नेहमी जागा राखीव ठेवलेली असते त्याठिकाणी त्या स्त्रीला प्रथमच निमंत्रित करण्यात आले होते. हे जे मंत्रिमहोदय होते ते अगदी साधेसुधे गृहस्थ होते, ते गावाकडून आलेले होते, त्यांनी पॅरिसमध्ये फार काळ वास्तव्य केलेले नव्हते, ते मंत्रिमंडळातसुद्धा नवीनच होते, तेव्हा नवनवीन गोष्टी पाहण्या-अनुभवण्यामध्ये त्यांना खरोखर बालसुलभ आनंद मिळत असे. ते अगदी सौजन्यशील गृहस्थ होते आणि त्यांनीच त्या स्त्रीला त्या प्रयोगाला निमंत्रित केलेले असल्यामुळे त्यांनी तिला पहिल्या रांगेतील खुर्ची देऊ केली आणि ते स्वत: मागील खुर्चीवर वसले. पण ते अतिशय खट्टू झाले कारण तेथून त्यांना पुढचे काहीच दृश्य दिसत नव्हते. ते पुढे झुकून, पण तिला कळणार नाही अशा बेताने, समोरील दृश्य पाहण्याचा यथाशक्य प्रयत्न करीत होते. त्या स्त्रीच्या हे लक्षात आले.
वास्तविक, ती पण त्या ऑपेरामध्ये रममाण झाली होती, तिलाही तो ऑपेरा आवडला होता, तिला तो प्रयोग खरंतर खूप आवडला होता पण त्या मंत्रिमहोदयांना तो प्रयोग नीट दिसत नसल्यामुळे ते किती खट्टू झाले आहेत हेही तिला समजत होते. तेव्हा तिने अगदी सहजतेने, तिची खुर्ची मागे घेतली, ती जणू दुसऱ्याच कशाचा तरी विचार करीत आहे असे भासवून थोडीशी मागे रेलली आणि ती अशा रीतीने मागे सरकली की, त्यामुळे त्या मंत्रिमहोदयांना पुढे चाललेला सारा प्रयोग दिसू लागला.
जेव्हा ती अशा रीतीने मागे सरकली आणि समोरील दृश्य पाहण्याची सर्व इच्छा तिने सोडून दिली तेव्हा वस्तूंच्या आसक्तीतून मुक्त झाल्यामुळे, एक प्रकारच्या शांतीने, एका आंतरिक आनंदाच्या जाणिवेने तिचे हृदय भरून गेले; स्वत:चेच समाधान पाहण्यापेक्षा, कोणासाठी काहीतरी केल्याच्या भावनेने ती समाधानी झाली. तिने तो ऑपेरा पाहिला-ऐकला असता तर तिला जो आनंद मिळाला असता त्यापेक्षा, अनंतपटीने अधिक आनंद तिला त्या संध्याकाळी गवसला. हा खराखुरा अनुभव आहे, पुस्तकात वाचलेली एखादी गोष्ट नाही. ती स्त्री त्या काळात बुद्धाच्या शिकवणुकीचा अभ्यास करीत होती आणि तिने हा जो प्रयोग करून पाहिला तो त्या शिकवणीशी मिळताजुळता होता.
आणि हा अनुभव इतका सघन होता, इतका खराखुरा होता… दोन क्षणांनंतर तर तो ऑपेराचा प्रयोग, ते संगीत, ते अभिनेते, ते दृश्य, ती चित्रं सारे सारे तिच्या लेखी अगदी गौण बनून गेले, अगदीच बिनमहत्त्वाचे बनून गेले. त्याच्या तुलनेत स्वत:मधील कोणत्यातरी गोष्टीवर प्रभुत्व मिळविल्यामुळे आणि नि:स्वार्थपणाने केलेल्या कृतीमुळे तिच्या मनामध्ये एक अतुलनीय शांती, आनंद भरून राहिला. अत्यंत आनंदादायी असा तो अनुभव होता. अर्थात, हा काही व्यक्तिगत, खाजगी अनुभव नाही. जो जो कोणी असा प्रयत्न करेल त्याला त्याला हा असाच अनुभव येईल.
– श्रीमाताजी
(CWM 07 : 37-38)