Posts

आत्मशोधाच्या पाऊलवाटेवर… (२५)

(भगवद्गीतेमध्ये आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी आणि ज्ञानी या चार प्रकारच्या भक्तांचे उल्लेख आले आहेत. त्यातील ‘अर्थार्थी’ भक्ताच्या भक्तीविषयी एका साधकाने श्रीअरविंदांना काही प्रश्न विचारला असावा असे दिसते. त्याला श्रीअरविंद यांनी दिलेले उत्तर…)

‘ईश्वरा’कडून काहीतरी मिळावे म्हणूनच केवळ ईश्वर-प्राप्तीची धडपड करायची हा दृष्टिकोन उचित नाही, हे उघडच आहे; पण (अशा गोष्टी मिळवायच्या असतील तर ‘ईश्वरा’कडे वळूच नका असे सांगून) त्यांना पूर्ण मज्जाव केला तर जगातील बहुतांशी माणसं ‘ईश्वरा’कडे कधीच वळणार नाहीत. माणसांची ईश्वराभिमुख होण्यास किमान सुरूवात तरी व्हावी म्हणून या गोष्टींना मुभा देण्यात आलेली आहे असे मला वाटते – त्यांच्यामध्ये श्रद्धा असल्यास, त्यांनी जे मागितले आहे ते त्यांना मिळू शकेल आणि मग या मार्गाने पुढे जाणे बरे आहे, असे त्यांना वाटू लागेल परंतु पुढे कधीतरी अचानकपणे एके दिवशी, ‘हे असे करणे बरं नाही’, (काहीतरी मागण्यासाठीच ‘ईश्वरा’कडे वळायचे हे बरं नाही) या विचारापाशी ते येऊन पोहोचतील; ‘ईश्वरा’भिमुख होण्याचे अधिक चांगले मार्ग आहेत आणि अधिक चांगल्या वृत्तीने ‘ईश्वरा’कडे वळले पाहिजे, हे त्यांना कळेल.

त्यांना जे हवे होते ते त्यांना मिळाले नाही आणि तरीसुद्धा जर ते ‘ईश्वरा’भिमुख झाले आणि त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला तर, आता त्यांची (ईश्वराभिमुख होण्याची) तयारी होत आहे हे दिसून येते. ज्यांची अजूनपर्यंत तयारी झालेली नाही अशा लोकांसाठीची ती (अर्थार्थी दृष्टिकोन ही) बालवाडी आहे, असे समजून आपण त्याकडे पाहूया. पण अर्थातच हे काही आध्यात्मिक जीवन नव्हे, हा केवळ एक अगदी प्राथमिक धार्मिक दृष्टिकोन झाला.

काहीतरी देणे आणि (त्या मोबदल्यात) कशाचीही मागणी न करणे हा आध्यात्मिक जीवनाचा नियम आहे. तथापि साधक, त्याचे आरोग्य उत्तम राहावे किंवा त्याच्या तब्येतीमध्ये सुधारणा व्हावी यासाठी, त्याच्या साधनेचा एक भाग म्हणून, ‘ईश्वरी शक्ती’ची मागणी करू शकतो; जेणेकरून आध्यात्मिक जीवन जगण्यासाठी त्याचे शरीर सक्षम होईल, सुयोग्य होईल आणि तो ‘ईश्वरी कार्या’साठी एक सक्षम साधन बनू शकेल.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 08-09)

विचारशलाका २८

 

आध्यात्मिक जीवनामध्ये प्रवेश म्हणजे जणू समुद्रात उडी मारल्याप्रमाणे ‘दिव्यत्वा’मध्ये उडी घेणे. आणि तरीदेखील तो शेवट नसतो तर तो प्रारंभ असतो. कारण एकदा का तुम्ही त्यामध्ये उडी घेतली की, त्यानंतर तुम्हाला ‘दिव्यत्वा’मध्ये जीवन जगता आले पाहिजे. “मी कोठे पडणार तर नाही नां? मला काही होणार तर नाही नां?” असा कोणताही विचार न करता तुम्हाला सरळ उडी मारायची असते. तुमच्या मनामध्ये असणारी चलबिचल तुम्हाला रोखू पाहत असते. पण तुम्ही स्वत:ला झोकून दिले पाहिजे. तुम्हाला समुद्रात उडी मारायची असेल आणि तुम्ही जर सगळा वेळ असा विचार करीत बसलात की, ”अरे बापरे, पण इथे किंवा तिथे एखादा खडक असला तर…” तर मग, तुम्ही कधीच उडी मारू शकणार नाही.

अर्थातच समुद्रात उडी मारण्यापूर्वी ज्याप्रमाणे तुम्ही समुद्र पाहिलेला असला पाहिजे आणि ज्याप्रमाणे तुम्हाला त्याविषयी काही माहिती असली पाहिजे त्याप्रमाणेच, तुम्हाला ‘दिव्य सद्वस्तू’चे (Divine Reality) आधी थोडी तरी झलक दिसलेली असली पाहिजे. ती झलक म्हणजे सहसा आंतरात्मिक चेतनेची (psychic consciousness) जागृती असते. भले तो संपर्क अगदी सखोल आंतरात्मिक किंवा समग्रतया प्रस्थापित झालेला नसला तरीदेखील, तुम्हाला किमान एक सुस्पष्ट अशी मानसिक वा प्राणिक प्रचिती (mental or vital realisation) तरी आलेली असली पाहिजे. तुम्हाला तुमच्या अंतरंगामध्ये किंवा बाहेर सुस्पष्टपणे ‘ईश्वरी उपस्थिती’ची जाणीव झालेली असली पाहिजे, तुम्हाला ‘दिव्य-जगता’चा श्वास जाणवलेला असला पाहिजे. आणि त्याचवेळी त्याविरुद्ध असणाऱ्या सामान्य जगताचा घुसमटवून टाकणारा दबाव तुम्हाला जाणवलेला असला पाहिजे की जो, तुम्हाला या दडपून टाकणाऱ्या वातावरणातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करण्यास भाग पाडतो. तुम्हाला जर तसा अनुभव आलेला असेल तर तुम्ही केवळ त्या ‘दिव्य सद्वस्तू’मध्ये नि:शेषतया आश्रय घेणे आणि त्याच्या आधाराने, त्याच्या सुरक्षेमध्ये, केवळ त्यामध्येच राहणे एवढेच करायचे असते. तुम्ही तुमच्या सामान्य जीवनामध्ये कधीतरी हे अंशत: किंवा तुमच्या अस्तित्वाच्या काही भागांनिशी वा कधीतरी, नैमित्तिकरित्या असे केले असेल तर ते आता तुम्ही पूर्णांशाने आणि सदासर्वदासाठी केले पाहिजे. ही उडी तुम्हाला मारायची आहे आणि जर तुम्ही हे केले नाहीत, तर तुम्ही वर्षानुवर्षे ‘योगसाधना’ करत राहिलात तरीही खऱ्या आध्यात्मिक जीवनाविषयी तुम्हाला काहीही माहीत होणार नाही, अशी शक्यता असते. संपूर्णतया आणि नि:शेषतया उडी मारा; तेव्हा तुम्ही या बाह्य गोंधळापासून पूर्णत: मुक्त व्हाल आणि तुम्ही आध्यात्मिक जीवनाची खरीखुरी अनुभूती प्राप्त करून घ्याल.

– श्रीमाताजी [CWM 03 : 21-22]

विचारशलाका २०

 

(श्रीअरविंदांनी एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून…)

एखाद्याला लौकिकतेचा त्याग करून, फक्त पारलौकिकतेची निवड करायची असेल आणि त्याच्या या निवडीमुळे त्याला जर शांती लाभत असेल तर त्याने खुशाल तसे करावे. शांती लाभावी म्हणून, लौकिकतेचा त्याग करणे मला स्वत:ला आवश्यक वाटले नाही. माझ्या ‘योगा’मध्ये (पूर्णयोग) सुद्धा, माझ्या कार्यक्षेत्रात भौतिक आणि आध्यात्मिक अशा दोन्ही विश्वांचा समावेश करण्यासाठी आणि केवळ वैयक्तिक मुक्तीसाठी नव्हे तर, येथील दिव्य जीवनासाठी, दिव्य ‘चेतना’ आणि दिव्य ‘शक्ती’ लोकांच्या अंत:करणात व या पार्थिव जीवनात स्थापित करण्यासाठी मी प्रवृत्त झालो आहे, असे मला आढळून आले.

अन्य ध्येयं जशी आध्यात्मिक आहेत, तसेच हे ध्येयदेखील ‘आध्यात्मिक’ आहे असे मला वाटते आणि या जीवनात लौकिक, पार्थिव गोष्टींचा पाठपुरावा करणे, त्यांचा जीवनात समावेश करणे यामुळे, आध्यात्मिकतेला कलंक लागेल किंवा त्याच्या भारतीयत्वाला काही बाधा येईल असे मला वाटत नाही. माझा तरी वास्तवाबद्दलचा आणि विश्वाचे, वस्तुंचे, ईश्वराचे स्वरूप याविषयीचा हा अनुभव व हा दृष्टिकोन राहिलेला आहे. हे त्यांबाबतचे जवळजवळ समग्र सत्य असल्यासारखे मला वाटते आणि म्हणूनच त्याचे अनुचरण (pursuit) करणे याला मी ‘पूर्णयोग’ म्हणतो. पण अर्थातच, एखाद्याला पूर्णतेची ही संकल्पना मान्य नसेल आणि तो ती नाकारत असेल किंवा या लौकिक जीवनाचा संपूर्णतया परित्याग करून, पारलौकिक जीवनावर भर देणाऱ्या आध्यात्मिक आवश्यकतेवर तो विश्वास ठेवत असेल तर तसे करण्यास तो मोकळा आहे, पण तसे असेल तर माझा ‘योग’ (पूर्णयोग) आचरणे त्याला शक्य होणार नाही.

– श्रीअरविंद [CWSA 35 : 234]

आध्यात्मिकता १८

जे साधक परिपूर्णतेपर्यंत किंवा त्या जवळपाससुद्धा पोहोचलेले नाहीत त्यांच्या बोलण्यातले आणि वागण्यातले अंतर, त्यांचे विपरीत वर्तन तुम्ही पाहता आणि आध्यात्मिक अनुभव वगैरे असे काही नसते किंवा त्यात काही अर्थ नसतो असे तुम्ही म्हणता; परंतु त्या साधकांचे वर्तन हे तुमच्या म्हणण्यासाठी पुरावा कसा काय ठरू शकतो? एखाद्या माणसाला जेव्हा कधी कोणत्याही प्रकारचा आध्यात्मिक अनुभव येतो किंवा साक्षात्कार होतो तेव्हा लगेचच त्या क्षणी तो माणूस एक निर्दोष किंवा दुर्बलता-विरहित असा परिपूर्ण मनुष्य बनला पाहिजे, असे तुम्ही लिहिले आहे. हे म्हणजे एक अशी अपेक्षा करण्यासारखे आहे की, ज्या अपेक्षेचे समाधान करणे अशक्य आहे आणि अशी अपेक्षा बाळगणे म्हणजे, ‘आध्यात्मिक जीवन हा एकाएकी घडून येणारा, अवर्णनीय असा चमत्कार नसून, आध्यात्मिक जीवन म्हणजे एक प्रकारचा विकास आहे.’ या तथ्याकडे दुर्लक्ष करण्यासारखे आहे. एखादा साधक हा आधीपासूनच सिद्ध-योगी आहे असे समजून त्याचे मूल्यमापन करता येऊ शकत नाही. प्रदीर्घ मार्गावरील जेमतेम पाव टक्के किंवा त्याहूनही कमी अंतर जे चालून गेले आहेत, त्यांच्याबाबतीत तर असे मूल्यमापन करताच कामा नये….

इतकेच काय पण, अगदी महान योगीसुद्धा पूर्णत्वप्राप्तीचा दावा करत नाहीत, आणि ते तसे अगदी परिपूर्णतया निर्दोष नसल्यामुळे, त्यांची ‘आध्यात्मिकता’ मिथ्या आहे किंवा तिचा या जगाला काही उपयोगच नाही, असे तुम्ही म्हणू शकत नाही. शिवाय आध्यात्मिक माणसं ही अनेक प्रकारची असतात. त्यांच्यापैकी काही जण त्यांना आलेल्या आध्यात्मिक अनुभवांवरच समाधानी असतात आणि बाह्य जीवनातील पूर्णत्व किंवा प्रगती यांच्यासाठी प्रयत्नशील नसतात. काहीजण संत असतात, तर काही जणांना संतत्वाचा ध्यास नसतो. अन्य काही जण वैश्विक चेतनेमध्ये, ‘सर्वव्यापी ईश्वरा’च्या संपर्कात किंवा त्याच्याशी सायुज्य पावून जीवन जगण्यामध्ये आणि स्वत:च्या माध्यमातून सर्व प्रकारच्या शक्तींना क्रीडा करू देण्यामध्ये समाधानी असतात, म्हणजेच ते ‘परमहंस’ स्थितीमध्ये असलेल्या व्यक्तीच्या वर्णनाप्रमाणे असतात.

…कोणत्यातरी एका काटेकोर व्याख्येमध्ये बसावावी किंवा एखाद्या ठरावीक बंदिस्त मानसिक नियमामध्ये बांधून ठेवावी अशी ‘आध्यात्मिक जीवन’ ही काही एक वस्तू नाही, तर ‘आध्यात्मिक जीवन’ हे उत्क्रांतीचे एक विशाल क्षेत्र आहे, ‘आध्यात्मिक जीवन’ म्हणजे असे एक विशाल साम्राज्य असते, की त्याच्या अधिपत्याखाली असणाऱ्या अन्य सर्व साम्राज्यांहूनही अधिक विशाल असण्याची क्षमता त्याच्या ठायी असते; ज्यामध्ये शेकडो प्रांत असतात, हजारो प्रकार असतात, स्तर असतात, रूपं असतात, मार्ग असतात, आध्यात्मिक आदर्शांमध्ये विभिन्नता असते, आध्यात्मिक उपलब्धीच्या विविध श्रेणी असतात.

– श्रीअरविंद [CWSA 31 : 656-657]

आध्यात्मिक जीवनामध्ये प्रवेश म्हणजे जणू काही समुद्रात उडी मारल्याप्रमाणे दिव्यत्वामध्ये उडी घेणे. आणि तरीदेखील तो शेवट नसतो तर ती केवळ सुरुवात असते. कारण एकदा का तुम्ही त्यामध्ये उडी घेतली की, त्यानंतर तुम्हाला दिव्यत्वामध्ये जीवन जगता आले पाहिजे. तुम्ही ते कसे करू शकता? “मी कोठे पडेन? नंतर माझे काय होईल?” असा कोणताही विचार न करता तुम्हाला सरळ उडी मारायची असते. तुमच्या मनामध्ये असणारी चलबिचल तुम्हाला रोखू पाहते. पण तुम्ही स्वत:ला जाऊ दिले पाहिजे. तुम्हाला समुद्रात उडी मारायची असेल आणि जर तुम्ही सगळा वेळ असाच विचार करीत बसलात,”अरे बापरे, पण इथे किंवा तिथे एखादा दगड असेल इ..” तर तुम्ही कधीच उडी घेऊ शकणार नाही.

पण अर्थातच समुद्रात उडी मारण्यापूर्वी ज्याप्रमाणे तुम्ही समुद्र पाहिलेला हवा आणि तुम्हाला त्याविषयी काही माहिती हवी त्याप्रमाणेच तुम्हाला दिव्य सद्वस्तूचे आधी थोडे का होईना दर्शन घडलेले असावे. हे दर्शन म्हणजे सहसा चैत्य जाणिवेची जागृती असते. भले त्या दिव्य सद्वस्तूशी अगदी खोलवरचा चैत्यमय वा संपूर्ण संपर्क प्रस्थापित झालेला नसला तरीदेखील किमान एक सुस्पष्ट असा मानसिक वा प्राणिक साक्षात्कार तरी तुम्हाला झालेला असला पाहिजे. तुम्हाला सुस्पष्टपणे तुमच्या अंतरंगामध्ये किंवा बाहेर ईश्वरी उपस्थितीची जाणीव झालेली असली पाहिजे, तुम्हाला दिव्य विश्वाचा श्वास जाणवला असला पाहिजे. आणि त्याचवेळी त्याविरुद्ध अशा या सामान्य जगताचा घुसमटवून टाकणारा दाब तुम्हाला जाणवलेला असला पाहिजे की जो, तुम्हाला या दडपून टाकणाऱ्या वातावरणातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करण्यास भाग पाडेल. जर तुम्हाला तसा अनुभव असेल तर तुम्ही केवळ त्या दिव्य सद्वस्तूमध्ये नि:शेषतया आश्रय घेणे आणि त्याच्या आधाराने, त्याच्या सुरक्षेमध्ये, केवळ त्यामध्येच राहणे एवढेच करावयाचे आहे. तुम्ही तुमच्या सामान्य जीवनामध्ये कधीतरी हे अंशत: किंवा तुमच्या अस्तित्वाच्या काही भागांनिशी वा कधीतरी, नैमित्तिकरित्या असे केले असेल तर ते आता तुम्ही पूर्णांशाने आणि सदासर्वदासाठी करावयास हवे. ही उडी तुम्हाला मारावयाची आहे आणि जर तुम्ही हे केले नाहीत, तर तुम्ही वर्षानुवर्षे योगसाधना करीत राहिलात तरीही खऱ्या आध्यात्मिक जीवनाविषयी तुम्हाला काहीही माहीत होणार नाही ह्याची शक्यता असते. संपूर्णतया आणि नि:शेषतया उडी मारा; तेव्हा तुम्ही या बाह्य गोंधळापासून पूर्णत: मुक्त व्हाल आणि आध्यात्मिक जीवनाची खराखुरी अनुभूती प्राप्त करून घ्याल.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 21-22)