Posts

आत्मशोधाच्या पाऊलवाटेवर… (२७)

(उत्तरार्ध)

(‘ईश्वरा’प्रति आत्मदान करण्याची प्रेरणा) ही प्रेरणा प्राणिक इच्छा नसते तर ती आत्म्याची प्रेरणा असते; (त्या पाठीमागे) एक तर्कही असतो पण तो मनाचा तर्क नसतो, तर तो आत्म्याचा आणि जीवात्म्याचा तर्क असतो. तेथेही एक मागणी असते, पण ती मागणी म्हणजे प्राणिक लालसा नसते तर ती आत्म्याची अंगभूत अभीप्सा असते. जेव्हा, “मी तुझा अमुक कारणासाठी शोध घेत आहे, मी तुझा त्या करणासाठी शोध घेत आहे,” अशी भाषा जाऊन तेथे, “मी तुझा शोध केवळ तुझ्यासाठीच घेत आहे,” असा बदल घडून येतो; म्हणजे जेव्हा निव्वळ आत्मदान घडून येते तेव्हा अशा प्रकारची अभीप्सा उदयाला येते. कृष्णप्रेम (रोनाल्ड हेनरी निक्सन नावाचे एक ब्रिटिश साधक, यांनी वैष्णव संप्रदायाचा स्वीकार केला.) जेव्हा म्हणतात, ‘ज्ञान नको, हेही नको आणि तेही नको, तर फक्त कृष्णच हवा,” तेव्हा त्यांना ‘ईश्वरा’च्या या अदभुत आणि अनिर्वचनीय केवलाविषयी बोलायचे असते.

‘ईश्वरा’ची ओढ ही खरोखरच एक सुस्पष्ट अनिवार्यता असते, आपल्यामधील जीवात्मा ‘ईश्वरा’कडे ओढला जातो कारण त्याला त्या महत्तर ‘आत्म्या’ची अनिवार्य हाक आलेली असते. जीवात्मा आपल्या आराध्य दैवताकडे अनिवार्यपणे ओढला जातो, कारण ‘ईश्वरा’शिवाय त्याचे अस्तित्वच असू शकत नाही. कारण जीवात्मा हा जीवात्मा असतो आणि ‘ईश्वर’ हा ‘ईश्वर’ असतो. ‘ईश्वरा’साठीच ईश्वराचा शोध, अन्य कशासाठीही नाही, असे आम्ही जेव्हा म्हणत असतो, तेव्हा त्याचा नेमका अर्थ काय असतो हे स्पष्ट व्हावे म्हणून, (अर्थात जेवढे स्पष्ट करण्याजोगे होते तेवढे) मी हे सर्व लिहिले आहे. स्पष्टीकरण करण्याजोगे असू देत वा नसू देत, आध्यात्मिक अनुभूतीची ही एक सर्वात प्रभावी वास्तविकता असते. ‘आत्मदानाची प्रेरणा’ ही या वास्तविकतेची केवळ एक अभिव्यक्ती असते.

परंतु याचा अर्थ असा होत नाही की, मी तुमच्या ‘आनंदा’च्या मागणीवर आक्षेप घेत आहे. जोपर्यंत तुमच्या व्यक्तित्वाच्या कोणत्याही एखाद्या भागाला तशी गरज असते, तोपर्यंत तुम्ही खुशाल त्याची मागणी करू शकता, कारण जोपर्यंत आपल्यामध्ये सदोदित असलेली निरपवाद आंतरिक हाक, स्वतःला पृष्ठस्तरावर नेण्यासाठी जोर लावत नाही तोपर्यंत (आनंद, प्रकाश, शक्ती, ज्ञान, शांती इत्यादी) याच गोष्टी व्यक्तीला ‘ईश्वरा’कडे घेऊन जाणाऱ्या असतात. आणि ही आंतरिक हाक खरोखरच अगदी आरंभापासूनच असते आणि पाठीशी असते – ती आध्यात्मिक सुस्पष्ट अनिवार्यता असते, आत्म्याची ‘ईश्वरा’प्रति असलेली ही निखालस (absolute) गरज असते.

त्या ठिकाणी ‘आनंद’ असताच कामा नये, असे काही माझे म्हणणे नाही. आत्मदान म्हणजेच स्वयमेव एक अपार ‘आनंद’ असतो, आणि जेव्हा ते आत्मदान स्वत:सोबत ‘आनंद’ घेऊन येते, तेव्हा ते एक अनिर्वचनीय ‘आनंद’ जागृत करते आणि इतर कोणत्याही पद्धतीपेक्षा, (निःस्वार्थी आत्मदान करणे) या पद्धतीद्वारे हा ‘आनंद’ लवकर गवसतो, म्हणून एखादी व्यक्ती असे म्हणू शकते की, “निःस्वार्थी आत्मदान ही सर्वोत्तम नीती आहे.” अर्थातच केवळ एक ‘नीती’ म्हणून ती व्यक्ती ते आत्मदान आचरणात आणत नाही. ‘आनंद’ हे फल असते, पण या फलासाठी आत्मदान केले जात नाही, तर ते स्वयमेव आत्मदानासाठी आणि साक्षात ‘ईश्वरा’साठीच केले जाते – यामध्ये अगदी सूक्ष्मसा फरक आहे; तो मानसिक आहे असे वाटेल, पण त्यामध्ये खरोखरच फरक असतो.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 12-13)

(श्रीमाताजींनी ‘विश्वात्मक’ प्राणाशी किंवा ‘ईश्वरी’ आनंदाशी एकात्म पावलेल्या व्यक्तिगत प्राणासंबंधी विवेचन केले आहे. एकदा का ही एकात्मता साधली की मग प्राणाचे व्यक्तिगत अस्तित्व शिल्लक राहत नाही, असे त्या म्हणतात.)

उदाहरणार्थ, क्वचितच एखाद्या मानवी वातावरणाने दूषित न झालेल्या गावाकडील निर्जन रस्त्यावरून, जेथे निसर्ग एखाद्या अभीप्सेसारखा, एखाद्या पवित्र प्रार्थनेसारखा अगदी शांत, विशाल, विशुद्ध असतो अशा ठिकाणी किंवा पर्वतराजीमध्ये, दऱ्याखोऱ्यांमध्ये, शेजारून खळाळणारे पाण्याचे प्रवाह जिथे वाहत आहेत अशा भटक्या वाटांवरून, किंवा अथांग सागरकिनाऱ्यावरून व्यक्ती जेव्हा एकटीच आपल्या नादात फिरत असते, किंवा ज्याच्याबरोबर त्या व्यक्तीचा पूर्ण सुसंवाद असतो अशा जोडीदाराच्या सहवासात विहार करत असते, तेव्हा तेथे तिला जी संवदेना जाणवत असते ती म्हणजे एक सूक्ष्मसा आनंद असतो, तो मधुर आणि अगाध असतो. जोपर्यंत प्राण व्यक्तिगत असतो, तोपर्यंत हा आनंद बाह्य परिस्थितीवर अवलंबून असतो. जेव्हा (व्यक्तीचा) ‘प्राण’ खऱ्या अर्थाने अवैयक्तिक, विश्वात्मक झालेला असतो, तेव्हा ‘ज्यांना ज्यांना त्याची जाणीव असते त्या सर्वांमध्ये असलेला, आल्हाददायक आनंदच’ ती व्यक्ती होऊन जाते; अशा वेळी व्यक्तीला त्या गोष्टीचा आनंदोपभोग घेण्यासाठी, आजूबाजूला कोणतीही विशिष्ट भौतिक परिस्थिती असण्याची आवश्यकता नसते. नाडीगत स्तराबाबत (Nervous plane) सांगायचे तर, अशावेळी व्यक्ती सर्व प्रकारच्या परिस्थितींपासून पूर्णतः मुक्त असते. त्यावेळी व्यक्तीला मुक्ती प्राप्त झालेली असते.

– श्रीमाताजी
(CWM 02 : 119-120)

विचार शलाका – ०३

सर्व वेदना, दुःखभोग, संकटे, चिंता, अज्ञान आणि सर्व प्रकारच्या अक्षमता, दुर्बलता ह्या गोष्टी विलगतेच्या भावनेतून आल्या आहेत. संपूर्णतया केलेले आत्मदान, संपूर्ण आत्मनिवेदनात (consecration) झालेला ‘मी’चा विलय, यामुळे दुःखभोग नाहीसे होतात आणि त्याची जागा, आनंदाने घेतली जाते की, जो कशानेही झाकोळला जात नाही.

आणि असा आनंद जेव्हा या जगामध्ये स्थापित होईल, तेव्हाच दुःखभोगाचे खरेखुरे रूपांतरण झालेले असेल, आणि येथे एक नवजीवन, नवनिर्माण व नव-प्रचिती असेल. हा आनंद सर्वप्रथम चेतनेमध्येच स्थापित झाला पाहिजे. तसे झाले म्हणजे मगच भौतिकाचे रूपांतरण होईल, तत्पूर्वी नाही.

खरे तर, ‘विरोधी'(शक्ती) सोबतच दुःखभोग या जगात आले. आणि असा आनंदच केवळ त्या दुःखभोगांना पराभूत करू शकतो, त्या दुःखभोगांचा अंतिमतः निर्णायक पराभव करू शकेल असे अन्य कोणीही नाही.

‘दिव्यानंदा’नेच निर्मिती केली आहे आणि पूर्णतेस नेणाराही ‘दिव्यानंद’च असेल.

हे मात्र नीट लक्षात ठेवा की, सामान्यतः लोक ज्याला आनंद म्हणतात, त्या आनंदाविषयी मी हे बोलत नाहीये. तो आनंद म्हणजे खऱ्याखुऱ्या आनंदाचे व्यंगचित्रही शोभणार नाही. मला वाटते, इंद्रियसुख, आत्मभानशून्यता आणि बेपर्वाई यांपासून मिळणारा आनंद हा व्यक्तीला मार्गच्युत करणारा राक्षसी आविष्कार असतो.

मी ज्या आनंदाविषयी बोलते आहे, तो आनंद म्हणजे परिपूर्ण शांती, छायाविरहित प्रकाश, सुसंवाद, संपूर्ण व सर्वांगीण सौंदर्य, अनिरुद्ध सामर्थ्य होय. तो असा आनंद आहे की, जो अर्करूपाने, ‘संकल्प’रूपाने आणि त्याच्या ‘जाणिवे’ने, स्वत:च एक ईश्वरी ‘अस्तित्व’ आहे!

– श्रीमाताजी
(CWM 07 : 396-397)

साधनेची मुळाक्षरे – २०

(श्रीमाताजी येथे भक्तिभावातून होणाऱ्या प्रगतीविषयी सांगत आहेत.)

भक्तीची भावना अंतःकरणात असेल तर अशा व्यक्तीला अडथळे, अडचणी यांच्या धक्क्यांची देखील तमा वाटत नाही. ते तुमचे काय वाईट करू शकणार? …व्यक्ती त्याची गणतीच करत नाही. इतकेच नव्हे, कधीकधी तर ती त्यावर हसतेसुद्धा. अधिक वेळ लागला तर त्याने तुम्हाला काय फरक पडणार आहे? अधिक वेळ लागला तर तेवढाच अधिक वेळ तुम्हाला अभीप्सेचा, आत्म-निवेदनाचा, आत्म-दानाचा आनंद मिळेल.

कारण तोच एकमेव खराखुरा आनंद असतो. आणि जेव्हा त्यामध्ये काहीतरी अहंभावात्मक आड येते तेव्हा तो आनंद मावळतो कारण तेथे एक प्रकारची मागणी असते – व्यक्ती त्याला गरज असे संबोधते – ती मागणी या आत्म-निवेदनात मिसळते. अन्यथा हा आनंद कधीच मावळत नसतो.

हा आनंद ही अशी गोष्ट असते की, जी व्यक्तीला सर्वप्रथम प्राप्त होते आणि सर्वात शेवटी उमगते. आणि हा आनंद हीच विजयाची खूण असते.

जोपर्यंत तुम्ही स्थिर, शांत, प्रकाशमान, अविचल अशा आनंदामध्ये सदासर्वकाळ नसता, तोवर तुम्हाला स्वतःचे शुद्धीकरण करण्यासाठी परिश्रम करावे लागणार, असा याचा अर्थ आहे, कधीकधी पुष्कळच परिश्रम करावे लागतात. पण ही त्याचीच खूण असते.

विभक्ततेच्या भावनेतूनच वेदना, दुःख, यातना, अज्ञान आणि सर्व प्रकारच्या अक्षमता येतात. निःशेष आत्म-दान, ‘स्व’ला विसरून केलेल्या आत्म-निवेदनानेच दुःखभोग नाहीसे होतात आणि त्यांची जागा असा आनंद घेतो की जो कशानेच झाकला जाऊ शकत नाही.

– श्रीमाताजी
(CWM 07 : 396)

ईश्वरी कृपा – ०८

एक अशी ‘सत्ता’ आहे, जिच्यावर कोणताही सत्ताधीश हुकमत गाजवू शकणार नाही; असा एक ‘आनंद’ आहे की, जो कोणत्याही लौकिक यशातून प्राप्त होणार नाही; असा एक ‘प्रकाश’ आहे, जो कोणत्याही प्रज्ञेच्या ताब्यात असणार नाही; असे एक ‘ज्ञान’ आहे की, ज्यावर कोणतेही तत्त्वज्ञान किंवा कोणतेही विज्ञान प्रभुत्व मिळवू शकणार नाही; एक असा ‘परमानंद’ आहे की, कोणत्याही इच्छापूर्तीच्या समाधानातून तसा आनंद मिळू शकणार नाही; अशी एक ‘प्रेमा’ची तृष्णा आहे, जिची तृप्ती कोणत्याही मानवी नातेसंबंधातून होऊ शकत नाही; अशी एक ‘शांती’ आहे, जी व्यक्तिला कोठेच प्राप्त होत नाही, अगदी मृत्युमध्येसुद्धा प्राप्त होत नाही. ही ‘सत्ता’, हा ‘आनंद’, हा ‘प्रकाश’, हे ‘ज्ञान’, हा ‘परमानंद’, हे ‘प्रेम’, ही ‘शांती’ ‘ईश्वरी कृपे’पासूनच प्रवाहित होते.

– श्रीमाताजी
(CWM 01 : 380)

स्वत:चा विचार न करता, स्वत:साठी न जगता, स्वतःशी काहीही निगडित न ठेवता; जे परमोच्च सुंदर, तेजोमय, आनंदमय, शक्तिवान, करुणामय, अनंत आहे केवळ त्याचाच विचार करणे, त्या विचारांमध्ये निमग्न राहणे ह्यामध्ये इतका अगाध आनंद आहे की त्याची तुलना दुसऱ्या कशाबरोबरच होऊ शकत नाही.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 269)